शनिवार, २६ डिसेंबर, २०२०

पडवीवरचा दासबोध, दिवस ३६ वा

 

।।श्रीराम।।

पडवीवरचा दासबोध

लेखिका- आशालता उर्फ आक्का वेलणकर

दिवस ३६ वा

            सगळे अगदी वेळेवर जमले. विलास नको नको म्हणत होता तरी सुध्दा गणपतीने त्याची करामत सर्वांना सांगितली. त्याच्या घराजवळच्या झोपडपट्टीत मुलामुलांच्यात हाणामारी चालली होती. विलासने दोन तास त्यांच्यात मिसळून त्यांची समजूत काढली. भांडण मिटवले व तो इकडे आला.

     सर्वांनी त्याचे कौतुक केले. सगळा घडलेला इत्यंभूत प्रकार ऐकून झाल्यावर आजी म्हणाल्या, विलास! गोष्ट कौतुकाची खरी. तुझी प्रामाणिक इच्छा मुले सुधारावीत हीच आहे. तेही उत्तम. पण पैसे लावून खेळणाऱ्या मुलांच्यावर एकाएकी संस्कार होणार नाहीत. भांडणाचे स्वरूप पाहून ते सोडवायला जात जा. दारूच्या नशेत भांडणे चालू असतील, तर त्या फंदात पडू नकोस. मुले नशेतून शुध्दीवर आली की घालतील गळ्यांत गळे. आपण आपली फळी भक्कम करू या. मग त्याही मुलांच्याकरीता मार्ग शोधू या. मीच असे म्हणते असे नाही. समर्थांचे सुध्दा काय म्हणणे आहे पहा. वाच तू... अति सर्वत्र वर्जावें | प्रसंग पाहोन चालावें | हटनिग्रहीं न पडावें | विवेकीं पुरुषें ||१८-६-||श्रीराम||

     आजी म्हणाल्या, अति तेथे माती, असे ऐकले आहेस नां? सगळ्याच गोष्टींना प्रमाण पाहिजेच. शिवाय अशा प्रसंगी दोन चार जणांची बलिष्ट शक्ती पाठीशी हवी. कोणत्या प्रसंगी कसे वागावे याचा खूप विचार करावा लागतो. प्रत्येक ठिकाणी आपलाच हट्ट चालवू नये. समर्थांनी असा गोड इशारा शिवाजी राजेंना पण दिला होता, हे लक्षांत घे. म्हणून प्रसंग पाहून शिवाजी महाराजांना वडिलांच्या सुटकेसाठी काही किल्ले सोडून द्यावे लागले होते. पुन्हा त्यांनी ते प्रयत्नाने मिळवले, काबीज केले ही गोष्ट वेगळी. पण कधी कधी पडही घ्यावी लागते. याला चतुराई म्हणतात. गणपती तू पुढचा विचार पहा. सकळ गुणामधें सार | तजविजा विवेक विचार | जेणें  पाविजे  पैलपार  |  अरत्रपरत्रींचा ||१८-६-२२||श्रीराम||

     आजी म्हणाल्या, विवेक हा जीवनाचा आधारस्तंभ, सगळ्या सद्गुणांचा मेरूमणीच. ज्याचा विवेक जागा त्याचे विचार पुरोगामी. कोणतेही काम करायचे म्हणजे योजना आखल्याशिवाय करू नये.

     गणपती म्हणाला, घर बांधायच्या आधी नकाशा काढतात. त्यालाच योजना म्हणतात नां?’

     होय! आजी म्हणाल्या, नुसता नकाशाच नव्हे. सामान, मनुष्यबळ, पैसा या सर्व गोष्टींची योजना हवी. लाखो रुपये सारून आपण घर बांधतो. ज्याच्या कृपेने घर बांधतो त्याच्या करीता देवघर म्हणून काही जागेची योजना असत नाही. हा विवेक खरा नव्हे.

     विलास म्हणाला, आजी! योजनाबध्द काम करणारा अरत्र परत्र पार करतो हे मला नाही कळलं.

     आजी म्हणाल्या, अरत्र म्हणजे या लोकी, प्रपंचात व परत्र म्हणजे परमार्थ. प्रपंच व परमार्थ दोन्ही नीट पार पडायला हवेत.

     विलास म्हणाला, पण आजी! आम्ही प्रपंचाचा आत्ताच कशाला विचार करायला हवा?’

     विलास!’ आजी म्हणाल्या, तूर्तास तुमचे शालेय जीवन हाच प्रपंच. आता पुढच्या आठवड्यांत शाळा सुरू होतील. मग विवेकाने न्यायाने वागायचे म्हणजे पहिल्या दिवसापासून गणवेशांत जायला हवे. ते कपडे लगेचच नवे हवेत कां? जुने निटनेटके धुतलेले आहेत की नाहीत पहायला हवेत. पावसाळ्याचे तोंडी शाळा सुरू होते. मग रेनकोट छत्री बघून ठेवायला नको कां? हीच तुमची प्रपंचातली योजना. पहिलेच दिवशी पुस्तके नसतील, पण एक वही पेन न्यायला हवी की नको? त्यासाठी पिशवी दप्तर? हीच योग्य काळजी.

     विलास म्हणाला, आलं! आत्ता लक्षांत आलं!’

     हुषार आहे बाळ! पण लक्षांत यायला जरा वेळ लागतो. बाजूला सरकतच गणपती म्हणाला.

     लवकर लक्षांत आले नाही तर दोष नाही. आजी म्हणाल्या, पण सांगूनही लक्षांत ठेवलं नाही, किंवा न समजलेलं तसंच मनांत ठेवलं, शंका निरसन करून घेतली नाही तर मात्र दोष ठरतो. शरीर संपदा वाढवण्यासाठी जसा व्यायाम तसा बुध्दी तरतरीत होण्यासाठी सुध्दा व्यायाम असतोच. ध्यानांत रहावेच असा जो भाग असतो तो दर चाळीस दिवसांचे आंत पुन्हा पुन्हा उजळणी करिता डोळ्यापुढे आणावा. स्मरणशक्ती वाढेल तेव्हा वाढेल असे म्हणू नये.

     मधुकर म्हणाला, म्हणजे प्रत्येक क्षेत्रात कष्ट करण्याची अभ्यास करण्याची जरूरी आहेच.

     हो तर!’ आजी म्हणाल्या, समर्थांनी सगळ्यांनाच इशारा दिला आहे. वाच..... कष्टेंविण फळ नाहीं | कष्टेंविण राज्य नाहीं | केल्याविण होत नाहीं |ाध्य जनीं ||१८-७-||श्रीराम||

     रोप लावल्याशिवाय फुले कशी मिळणार?’ सुधा म्हणाली.

     दूध तापवून विरजल्या शिवाय दही कसे मिळणार. जया म्हणाली.

     सैन्यामध्ये भरती होऊन पराक्रम गाजवल्याशिवाय सेनापतीपद कसे मिळणार?’ विलास म्हणाला.

     आजी म्हणाल्या, विचार केला की कशा कल्पना सूचतात. मग आनंदही होतो. ही ओवी तेच सांगते पहा... जेहीं उदंड कष्ट केले | ते भाग्य भोगून ठेले | येर ते बोलतचि राहिले | करंटे जन ||१८-७-१६||श्रीराम||

     बोलाचाच भात......

     बोलाचीच कढी. जयाने वाक्य पूर्ण केले.

     शाब्बास!’ आजी म्हणाल्या, असे फक्त विचार करून आला दिवस साजरा करीत राहतात त्यांना पदरात कांहीच पडत नाही. पैसा अमाप असतो. तो खर्च कोण करणार? मग जीवाची मुंबई! यात्रा कंपनी गाठून तीर्थक्षेत्रे. स्वस्थपणाने दर्शन तरी होतं कां?’

     मुळीच नाही!’ जया म्हणाली, काका तेच सांगत होते. सारी धावाधाव. कधी कधी खाणं सुध्दा मोटारीतल्या मोटारीतच. कधी सोय कधी गैरसोय. फक्त खूप गावे पाहिली. पण निर्भेळ आनंद दोन तिन ठिकाणीच झाला. तेथे मुक्कामच घडला नाही.

     जया! तूच वाच आता ही ओवी... तो अंतर्देव चुकती | धांवा घेऊन तीर्था जाती | प्राणी बापुडे कष्टती | देवास नेणतां ||१८-८-११||श्रीराम||

     आजी म्हणाल्या, हौस म्हणून, विरंगुळा म्हणून कुटूंबियांसमवेत एखादे ठिकाण जरूर पहावे. पण निसर्ग सान्निध्य देवदर्शन तीर्थस्नान इतके काही मनासारखे घडावे की आनंद ओसंडून वहावा.

     पण होते काय? आतच असलेल्या रामाला विसरून काळा राम गोरा राम करीत बसतो. काळ्या रामाची बडदास्त. नी गोरा राम पडीत! असे कां व्हावे? केवळ शुध्द भाव नाही. खऱ्या ज्ञानाचा लोप. वरवरच्या कर्मात गुंतून पडण्याची शर्यत लागते जणू! तुमचा हार दोन रुपयांचा माझा पांच रूपयांचा. दोन्ही हार देवाच्या पायाला लावले की, निर्माल्य म्हणून फेकून दिले जातात. निदान एकदा प्रचिती आल्यावर तरी सुधारणा करावी! तर मन फिरायला तयार नाही. समर्थांचे म्हणणे... प्रचीतीविण जें केलें | तें तें अवघें वेर्थ गेलें | प्राणी कष्टकष्टोंचि मेलें | कर्मकचाटें ||१८-८-२०||श्रीराम||

     पण आजी! कर्म केल्याशिवाय माणूस राहू शकतो कां?’ विलासने विचारले.

     जया म्हणाली, मरेपर्यंत कर्म करावेच लागते नां?’

     बरोबर आहे तुझे म्हणणे!’ आजी म्हणाल्या, कर्माकरीता कर्म, कर्तव्यापोटी कर्म, आवश्यक कर्म, ईश्वरार्पण बुध्दीतून केलेले कर्म, सगळी एकच कां? कर्माच्या ओझ्याखाली दबून जाणे वेगळे. अनावश्यक कर्मे करून जीव बेजार होतो. शेवटी देह सोडून जातो.

     मधुकर म्हणाला, म्हणजे मनुष्यदेह मिळूनही त्याचे आयुष्य वायाच गेले म्हणायचे!

     सुधा म्हणाली, पण आजी! सगुणाची पूजाअर्चा करण्याकरिता कर्माची गरज आहेच नां?’

     आजी म्हणाल्या, सुधा! सगुण म्हणजे नुसत्या देवघरातल्या मूर्ती नव्हेत. आणि तसे जरी समजलो तरी त्यांच्या पूजेअर्चेचेची कर्मे तरी शुध्द होतात कां? कर्मांचे अवडंबर माजवून पदरात काय पडतं?’

     वटपोर्णिमेस वडाची पूजा म्हटले की, डालडाच्या डब्यांत वाळू किंवा मातीत पांच पानांची फांदीची पूजा. देहाचा साजशृंगार मात्र पाहून घ्यावा. नाकात नथ घालायला दहा मिनीटे लागतात. ठेवणीतली कडक इस्त्रीची साडी नेसतात पण पळी पंचपात्री विसरतात. सुवासिनीची ओटी कशी भरतात? व घेतात तरी कशी? साराच गोधळ, नागोबाचं पूजन नागपंचमीला कसे होते? ऋषीपंचमीला एका तरी ऋषींची माहिती पांच दहा वाक्यांत तरी कोणाला सांगता येते कां? सगळीकडे नन्नाचा पाढा. त्यापेक्षा समर्थ म्हणतात हे खटाटोप थांबवून काय करा,.. परमेश्वरीं अनुसंधान | लावितां होईजे पावन | मुख्य ज्ञानेंचि विज्ञान | पाविजेतें ||१८-८-२४||श्रीराम||

     गणपती म्हणाला, हे पावन होणं सोप खरं! अनुसंधानात रहायचं कठीण!

     विलास म्हणाला, अनुसंधान म्हणजे काय? हे ध्यानात येण कठीण!

     जया म्हणाली, अजून कठीण वाटतें तुला?’

     मला नाही म्हणत मी!’ विलास म्हणाला, धर्माच्या नांवाने अधर्माने वागतात नं! त्यांच्या लक्षांत यायचे कठीण म्हणतो मी!

     मधुकर म्हणाला, तुला समजलं आहे न पक्कं?’

     हो तर! आजी! मला सगळेच बुद्दू समजतात. विलासची तक्रार. अनुसंधानात म्हणजे एका भगवंताशिवाय दुसरे काही नको वाटणे. सतत भगवंताचाच विचार मनांत रहाणे म्हणजे अनुसंधान. थोडक्यांत म्हणजे दुपारच्या दासबोधाच्या अनुसंधानात असल्यामुळे कोणालाच कधी उशीर झाला नाही. कधी कोणी गैरहजर राहीला नाही. ज्ञानात भर पडली. पण खंड कधीच पडला नाही. हेच पावन होणे. उलट काही किरकोळ दोष असतील तर ते जाऊ लागले. ही प्रचितीच नव्हे कां?’

     आजी म्हणाल्या, खरंच छान सांगितलसं! याच ज्ञानाच रूपांतर विज्ञानात होतं. विज्ञान म्हणजे शुध्द ज्ञान. निर्गुण ब्रह्माशी ऐक्य आणि बाळांनो! हा विषय पटवून देण्याकरिता समर्थांनी शिष्यांना निद्रा निरूपण ऐकवले. झोपेचे नाना प्रकार नी गमती जमती सांगितल्या. थोडा विचार करून समास वाचला तर ते एक रूपकच आहे. निद्रा हे अज्ञानाचे प्रतीक. निद्रेत अजाणतेपणी माणूस जे जे करतो ते ते अज्ञानामुळे माणसाचे हातून घडत असते.

     रात्रीच्या झोपेतून मनुष्य जागा होतो व ठरलेल्या चाकोरीतले जीवन सुरू करतो. पण शेवटच्या दोन ओव्या पहा कशा विचार करायला लावतात. मागें निद्रा संपली | पुढें जागृति प्राप्त जाली | वेवसाईं बुद्धि आपुली | प्रेरिते  जाले  ||१८-९-२३||श्रीराम||

     मधू म्हणाला, निद्रा संपली, म्हणजे अज्ञान गेले. आणि खऱ्या अर्थाने जाग आली. म्हणजे आत्मज्ञान झाले. मी कोण? हे कळले. अंतरात्मा कोठे, कसा आहे हे समजले. मग बुध्दीने निर्णय घेतला. आता ज्ञान विचाराला सोडायचे नाही. त्याप्रमाणे तिने प्रेरणा दिली. व मनाला तिचे ऐकावे लागले. दहा इंद्रियांसह मन भक्ती मार्गाकडे वळले. ही खरी जागृती.

     शाब्बास!’ आजी म्हणाल्या. पुढचेच बघ समर्थ काय म्हणतात... ज्ञाता तत्वें सांडून पळाला | तुर्येपैलिकडे गेला | आत्मनिवेदनें जाला | ब्रह्मरूप ||१८-९-२४||श्रीराम||

     सुधा म्हणाली, आजी! एकदा का मन या आत्मज्ञानांत रमले की तो जीव २५ तत्वांच्या स्थूल देहाला बाजूला सारतो. कारण ती तत्वे नाशिवंत आहेत. म्हणून स्थूल देह नाशिवंत. सूक्ष्म देहाच्या २५ तत्वांना बाजूला सारतो. नी मनाच्या ओढीने जागृती, स्वप्न, सुषुप्तीच्या पलीकडे उन्मनी अवस्था व त्याहीपलीकडे तुर्यावस्था तो ओलांडतो. तेथेच आत्मनिवेदन घडते व ब्रह्मस्वरूपाचा त्याला  अनुभव येतो.

     वा! वा! सुधा! अगदी आजी बोलतात तस्स फक्कड बोललीस. पण या खोक्यांत फारच थोड शिरलं बघ! विलास म्हणाला.

     आजी म्हणाल्या, विलास! तुला सुध्दा हे सगळं सांगता येईल. फक्त लहान लहान प्रश्न विचारून तुला समजले याची खात्री करून दिली की तूच म्हणशील हे सोप आहे. तिने एकदम २५ तत्वे म्हटले म्हणून तू गडबडलास.

     ५ ज्ञानंद्रिये, ५ कर्मेंद्रिये, ५ अंत: करण पंचक, ५ विषय, व ५ प्राण मिळून २५ तत्वे तयार झाली की नाही. त्यांची नांवे तू जाणतोस.

     असे सुटे सुटे घेतले की, येत तुला सांगायला. समर्थ काय म्हणातात, ते लक्षांत ठेव... जें जें कांहीं श्रवणीं पडिलें | तितुकें समजोन विवरलें | तरीच कांहीं सार्थक जालें | निरूपणीं  ||१८-१०-१६||श्रीराम||

     आलं लक्षांत!’ विलास म्हणाला, मनन हवं. म्हणजे अर्थाच अनुसंधान हवे. म्हणजे निरूपण येत, आजी मला कल्पना सूचली. तुम्ही १० छोटे छोटे प्रश्न विचारा आम्ही उत्तरे लिहू. बघू कोणाच्या किती लक्षांत आहे.

     आजी म्हणाल्या, आपण तोंडी उजळणी घेऊ या. स्पर्धेने कोणाचे तरी मन दुखवले जाईल. सध्या आपण अभ्यास करीत आहोत. आपल्याला थोरल्या देवाचे पाईक व्हायचे आहे. मग थोरांचे लक्षण आपल्यांत उतरायला हवं, कोणतं ते?’ अखंड आपणा सांभळिती | क्षुल्लकपण येऊं नेदिती | थोर लोकांस  क्ष्मा  शांति  |  अगत्य करणें  ||१८-१०-३७||श्रीराम||

     आपण थोरपणा म्हणजे आपले मिळाले आहे ते ज्ञान सांभाळून आपल्याकडे कमीपणा येऊ देऊ नये. कोणाला उत्तर आले न आले तरी उणे दुणे काढू नये. हिणवू नये. आपल्याला सगळ्यांनी मिळून एकच कार्य करायचे आहे. बहुत जनास चालवी | नाना मंडळें हालवी | ऐसी  हे  समर्थपदवी | विवेकें  होते ||१८-१०-४६||श्रीराम||

     करणार न एकजुटीन काम?’

     वा! वा! विचारायला हवं काय? करणारच. सगळे मिळून जगन्नाथाचा रथ ओढू.

     शाब्बास!”

।। जय जय रघूवीर समर्थ ।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा