।।श्रीराम।।
पडवीवरचा दासबोध
लेखिका- आशालता उर्फ आक्का वेलणकर
दिवस २४ वा
सगळे वेळेवर जमले.
मारूतीरायाला वंदन झाले. आजींना नमस्कार करून सगळे आपापल्या जागी बसले. सुधा व जया
एकमेकींना काहीतरी खुणावत होत्या. विलासच्या हे तेव्हाच लक्षांत आले.
‘आजी!’ विलास म्हणाला, ‘त्या
दोघींचे काहीतरी कट कारस्थान दिसतंय. वाचा कोणी फोडायची? पहा कशा खूणावत आहेत.’
जया म्हणाली, ‘कसला कट नी कसलं कारस्थान!
कालपासून पुन्हा
पुन्हा प्रयत्न करतेय, पण ओम फस्स्!’
मधू म्हणाला, ‘कसला प्रयत्न करतेय?’
जया म्हणाली, ‘मधूदादा! आजी म्हणाल्या न.
आकाशाच्याही पलीकडे निश्चल ब्रह्म असते. म्हणून मी आकाशाच्या पलीकडे पलीकडे म्हणजे
नक्की कोठे? कुठपर्यंत बघायचं? खूप
विचार केला. वर आकाश, खाली आकाश, बाजूला आकाश, अलिकडे आकाश, पलिकडे आकाश, सगळेंच
आकाश. मग पलीकडे म्हणजे कोठे जायचे तेथे आकाश आहेच. मग ब्रह्म सापडायचे कसे? खिडकीत बसून विचार करीत होते. पोर्णिमेचा चंद्र
पश्चिमेला जाऊ लागला तरी उत्तर सापडेना. आईने बळेच हाताला धरून उठवले. पलंगावर
झोपवले. झोपल्याचे नाटकं केलं. पण आतून जागीच होते. ते ब्रह्म खरंच कधी कोणाला
दिसलं आहे कां? तेच मला विचारायचं होते. सुधाला म्हणत होते तू
विचार, ती म्हणे तू विचार. अशा खूणा चालल्या होत्या आमच्या.’
आजी स्वस्थपणाने ऐकत
होत्या. अगदी मनापासून गुरदेवांचे स्मरण करून त्यांनी नमस्कार केला. त्यांच्याच
प्रेरणेने कार्य करते. वेल लावलाय त्याला फळ येणारच. हा आनंद त्याचे चरणाशी
वाहिला. तुम्ही पण डोळे मिटलेत नमस्कार केलात. कोणाकोणआची काय काय भावना झाली? खरं खरं सांगायचं हं!
गणपती
म्हणाला, ‘आजी
डोळे उघडत नाहीत तो पर्यंत असंच आजींके पहात रहायचं अस ठरवून नमस्कार केला तर समोर
आजी दिसल्याच नाहीत. तुम्ही उठून आंत गेलात असे वाटले. म्हणून डोळे उघडले तर
तुम्ही येथे आहातच.’
विलास
म्हणाला, ‘मी
हात जोडले. पण सर्वच जण पुढे काय करतात हे हळूच पहात होतो. तो सगळ्यांचे नमस्कार
झालेले. मी ही हात खाली घेतले.’
मधू
म्हणाला, ‘आजींनी
बहूतेक गुरूदेवांना नमस्कार केला असावा. आपल्याला अजून गुरू कोण कळलेच नाही. मी मारूती
रायाकडे पाहून नमस्कार केला. आजी खरं सांगू? मारूती हसल्यासारखं मला वाटलं. म्हणून
मी डोळे उघडले तो आहे तस्साच. मग मगाशी कसा हसला? म्हणून मनोमन पुन्हा नमस्कार केला.’
जया
म्हणाली, ‘आजी! मी विचारांत पडले की, आजींनी
डोळ्यापुढे काय पाहिले असेल? म्हणून त्यांच्या डोळ्यांत पाणी आले. मला तर काहीच दिसले नाही. पण
नमस्कार मात्र केला. आजी आनंद वाटला एवढे खरे!’
सुधा
म्हणाली, ‘बालध्रुवाला
जसा विष्णू समोर दिसला व त्याने गालाला शख लावला तसे आपल्याला कोणीतरी दिसेल व आपण
आनंदी होऊ असे वाटून हात जोडले. पण काहीचं दिसले नाही. मग नमस्कार कोणाला पोहोचला? कोणाला केला? आजींनी केला म्हणून आपण केला कां? सगळ्यांनी हात जोडले. मी जोडले नसते
तर हे सगळे काय म्हणतील असे वाटून हात जोडले?’
बाळांनो! आजी म्हणाल्या, ‘शुध्द स्वच्छ मनाने, प्रामाणिकपणे
सांगितलेत ना! त्यातच मला आनंद वाटला. आपला अभ्यास अनाठायी जाणार नाही. कोणाला
लवकर अनुभव येईल कोणाला उशिरा अनुभव येणार त्यासाठी काय करायचे कळले? सुधा तू वाच ही ओवी....’ आद्य मध्य अवसान | जें शाश्वत निरंजन | तेथें लावावें अनुसंधान | जाणते पुरुषीं ||१२-६-२०||श्रीराम||
‘ठिक!’ आजी म्हणाल्या, ‘आद्य म्हणजे विश्वरचनेच्या आधी, मध्य
म्हणजे आत्ता चालू काळांत व प्रलय, महाप्रलय झाला तरी जे शाश्वत ब्रह्म कसे, अगदी
स्वच्छ, मल रहित, कलंक रहित राहते ते ब्रह्म ज्ञानी साधकाने एकाग्र चित्ताने अखंड
अनुभवावे. असे चिंतन करीत असता त्या दिव्य शक्तीचा म्हणजे ब्रह्माचा गोड अनुभव
येईल.’
विलास
म्हणाला, ‘तेथे
लावावे अनुसंधान हे नाही मला कळले.’
गणपती
म्हणाला, ‘लागला
मध्येच विचारायला.’
‘विचारू दे!’ आजी म्हणाल्या, ‘मनातली शंका निरसन झाली की पुढचे
ऐकायला गोडी वाटते.’
‘पण आजी! गणपती म्हणाला, आत्ता नाही कळलं तर
गप्प बसावे. घरी शब्दकोषात अनुसंधान शब्द पहावा. अर्थ कळेल आपला आपल्याला.
विचारायचे कशाला? याला एवढही येत नाही असे नाही कां दुसऱ्याला वाटत?’
आजी
म्हणाल्या, ‘गणपती! जगाला वाटण्याशी आपला संबंध कशाला? पुस्तकात अर्थ सापडेल. अनु = पाठोपाठ जाणे. सं = सम्यक्, धान =
ध्येय प्राप्तव्य. जे प्राप्त करून घ्यायचे ते प्राप्त होई पर्यंत सारखे त्याच
विचारात रहाणे म्हणजे अनुसंधान. असा अर्थ पाहून समाधान होत नाही. संत तुकारामांनी
दृष्टांत दिला आहे, तुका म्हणे आळी । जेवी नुरेचि वेगळी ।। कुंभारीण
नावाच्या किटकाने मातीचे बाटली सारखे घर बांधले. त्यांत एक खादय म्हणून आळी आणून
ठेवली. घराचे तोंड बंद केले.आतल्या त्या आळीला त्या कुभारीण किटकाचा ध्यास लागला.
कुंभारणीने घराचे तोंड उघडल्याबरोबर पाखरांत रूपांतर झालेली आळी भुरकन उडून गेली.’
‘संतांनी दिलेले अनुसंधानाचे उदाहरण
पुस्तकातल्या अर्थापेक्षा लवकर पटेल असे आहे. जर ब्रह्म दर्शनाकरीता तोच विचार
अखंड राहिल तर ते ब्रह्म अंतरंगात चटकन स्फुल्लींगा प्रमाणे प्रगटेल ही शक्ती
सद्गुरूंकडून मिळते. गणपती तूच वाच ही ओवी....’ पुस्तकज्ञानें निश्चये धरणें | तरी गुरु कासया करणें | याकारणें विवरणें | आपुल्या प्रत्ययें ||१२-६-३०||श्रीराम||
‘आता मला सांग!’ आजी म्हणाल्या, ‘आंबा गोड आहे असे म्हणत मीच चाखत
राहिले तर तुला गोडी कळेल कां? त्यासाठी तुला आंब्याची
लहानशी का होईना पण फोड घ्यायला हवी.’
सुधा
म्हणाली, ‘यालाच
स्वत:चा
अनुभव म्हणायचे नां?’
‘बरोबर!’ आजी म्हणाल्या, ‘आणि हे अनुभवास येण्यापूर्वी ह्या
भोवतालचा प्रत्यक्ष दिसणारा पसारा आपणास मागे खेचतो नं? म्हणून शांतपणे, कसे निर्माण झाले? कसे मोडते? कोण करते? रहाते काय? याचा
विवेकाने विचार करायचा.’
विलास म्हणाला, ‘आता आलं ध्यानात, आधी एकच ब्रह्म होते. त्याची
हालचाल म्हणजे स्फूरण, विचार, वायूरूप तो बाहेर पडला. पसरला, सगळीकडे पसरला.’
गणपती म्हणाला, ‘त्या वायूरूप चैतन्य शक्तीने आकाश व्यापले. त्या
वायूतून तेज म्हणजे अग्नी उत्पन्न झाला.’
मधू म्हणाला, ‘त्या तेजातून आप म्हणजे जल व जलातून पृथ्वी तयार
झाली. जलचर भूचर खेचर प्राणीच प्राणी पृथ्वी ठेलं ठेल भरली.’
जया म्हणाली, ‘थांब मधूदादा! पुढे त्या मायेला,
शक्तीला आवरा आवरी करावी वाटली तशी नाशाला सुरवात झाली. जशी उत्पन्न झाली तशी भूते
एकमेकांत मिसळता मिसळता वायू आकाशात स्थिर झाला. आकाश आहे तसेच राहिले. चैतन्य
जेथून आले तेथे विसावले. तेच.....’
विलास ओरडला, ‘तेच ब्रह्म!’
‘हं!’ आजी म्हणाल्या, ‘हे छान लक्षांत राहिले. पण चुचकारून त्यागाची
वृत्ती तयार करायची, मोह कमी करायचा, लोभाला आवरायचे. म्हणजेच समर्थ म्हणतात
विरक्त व्हायचे. विलास तू वाच ही ओवी.....’ वैराग्यापरतें नाहीं भाग्य | वैराग्य नाहीं तों अभाग्य | वैराग्य नस्तां योग्य | परमार्थ नव्हे ||१२-७-१७||श्रीराम||
‘ठिक!’ आजी म्हणाल्या, ‘त्यागाशिवाय विरक्तता येत नाही. वैराग्य वृत्ती
ही मनाची अवस्था अत्यंत आवश्यक आहे. वैराग्य असणे हेच भाग्य. त्या वैराग्याला
विवेकाची जोड असली की माफक प्रमाणांत योग्य ते विषय सेवन करून परमार्थ घडतो.’
विलास म्हणाला, ‘म्हणजे सध्या आमचा साधला जातो तसा. उन्हाचे वेळी
बुध्दीला खुराक, ज्ञानांत भर. संध्याकाळी खेळ, रात्री नऊ पर्यंत टि. व्ही., पुढे
झोप. सकाळी बागकाम, घरकाम, जेवण, थोडी विश्रांती की यायचं पडवीवर. हे सर्व साधले
म्हणजे विवेकाने साधले म्हणायचे कां?’
आजी म्हणाल्या, ‘होय
विवेक नसला तर? तूच वाच आता......’ जे विचारापासून चेवले | जे आचारापासून भ्रष्टले | विवेक करूं विसरले | विषयलोभीं ||१२-७-२२||श्रीराम||
आजी म्हणाल्या, ‘जर का मनुष्य विषय लोभापासून घसरला, तर तो भ्रष्ट
झालाच म्हणून समजा. मग तो करू नये ते करतो. त्यालाच भ्रष्टाचार म्हणतात. विवेकाची,
सारासार विचाराची संगत सोडली की तो लोभात गुंतलाच.’
‘कमळाची फुले काढायला जर माणूसतळ्यात उतरला तर तो
देठाच्या जाळ्यात अडकलाच म्हणून समजा. तस्सा आसक्तीत बुडालेला मनुष्य फसतो व
इतरांना फसवतो.’ असतें येक वाटतें येक | त्याचें नांव हीन विवेक | नाना
प्रवृत्तीचे लोक | प्रवृत्ति जाणती ||१२-८-१८||श्रीराम||
‘हीन विवेकी माणसे करं ते विसरतात, खोट्याच्या
मागे लागतात. त्यांना विषय सुख मिळते असे वाटते परंतु ते क्षणीक असते.
खाण्यापिण्यात पूर्ण आयुष्य जाते. जया तू वाच....’ कीर्ति करून नाहीं मेले | ते उगेच आले आणि गेले | शाहाणे होऊन भुलले | काये सांगावें ||१२-८-२७||श्रीराम||
आजी म्हणाल्या, ‘व्यर्थ जीवन न घालवता नाव राहील असं काही केल
पाहीजे. बुध्दी मिळाली, धनदौलत कमावली, पैसा वाढला, धुंदी माजली. कष्टाची
प्रवृत्तीच नष्ट झाली. जीवन वाया गेले असे नको व्हायला.’ म्हणोन आळस सोडावा| येत्न साक्षेपें जोडावा | दुश्चितपणाचा मोडावा
| थारा
बळें ||१२-९-८||श्रीराम||
विलास म्हणाला, ‘मी सांगतो अर्थ. माणसाने आळसाला थारा देऊ नये.
नेहमी प्रयत्नशील रहावे. चांगले विचार स्थीर रहात नाहीत. संशय येतो. अर्धवट काम
सोडावेसे वाटते. चित्त एकाग्र होत नाही. आळसाला हुसकून लावून निर्धार पक्का करावा.’
सुधाने ओवीपण वाचून
दाखवली.... जैसें
बोलणें बोलावें | तैसेंचि चालणें चालावें | मग महंतलीळा स्वभावें | आंगीं
बाणे ||१२-९-२३||श्रीराम||
‘आजी! तुकाराम महाराज
म्हणतात, बोले तैसा चाले....’
विलासने घाईघाईने
सांगितले, ‘त्यांची वंदावी पाऊले.’
आजी म्हणाल्या, ‘खरचं आहे. तरच लोकांत प्रतिष्ठा वाढेल. समाजांत
खालच्या थरापासून वरच्या थरापर्यत सर्वांच्यात मिळून मिसळून काम केले पाहिजे. तरच
वाहवा होईल. त्यासाठी काय करायचे?’ घालून अकलेचा पवाड | व्हावें ब्रह्मांडाहून जाड | तेथें
कैचें आणिले द्वाड |
करंटपण ||१२-९-२९||श्रीराम||
‘विलास! अकलेचा पवाड
घालायचा म्हणजे काय कळलं कां?’
विलास म्हणाला, ‘अक्कल म्हणजे बुध्दी, बुध्दीचे चातुर्य दाखवून
काम करायचे. जगातले सर्व ज्ञान प्राप्त करून घेऊन बुध्दीचे सामर्थ्य वाढवायचे.
म्हणजे बुध्दी विशाल झाली म्हणतात. तेथे नतद्रष्टपणा राहिलच कसा? आपल्याला करंटा म्हणणार कोण?’
आजी
म्हणाल्या, ‘छान
अशी बुध्दी व्यावक झाली की ज्ञानाने तृप्त होते.’ तैसें ज्ञानें तृप्त
व्हावें | तेंचि
ज्ञान जनास सांगावें | तरतेन बुडों नेदावें | बुडतयासी ||१२-१०-२||श्रीराम||
आजी म्हणाल्या, “नदीच्या प्रवाहात एक मुलगा बुडताना पाहून पुलावरील एक मुलगा म्हणतो, मरे नां मेला तर, आपल्याला काय त्याचे. त्याच पुलावर दुसऱ्या बाजूला मुलगा बुडत आहे असे पाहून एकाने त्याला सूर मारून बाहेर काढले.” ‘बघा कसा छान बोध आहे. ज्याला पोहता येतय त्याने बुडणाऱ्यास तारावे की बुडून द्यावे? स्वत: ज्ञान मिळवावे. आटोक्यांत असेल ते दुसऱ्यांस सांगावे. त्याने आपले ज्ञान वाढते. त्यासाठी पथ्य कोणते माहीत आहे?’
विलास म्हणाला, ‘त्यासाठी आळस सोडायला हवा. आता मी वाचतो ओवी...’ आलस्य अवघाच दवडावा | येत्न उदंडचि करावा | शब्दमत्सर न करावा | कोणीयेकाचा ||१२-१०-११||श्रीराम||
आजी म्हणाल्या, ‘व्देषाने व मत्सराने माणसाचा नाश होतो. उणे दुणे
अधिकच वाढते. सहनशीलता वाढली की, या दुर्गुणाला राहायला जागाच मिळणार नाही. आळस
गेला. प्रयत्न वाढला, उद्योगी वृत्ती वाढली, सहनशिलता आली, दुसऱ्याचे बरे वाईट सहन
करून आपले ध्येय सोडले नाही की जगात मोठेपणा आपोआप वाढेल. मग भक्तीला अधिकच रंग
चढेल.’ मनापासून भक्ति करणें | उत्तम गुण अगत्य धरणें | तया माहांपुरुषाकारणें | धुंडीत येती ||१२-१०-३१||श्रीराम||
विलास म्हणाला, ‘आजी अगदी खरं आहे. परवाचीच गोष्ट,
अध्यक्ष महाशय बाबांचे ऑफिस मधले होते. त्यांनी सहज बोलता बोलता आमची नावे
सांगितली. बाबांना पण आनेद झाला. हा गणपती, आमच्या शेजारीच रहातो आणि मधुकर
पलीकडच्यां चौकात रहातो.’
‘तेच अध्यक्ष आमच्या घरी आले होते. चहा
देण्याचे काम माझ्याकडेच आले. मला पाहिल्यावर त्यांना आनंद झाला. आम्हा तिघांची
त्यांनी जवळून ओळख करून घेतली.’
गणपती
म्हणाला, ‘आजी
याचे बाबा म्हणाले, जवळच इनामदारांचा वाडा आहे. तेथे दुपारी दासबोध अभ्यास चालतो.
तेथे मुले जातात. तेथल्या आजी मुलांवर फार चांगले संस्कार बसवत आहेत. मग तर
आम्हाला फारच आनंद झाला. आजी त्या आनंदाच्या भरांत आम्ही डोळे मिटून नमस्कार पण
केला.’
‘बाळांनो! असेच आनंदाचे क्षण टिपत राहू या.
अलिप्त राहून काम करू या. शक्ती देणारा कोण? बुध्दी देणारा कोण?’
सगळेच
म्हणाले, आपला मारूती. महारूद्र हनुमान की जय.
।। जय जय रघूवीर समर्थ ।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा