शुक्रवार, ४ डिसेंबर, २०२०

पडवीवरचा दासबोध, दिवस २१ वा

 

।।श्रीराम।।

पडवीवरचा दासबोध

लेखिका- आशालता उर्फ आक्का वेलणकर

दिवस २१ वा

     सगळ्यांनी वंदन केले. विलासचे हात घडी केलेले छातीशीच होते. आजींच्या हे लक्षांत आले.

     विलास! तोंडाने स्तोत्र म्हणालास पण हात जोडले नाहीस. ते कां बरे? छातीशीच हातांची घडी. छाती दुखते आहे कां?’  आजींनी विचारले.

     नाही!’ विलास म्हणाला, छाती दुखत नाही. पण सदऱ्याचा खिसा फाटला आहे.

     तो रे कसा?’  आजी म्हणाल्या, निघता निघता फाटला कां?  मग सदरा बदलायचा होतास.

     तस नाही! मी निघालो. विलास म्हणाला, झोपडपट्टीतल्या मुलांची जंगी मारामारी चालली होती. त्यांचे भांडण सोडवण्याच्या भरीस पडलो. तो एका मुलाने खिशाला धरून सदरा ओढला. तो खिसा फाटला. फाटला तर फाटू दे. पण भांडण मिटवून आलो हा आनंद. पण आजी! मला शंका अशी की संघर्ष कां होतो?’  

            आजी म्हणाल्या, निमित्त काहीतरी एवढेसेच असते. पण शब्दाने शब्द वाढतो. शब्दातल्या दोन कठीण शब्दांची टक्कर झाली की कठीण शब्द, दुरूत्तरे म्हणजेच शिव्या, क्रोध वाढविणाऱ्या शिव्या उच्चारल्या जातात. शिव्या पाठोपाठ हातवारे हावभाव वाढतात. स्फुरण येते. मग मारामारी सुरू होते. पर्यवसान दगडफेक हत्यारांचा वापर सुरू होतो.

     शब्द म्हणजेच वायूच. दोन शब्दांतून क्रोधाग्नी वाढतो. तसाच ब्रह्मांडात वायूच्या घर्षणातून अग्नी उत्पन्न होतो.

     आता पुढे मी सांगतो. विलास म्हणाला, अग्नीतून पाणी, पाण्यातून पृथ्वी तयार होते. पृथ्वीवर जीवसृष्टी वाढते. ती चालवतो कोण?’

     मधुकर म्हणाला, करून अकर्ता असा परमात्मा. मग तोच खरा देव कां?’

     आजी म्हणाल्या, नाही! विवेकाने शोधले तर तो नाश पावतो.

     जया म्हणाली, मग आजी ही जी जाणीव किंवा जीवन कला आहे, तिला देव म्हणावे कां?’

     आजी म्हणाल्या, नाही! कारण ही जाणीव म्हणजे निव्वळ निश्चल असलेला परब्रह्म त्याची स्फूर्णा. स्फूर्णा हा विकार उद्भवला. विकार म्हणजे चंचल. चंचल ते नाश पावते. या स्फूर्णेला काय म्हणतात?’

     गणपती म्हणाला, प्रथमच्या स्फूर्णेला मूळ माया म्हणतात.

     शाब्बास!’ आजी म्हणाल्या, त्या मूळमायेतला विकार म्हणजे विकारातला विकार. म्हणजेच जगज्जोती. सुधा या तीनही ओव्या वाच.... श्रोत्रीं नाना शब्द जाणे | त्वचेमधें सीतोष्ण जाणे | चक्षुमधें पाहों जाणे |ाना पदार्थ ||११-१-२७||श्रीराम|| रसनेमधें रस जाणे | घ्राणामधें वास तो जाणे |कर्मइंद्रियामधें जाणे | नाना विषयेस्वाद ||११-१-२८||श्रीराम|| सूक्ष्म रूपें स्थूळ रक्षी | नाना सुखदुःखें परीक्षी | त्यास म्हणती  अंतरसाक्षी | अंतरात्मा ||११-१-२९||श्रीराम||

     मधुकर म्हणाला, ती  जाणीव कला म्हणजेच अंतरसाक्षी, आत्मा कां? मग मगाशी विलास म्हणाला की, झोपडपट्टीतील मुले एकमेकांचा जीव घेत होते. जीव जातो म्हणजे मग कोण जातो?’

     सांगते!’ आजी म्हणाल्या. जाणतो जीव तो प्राण | नेणे जीव तो अज्ञान | जन्मतो  जीव  तो  जाण | वासनात्मक ||११-१-३४||श्रीराम||

     जीव गेला असे आपण म्हणतो, तेव्हा श्वास बंद होतो. म्हणजे प्राण जातो. प्राणाची गती थांबते. नाकावाटे प्राण(हवा) येतही नाही व जातही नाही. मनुष्य प्राणी गार.

     जीवाला बरं नाही किंवा कळत नाही, असं जेव्हा आपण म्हणातो त्यावेळी ज्ञान नसलेली अवस्था असते. म्हणजे अज्ञान असते. जीव जन्माला आला म्हणतो तेव्हा वासनाच अवतरून येते. नव्या देहातून वासना पूर्ती होते. म्हणजे वासना साकार होते. तो जीव.

     आजी! मग विवेकाने नक्की काय करायचे?’ जयाने विचारले.

     छान विचारलेस!’ आजी म्हणाल्या. बघ समर्थच काय सांगतात, श्रवणापरीस मनन सार | मननें कळे सारासार | निजध्यासें साक्षात्कार |िःसंग वस्तु ||११-१-४१||श्रीराम||

     आता तुमच्या शंका म्हणजे मननाचाच मार्ग मोकळा होतोय. जीवाची उपाधी देह. देहामुळे देहात्म बुध्दी. ही देहात्मबुध्दी गळून पडली की ज्ञान होते. ज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव म्हणजे विज्ञान. विज्ञानाने मन उन्मन होते. व खरा देव परब्रह्म त्याच्याशी ऐक्य होते.

     सुधा म्हणाली, तीच सायुज्य मुक्ती कां?’

     होय!’ आजी म्हणाल्या. पण काय होते. गणपती आता तूच वाच... संदेह अनुमान आणी भ्रम | अवघा चंचळामधें श्रम |निश्चळीं कदा नाहीं वर्म | समजलें पाहिजे ||११-२-||श्रीराम||

     आजी म्हणाल्या, माणूस संशयग्रस्त असतो. नाना तऱ्हेच्या कल्पना करीत सुटतो. भ्रमांत सापडतो. मुख्य वर्म म्हणजे खरा देव विसरतो. मुख्य  देव  तो  कळेना | काशास  कांहींच मिळेना | येकास येक वळेना | अनावर ||११-२-२१||श्रीराम||

     कोणाचा विचार कोणास पटत नाही. म्हणून ज्ञानी माणसांनी अधिकारपरत्वे चार देवांची कल्पना केली. विलास तू वाच. ... येक नाना प्रतिमा | दुसरा अवतारमहिमा | तिसरा तो अंतरात्मा | चौथा तो निर्विकारी ||११-२-३३||श्रीराम||

     भक्ती मार्गात जसा अधिकार वाढेल तसा देवाचा विचार वाढतो. सामान्य भक्त नाना प्रकारच्या प्रतिमांना देव म्हणतात. त्यांची पूजा करतात.

     गणपती म्हणाला, म्हणजे आपल्या घरातले देव नां?’

     होय!’ आजी म्हणाल्या, थोडे ज्ञान वाढले की, भगवंताचे राम कृष्णादिक अवतार हेच देव वाटते. सत् संगती वाढली. श्रवण खूप घडले व विवेक वाढीस लागला की अंतरात्मा म्हणजेच जाणीव कला म्हणजेच आत्मा हा खरा देव वाटतो. पण ज्ञानाचे विज्ञान झाले की निर्विकार परब्रह्म हाच खरा देव हे पटते. विलास तूच सांग, परब्रह्म विकारी की निर्विकारी?’

     विलास म्हणाला, निर्विकारी!’

     ठिक!’ आजी म्हणाल्या. आत्मा, अंतरात्मा, साक्षी परमात्मा निर्विकारी की विकारी?’

     विलास म्हणाला, विकारी!’

     शाब्बास!’ आजी म्हणाल्या. म्हणूनच समर्थ काय म्हणातात बघ. .. निर्विकारी आणि विकारी | येक म्हणेल तो भिकारी | विचाराची होते वारी | देखतदेखतां ||११-४-||श्रीराम||

     ज्याचा विवेक जागा तो विकारी तत्वांना देव म्हणत नाही. निर्विकारी परब्रह्म व विकारी देव यांना एकच समजणे हे भिकारीपण म्हणजे शूद्रत्व. हीनपणाच तो. मनुष्य देहांत बुध्दी लाभली असता असे हीनपणाने वागावे कां?’

     विलास म्हणाला, नाही! तो मूर्खपणा ठरेल.

     आजी म्हणाल्या, मधू! तू ही ओवी वाच. म्हणौन  हा  विचार करावा | सत्यमार्ग  तोचि धरावा | लाभ जाणोन घ्यावा | विवेकाचा ||११-४-२१||श्रीराम||

     गणपती म्हणाला, लाभ मिळवायचा म्हणजे आत्मज्ञानच नं?’

     आजी म्हणाल्या, पण त्याचे आधीची तयारी? शेतात पीक काढण्यापूर्वी नांगरणे, ढेकळे फोडणे, जमीनीत खत घालणे, बी पेरणे करावे लागते की नाही? एकदम धान्य पेरले की उत्पन्न मिळते कां? तसेच आहे हे.

     समर्थ आवर्जून सांगतात. शुध्द विवेक वाढीस लागवा म्हणून काय करावे? सुधा तू दोन्ही ओव्या वाच. मुख्य हरिकथा निरूपण | दुसरें तें राजकरण | तिसरें  तें  सावधपण  |  सर्वविषईं  ||११-५-||श्रीराम|| चौथा अत्यंत  साक्षप | फेडावे  नाना  आक्षेप| अन्याये थोर अथवा अल्प | क्षमा करीत जावे ||११-५-||श्रीराम||

     जीवन उत्तम चालावे, हातून ईशसेवा घडावी असे वाटत असेल तर पहिली गोष्ट भगवंताला विसरू नये. आजी म्हणाल्या. हरीचे गुणगान गावे, व्यवहारांत चातुर्याने वागावे. बेसावध असणाऱ्याचा नाश होतो. ज्याला समाजकार्य करावयाचे असते. लौकीक मिळवायचा असतो. त्याने सर्व ठिकाणी तत्पर असावे. अंगी उद्योगीपणा असावा. आळसाला थारा देऊ नये. आळस उद्योगाचे आड येतो. उद्योग करीत राहीले की यश मिळते. टिकावू यश हेच खरे यश. कोणी नाना तऱ्हेचे संशय घेतील, शंका काढतील त्यांचे निवारण करता आले पाहिजे. आपल्याशी ज्यांचा संबंध येतो त्यांच्या हातून काही चूका झाल्यास क्षमाशील वृत्तीने क्षमा करता आली पाहिजे. अशा वागण्याला काय म्हणायचे?’

     जया म्हणाली, विवेकाने वागणे. पण आजी जरा कठीणच आहे. नाही कां? जरा मनाविरूध्द कोणी वागले तर राग येणारच! नाही कां?’

     आजी म्हणाल्या, तुझ म्हणणे ठिक आहे. पण खरा लौकीक ज्याला मिळवायचा आहे त्याने प्रथम लक्षांत ठेवावे... दोष देखोन झांकावे | अवगुण अखंड न बोलावे | दुर्जन सांपडोन सोडावे | परोपकार करूनी ||१०-५-१०||श्रीराम||

            दुसऱ्याच्या दोषांवर पाघरूण घातल्याने त्याला दोष काढून टाकायला संधी मिळते. अवगुण बोलत राहिले तर दोष आपल्यातच शिरतील. मनुष्य कोडगाच होईल. सुधारायचे राहोच पण हित साधणार नाही. कोणी दुर्जन भेटला तर त्याचेवर परोपकार करावा. त्याचा दुर्जनपणा न बोलता घालवावा.

     किती बारीक बारीक पण मोलाच्या सूचना दिल्या आहेत. हे सारे मोठ्या माणसांकरिता. आम्ही लहानमुलांनी काय करावे?’

     बाळांनो!’ आजी म्हणाल्या, आपल्या आवाक्यांत येईल तेवढे आपण वागू यां. आपण स्वत:ला लहान कां मानावे? तुम्हाकरता पण सांगितले आहे बघ, अपार  असावें  पाठांतर  |  सन्निधचि असावा विचार | सदा सर्वदा तत्पर | परोपकारासी ||११-५-१५||श्रीराम||

     छोट्यांनी काय नी मोठ्यांनी काय? पाठांतर नित्यनेमाने करावे. जुन्याची उजळणी. नव्याची भर. त्याने बुध्दी प्रगल्भ होते. विचार संपन्नता वाढते. विवेकाने वागून परोपकार वृत्तीने जगात वावरावे. दुसऱ्याला मदत करणे हे पुण्यकर्मच नां? पुढच वाच मधू... शांती करून करवावी | तऱ्हे सांडून सांडवावी | क्रिया करून करवावी | बहुतांकरवीं ||११-५-१६||श्रीराम||

     अर्थ तर सोपाच आहे, मधू म्हणाला, स्वत: शांत रहावे. नाथ महाराजांसारखे. आणि इतरांना शांत करावे. शोभणार नाही असे आपले वागणे नसावे. स्वत: तर काम करावेच. इतरांनाही कार्य करण्यास वावा द्यावा. काम करण्यास तयार करावे. त्यांच्यात कार्याची गोडी उत्पन्न झाली तर नकळत आपली महती वाढेल. असेच की नाही आजी?’

     बरोबर आहे!’ आजी म्हणाल्या, समर्थांनी आणखी एक इशारा दिला आहे बघ. राजकारण बहुत करावें | परंतु कळोंच नेदावें | परपीडेवरी नसावें |ंतःकरण ||११-५-१९||श्रीराम||

     आजी म्हणाल्या, समर्थांचा राजकारण हा शब्द फार व्यापक आहे बरं! लोकसंग्रह एकजूट या अर्थाने तो शब्द वापरला आहे. लाथाळीचे राजकारण नव्हे. हेव्यादाव्याचे तर नव्हेच नव्हे.

     समर्थ म्हणतात, ज्याला लोकसंग्रह करायचा आहे, त्याने आपले कार्य गुप्त रितीने करावे. आपण काय करतो, कोठे जातो, कोणाला काय निरोप देतो, हे इतरांना काहीच कळू देऊ नये. सारे कार्य गुप्तच असावे. दुसऱ्याला दु:ख होईल असे तर मुळीच वागू नये.

     बाळांनो! व्यवहारात काय होते, आपण स्वार्थाने एखाद्याची कड घेतो. बाजू उचलून धरतो. पण त्याच वेळी दुसऱ्याचा मत्सर करतो. दुसऱ्याचा उत्कर्ष सहन न होणे हे लक्षण कांही बरे नव्हे.

     आपण न्यायाने वागावे. त्यागाची वृत्ती वाढीस लावावी. मग आपसूकच मन अमन होते. निर्मळ होते नी सहज दर्शन घडते. कोणाचे?’

     विलास म्हणाला, देवाचे.

     गणपती म्हणाला, भगवंताचे.

     मधुकर म्हणाला, परमेश्वराचे.

     सुधा म्हणाली, आजी नुसत्या परमेश्वराला ओळखण्यापेक्षा तोच होऊन रहावे. हेच खरे नाही कां? त्याचसाठी तर हा आटापिटा.

     आजी म्हणाल्या, सगळ्यांचेच उत्तर बरोबर. खरा देव कळला, मग प्रतिमा, अवतार, विभूती यांची भक्ती केली तरी ती परमेश्वरा पर्यंत पोहोचते.

     समर्थांनी आयुष्यभर तेच केले. मारूतीरायांनी तेच केले. आपण तोच आदर्श डोळ्यांपुढे ठेवू या.

।। जय जय रघूवीर समर्थ ।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा