सोमवार, १४ डिसेंबर, २०२०

पडवीवरचा दासबोध, दिवस ३१ वा

 

।।श्रीराम।।

पडवीवरचा दासबोध

लेखिका- आशालता उर्फ आक्का वेलणकर

दिवस ३१ वा

            मुले जमली. सुधा जया जोडी पण आली. गल्लीत नुकताच नंदीबैल येऊन गेला होता. नी बैलाचा मालक त्याला प्रश्न विचारी. बैल कधी होकार्थी मान हलवी, तर कधी नकार्थी मान हलवी. कांही उत्तरे बरोबर असत, तर कधी भलत्याच त्तराकरीता मान हलवली तर त्याला लहानसा फटका मिळे. बैलाला खरचं काही कळत होते कां? की दोरीच्या इशाऱ्यावर मान हलवी. त्यावरून सांगतो ते ज्योतिष तरी बरोबर असतं कां? अशी भविष्यवाणी खरी ठरली तर जीवन सुखकर होईल कां? की दु:खकर होईल? चर्चा तर अगदी रंगात आली होती की, आजी आलेल्या कळलंच नाही.

     आजी आपल्या जागेवर बसल्या आणि म्हणाल्या, बाळांनो! सगळी भविष्य खरी ठरतं नाहीत. अचूक भविष्य सांगणारी माणसे थोडीच असतात? पण एक विश्वास बसणार नाही अशी घटना ऐकलीत कधी? रामावतार होण्याआधीच संपूर्ण रामकथा रचणारा कवी, कधी ऐकलेत नांव त्यांचे? त्यांनी रचलेल्या कथेप्रमाणेच रामावतारात घटना घडल्या. त्यांची भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरली. कोण बरं ते ऋषी?’

     मधुकर म्हणाला, सामान्य कवी नव्हे तो! वाल्मिकी ऋषी त्यांचे नांव. आजी त्यांच्या चरित्राचे पुस्तक मी नुकतेच वाचले. मुळात ते ऋषी कुळातले नव्हेतच.

     विलास म्हणाला, मग रामायणासारखे महाकाव्य कसे रचता आले त्यांना?’

     मधुकर म्हणाला, लूटमार करणारा हा वाल्या. पण उध्दाराचा काळ जवळ आला. भाग्य त्यांचे की नारद मुनींशी गाठ पडली.

     सुधा म्हणाली, सत्संगाचा महिमाच असा! त्यांनी वाल्याला रामनाम घ्यायला सांगितले. म्हणून एवढे परिवर्तन घडले.

     जया म्हणाली, राम नामाचा महिमा हे खरे. पण मुख्य गोष्ट वाल्याला पापाचं फळ भोगावे लागेल, ही भीती म्हणून तो तयार झाला.

     गणपती म्हणाला, भीतीपेक्षा त्याला उपरती झाली म्हटले तर? या पापाचे वाटेकरी सर्वच कुटूंबीय होणार या भ्रमात तो होता. बिनादिक्क्त तो माणसे मारत होता. खरं तर घरच्या लोकांचीच कृपा म्हणायची. सगळ्यांनीच जेव्हा आम्ही पाप कशाला भोगू? तुझं कर्तव्यच होतं आम्हाला पोसायचं. अस ऐकवलं म्हणूनच त्याचे डोळे खाडदीशी उघडले.

     विलास म्हणाला, पण आजी! इतका दुष्ट वृत्तीचा वागणारा माणूस एकाएकी निश्चल कसा बसू शकला? त्याच्या वृत्तीची धरसोड झाली नाही हे नवलच नव्हे कां?’

     आजी म्हणाल्या, यालाच अंतरात्म्याची कृपा म्हणतात. नारदांचे बोलणे धीराचे, स्पष्ट पण मृदू, ह्रदयाचा ठाव घेणारे होते. म्हणून राम म्हणता येत नसेल तर मरा मरा म्हणता येते नां? चालेल. तसेच म्हण. पण निर्धाराने म्हण. निष्ठेने म्हण. विश्वास ठेव.

     नारदांचा आशिर्वाद हा भगवंताचाच आशिर्वाद होता. निष्ठेने नाम घेतल्याने दृष्यावरचे प्रेम एकाएकी उडाले व नामाशी एकरूप झाले. अंगावर मुंग्यांनी वारूळ रचले तरी देहात्मबुध्दी सुटलेला वाल्या नामांत होता. ठराविक मर्यादेपर्यंत नाम गेल्यावर ईश्वरी कृपा म्हणजेच शरिरातील अमृत तत्व शरीरभर पसरले. रक्तातील दोषात्मक भाग पूर्ण जळला. खाक झाला. वाल्या आतून बाहेरून शुध्द झाला. त्याला लोक वाल्मिकि म्हणू लागले. रामायण रचले गेले. एक महाकाव्य.. उफराटे नाम म्हणतां वाचें | पर्वत फुटले पापाचे | ध्वज उभारले पुण्याचे | ब्रह्मांडावरुते ||१६-१-९||श्रीराम||

     महाप्रलय होईपर्यंत घरोघर रामायण वाचले जाणार. अनेक कवींनी आपापल्या परी रामकथा गाईली तरी वाल्मिकि रामायण अजरामरच रहाणार. वाल्मीकीचा देह गेला तरी तो अजून ग्रंथ रूपाने आहेच नां?’

     विलास म्हणाला, माणूस मारला की एक खडा रांजणात टाकावा असे सात रांजण भरले होते म्हणे. ते फक्त मरा मरा चे राम राम आपोआप झाले व एवढे परिवर्तन घडून आले. आता मला असे म्हणायचं आहे की, इतकं ज्वलंत उदाहरण डोळ्यापुढे असताना, वाल्मीकीची कीर्ती गातांना मनुष्यमात्रांच्या मुखातून ते नाम कां येत नाही? शंका पोरकट असेल पण शंका आहे की, सरकारी नियमच जर केला की इतके नाम घेतलेच पाहिजे तर होणार नाही कां? सगळ्या राष्ट्राचा उध्दार होईल की! दुष्ट वृत्ती औषधाला सुध्दा सापडणार नाही.

     विलास!’ आजी म्हणाल्या, नाम जबरदस्ती करून घेतले, तर त्याचे फळ मिळणार नाही. कारण त्यात जिव्हाळा प्रेम असत नाही. असणार नाही. आता तुला चटकन पटावं म्हणून सांगते. आजपर्यंत तुझ्या आई बाबांनी लवकर उठावे असे कधी सांगितलेच नव्हते कां? पण तू ऐकलं नाहीस. ऐकणार नाहीस म्हणून त्यांनी सांगण्याचा नाद सोडून दिला. पण परवा परवा पासून तुझे तुलाच पटल्यावर अगदी कोणी न हलवाता, न उठवता उठतोस नां? म्हणजेच तुला तुझ्या आतल्या जाणीवेने धक्का दिला की, असे करणे योग्य आहे. ते मनाला पटले. स्नानही लवकर होऊ लागले. उत्साह वाढला.

     विलास म्हणाला, आजी! हा दासबोध श्रवणाचा परिणाम. आम्ही पांचही जण जसे आकर्षले गेलो. तसे सर्वही आकर्षले जातील की.

     नाही!’ आजी म्हणाल्या, मूर्ती तितक्या प्रकृति. तमोगुणाचे प्राबल्य असल्यावर इतके कठोर तप करण्याचे सामर्थ्य सगळ्यांच्यात येणार नाही. हे केव्हा जमते व त्याने काय होते. तूच वाच... उपरति आणि अनुताप | तेथें कैंचें उरेल पाप | देह्यांततपें पुण्यरूप | दुसरा जन्म जाला ||१६-१-१२||श्रीराम||

     ही उपरति व्हायला सद्गुरू भेट हवी. आजींनी अगदी स्वाभाविकपणे नमस्कार केला. न सांगता मुलांनी पण डोळे मिटले व नमस्कार केला.

     बाळांनो! आजी म्हणाल्या, असा सुंदर संस्कार बसण्यासाठी सद्ग्रंथ श्रवण सतत हवे. म्हणजे बुध्दी सतेज होते. असे श्रवण एकांती व्हावे. मोजक्याच लोकांच्यात व दिवसाच व्हावे. दिवसा सूर्यप्रकाश असतो. सूर्य हा आपला पिताच. त्याच्या प्रकाशाने जग उजळून निघते. दिवसाची कामे धड होतात. ती रात्री होत नाहीत. समर्थ काय सांगतात बघ, प्रपंचिक अथवा परमार्थिक | कार्य करणें कोणीयेक | दिवसेंविण निरार्थक | सार्थक नव्हे ||१६-२-७||श्रीराम||

     आजी म्हणाल्या, मग हे कार्य संसारातले असो वा परमार्थातले असो. दिवसा करावे. हुरूप वाढतो. रात्री मलूलपणा येतो. उठाव येत नाही. सूर्याचा महिमा किती, माहीत आहे?’ विश्वचक्षु हा भास्कर | ऐसें जाणती लाहानथोर | याकारणें  दिवाकर|  श्रेष्ठाहून  श्रेष्ठ  ||१६-२-१५||श्रीराम||

     विलास म्हणाला, मी सांगतो अर्थ! विश्वाचा डोळा म्हणजे साऱ्या प्राणी मात्रांचा डोळा. म्हणजेच त्याच्या उजेडांत सर्व प्राणीमात्रांना काम करता येते. याला थोडा अपवाद आहेच नं? काही दिवाभीत असतातच ते दिवसा झोप घेतात व रात्री खाद्य मिळवण्यासाठी बाहेर पडतात. पण तेवढ्याने सूर्याचा महिमा कमी होतो असे नाही. सूर्य जर चार आठ दिवस रजेवर गेला तर? पावसाळ्यात तो रजेवर जात नाही. पण सतत पावसामुळे दोन चार दिवस त्याचे दर्शन घडले नाही, तरी मरगळल्या सारखे वाटते. चार दिवसांनी सूर्यदर्शन झाले की तरतरी येते. हा अनुभव सगळ्यांनाच आहे.

     गणपती म्हणाला, आजी! बरोबर आहे विलासचे म्हणणे. समर्थांनी सूर्य महिमा गाइला. आपण पण त्याची पूजा करीतो. १२ सूर्यनमस्कार घालतो. तो आपला पिता खरा. पण त्याच्यापेक्षा पृथ्वी श्रेष्ठ नाही कां? तिला आपली माता म्हणायला काय हरकत आहे?’

     आजी म्हणाल्या, आहेच ती माता, हरकत कसली? समर्थ तरी कसे विसरतील? पृथ्वीतर बहुगुणी बहुरत्ना अत्यंत सोशिक. सर्वांचे भरण पोषण करते आहे. सगळ्यांना आपल्या अंगावर वाढवते. गणपती तू वाच समर्थ वचन... बहुरत्न हे वसुंधरा | ऐसा पदार्थ कैचा दुसरा | अफाट पडिलें सैरावैरा | जिकडेतिकडे ||१६-३-२०||श्रीराम||

     मधू म्हणाला, पाणी आटून पृथ्वी झाली असे पटकन म्हणतो आपण. पण त्याला किती काळ लागला असेल. उंच उंच पर्वत, खोल खोल दऱ्या, कुठे जमीन पिवळट, तर कुठे काळी भोर, कुठे लाल तर कुठे मुरुम किती तऱ्हा.

     त्याला थांबवीत जया म्हणाली, आणि तिच्या पाठीवरच्या नद्या. त्या तरी किती प्रकारच्या? कोणाला दोनदा पुर तर कोणी उन्हाळ्यात आटतात. काही नद्या लहान तर काही महान. सगळ्या नद्यांची नांवे लिहू म्हटले तरी जमणार नाही. किती अफाट पसारा....

     सुधा म्हणाली, आणि पिके तरी किती? सगळच नाविन्य. कोठे भात पिकतो तर कोठे ज्वारी, कोठे गहू तर कोठे बाजरी. फुले विपूल, फळे विपूल. या सगळ्या गोष्टी मानवाला ज्याने पुरवल्या त्याचे ऋण कधी फिटणार?’

     विलास म्हणाला, ते ऋण फेडण्यासाठी तर नाम घ्यायचे. ज्ञान मिळवायचे. आपण आनंदात रहायचे. जगाला आनंद वाटायचा. आजी! मी अगदी शपथ्थ घेऊन सांगतो, पहाटे उठून स्नान व सूर्यनमस्कार घातल्याने मला फार आनंद होतो. माझ्यातला चिडचिडेपणा गेला. मलाच जाणवतो.

     आजी म्हणाल्या, शाब्बास! हेच १० मुलांना पटेल असे सांग. हळू हळू एकेक मुलगा तयार कर. अशी १० मुले तयार केलीस की हा आनंद १० जणांत वाटला जाईल. हे त्या परब्रह्माचे ऋण फेडणे होय. आणि मी म्हणते कोणाकोणाचे ऋण फेडणार? आपले जीवनच ज्याच्यावर अवलंबून त्याला आपण जीवन म्हणतो म्हणजे पाणी त्याला विसरणारं कां? त्या आपोनारायणाची तर अत्यंत गरज असते आपल्याला. २ दिवस नळाला पाणी येणार नाही म्हटले की तोंडचे पाणी आटते. आपोनारायणाचे अलौकिकत्व समर्थ सांगतात बघ, उदक तारक उदक मारक | उदक नाना सौख्यदायक | पाहातां उदकाचा विवेक  | अलोलीक  आहे  ||१६-४-२३||श्रीराम||

     त्या पाण्याशी सुध्दा मर्यादेनेच वागायला हवे. त्याचा योग्य वापर करायला हवा. पाण्याच्या शुध्द, अशुध्दतेचा विचार करायला हवा. अशुध्द पाणी सुध्दा योग्य विल्हेवाट करून उपयोगात आणायला हवे. असे झाले नाही तर तेच पाणी मारकही होते. दोन्ही शक्ती पाण्याजवळ आहेत.

     विलास म्हणाला, आजी! सूर्य पिता, पृथ्वी माता, मग उदक बंधू म्हणायचा कां? आपला भाऊ सुध्दा कधी सहाय्य करतो कधी भांडतो. तसचं पाणी.

     सुधा म्हणाली, पाण्यासारखाच दुसरा भाऊ आहे. त्याला विसरू नकोस. त्याचे नांव अग्नी. आजी! अग्नीची पण ओवी असेलच की.

     आजींनी लगेचच ओवी दाखवली... अग्नीकरितां  नाना  उपाये  | अग्नीकरीतां नाना अपाये | विवेकेंविण सकळ होये | निरार्थक ||१६-५-२१||श्रीराम||

     मधुकर म्हणाला, मानवाने अग्नीचा शोध लावला. दाहक अग्नी पण खिशांत ठेवता येईल असे त्याला रूप दिले. त्या अग्नीचे अनंत उपकार आहेत आपल्यावर. अग्नीमुळेच भूक लागते. तहान लागते. अग्नीमुळेच अन्न पचते. अग्नीमुळे अन्न शिजते. थंडीचे निवारणही अग्नीच करतो. रात्री अग्नीचा प्रकाशासाठी उपयोग होतो.

     सुधा म्हणाली, पण जर अग्नीदेव रागावला तर भडका उडवून देतो. घरे जळतात. माणसे मरतात. अग्नी या देहाचे भस्म करतो. यज्ञातला अग्नी पवित्र पूजनीय देवांना हविर्भाग देतो. अग्नीच्या साक्षीने विवाह होतात.

     माणसाला सुख नी दु:ख देणारा अग्नी. त्याचे सुध्दा पूजन शास्त्रांत सांगितले आहे.

     आजी म्हणाल्या, अगदी हाच विचार समर्थ सांगतात बघ.. जीत असतां सुखी करी | मेल्यां प्रेत भस्म करी | सर्वभक्षकु त्याची थोरी | काये म्हणोनी सांगावी ||१६-५-२४||श्रीराम||

     अग्नी सर्व भक्षक असला तरी उपयुक्तता लक्षांत घेऊन त्याचे पूजन अवश्य करावे. घरोघर वैश्वदेव होत असत. चुलीतल्या अग्नीची पूजा होत असे. आता विज्ञान युगांत दोन्ही गोष्टी बंद झाल्या. यज्ञाचे विपरित प्रकार पाहून यज्ञ ही नको ही मत प्रणाली वाढली. तरी वैश्वानराची पूजा करणे आवश्यकच.

     विलास म्हणाला, वैश्वानर म्हणजे अग्नी. आपल्या पोटांत पण असतो अग्नी. त्याला आहूती द्यायची म्हणजे खायचे. अन्नाच्या आहूतींनी जठराग्नी शांत होतो.

     आजी म्हणाल्या, बरोबर! पण तेथेही योग्य, अयोग्य विचार करायला हवा. भूक लागलेली नसता जर खाल्ले तर अग्नी मंद होतो. अन्न पचत नाही. अग्नीची कार्यक्षमता बघूनच अन्न खावे. वाजवीपेक्षा जास्त खाल्ले तरी अग्नी विझतो. अन्न पचत नाही. दुखणी होतात.

     सुधा म्हणाली, मग धावा डॉक्टरांकडे. ते गोळी देतात ती कशावर? भूक लागावी म्हणूनही आणि अन्न पचावे म्हणूनही.

     मधू म्हणाला, अशी पाळी आपल्यावर येऊ नये म्हणून आत्ता पासून व्यायाम करायचा. शरीर ताब्यात ठेवायचे. पंच महाभूतापैकी दृष्यस्वरूपांत असलेल्या पृथ्वी, आप, व तेज यांची यथायोग्य बडदास्त ठेवावी.

     गणपती म्हणाला, वर्षातून एकदा स्वच्छता सप्ताह पाळून कसे भागेल? रोजच स्वच्छ व नेटकेपणाने वागलो की जीवन सुखकर होणार.

     मन प्रसन्न रहाण्याची गुरूकिल्लीच आज आपल्याला मिळाली. देवघरातल्या देवापेक्षा या देवांची पूजा आवश्यक हे आज आपल्याला कळले. मग आता उदयापासून, उद्यापासून कशाला? आत्तापासूनच तसे वागायचे ठरवू या. आजी आशिर्वाद देतीलच.

।। जय जय रघूवीर समर्थ ।।

      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा