।।श्रीराम।।
पडवीवरचा दासबोध
लेखिका- आशालता उर्फ आक्का वेलणकर
दिवस २० वा
आज दुक्कल हसत हसतच आली. सगळे नुकतेच जमले होते.
सुधा म्हणाली, ‘येवढे हसायला का येतय?’
विलास म्हणाला, ‘सांगतो
ना! काल गणपतीकडे चोर आले होते. किती होते रे? विलास हसतच राहिला.’
जया घाबरून म्हणाली, ‘मग चोरीला काय काय गेलं? नी तू हसतोस काय? चोरी
झाल्यावर हसतात?’
‘चोरीला नाही काही गेलं.’ विलास म्ह्णाला, ‘नाक बघा
गणोबाचं! कस लाल लाल झालंय! पुन्हा
हसतच सांगू लागला, गणपतीच्या बोटातली नसलेली अंगठी चोर ओरबाडून घेत होते. गणपती
ओरडू लागला. म्हणून त्यांनी म्हणजे चोरांनी छान दोन चार ठोसे नाकाच्या शेंड्यावर
मारले. त्याबरोबर स्वारी ओय् ओय् करून नाचायला लागली. पटापट दिवे लागले. माझे
आईबाबा पण काय झाले म्हणून बघायला गेले. तो कसलं काय? गणपती महाराज नाक चोळत रडत होते. हसून हसून मुरकुंडी वळली आमची!’
आजी
म्हणाल्या, ‘भ्रम
हा माणसाला असाच वेडा करतो.’
सुधा
म्हणाली, ‘पण
हा भ्रम चोर आल्याचा व मारल्याचा होतोच कां? आणि इतका सत्य का वाटतोच कां?’
आजी
म्हणाल्या, ‘देहात्मबुध्दीने
भ्रम म्हणजेच भास उत्पन्न होतो. सोन्याच्या अंगठीवर प्रेम असते. ती कोणी नेऊ नये.
मलाच असावी असे वाटले. नेमके रात्री स्वप्नात मन कल्पना रचते. चोर नाकावर ठोसा
लगावून अंगठी घेऊन जातात. विवेकाने भ्रमाला नाहीसे करता येते. अज्ञानाने वस्तू वा
स्थिती जशी नाही तशी वाटते. याला विपरीत ज्ञान म्हणजे भ्रम असे म्हणतात. भ्रमाचेच
दुसरे नांव भास.’
मधू
म्हणाला, ‘खरचं
आजी, मागच्या वर्षी परीक्षा निकालाचे दिवशी मी घवघवीत ३/४ लाल रेघा मिळवून नापास
झालो असे स्वप्न पडले. खिन्न होऊन रडत बसलो. आईच गेली शाळेत. ती निकाल पत्रक घेऊन
आली. माझा झक्कपैकी गुण मिळवून पांचवा नंबर आला होता.’
विलास
म्हणाला, ‘मी
एकदा माझ्या सावलीलाच भ्यालो, नी पळत सुटलो. अस्सा घामाघूम झालो होतो. भ्रमातुन बाहेर पडलो तरी
घाम येतच होता. सुधा तुला नाही का अशी भीती वाटत?’
सुधा
म्हणाली, ‘भीती
नाही! पण
माझी मोत्याची माळ मीच डब्यात ठेवली होती. पण नक्की आठवेना. म्हणून माळ हरवली या
कल्पनेने दोन तीन दिवस जेवणही जात नव्हते. अचानक डब्यांत जेव्हा माळ सापडली तेव्हा
आनंद झाला. माळ हरवली नसतांना हरवली वाटणे हा भ्रमच नाहीं कां?’
सुधा
म्हणाली, ‘आजी! मी महानंदा सिनेमा पहायला गेले होते.
मावशी होती बरोबर. महानंदेने अग्नीत उडी घेतली. मी आई गSS करुन ओरडले. मावशीने व भोवतालच्यांनी
मला खाली बसवले. माझी कींव करायच्या ऐवजी, ऐकून घ्यावे लागले, सिनेमा आहे हा! पडद्यावरचं
चित्र. त्याला काय भ्यायचं! मी ओशाळलेच. कोणीच रडत नव्हते की भ्यायले नव्हते. मग
मलाच का वाईट वाटलं? मी कां लहान होते? पण मलाच खरचं महानंदा जळून भाजून मेली, असेच वाटले त्यावेळी. हा
भ्रमच कां?
आजी तुम्हाला नाही कधी असं भासत?’
आजी
म्हणाल्या, ‘अगं
आपण सारी या भ्रम सागरांत पोहोतो आहोत. खूप खेपा पुण्यांत झाल्या पण अजून गल्ली
बोळ रस्ते चुकते. मीच वस्तू ठेवते पण मला आठवतच नाही. चष्मा व जपाची माळ तर मला
नेहमीच चक्रात टाकतात. सुधा आता ही ओवी वाच....’ परब्रह्म असतचि असे | मध्येंचि हा भ्रम भासे | भासे परंतु अवघा नासे | काळांतरी ||१०-६-३||श्रीराम||
‘बाळांनो!’ आजी म्हणाल्या, ‘चित् शक्तीने हा विश्वाचा भ्रम निर्माण
केला. त्यातच प्राणी अडकला. डोळस असून आंधळ्यासारखा वागू लागला. विलास आता तू वाच.’
काच देखोन उदकांत
पडे | कां सभा
देखोन दर्पणीं पवाडे | द्वार चुकोन भलतीकडें जाणें | या नांव भ्रम ||१०-६-२२||श्रीराम||
आजी
म्हणाल्या, ‘जो
विवेकाने वागतो, तोच भ्रमातून मुक्त होतो. तो सारासार विचार करतो. फडीत पावत नाही
कधी!’
याकारणें
पुण्यमार्गें चालावें | भजन देवाचें वाढवावें | न्याये सांडून
न जावें |
अन्यायमार्गें ||१०-७-१२||श्रीराम||
‘भ्रमाच्या कोलाहलातून सुटावे अशी
ज्यांची इच्छा असेल त्याने देवाला अखंड स्मरावे. प्रेमाने भजन करावे. तोच खरा
पुण्यमार्ग. जो भगवंताला अनुसरतो त्याचे महात्म्य स्वत: भगवंतच वाढवतो. भजन कसे करावे. मधू तू
वाच आता. ..’ कामनेनें
फळ घडे | निःकाम भजनें भगवंत जोडे | फळभगवंता कोणीकडे | महदांतर ||१०-७-२०||श्रीराम||
‘मीच सांगतो अर्थ, कोणतीही अपेक्षा न
ठेवता, शुध्द अंत:करणाने भगवंताची भक्ती करावी. मग प्रत्यक्ष त्या दिव्य शक्तीचे दर्शन
घडतेच. अनुभव येतो. प्रचिती येते. भक्तीच्या फळापेक्षा भगवंताची प्राप्ती अत्यंत
श्रेष्ट नाही कां?’
आजी
म्हणाल्या, ‘समर्थ
अगदी हेच सांगतात बघं.’ म्हणोन सगुण भजन | वरी विशेष ब्रह्मज्ञान | प्रत्ययाचें समाधान | दुर्ल्लभ जगीं ||१०-७-३१||श्रीराम||
‘जगात सारे कांही पैशाने मिळते. सहज
प्राप्त करून घेता येते. पण उपासनेव्दारा ब्रह्मज्ञान व स्वानुभवाचे समाधान या
गोष्टी दुर्लभ आहेत. त्याच मिळवायचा प्रयत्न करायला हवा.’
मधुकर
म्हणाला, ‘असा
प्रयत्न करणारालाच आत्मज्ञानी म्हणतात नां? पण त्याला ओळखायचा कसा? मधुने ओवी वाचली...’ पापाची खंडणा जाली | जन्मयातना चुकली | ऐसी स्वयें प्रचित आली | म्हणिजे बरें ||१०-८-२१|| श्रीराम||
आजी म्हणाल्या, ‘विवेकाने वागलो तर सोपे आहे हे. पुन्हा
पुन्हा जन्म घ्यावा लागतो वासनेमुळे. वासना पापात्मक कर्म अधिक घडवून आणते. पाप
प्रवृत्ती नष्ट व्हावी. वासना शुध्द व्हाव्या असा प्रयत्न असावा. मग जन्मयातना
चुकणारच. तोच आत्मज्ञानी असतो जो कधीच कोणाला तुच्छ मानीत नाही. सारे कर्तृत्व
कोणाचे हे तो ओळखुन असतो. कोणाचे बरे?’
‘परब्रह्माचे!’ विलास म्हणाला.
‘अंsहं!’ सुधा म्हणाली, ‘हे कर्तृत्व मायेचे. मूळ मायेनेच पांच
भूते आणि तीन गुण निर्माण केले. हा पसारा मांडला.’
गणपती
म्हणाला, ‘पण
जाणीव कला हे सर्व घडवून आणते नां?’
आजी म्हणाल्या, ‘गणपती तुझी आई ती नातवाची आजी, पुतण्याची काकू,
भाच्याची मामी आणि आत्या असू शकते की नाही? तशीच माया, वायू,
जाणीव, जगज्जोती, चैतन्य, शक्ती ही तिचीच नांवे.’
‘वायूला म्हणायचे, प्रकृती, जगज्जोतीला म्हणायचे
पुरुष, प्रकृती पुरूष सर्व काही घडवतात. त्यांनाच अर्धनारी नटेश्वर म्हणतात.’
‘देव, देवता, भूते ही वायूचीच रूपे. त्यांना खोटे
मानू नये. पण भयही वाटू नये. मग त्यांची बाधा कशाला होईल? जया तू वाच ही ओवी...’ ज्ञात्यास संकल्पचि असेना | म्हणोन त्यांचेच बाधवेना | याकारणें आत्मज्ञाना | अभ्यासावें ||१०-९-२२||श्रीराम||
आजी म्हणाल्या, ‘आत्मज्ञानी
पुरुषाचा अभ्यास पूर्णत्वाला जातो म्हणून सर्व कर्मांचा नाश होतो. कर्मे बाधत
नाहीत. म्हणून त्याला संकल्पच नसतो. मग कोणाची कशाला बाधा होईल?’
मधू म्हणाला, ‘भीत्या पाठी ब्रह्मराक्षस. मग तो सावलीला सुध्दा
भिऊन पळातो. सगळेच हसले.’
आजी म्हणाल्या, ‘मग जीवनात प्रथम काय करावे?’
‘मी सांगते!’ सुधा म्हणाली, ‘आत्मज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करावा.’
आजी म्हणाल्या, ‘शाब्बास! ही ओवी वाच...’ ज्ञानेविण कर्म विघडे | हें तों कदापी न घडे | सद्गुरुवीण ज्ञान जोडे | हेंहि अघटीत ||१०-९-२४||श्रीराम||
आजी म्हणाल्या, ‘कर्मे बंधनात घालणारीच असतात. कर्माची बंधने
तोडायची असतील तर आत्मज्ञान हवेच. आत्मज्ञान सद्गुरूं शिवाय लाभत नाही. म्हणून
भगवंताची भक्ती दृढतर केली की भगवंतच सद्गुरूंची योजना आखतो. तो पर्यंत सत्संग
धरावा. श्रवण करावे. तत्वांच्या, सृष्टीच्या व देहाच्या घटकांचा विचार करावा. आपला
आपण शोध घेत साक्षात्कार संपन्न व्हावे. सद्गुरू मार्गदर्शन लाभतेच.’
गणपती म्हणाला, ‘पण आजी! साक्षात्कार संपन्न
म्हणजे जाणायचे कोणाला? परब्रह्माला की मायेला की आत्म्याला? मला घोटाळाच वाटतो.’
आजी म्हणाल्या, ‘आपण काढून टाकू घोटाळा. हे बघ, तुझं नांव गणपती.
खरं ना? बाबा लाडात म्हणतात गणोबा. विलास थट्टेत म्हणतो
गण्या. गडी लोक म्हणतात गणूदादा. म्हणजे बघ किती नांवे झाली? तसेच तू कोणाचा मुलगा, कोणाचा भाऊ, कोणाचा काका,
कोणाचा मामा, तुझ्या वहिनींचा तू भाऊजी! पण गणपती एकच नां? तसेच हे पिंडाचे चार देह. कोणते?’
सुधा म्हणाली, ‘स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण.’
‘शाब्बास! आता ब्रह्मांडाचे
चार देह कोणते बरे?’ आजींनी विचारले.
मधू म्हणाला, ‘विराट, हिरण्यगर्भ, अव्याकृत, मूळमाया.’
आजी म्हणाल्या, ‘गणपती येथपर्यंत घोटाळा नाही नां? पिंडात दिव्य शक्ती जाणीव आहे. ब्रह्मांडात पण
आहे. जाणीव म्हणजेच परमात्मा, परमेश्वर, ज्ञानधन, जगदीश, जगदात्मा कळलं. ही झाली
पुरुषवाचक नांवे.’
‘आपल्या भक्तांचा भगवंत तोच. तोच स्त्रीवाचक
नावांनी ओळखला जातो. मूळमाया, जगदीश्वरी, जगन्माता, विश्ववंद्या, विश्वेश्वरी खूप
खूप नांवे.’
आजींनी विचारले, ‘मूळमाया चंचल की निश्चल?’
मधू म्हणाला, ‘चंचल.’
आजी म्हणाल्या, ‘म्हणूनच पुरूषवाचक, स्त्रीवाचक नावांनी ओळखला
जाणारा परमात्मा नपुंसक लिंगी नावाने पण ओळखला जातो. जाणणे, अंत:करण, श्रवण, चित्त, अनन्य,
चैतन्य इत्यादी खूप खूप नांवे आहेत.
आणि गंमत अशी तिन्ही
लिंगातल्या नावांनी ओळखला जाणारा जो अलिंगी तो परब्रह्म.’ तो चालवी सकळ देहासी | करून अकर्ता म्हणती त्यासी | तो
क्षेत्रज्ञ क्षेत्रवासी | देही
कूटस्त बोलिजे ||१०-१०-४४||श्रीराम||
‘कळलं आता? तो बाल नाही. तरूण
नाही. वृध्द नाही. देह तर चालवतो. पण अलिप्त असतो. देहांत गुप्तरूपाने राहतो. तो
कोण बरें?’
विलास म्हणाला, ‘आत्मा!’
आजी म्हणाल्या, ‘मग आता सांगा साक्षात्कार म्हणजे अनुभव कोणाचा
यायला हवा?’
गणपती म्हणाला, ‘आत्म्याचा, म्हणजेच कूटस्थाचा म्हणजेच
स्वस्वरूपाचा.’
विलास म्हणाला, ‘म्हणजे सोहं चा. मीच परब्रह्म हा अनुभव यायला
हवा.’
‘वा! वा!’ आजी आनंदून म्हणाल्या, ‘विलास तूच वाच ही ओवी...’ निश्चळ परब्रह्म येक | चंचळ जाणावें माईक | ऐसा प्रत्यय निश्चयात्मक | विवेकें पाहावा ||१०-१०-४९||श्रीराम||
‘बाळांनो!’ आजी म्हणाल्या, ‘परब्रह्म कसे?’
सर्वजण म्हणाले, ‘निश्चल.’
आजी- ‘मायामय विश्व कसे?’
सर्वजण- ‘चंचल.’
आजी म्हणाल्या, ‘चंचल ते बदलते. बदलते ते नाश पावते. म्हणून नाश
पावते त्याच्याशी संबध जरूरी पुरता ठेवायचा. व सदैव अंतरंगात त्या निश्चलाचा अनुभव
घ्यायचा.’ आत्मज्ञान पाहे
सदा | त्याच्या पुण्यासी नाहीं मर्यादा | दुष्ट पातकाची बाधा | निरसोन गेली ||१०-१०-६५||श्रीराम||
‘बाळांनो! समर्थ स्वानुभवाचे
बोल आपल्याला ऐकवत आहेत. अमृताचा घोट आहे हा. जो आत्मज्ञानात रत असतो. त्या सारखा
पुण्यवान कोणीच नाही. सदैव आत्मज्ञान संपन्न असतो तो पुण्य संपादितो. दुष्ट घातक
देहात्म बुध्दीच्या पापाची त्याला बाधा होत नाही.’
मधू म्हणाला, ‘म्हणजे तो देहात असून देहात्म बुध्दीत सापडत
नाही. असंच नां?’
‘अगदी बरोबर!’ आजींनी भरल्या
डोळ्यांनी मारूतीकडे पाहून नमस्कार केला. मारूतीराया बाळांच्या पाठीशी सदैव रहा.
त्यांची बुध्दी चळू देऊ नकोस.
नकळत सगळ्यांनीच नमस्कार
केला व एका आवाजात म्हणाले,
।। महारूद्र हनुमान की जय ।।
।। समर्थ रामदास स्वामी महाराज की जय ।।
।। जय जय रघूवीर समर्थ ।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा