।।श्रीराम।।
पडवीवरचा दासबोध
लेखिका- आशालता उर्फ आक्का वेलणकर
दिवस १८ वा
विलास व गणपती
वाड्याबाहेरच चर्चा करीत होते.
‘मी आजींना विचारू कां? आपले शरीर पंचमहाभूतांचे, पण भूते आली कोठून?’ विलास गणपतीला म्हणाला.
गणपती म्हणाला, ‘मला पण विचारावेसे वाटते की, एकमेकांत मिसळूनही
ती कार्य कशी करतात?’
इतक्यांत मधुकर आला, ‘वा! वा! मलापण विचारायचं आहे की, ही भूते एकामागून एक
किती किती दिवसांनी, महिन्यांनी तयार झाली?’
इतक्यांत सुधा आणि जया पण
आली, ‘कसली रे वाटाघाट चालली आहे?’ सुधाने विचारले.
जया म्हणाली, ‘मला प्रश्न पडला की, परब्रह्म काहीच करीत नाही तर
त्याचे स्वामित्व तरी कसं मानायचं?’
सुधा म्हणाली, ‘चला आता! वेळ झाली. आजी
पायरीवर आल्या बघ.’
पाचहीजण हातपाय धुवून
पडवीवर आले. वंदानादिक आटोपले. सर्व स्थानापन्न झाले.
‘बाळांनो! आज बराच कांही
विचार करून येताहात!’ आजी म्हणाल्या.
सुधा म्हणाली, ‘आजी! न सांगता तुम्हाला
कसें कळलं?’
‘अगं त्यात काही गुपीत नाही.’ आजी म्हणाल्या. ‘तुमच्या
मनांत काहीतरी विचारायचं आहे हा भाव चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय. आपल्या मनातील
विचाराच प्रतिबिंब चेहऱ्यावर स्पष्ट दिसतं. जणू काही आरसाच तो. विचारा. जरूर
विचारा. समर्थच देतील उत्तरे.’
मधू म्हणाला, ‘मी आधी विचारतो. काल आपण आपल्या शरीरातील पंच
भूतांचा अभ्यास केला. ती भूत कीती कीती अंतराने तयार झाली? ती कार्य कशी करू शकतात?’
‘आणि आजी!’ विलास म्हणाला, ‘माझी शंका अशी की, ही भूते आली कोठून व कशी?’
‘छान!’ आजी म्हणाल्या, ‘आज चर्चेला चांगला विषय मिळाला. समर्थ दासबाधात
म्हणतात बघं.’ पंचभूतें त्रिगुणाकार | अवघा वायोचा विकार | जाणीवनेणीवेचा विचार | वायोचि करितां ||९-६-११||श्रीराम||
विलास म्हणाला, ‘आता या भूतांना अंगड टोपडं लागलंच. हे गुण म्हणजे
त्यांना दोरीने बांधले कां? सुटे सुटे होते त्यांची मोळी केली कां?’
आजी हसल्या, ‘तू सांगितलास गुण याचा अर्थ दोरी. तो बरोबर
आहे.पण, दासबोधात हे गुण म्हणजे कार्य करण्याची शक्ती. आपण कोणतेही काम केलं तरी
त्यांत वर्गवारी असतेच. तुमच्य वर्गात म्हणजे यत्तेत १ त १० क्रमांकात पास झालांत
की उत्तम. त्यांत पहिला क्रमांक म्हणजे विशेष. ११ ते २५ पर्यंत मध्यम. गुण म्हणजे
मार्ग बेताचे पास होण्यास लागणारे. लाल रेघ एखाद दुसरी पण वर पाम हा ना कनिष्ट नां
मध्यम. आणि नापास म्हणजे कनिष्ठच असे असते की नाही?’
‘तसेच! त्या महान दिव्य
शक्तीमध्ये म्हणजे परब्रह्मामध्ये, मूळ माया उद्भवली. तीच तीव्र इच्छा शक्ती.
तिच्यात तीन गुण सुप्त अवस्थेत असतातच. १) सत्वगुण, २) रजोगुण, ३) तमोगुण.’
सत्वगुण जाणीवयुक्त ज्ञानमय असतो. तो १ला वर्ग.
रजोगुण थोडी जाणीव थोडी नेणीव खिचडी. २ रा वर्ग म्हणजे मध्यम. तमोगुण पूर्ण नेणीव,
हा तिसरा वर्ग. या गुणामुळेच वैचित्र्य निर्माण झाले. मूळमायेला स्वस्थ बसवेना.
साम्यावस्थेत, सुप्त अवस्थेत असलेल्या गुणांना प्रगट करावेसे वाटले. तेव्हाच तिला
गुणमयी माया असे नांव पडले. थोडक्यांत म्हणजे काही सूचले नाही की, विलास, गणपती एकमेकांस धक्का देतात किंवा चापटी मारतात
मग मधू त्यांना खोडसाळ म्हणतो. तोपर्यंत दोघे सूज्ञच असतात व आहेत. तस्सेच हे गुण
प्रगट झाल्यावर ती मूळ माया गुणमयी झाली.
‘सत्वगुणांतुन अंत:करण,
मन, बुध्दी, चित्त, अहंकार
तयार झाले. याला अंत:करण पंचक म्हणतात. रजोगुणातुन पांच ज्ञानेंद्रीये व पांच
कर्मेंद्रीये व त्यांची कार्य शक्ती म्हणजे देवता तयार झाल्या. तमोगुणांतुन
पंचमहाभूते निर्माण झाली. पाचांची नाव एकदम कशी सांगणार? एकानंतर दुसरे असेच नाव सांगावे
लागेल. चकत्यांची चवड एकावर एक ठेवूनच करावी लागते. इच्छा शक्ती म्हणजे वायूच. पण
तो रहाणार कुठे म्हणजे पोकळी आधी तयार होऊन त्यात वायू संचरला. पोकळी म्हणजे अवकाश
म्हणजेच आकाश. ते वायून भरले. वाऱ्याला हालचालीला खूपच जागा मिळाली. वेग वाढला,
घर्षण झाले. तेज निर्माण झाले.’
विलास म्हणाला, ‘थांबा आजी! म्हणजे कसे झाले? आईने पोळ्या करायचे मनांत आणले. परात
घेतली. परात म्हणजे पोकळी, आकाश समजू. त्यात कणीक घेतली. कणकेत मीठ, तेल घातले.
पाणी कालवुन कणकेचा गोळा केला. त्याचे गोळे गोळे करून पोळ्या केल्या. एकावर एक
ठेवल्या. एकापाठोपाठ काम झाले. त्याच कणकेच्या पुऱ्या केल्या, पापड्या केल्या.
म्हणजे जणू नाना प्राणी तयार झाले असेच ना?’
‘होय!’ आजी म्हणाल्या, ‘जवळ जवळ असेच. वायूच्या घर्षणातून
अग्नी म्हणजे तेज तयार झाले. उष्ण भागातून सूर्यदेव तर थंड भागातून पाणी तयार
झाले. पाणी आटले घट्ट घट्ट व्हायला लागले. तीच पृथ्वी, जमीन तयार झाली. डोंगर
जाले, पर्वत झाले. आपण तिच्यावर वावरतो. बहूगुणी वसुंधरा! ही पांच भूते व तीन गुण यांना काय
म्हणायचं?
कणकेच्या गोळ्यावर लाटण्याची भाजण्याची प्रक्रीया झाली. रूप मिळाले, नाम आले.
पोळ्या, पुऱ्या पापड्या तशी ही झाली अष्टधा प्रकृति.’
गणपती
म्हणाला, ‘आजी! पृथ्वी दिसते. तिच्यावर आपण रहातो.
पाणी दिसते. सूर्यरूपाने अग्नी दिसतो. पण वायू आणि आकाश दिसत नाही.’
सुधा
म्हणाली, ‘दिसत
नाही, पण वायू हलला की वारा आला असे आपण म्हणतो. तो भासतो, जाणवतो. पोकळी अफाट
आहे. ही पृथ्वी त्या पोकळीतच आहे. पोकळी म्हणजे आकाश. व्यापक पण व सूक्ष्म म्हणून हातात
धरून दाखवता येत नाही.’
आजी म्हणाल्या, ‘या आकाशापेक्षाही परब्रह्मशक्ती व्यापक व सूक्ष्म
आहे. विकारी नाही. आकाशाला निरभ्र, ढगाळलेले हे विकार आपण चिकटवतो. ते परब्रह्मात
नाहीत. म्हणून अत्यंत शुध्द निर्मळ त्याचे श्रेष्ठत्व मानायला हवे.’
मधुकर म्हणाला, ‘पण हे विकार तरी कसे निर्माण झाले?’
आजी म्हणाल्या, ‘तुला चित्रे काढता येतात. तुझ्याकडे रंगपेटी आहे,
काळा रंग व पांढरा रंग एकत्र केला तर?’
विलास म्हणाला, ‘पारवा रंग तयार होतो. आजी निळा नि पिवळा एकत्र
केला तर हिरवा होतो.’
‘शाब्बास!’ आजी म्हणाल्या, ‘असे एकात एक मिसळून अनेक रंग तयार होतात. वाच ही
ओवी.’ ऐसें रंग नानापरी | मेळवितां पालट धरी | तैसें दृश्य हें विकारी | विकारवंत ||९-६-४१||श्रीराम||
आजी म्हणाल्या, ‘मुळातला एकरंग विविधतेने नटतो. तसा एकच विकार
एकमेकांत मिसळून अनेकानेक विकार तयार होतात. आणि या विकारांना भुलून मनुष्य त्यांत
अडकतो.’
मधु म्हणाला, ‘पण हे विकार बाधतात. त्यातून सुटावे, मोकळे
व्हावे हे कळते कशाने?’
आजी म्हणाल्या, ‘छान विचारलेस! परब्रह्माने मायेला
जशी खेळ खेळण्याची शक्ती दिली. तशी त्याला ओळखण्याची पण शक्ती दिली. तिचे नांव
जाणीव. जाणीव म्हणजे ज्ञान. ही जाणीव आहे नाही कसे ओळखतात. वाच तू...’ सावध आहे तों स्मरण | विकळ होतां विस्मरण | विस्मरण पडतां मरण | पावती प्राणी ||९-७-२५||श्रीराम||
आजी म्हणाल्या, ‘माणसाची बुध्दी शुध्दीत असते तोपर्यंत जाणीव
असते. स्मरण रहाते. आठवते. पण माणूस बेशुध्द झाला की जाणीव लोप पावते. आठवतच नाही.
विस्मरण होते. ही जाणीव संपूर्णपणे लोप पावली की तो माणूस गेला. म्हणजे त्याला
मृत्यू आला, मरण पावला असे आपण म्हणतो. देहाला मरण आल्यावर त्याला ना दु:ख ना सुख. जाणीव गेली तसे अज्ञान पण गेले.’
विलास म्हणाला, ‘आता मनुष्य मरण पावला म्हणजे ते बध्दपणापासून
सुटला. मोकळा झाला. मग ज्ञानाचा काय उपयोग?’
आजी म्हणाल्या, ‘सांगते! देह संपला खरे. पण
शेवटच्या क्षणाला जी इच्छा आत उद्भवली असेल त्या इच्छापूर्ती करीता त्याला,
म्हणजेच अंत:करणाला
जीवाला नवा देह घ्यावा लागतो. म्हणजे पुन्हा बंधनात पडतो. तो देह माणसाचाच मिळेल
असे नाही. कर्माप्रमाणे चांगल्या वा हीन योनीत जन्म मिळेल.’
गणपती
म्हणाला, ‘अस
अडकायची इच्छा नसेल, सुटण्याची म्हणजे मुक्त होण्याची इच्छा असेल तर?’
आजी
म्हणाल्या, ‘तू
ओवीच वाच. समर्थांनी सांगूनच छेवलंय....’ तैसें जयास ज्ञान जालें | ते ते तितुकेच तरले | ज्याचें बंधनचि तुटलें | तोचि मुक्त ||९-७-३६||श्रीराम||
आजी म्हणाल्या, ‘तैसे म्हणजे, या ओवीच्या आधी समर्थांनी पोहणाराचे
उदाहरण दिले. ज्याला पोहता येते तो पूर आलेली नदी सुध्दा पार करून जातो. पण ज्याला
पोहता येत नाही तो बुडेल. नदीच्या पुरात तर बुडेलच. पण
साध्या खोल पाण्यांत सुध्दा बुडेल. म्हणून माया नदी किवां भवसागर ज्याला तरून
जायची इच्छा आहे त्यानेतरण्याचा उपाय शोधलाच पाहीजे. म्हणजेच ज्ञान मिळवलेच
पाहीजे. ज्ञान म्हणजे?’
सुधा म्हणाली, ‘त्यालाच म्हणतात स्वरूप ज्ञान, म्हणजे मी कोण ही
जाणीवच हवी की!’
‘बरोबर!’ आजी म्हणाल्या. ‘ज्याला हे ज्ञान होते तो मोहात सापडत नाही. खरं
काय खोट काय त्याला कळते. तो तरतो. फसत नाही. कारण.....’ ज्ञात्याची उगवली वृत्ती | बद्धाऐसी न पडेल गुंती | भुकेल्याची अनुभवप्राप्ती | धाल्यास नाहीं ||९-७-५६||श्रीराम||
‘ज्याचे जेवून पोट भरले त्याला भुकेलेल्याला काय
होते हे कसे कळणार? जया आता तू वाच ही ओवी. ..’ मनाच्या वृत्ती नाना | त्यांत जन्म घेते वासना | वासना पाहातां दिसेना | परंतु आहे ||९-८-१२||श्रीराम||
आजी म्हणाल्या, ‘वासना म्हणजे इच्छा अगदी सूक्ष्म असतात. मी
ब्रह्म आहे ही जाणीव शुध्द, निर्मळ, अनंत आहे. ही जाणीव सुध्दा वायूरूपाने असते व
विषय वासना इच्छा पण वायूरूपच असतात. कल्पना वायुरूपच.
हा वायू मोठा कारभारीच
आहे. वायू हलू लागला, हालचाल करू लागला, हालचाल करू लागला की, त्याला वारा
म्हणतात. वारा काय करतो?’
विलास म्हणाला, ‘सोसाट्याचा वारा घरावरची कौले, पत्रे उडवतो. झाडे
पाडतो. ढगांना गोळा करतो पसरवतो पण.’
गणपती म्हणाला, ‘दामूअण्णांच्या अंगावरून वारे गेले म्हणे. ते तर
अपंगच होऊन बसलेत. या वाऱ्यालाच एका विशिष्ठ शक्तीने एकत्र आणले की त्याला मंत्र
म्हणतात. मंत्र म्हणून सापाचे विंचवाचे विष उतरवतात. मंत्राने प्रेते सुध्दा
उठतात. भूते घालवतात. मंत्र म्हणून बाण सोडत व युध्द होत असत.’
आजी म्हणाल्या, ‘बरोबर! मंत्र किती प्रभावी
असला तरी ब्रह्मांडाला भेदेल. ब्रह्माला भेदूच शकणार नाही.’
जया म्हणाली, ‘आजी आकाशांत ब्रह्म आहे. आकाशाचा भेद केला की
ब्रह्माचा भेद झाला असे नाही कां होत?’
‘नाही!’ आजी म्हणाल्या, ‘आकाश सर्वव्यापी, निर्मळ ब्रह्मासारखे जरा आहे
तरी सुध्दा......’ पंचभूतांमधें वास | म्हणौन बोलिजे आकाश | भूतांतरीं जो ब्रह्मांश| तेंचि गगन ||९-९-२१||श्रीराम||
‘बाळांनो! पंचमहाभूतात आकाश
वरिष्ट. भूतमात्रांतला ब्रह्मांश म्हणजे आकाशच. आकाश सोडून उरलेली चार भूते आली
काय आणि गेली काय ते तसेच रहाते हा ब्रह्माचा एक गुण आकाशात आहे. म्हणून ते
ब्रह्मसदृश मानतात.’ सागरामधें खसखस | तैसें परब्रह्मीं दृश्य | मतीसारिखा मतिप्रकाश | अंतरीं वाढे ||९-९-२९||श्रीराम||
सुधा म्हणाली, ‘मी
सांगते अर्थ, समुद्रात खसखस पडली तर तिचा थांग पत्ताच लागणार नाही. त्या अफाट
समुद्रापेक्षाही ब्रह्म अफाट, म्हणून ज्याला ब्रह्मज्ञान हवे आहे त्याने बुध्दीचा
विकास करावा. बुध्दीला विशाल करावी. करिता करिता फाटतेच आणि परब्रह्मात मिसळते.’
विलास म्हणाला, ‘बेडकी फुगली. पण बैलाएवढी नाही झाली. तिचे पोट
फुटले.’
आजी म्हणाल्या, ‘ती देहाने फुगली. म्हणून पोट फुटले. बुध्दी
वायूरूप विशाल होता होता विरळ होते व मूळ रूपात मिसळते. हे विवेकाने जाणावे. गणपती
तू वाच. ...’ विवेकें तुटें अनुमान | विवेकें होये समाधान | विवेकें आत्मनिवेदन | मोक्ष लाभे ||९-९-३९||श्रीराम||
विलास म्हणाला, ‘सोपे आहे. विवेक!
विवेकाला हाताशी धरायचे.’
आजी म्हणाल्या, ‘बरोबर! समर्थ हेच सांगतात.
....’ लोकिक बरा संपादिला| परी अंतरीं सावध नाहीं जाला | मुख्य देवास चुकला | तो आत्मघातकी ||९-१०-९||श्रीराम||
‘नुसता लौकीकांत मोठेपणा मिळवून चालत नाही.’ आजी म्हणाल्या. ‘मुख्य
देव म्हणजे परब्रह्म. आत्मज्ञानाने परब्रह्मास जाणले नाही तर आत्म घातकीच.’
‘तें ब्रह्मरूप आपणचि आंगें | सारासारविचारप्रसंगें | करणें न करणें वाउगें | कांहींच नाहीं ||९-१९-३१||श्रीराम|| आपण ब्रह्मरूपच आहोत असा विवेकाने अनूभव आला की कर्म अकर्म हा विचारच
उद्भवत नाही. काय करू? कसं करू? कोडेच सुटते. शांत,
शून्यासारथी स्थीर वृत्ती होते.’
सुधा म्हणाली, ‘म्हणजे ब्रह्मात विलीन होण्याची पात्रता आली, असेच म्हणायचे ना?’
‘होय!’ आजी म्हणाल्या, ‘पण देह असतानाच हे साधायचे. मग आनंदच आनंद.’
विलास म्हणाला, ‘आजी! आपण सगळ्यांनी
उत्तम साधना केली की हा आनंद आपण सर्वजण एकाच वेळी अनुभवू शकू कां?’
‘कां नाही? म्हणूनच या
बुध्दीमंताची प्रार्थना करायची की आमची बुध्दी स्थीर ठेव.’
सर्वांनी हात जोडले.
भीमरूपी स्तोत्र म्हटले. वंदन केले. आजी आनंदून म्हणाल्या,
।। जय जय रघूवीर समर्थ ।।
Atishay sundar aahe aapla blog.
उत्तर द्याहटवा