मंगळवार, ८ डिसेंबर, २०२०

पडवीवरचा दासबोध, दिवस २७ वा

 

।।श्रीराम।।

पडवीवरचा दासबोध

लेखिका- आशालता उर्फ आक्का वेलणकर

दिवस २७ वा

     कालचीच रडवेली जया आनंदीत चेहऱ्याने आली. उशीर नव्हता झाला. पण सगळ्यात शेवटी आली इतकेच.

     ये! सावकाश ये! अजुन सुरुवात झाली नाही. आजी म्हणाल्या.

     सर्वांना नमस्कार करून जया सांगू लागली. तशी मी रोजच्या सारखीच निघाले. पण वाटेत केशवच्या आईने पांच दहा मिनिटे थांबवून घेतले. केशवच्या विद्यालयात सध्या उन्हाळी शिबीर आहे. काल त्याची आई तेथे गेली होती. केशवचा गोष्टी सांगण्याचा काल कार्यक्रम होता. त्याने साने गुरूजींच्या गोड गोष्टी यातली एक गोष्ट सांगितली. हाव भावासह सांगितली. त्याचा  पहिला नंबर आला. त्याला बक्षीस मिळाले. मिठाईपण मिळाली. त्याच्या आईने तर मला मिठीच मारली. मला पेढे दिले. म्हणून यायला उशीर झाला. आज आपण हा प्रसाद वाटू या.

     सगळ्यांनीच टाळ्या वाजवल्या. आजींचा आनंद डोळ्यातून वाहू लागला. बाळांनो!’ आजी म्हणाल्या, आली ना प्रचिती! ईश सेवा समजून कार्य केले की देव अशा आनंद स्वरूपात प्रगट होतो. कीर्ती रूपाने प्रसाद देतो. जयाचा सुट्टीचा काळ सार्थकी लागला हा तिचा आनंद. आपल्या संस्थेतल्या विद्यार्थ्याला मोठ्या समाजात छान गोष्ट सांगता आली. आपल्या संस्थेचे नांव राखले हा मुख्याध्यापकांचा आनंद. बक्षीस मिळाल्याचा केशवला आनंद. मुलाने समाजात अंध असून नांव गाजवले हा आईचा आनंद. पहा हा आनंद कसा पसरला.

     जया म्हणाली, आजी! या सगळ्यांच्या मूळाशी तुम्ही आहांत. तुम्ही मला पुस्तके दिलीत व त्याचा उपयोग कसा करायचा हे सांगितलेत म्हणून हे जमले.

     हे झाले तुझ्या दृष्टीकोनातून!’ आजी म्हणाल्या, मला तरी तुला सांगावेसे वाटले हे समर्थ प्रेरणेनेच ना? दासबोध समर्थांचा. म्हणजे या सर्व कार्याचे मूळ समर्थच. सद्गुरूंची किमया ही अशीच असते. अमृतवेलच ही. अवगुणांचा त्याग घडला की प्रचितीला वेळ नाही लागत. समर्थ सांगतात ती पथ्ये मात्र पाळली पाहिजेत. जया पहिले पथ्य तूच वाच... आचारभ्रष्ट होऊं नये | दिल्यां द्रव्य घेऊं नये | उणा शब्द येऊं नये | आपणावरी ||१४-१-||श्रीराम||

     छान!’ आजी म्हणाल्या, समर्थांचा शुध्द आचारावर फार भर आहे. अशुध्द वागणूकीने मनुष्य पशुवत ठरतो. काम केले तर दाम ठिक आहे. पण कोणी तसेच दिले तर मिंधेपणा येतो. तसे कष्टाशिवाय कोणाचे द्रव्य घेऊ नये. निस्पृहपणाने वागायचे म्हणजे कसे?  तुम्हाला पटलयं. परवा तुम्ही खाऊचे पुडे स्विकालेत पण पैशाची पाकीटे परत केलीत हे उत्तम. आपले बोलणे सदा गोड असावे. कोणाचाही हीन शब्द आपल्या बाबतीत येऊ नये. मग नाव लौकीक वाढायला वेळ लागत नाही.

     कोमतेही काम काळजी करून यशस्वी होत नाही. काळजी घ्यावी की यश आपलेच. तेवढ्यासाठी काय करावे? गणपती आता तू वाच.... पोटीं चिंता धरूं नये| कष्टें खेद मानूं नये | समइं धीर सांडूं नये | कांहीं केल्या ||१४-१-१३||श्रीराम||

     सुधा म्हणाली, आजी! चिता आणि चिंता, फक्त अनुस्वाराचा फरक पण चिता माणसाला जाळून राख करते. चिंता सारखी पोखरतच रहाते. तसेच खायला आधी आधी आणि कामाला कधी बधी असेही नसावे. कष्टाळू वृत्तीचा मनुष्य कधीही उपाशी रहात नाही. प्रसंग कसलाही असो धैर्य गळू देऊ नये. धैर्यवान मनुष्य सर्वही संकटांना तोंड देऊ शकतो.

            विलास म्हणाला, शिवाजी महाराजांचे धैर्य वाखाणण्या सारखे नाही कां? फळांच्या पेटाऱ्यातून सही सलामत सुटले. आग्र्याहून मजल दरमजल करीत पुण्यांत येऊन पोहोचले.

     सुधा म्हणाली, धैर्य तर खरेचं. पण आठ आठ दिवस आधी योजना आखणे व भोयांचे सहाय्य, त्यापेक्षा हिरकणी गवळण! तिचे धैर्य मोलाचे. बाळासाठी जीवाची पर्वा न करता कड्यावरून उडी घेतली. आड वळणाने काट्याकुट्यातून अंधारात वाट काढीत घर गाठले. हिरकणी बुरूज अजून या गोष्टीची साक्ष देतोय.

     आजी म्हणाल्या, खऱ्या आहेत या गोष्टी. पण माणसाला हे केव्हा साधते? गणपती वाचेल. ऐका.... नित्यनेम सांडूं नये | अभ्यास बुडों देऊं नये | परतंत्र होऊं नये |ांहीं केल्यां ||१४-१-२२||श्रीराम||

     आजी म्हणाल्या, आदर्श जीवन जगायचे म्हणजे काही नियम म्हणजेच नेम आपणच घालून त्याप्रमाणे वागायला हवे. देहाला सवय पडली की, शिस्तबध्द कामे होतात.  

     विलास म्हणाला, आजी! आम्ही येथे हातपाय धुवून बसतो. ही सवय कशी छान लागली. मी खरं सांगतो, शाळेतून आल्यावर मला अशी भूक लागे की, जेमतेम बुट काढून मी पाणी पित असे. आई ओरडायची पण माझी सवय काही जात नव्हतीच. आता आई बाबा माझे कौतुक करतात. घरांत मी थोडे थोडे आईचे काम पण करतो.

     गणपतीने त्याच्या पाठीवर छानच शाबासकी दिली.

     मधुकर म्हणाला, आजी! अभ्यास बुडो देवू नये. हा अभ्यास शालेय नसणारच.

     आजी म्हणाल्या, समर्थांना सांगायचय साधने बद्दलच. अभ्यास म्हणजे सराव सोडला की नुकसान. सततच्या अभ्यासाने कला जिवंत रहाते. ज्ञानाला उजाळा मिळतो. मात्र मी ज्ञानी हा फुंजही वाढू देऊ नये.

     गणपती म्हणाला, गर्वाचा फुगा फटदिशी फुटला की, पितळ उघड पडायच नाहीतर!

     बरोबर आहे!’ आजी म्हणाल्या, समर्थांनी स्पष्टच केलयं. ज्ञानगर्व धरूं नये| सहसा छळणा करूं नये | कोठें वाद घालूं नये | कोणीयेकासी ||१४-१-४८||श्रीराम||

     आजी म्हणाल्या, बाळांनो! येथे छळणे म्हणजे छळणे, त्रास देणे नव्हे. दुसऱ्याचा बुध्दी भेद करून आपले म्हणणे दुसऱ्यावर लादू नये. जबरदस्तीने कामे होत नाहीत. मानीत मानीत शिकवावे. पण आपण नम्र असावे. जर ही समर्थांची शिकवण लक्षांत ठेऊन आपण वागलो, तर जगातील सगळीच सुखे आपल्या पायाशी लोळण घेतील. कशालाच कमतरता असणार नाही.

     पुन्हा गंमत अशी की, ज्ञानाची जोपासना केली व ज्ञानाची वाढ व्हावी ही पोटी आस असली की त्याने प्रचाराकरिता थोडे फिरावे. लोक संग्रह करावा. संघटना शक्ती वाढवावी.

     विलास म्हणाला, पण असली कामे दुसऱ्या गावांत जाऊन करायची म्हणजे जेवायचे खायचे कोठे?’

     आजी म्हणाल्या, याचे उत्तर देखील समर्थांनी दिले आहे... पृथ्वीमधें देश नाना | फिरतां उपवासी मरेना | कोणे येके ठाईं जना | जड नव्हे ||१४-२-१७||श्रीराम||

     विलास! आपल्यातील लोकसेवेच्या गुणामुळे ईश्वर आपली सर्व चिंता वहातो. त्या त्या गावात सहजच आपली रहाण्या खाण्याची सोय होते. थोडे मोठे व्हा. आणखी दोन वर्षे जाऊ देत. आपणच पांच सहाजण एक दोन गावे फिरून प्रचिती घेऊ या.

     विलास म्हणाला, पण त्याचे आधी तयारी?’

     आजी म्हणाल्या, समर्थच तयारीचा मार्ग दाखवतात. बघ तूच वाच. आजींनी ओवी दाखवली... जेणें घडे भगवद्भक्ती | जेणें घडे विरक्ती| ऐसिया कवित्वाची युक्ती | आधीं वाढवावी ||१४-२-४||श्रीराम||

     म्हणजे आपण सगळ्यांनी कवी व्हायचं की काय?’  विलासने विचारले.

     आजी म्हणाल्या, व्हाव अस लागतच नाही. शुध्द भक्तीने मूलाधार चक्र शुध्द होते. आपोआपच काव्य स्फुरते. ते सुध्दा प्रासादीक काव्य स्फुरते. त्यात उत्कट भाव आपोआप येतो. आपण फक्त आपली जबाबरदारी त्याच्यावर टाकायची. मी नाही तूच असे आतून विश्वासाने वाटून तसे वागायचे.

     माकडीणीचे पिल्लू आईच्या पोटाला घट्ट बिलगून असते म्हणून स्थलांतर करताना ते पडत नाही. योग्य ठिकाणी आल्यावर आई त्याला दूर सारते, तेव्हा ते उड्याच मारण्यास दूर जाते.

     याच्या उलट मांजरी आपल्या पिल्लाला मानेवर तोंडात धरते व पिल्लाचे डोळे उघडत नाहीत तोपर्यंत ७ ठिकाणी फिरवते. पिलांची काही तक्रार नाही. तुला वाटेल तिकडे ने. माझा सांभाळ करणारी तूच आहेस. हा विश्वास पक्का असतो.

     आता सांगा, आपण माकडाच्या पिल्लांसारखे रहायचे की मांजराचे पिल्लू?’

     मधुकर म्हणाला, मांजराच्या पिल्लासारखे वागायचे. पूर्णपणे ईश्वरावर अवलंबून. तो ठेवील त्यांत आनंद. तोंडाने वल्गना पण करायची नाही.

     आजी म्हणाल्या, शाब्बास! समर्थांचे वचन असेच आहे बघ..... क्रियेवीण शब्दज्ञान | तया न मानिती सज्जन | म्हणौन देव प्रसन्न | अनुतापें करावा ||१३-३-५||श्रीराम||

     एकदा कां दिव्य शक्ती पाठीशी आहे असे पक्के झाले की, जीवन निर्धास्त जगावे. मात्र भगवंताबद्दलचे उत्कट प्रेम जीवंत झऱ्याप्रमाणे सतत झुळझुळ वहाणारे असावे. अशा भक्ताचे जीवन कसे असते?’ जो भगवद्भजनेंवीण | जाऊं नेदी येक क्षण | सर्वकाळ अंतःकरण | भक्तिरंगें रंगलें ||१४-३-२४||श्रीराम||

     भगवंताचे विस्मरण म्हणजे मरणच वाटावे.

     विलास म्हणाला, आजी! मी खरं सांगतो, चहाबरोबर आईने बिस्कीटे दिली नाहीत, तर मी मागून घेतो. अशी कशी विसरलीस? तिला विचारतो. नसली तरी चालतील, असे होत नाही. पण मारूती स्तोत्र एखाद दिवशी विसरतो. दोन दिवसांनी आठवण आली की म्हणतो. असं कां बरं होतं?’

     छान विचारलेस!’ आजी म्हणाल्या, चहा बरोबर बिस्कीटे लहानपणापासून खात आहेस. त्याच्याशी पक्की मैत्री जमली आहे. तशी नामाशी अजून जमली नाही. मारूती स्तोत्र आत्ता आत्ता म्हणायला सुरूवात केली आहेस. रोज म्हणायचा सराव झाला की, आपोआप त्या त्या वेळी मुखात येईल. नाना नामे भगवंताचीं| नाना ध्यानें सगुणाचीं | नाना  कीर्तनें  कीर्तीचीं | अद्‍भूत  करावीं||१४-४-||श्रीराम||

     आजी म्हणाल्या, सगळं एकदम एकाकी होत नाही. सकाळी स्नान केल्यावर सूर्यदर्शन घ्यावे. जमलं तर नमस्कार घालावेत.

     गणपती म्हणाला, आजी! मधूने आम्हाला नमस्कार शिकवले. आम्ही दोघे रोज बारा सूर्यनमस्कार घालतो.

     वा! वा!’ आजी म्हणाल्या, सूर्याची बारा नांवे सांगशिल?’

     विलास म्हणाला, आजी! व्यायाम म्हणून आम्ही नमस्कार घालतो. नांवे घेत नाही.

     आजी म्हणाल्या, ॐ मित्राय नम:। म्हणावे व नमस्कार घालावा. ॐ रवये नम:। शांतपणे दुसरा नमस्कार घालावा. दोन्ही साधते. नाम व व्यायाम. प्रात:स्मरणीय बारा नांवे. तोंड पूर्वेला करून नमस्कार घालावेत. शक्यतो सकाळी सातचे आत. कठीण नाही. जेवणापूर्वी देवाचे स्मरण करावे. झोपतांना श्लोक म्हणावेत. नमस्कार करून झोपावे. एकदा इंद्रियांना सवय लागली की कामे आपोआप होतात. आठवण ठेवावी लागत नाही.

     गणपती म्हणाला, आजी! माझे बाबा म्हणाले, की ते लहानपणी संध्या पण करीत होते. नमस्कार घालत होते. काही कारणाने संध्या बंद पडली. तरी नमस्कार घालत होते. शाळा संपली कॉलेज सुरू झाले. अभ्यास वाढला हे निमित्त पण नमस्कारही बंद पडले. पुढे नोकरी आता ब्लडप्रेशर... पण मला शाबासकी देत म्हणाले कायम घाल. चांगलीच गोष्ट. तुझे नमस्कार पाहून मला आनंद होतो.

     आजी म्हणाल्या, असं होत बऱ्याच जणाच. निमित्त अनेकानेक. मुख्य गोष्ट आळस व लाज वाटते. मग आवड कमी होते. गरज नाही अशी वृत्ती वाढते. तेथेच सावध रहायला हवे. ते वय गध्दे पंचविशीचं!

     गध्दे पंचविशी, सगळे एकदमच म्हणाले व हसले.  

     आजी म्हणाल्या, समर्थांनी एक धोक्याचा कंदील दाखवला आहे पहा! निर्गुण नेलें संदेहानें | सगुण नेलें ब्रह्मज्ञानें | दोहिकडे  अभिमानें  |  वोस  केलें  ||१४-५-९||श्रीराम||

     काय गंमत आहे पहा. परब्रह्म कसे हे शब्दांनी आपल्याला कळले आहे. सगुण की निर्गुण?’

     निर्गुण!’ सगळ्यांनी एकदम उत्तर दिले.

            आजी म्हणाल्या, परब्रह्म अव्यक्त, निर्गुण, चर्मचक्षुंना दिसत नाही. मग ते आहे की नाही? शंकाच येत रहातात. सत्संगाने श्रवण घडले. आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान बुध्दीत शिरले म्हणून सगुणी, मूर्तीची देवदेवतांची पूजा अर्चा करिता करिता सगुण नाशिवंत कळले. म्हणून पूजा बंद पडली. नाशिवंताची पूजा कशाला करा? हातचे गेले. पळत्याचे पाठीस लागलो ते पण हुकले. शेवटी दोन्हीकडून देहाभिमानामुळे मनुष्य फसतो. मग फक्त देह सुखाच्या मागे लागतो. पैसा प्रपंच व्यवहार यातच स्वत:ला रमवतो व आनंद मानतो.

     संताचे याच्या विरूध्द वागणे असते. ते देहाने सर्व व्यवहार सांभाळतात. इतर लोंकाप्रमाणेच वागतात पण, नम्र होऊन राजांगणीं | निःशंक जावें लोटांगणी| करताळिका नृत्य वाणीं | नामघोषें गर्जावें ||१४-५-१७||श्रीराम||

     भगवंताचे मंदिरापुढे नम्रपणाने नमस्कार घालण्यात त्यांना संकोच वाटत नाही. लोटांगण घालताना देहभाव नसतो. हाताने टाळ्या वाजवतात. प्रसंगी नृत्य करतात. भगवंताचे नाम मनापासून घेतात. देहभाव कुठल्या कुठे जातो. आनंदाने भारावतात. समर्थ म्हणतात तेच खरे धन्य... मन ठेऊन ईश्वरीं | जो कोणी हरिकथा करी | तोचि ये संसारीं | धन्य जाणा ||१४-५-३७||श्रीराम||

     बाळांनो! मग ते काम कोणतेही असो, मनांत ईश्वरसेवेचा भाव असावा. भगवंताच्या कथा प्रेमाने गाव्यात. इतरांना प्रेरणा द्यावी. जीवनाचे सार्थक साधावे. लाजू नये. विसरू नये. संकोचू नये. भगवंताशी एकरूप...

     कसे ते मी सांगू?’ विलास म्हणाला. मारूतीच्या ह्रदयांत राम, रामाच्या अंत:करणांत मारूती. बरोबर नां?

     आजी म्हणाल्या, आपल्या ह्रदयांत?’

     आत्माराम!’ गणपती चटकन म्हणाला.

     शाब्बास!’ आजी म्हणाल्या.

।। जय जय रघूवीर समर्थ ।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा