।।श्रीराम।।
पडवीवरचा दासबोध
लेखिका- आशालता उर्फ आक्का वेलणकर
दिवस ३५ वा
सगळी जमली. जयाच्या
हातातल्या डब्याकडे सगळ्यांचे लक्ष होते. ‘आज खूपच मोठा डबा
आहे. काय आहे एवढा खाऊ?’ विलासने विचारले.
जया म्हणाली, ‘खाऊ नाही! प्रसाद आहे प्रसाद!’
‘प्रसाद! सत्यनारायणाचा कां?’ गणपतीने विचारले.
जया म्हणाली, ‘नाही! प्रसाद फक्त
सत्यनारायणाचाच असतो कां? आज खूप प्रसाद आहे. आजी आज आधी आम्ही प्रसाद
कोणता ते पाहू कां?’
आजी म्हणाल्या, ‘पहा! पहा! थांबा मी ताट आणते. त्यात ठेव वेगवेगळा.’ आजींच्या ऐवजी सुधाच आत गेली ती ताट घेऊन आली.
डबा आजींच्या हातात दिला.
आजींनी डबा उघडला. एक पुडा काढला. त्यात एक लहान
पुडी होती. ती उघडली त्यात काळा बुक्का होता. वास छान आला. चुरमुऱ्याला पण
बुक्याचा वास लागला होता.
‘हा प्रसाद पंढरपूरचा!’ विलास म्हणाला. विठोबा काळा बुक्का काळा.
दुसरा पुडा काढला, त्यात
कवठाची बर्फी होती. मधु म्हणाला, ‘ही बर्फी केशरी आंबट
गोड, कवठाची, नरसोबाच्या वाडीची. होय नां?’ जयाने मान हलवली.
‘अय्या! हे पेढे. वास कसा
खमंग आला. पुड्यावरच नांव आहे, कंदी पेढे. म्हणजे हे सातारचे. हा प्रसाद गडावरचा
दिसतोय.’ सुधा म्हणाली.
‘आणि हे काय आहे?’
विलासने विचारले.
आजी म्हणाल्या, ‘याला पेठा म्हणतात. वरून कोरडी दिसते वडी, पण आंत
मऊ ओलसर आहे. हा मथुरेचा प्रसाद. तिकडचा पेठा प्रसिध्द.’
‘आणि हे खोबरे. याला हळद किती लागली आहे. पिवळ
झालयं सगळं.’ विलासने नाक उडवलं.
जया म्हणाली, ‘हा जेजुरीचा प्रसाद! याला भंडारा म्हणतात. जेजुरीला गेलं की
कपड्यांना पिवळा डाग पडलाच म्हणून समजा. कपाळाला हळद फासतात. नी खोबऱ्याचा प्रसाद
देतात.’
‘आणि हे मोठे फुटाणे. हे कोल्हापुरचे अंबाबाईचा
प्रसाद हा.’ विलास म्हणाला.
‘इतका प्रसाद एकदम कसा आला?’ गणपतीने विचारले.
जया म्हणाली, ‘माझे काका भारत दर्शनला गेले होते. खूप खूप
यात्रा केली त्यांनी, प्रत्येक गावाचा देव वेगवगळा, प्रसाद वेगळा. हिमालयातील
बद्रीनारायणा पासून दक्षीणेला रामेश्वर पर्यंत आणि पूर्वेच्या जगन्नाथपुरी पासून पश्चिमेला
व्दारके पर्यंत चार धाम यात्रा केली. आजी इतके देव असल्यावर भक्ती कोणत्या देवाची
करायची.’
आजी म्हणाल्या, ‘हे सगळे देव म्हणजे मोठ्या अवतारी देवांच्या
काल्पनिक प्रतिमा.’
‘जोपर्यंत पूर्ण ज्ञान होत नाही तोपर्यंत सगुण
मूर्तीची पूजा वंदन आवश्यकच. मात्र विचार करून आपले आवडते दैवत आपण पक्के ठरवावे.
व मनोभावे एकाचीच उपासना करावी. कोणत्याही प्रतिमेची मनोभावे भक्ती केली तरी ती
पूजा अंतरात्म्यालाच जाऊन पोहेचते. फळ देणारा शेवटी अंतरात्माच असतो.’
‘कारण समर्थ दासबोधात सांगतात. सुधा १८/१ काढ.’
विलास म्हणाला, ‘आजी १८/१ म्हणजे काय?’
सुधा म्हणाली, ‘दशक अठरा समास एक. आता ओवी ऐक....’ सकळ देवांचे मूळ | तो हा अंतरात्माचि केवळ | भूमंडळीं भोग सकळ | त्यासीच घडे ||१८-१-१६||श्रीराम||
आजी म्हणाल्या, ‘देव कोणत्याही क्षेत्रातला असो. त्याचे नांव
काहीही असो. जगन्नाथ पुरीचा जगन्नाथ नाहीतर व्दारकेचा व्दारकानाथ. आपण जी पूजा करू
ती अंतरात्म्यालाच पोहोचते. सामन्य मनुष्य अंतरात्म्याला पाहू शकत नाही तो पर्यंत
एकनिष्ठेने सगुणाची म्हणजे मूर्तीची पूजा करायला हवी.’
‘पूजा करता करताच भगवंताचे प्रेम वाढीसलागले की,
मूर्ती आपोआप सुटते व प्रेमाचा ओघ अनुसंधानात शिरतो. अनुसंधान म्हणजे त्याच्या
शिवाय दुसरा कोणी नाहीच. सर्वत्र तोच तो अनुभवास येणे. या अनुसंधानाने काय साधते? गणपती आता तू वाच...’ त्या अनुसंधानासरिसें | जळोनी जाईजे किल्मिषें | अंतरनिष्ठ ज्ञानी ऐसे | विवरोन पाहाती ||१८-१-२३||श्रीराम||
आजी
म्हणाल्या, ‘एकदा
का भक्ताला अनुभव आला की हा अंतरात्माच सर्व काही आहे. की बस्सं! मार्ग मोकळा झाला. पुण्याई शिवाय अनुसंधान राखता येत नाही.
अनुसंधान राखता येऊ लागले की, पापाचे नांव सुध्दा शिल्लक रहात नाही.’
मधू
म्हणाला, ‘पाप
जळून जाते. म्हणजेच सदैव देवाचेच स्मरण असल्याने पापकृती हातू घडणारच नाही. जळायला
पापच कुठे आहे?’
आजी
म्हणाल्या, ‘बरोबर! पण भक्ती करायला लागण्यापूर्वी जे
काही पापात्मक कर्म केले असेल तेही फळ देण्याकरीता शिल्लक रहायला नको. ते पाप जळून
जाते व नवीन होतच नाही.’
‘असे जे अंतरात्म्यावर प्रेम करणारे
अंतर्निष्ठ असतात, त्यांचे काय होते? त्यांना कोणता लाभ मिळतो.’ जयाने विचारले.
आजींनी
लगेच दासबोधातली ओवी वाचायला दिली.... अंतरनिष्ठ तितुके
तरले |
अंतरभ्रष्ट तितुके बुडाले | बाह्यात्कारें भरंगळले | लोकाचारें ||१८-१-२३||श्रीराम||
आजी
म्हणाल्या, ‘त्या
थोरल्या देवावर ज्याचे खरेखुरे प्रेम असते ते नाना तऱ्हेच्या संकटातून सुटतात.
माया नदी तरून जातात. दृष्य माईक पसाऱ्यात अडकत नाहीत. त्यांचे जीवन सार्थकी
लागते.’
‘ज्यांना देवावर प्रेमच करता येत नाही.
ते देवाण घेवाण या व्यवहारात गुंतून पडतात. ते अंतरभ्रष्ट. ते पार बुडतात. त्यांचे
जीवन फुकट जाते.’
विलास
म्हणाला, ‘आजी! खरे खुरे प्रेम करायचे म्हणजे ते कसे? ते कोठे शिकायचे?’
‘छान विचारलेस!’ आजी म्हणाल्या, ‘हे बघ समर्थ काय सांगतात....’ जाणत्याची संगती धरावी | जाणत्याची सेवा करावी | जाणत्याची सद्बुध्दी घ्यावी| हळुहळु ||१८-२-२||श्रीराम||
विलास
म्हणाला, ‘सोपी
आहे ओवी. मला कळला अर्थ. जाणता म्हणजे अंतरात्मा हाच खरा देव. तोच सारे करतो.
सांभाळतो, मोडतो. तरी तो असतोच असतो. हे ज्यांनी ओळखले तो जाणता. म्हणजे संत. त्यांची
संगती धरावी. त्यांचे पडेल ते काम करावे. त्यांची आज्ञा पाळावी. त्यांच्या
वागणुकीचे निरीक्षण करावे. घेता येतील तितके गुण घ्यावेत. गुणांचा साठा आपल्या जवळ
झाला ती त्यांचे अनुसंधान आपल्याला राखता येईल.’
सुधा
म्हणाली, ‘वा! वा! आता विलास पण वाढीव अर्थ सांगू शकतो
हं!
शाब्बास विलास.’
‘थँक यू मॅडम!’ विलास म्हणाला, सगळे हसले.
‘जाणत्यापाशी, म्हणजे ज्ञानी माणसापाशी
शिकण्यासारखे असे काय असते? गणपतीने शंका विचारली.’
आजी
म्हणाल्या, ‘खूप
काही असते. ती बघण्याची दृष्टी हवी. ही ओवी बघ..’ जाणत्याची तीक्षणता | जाणत्याची सहिष्णता | जाणत्याची उदारता | समजोन घ्यावी ||१८-२-१७||श्रीराम||
आजी
म्हणाल्या, ‘जाणता
सूक्ष्म, तीक्ष्ण बुध्दीचा असतो. सूक्ष्म विचार करतो.’
विलास
म्हणाला, ‘थांबा
आजी!
सूक्ष्म आणि तीक्ष्ण एकच कां? मी आतापर्यंत समजत होतो, सूक्ष्म म्हणजे लहान, मंद बुध्दी. आता मला
समजायला लागलं.’
गणपतीने
टोला हाणला, ‘बाळ
आता मोठा झाला नं! मोठा म्हणजे शहाणा.’
आजी
म्हणाल्या, ‘आपण
सगळेच हनुमान भक्त नं? सगळेच शहाणे होऊ या. जाणत्या माणसाचे ठिकाणी सहिष्णूता असते. सारे
काही सहन करण्याची ताकद असते. जाणता समभावाने वागतो, म्हणून मनाविरूध्द काही घडले
तरी खोल विचार करून तथ्य नाही तो भाग काढून फेकून देतो. दुष्ट माणसाच्या सुध्दा
चांगल्या विचाराचे स्वागत करतो. त्याला सहिष्णू म्हणतात. असा ज्ञानी उदार असतो.
अशा उदारपणाची दातृत्वाची कितीतरी उदाहरणे आपल्या वाङ्मयातून आढळतात. शिबी राजा,
चांगुणा, कवच कुंडले काढून देणारा कर्ण, शीर कापून भगवंताला वहाणारा बाणासूर.
सगळ्या कथा वाचाव्यात. संतांच्या संगतीत हे सारे समजते. मग १० चांगल्या गुणातील एक
तरी आपल्यात उतरतोच.
‘बाळांनो! जो आपला योगक्षेम चालवतो, त्याचे
चिंतन असावे. एकांतात त्याच्या अव्यक्त स्वरूपाचे चिंतन करावे. जो असे ध्याने धरत
नाही तो अभक्त. जो भगवंताचा भक्त असतो त्यास भगवंत जन्म मृत्यूच्या संसारापासून
मुक्त करतो. म्हणजेच वासना शुध्द करण्यास मदत करतो. शुध्द विचाराची ठेवच शुध्द
आचाराकरिता उपयोगी पडते. मनुष्य कर्मबंधनातून सुटतो.’
मधुकर म्हणाला, ‘समर्थ आणि इतर संतही इतके मार्गदर्शन
करतात तरी पुण्यमार्ग लोकांना कां बरे आवडत नाही?’
जया
म्हणाली, ‘मला
वाटते या ध्यान, अनुसंधान, भक्ती यात पैसा मिळण्याची बाब कोठेच नाही. इतरांनी पैसा
हेच सर्वस्व वाटते.’
गणपती
म्हणाला, ‘ते
तर खरंच, पण ज्याच्याजवळ विपुल पैसा आहे त्यांना द्रव्या करीता नको भक्ती करायला.
पण अध्यात्माचा कांही भाग जाचक व अवघड वाटतो.’
आजी
म्हणाल्या, ‘गणपती! तेवढीच अडचण असेल तर समर्थ युक्ती
सांगतात बघ. खरी गंमत त्यांना आवश्यकताच वाटत नाही.... आपणांस कांहींच येना | आणी सिकविलेंही मानेना | आपण
वेडा आणी सज्जना
| बोल
ठेवी ||१८-३-९||श्रीराम||
‘स्वत:ला कळत नाही. दुसऱ्याने सांगितलेले पटत
नाही. दोष मात्र देतो. तसे न करता काय करावे. जया तू वाच.....’ येकाग्र करूनियां मन | बळेंचि धरावें साधन| येत्नीं आळसाचें दर्शन | होऊंच नये ||१८-३-१२||श्रीराम||
‘एकाग्र चित्ताने साधना केली तर अशक्य
काय आहे? मन
एकाएकी रमत नाही. म्हणून त्याला बळेच खेचून साधनेस बसवावे. आळस केला की जीव वाया
गेला. असाच हील नाही कां याचा अर्थ?’ जयाने अर्थही सांगितला.
आजी
म्हणाल्या, ‘बरोबर
सांगितलेस!
चित्त एकाग्र होण्यासाठी एकांताची अत्यंत गरज असते. समर्थ तर म्हणतात,’ अखंड येकांत सेवावा | ग्रन्थमात्र धांडोळावा | प्रचित येईल
तो घ्यावा | अर्थ मनीं ||१८-३-२०||श्रीराम||
‘सूक्ष्म अभ्यासासाठी साधनेत खंड नको.
अखंडीत साधना लवकर फलद्रूप होते. बऱ्याच ग्रंथांचे वाचन मन लावून करावे. ग्रंथातील
विचारा बरोबर न जाता आपल्या कुवतीप्रमाणे योग्य तो विचार संग्रही ठेवावेत.’
विलास
म्हणाला, ग्रंथाची कात्रणे कोण काढून देईल? जेवढे पटले आहे तेवढे लिहित बसायला
वेळ किती लागेल? मग
संग्रही कसे ठेवायचे?’
गणपती
म्हणाला, ‘मेंदूच्या
कपाटात ठेवायचे. कात्रणे नाही काढून घ्यायची. स्मरणांत ठेवायचे. विलासच्या डोक्यावर
थाप मारूनच सांगितले.’
आजी
म्हणाल्या, ‘भगवंताची
आपल्यावर केवढी कृपा आहे? त्याची भेटी लवकर व्हावी म्हणूनच हा सुबक देह त्याने मला दिला आहे.’
‘आणि सुपीक बुध्दी पण दिली आहे.’ गणपतीच्या डोक्यावर थाप मारून विलास
म्हणाला.
आजींसह
सर्वजण हसले. ‘विलास! ही ओवी तू वाच!’ आजी म्हणाल्या, देह्याकरितां श्रवण
घडे| देह्याकरितां
मननीं पवाडे | देह्याकरितां
देहीं आतुडे | मुख्य परमात्मा ||१८-४-५||श्रीराम||
आजी म्हणाल्या, ‘येथे करीता या शब्दाचा अर्थ मुळे असा
होतो. देहामुळे श्रवण घडते. ऐकण्याचे काम जरी कान करीत असले तरी मनासह सर्व देह
अनुकूल असावा लागतो. तरच श्रवण घडते. श्रवणाचे मनन झाले की, या देहातच तो परमात्मा
कोठे व कसा आहे हे स्पष्ट कळू लागते. आणखी काय करता येते? मधु तू वाच आता....’ नाना सन्मार्गसाधनें | देह्याकरितां तुटती बंधनें | देह्याकरितां निवेदनें | मोक्ष लाभे ||१८-४-१७||श्रीराम||
मधु
म्हणाला, ‘पण
आजी! हा
देहच बंधनात ढकलतो आणि सोडवतो पण! कशी गंमत आहे?’
सुधा
म्हणाली, ‘मधुदादा! जे परमार्थ मार्गाला लागत नाहीत
त्यांचेच देह त्यांना देहात्मबुध्दीत जखडतात. पण साधना करू लागल्यावर हा देहच
मुक्त होण्यासाठी मदत करतो. म्हणजेच साधना देहानेच करायची असते.’
आजी
म्हणाल्या, ‘फक्त
विवेक जागा ठेवावा. सर्वांचे ठिकाणी भगवत् भाव ठेवावा. पूज्य वंदनीय असतील त्यांची
अधिकार पाहून पूजा करावी. तिरस्कार कोणाचाच करू नये. समर्थ बघ काय म्हणतात...’ पूज्य पूजेसी अधिकार | उगेचि तोषवावे इतर | दुखऊं नये कोणाचें अंतर | म्हणिजे बरें ||१८-४-३८||श्रीराम||
‘कोणाच्याही अंत:करणाला वेदना होतील असे बोलणे वागणे
नसावे. जे ज्ञान आत्मसात केले आहे ते विचारपूर्वक वापरता आले पाहिजे. नाहीतर नुसता
शब्द पंडित आतून कोरा करकरीत. कसा छान दृष्टांत दिला आहे समर्थांनी....’ धान्य उदंड मोजिलें | परी त्या मापें नाहीं भक्षिलें | विवरल्याविण तैसें जालें | प्राणीमात्रांसी ||१८-५-१||श्रीराम||
‘लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे
पाषाण असे होऊ नये म्हणून मननाला फार मह्त्व आहे....’ स्वये आपणचि गुंते | समजावीस कैसी होते | नेणतां कोणीयेक ते | आपदों लागती ||१८-५-१९||श्रीराम||
मधु
म्हणाला, ‘किती
योग्य विचार. समर्थांनी जणू कांही धोक्याची सूचनाच दिली आहे. जो स्वत:च दुबळा आहे
तो दुसऱ्याला काय मदत करणार? आणि अशांच्या तडाख्यात सापडणारा अज्ञानी पार संकटात बुडणार! उध्दार तर बाजूलाच राहिला पण अवनती
मात्र होणार!’
‘म्हणून तर आपला आदर्श आपण भक्कम ठेवला
आहे,’
विलास म्हणाला.
‘सारासार विचार जागा ठेवणारा मारूती!’ मधुकर म्हणाला.
‘रामाचा अनन्य भक्त लेचापेचा नाही!’ जया म्हणाली.
‘समर्थांचा आदर्श तोच आपला आदर्श!’ आजी म्हणाल्या. ‘आता प्रसाद घ्या आणि तोंड गोड करा.’
।। जय जय रघूवीर समर्थ ।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा