।।श्रीराम।।
पडवीवरचा दासबोध
लेखिका- आशालता उर्फ आक्का वेलणकर
दिवस २९ वा
आज सगळेजण दहा मिनिटे आधीच जमले. “अंतरात्मा फक्त माणसांच्याच देहाला सांभाळतो कां? पशू, पक्षी, प्राणी त्या अंतरात्म्यामुळे
संकटातून सुटतात की बुध्दी चातुर्याने?” सगळ्यांपुढे प्रश्न
निर्माण झाले होते.
मधू म्हणाला, ‘सुसरीच्या पाठीला मऊ म्हणून स्तुती केली. वानर
सही सलामत सुटले बुध्दी चातुर्यानेचे.’
विलास म्हणाला, ‘ससा केवढा पिटूकला पण सिंहाला विहिरीत दुसरा सिंह
दाखवून चकवले व आपला प्राण वाचवला. इतरही प्राण्यांना आनंद झाला. हे पण बुध्दी
चातुर्यानेच.’
गणपती म्हणाला, ‘कोल्ह्याने माणसाची तर सुटका केलीच. पण वाघाला
पुन्हा पिंजऱ्यात अडकवले. वा रे बुध्दी चातुर्य! माणसाला
सूचले नाही ते त्याला सूचले.’
सुधा म्हणाली, ‘आपले प्राण वाचवलेल्या कबुतराचे प्राण एका मुंगीने
वाचवले. कशी कडकडून चावली पारध्याच्या पायाला. त्यामुळे पारध्याचा नेम चुकला.
कबुतर उडून गेले. किती सांगाव्यात चतूरपणाच्या गोष्टी! माणसाची बुध्दी तर याही पेक्षा श्रेष्ठ.
मग या चातुर्याचा उपयोग करून आपापली उन्नती का करून घेत नाही? आपण आजींनाच विचारू या.’
असे
म्हणेपर्यंत आजी आल्याच. मुलांची चर्चा माजघरांतून त्यांनी ऐकली होती. आता मुले स्वत:च विचार करू लागली याचा त्यांना आनंद
झाला होता. स्थानापन्न होऊन त्या म्हणाल्या, ‘विचारा काय विचारायचं आहे? त्याचे उत्तर दासबोधात सापडणारच.’
विलास
म्हणाला, ‘आजी! चतुराईचा उपयोग करून कोण कसे सुटले या
गोष्टीची आम्ही चर्चा करीत होतो. हे चातुर्य माणसांत का नसावे? बुध्दी तर अधिक प्रमाणांत लाभली आहे.
बुध्दी चातुर्याचा स्वत:च्या उन्नती करिता कां उपयोग करून घेत नाही?’
आजी
म्हणाल्या, ‘चांगला
प्रश्न आहे. साधन आहे पण त्याचा उपयोग करता आला पाहिजे नां? समर्थ सांगतात, ...’ जीव जीवांत घालावा | आत्मा आत्म्यांत मिसळावा | राह राहों शोध घ्यावा | परांतरांचा ||१५-१-४||श्रीराम||
‘ही फार मोठी कला आहे. ती आत्मसात करता
आली पाहिजे. सर्व जीवंत प्राण्यात जीव, प्राण, आत्मा आहेच. पण जीव जीवांत घालावा
हे वागणे सगळ्यांचे होते कां? आपल्यावरून जग ओळखून सर्वांशी जर प्रेमाने वागता येईल तर
आत्मस्वरूपाने आपण एकच आहोत याचा प्रत्यय येईल. बुध्दी अधिक शुध्द व सतेज होईल. देहात्म
बुध्दीने स्वत:चाच फायदा व दुसऱ्याचे नुकसान असे कर्म होणार नाही. आपल्याशी संबंध
असलेले लहान बालक रस्त्यांत पडले तर आपली प्रतिक्रीया काय होते?’
जया
म्हणाली, ‘आपण
धावत जाऊन त्याचे दु:ख निवारणाच्या कसोशीने प्रयत्न करतो.’
आजी
म्हणाल्या, ‘तेच
मूल आपल्याशी संबंध नाही त्यातून झोपडपट्टीतील मूल असेल तर स्वाभाविकपणे काय होते?’
सुधा
म्हणाली, ‘फार
फार तर हळहळतो. अरेरे! दहा दहा वेळा म्हणतो. पाडणाऱ्याला दोष देतो. दु:ख निवारणाचा प्रयत्न
जातीनिशी होत नाही.’
आजी
म्हणाल्या, ‘यालाच
म्हणतात, आत्म्यात आत्मा घालता आला नाही. माझे तुझे व्दैत गेले नाही. तर परांतराचा
शोध कसा घेता येईल? म्हणून शुध्द भक्तीने आधी स्वत:मधला देव शोधून तोच सर्वत्र पहायचा
अभ्यास आवश्यक. समर्थ पुढे काय म्हणतात बघ. गणपती तू वाच...’ आचारविचारेंविण | जें जें करणें तो तो सीण | धूर्त आणि विचक्षण | तेचि शोधावे ||१५-१-२४||श्रीराम||
‘शुध्द आचरणावर समर्थांचा फार भर.
म्हणजे वागणूक अगदी कसं धुतलेल्या तांदळासारखं. तारतम्य ठेऊन वागायला हवे. विवेक
विचाराशी सांगड घालून जर आपण चांगले वागलो नाही तर जे कर्म करू ते वाया जाईल. श्रम
फुकट जातील. म्हणून धूर्त, दूरवर विचार करणारांनी चातुर्याने वागणारांची संगत
धरावी.’
‘जया! ज्ञान ग्रहण करीत असताना वृत्ती कशी
असावी?
तूच वाच.’ वेष धरावा बावळा | अंतरीं असाव्या नाना कळा | सगट
लोकांचा जिव्हाळा | मोडूं
नये ||१५-१-३१||श्रीराम||
‘बाह्य वेष अगदी साधा असावा, आतून मात्र नाना कला जोपासाव्यात.’
‘कलाहीन मनुष्य म्हणजे पशूच. या कलेमुळे आपला
नावलौकीक तर वाढतोच अनेक लोकांशी आपला जिव्हाळ्याचा संबंध येतो. सर्वांची अंत:करणे जिंकण्याची कला आत्मसात करता
येते. जगांत सर्वांशी मैत्री असावी. त्यामुळे काय होते. तूच वाच विलास.....’ या कारणें ज्ञान दुल्लभ | पुण्यें घडे अलभ्य लाभ | विचारवंतां सुल्लभ| सकळ कांहीं ||१५-२-१२||श्रीराम||
‘बाळांनो!’ आजी म्हणाल्या, ‘समर्थ याकारणे असे कां म्हणतात बरे? पोटापाण्याच्या मागे लागला धर्म
बुडला. पैसा मिळतो म्हणून लोकांनी इस्लाम धर्म स्विकारला. युध्दाकरीता लष्करांत
माणसांची भरती होऊ लागली. हरि कीर्तने पोटासाठी होऊ लागली. बेबंदशाही माजली.
ज्ञानाचा लोप पावला. समर्थांचा जीव तीळ तीळ तुटत होता. खरे ज्ञान दुर्लभ झाले याचे
त्यांना वाईट वाटत होते. जे पुण्यवान असतील त्यांनाच खऱ्या ज्ञानाचा लाभ होईल हे
वचन आजही खरेच आहे. पैशाची सुबत्ता असली तर ज्ञानाची आवश्यकताच काय, असे समाजात
म्हणणारी माणसे फार. विचारी विवेक संपन्न माणसांना सर्व कांही सुलभच. मग
ब्रह्मज्ञान मिळवणे सुध्दा सुलभच असे समर्थ ठासून सांगतात.’
‘बाळोंना! समर्थ नुसते सांगून गप्प बसले नाहीत.
समाज सुधारावा म्हणून या गोड व अत्यावश्यक प्रचाराकरीता शिष्य तयार केले. त्यांनी
काम कसे करावे हेही पण सांगायला कमी केले नाही.’ उदंड करी गुप्तरूपें | भिकाऱ्यासारिखा स्वरूपें| तेथें येशकीर्तिप्रतापें | सीमा सांडिली ||१५-२-२१||श्रीराम||
‘लोक जागृतीचे कार्य करायचे पण वल्गना
नको. भिकाऱ्यासारखे म्हणजे मलीन फाटके कपडे घातलेले नव्हे. छान छोकी नको. साधे
स्वच्छ कपडे असावेत पण बडेजाव नको. मग कार्यात यश येतेच. कीर्ती वाढते, कामाचा
आवाका वाढतो कारण काय माहीत आहे? मधू तू वाच....’ अवघड स्थळीं कठीण लोक | तेथें राहाणें नेमक | सृष्टीमधें सकळ लोक | धुंडीत
येती ||१५-२-२४||श्रीराम||
मधूनेच
अर्थ सांगितला, ‘शहाणे हुशार चतूर अशी माणसे सगळ्यांनाच हवी वाटतात. त्यांना कोणीही
बोलावतात. सन्मान राखतात. मूर्खाला कोण विचारतो? आळशी निरूद्योगी त्याला हाकलून
लावतात. ज्याला खरीच संपत्ती हवी असेल त्याने शहाणे व्हावे. ही संपत्ती
दासबोधातली. पैसे नव्हेत. विवेकाने शहाणा होतो त्यालाच समाधान संपत्ती मिळते.’
‘शाब्बास! छान सांगितलास अर्थ!’ आजी म्हणाल्या.
विलास
म्हणाला, ‘आजी! जो असा शहाणा होण्याचा प्रयत्नच करीत
नाही. त्यांच्या बद्दलही समर्थ काही म्हणाले असतीलच की!’
‘हो तरं!’ आजी म्हणाल्या, ‘ही बघ ओवी.....’ आपलें हित न करी लोकिकीं | तो जाणावा आत्मघातकी | या मुर्खायेवढा पातकी | आणिक नाहीं ||१५-३-२७||श्रीराम||
आजी
म्हणाल्या, ‘मनुष्य
देह मिळून सुध्दा जो स्वत:चा उत्कर्ष साधू शकत नाही, तो लोकांचा तरी उत्कर्ष कसा साधेल? त्याला स्वत:चेच अकल्याण करणारा
म्हणावे. आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतो. अशा पापी माणसासारखा दुसरा पापी नाही
कोणी. त्याचे संगतीत सुध्दा कोणी राहू नये.’
विलास
म्हणाला, ‘आजी! हित साधायचे म्हणजे नुसते परीक्षा पास
होऊन वरच्या वर्गात जायचे असे समर्थांना म्हणायचे नसेल. पण हित म्हणजे ज्ञान
मिळवणे कां?
ज्ञान म्हणजे खऱ्या देवाला ओळखणे नां?’
आजी
म्हणाल्या, ‘होय! शालेय परीक्षा उत्तीर्ण होणे हे एक
अंग आहेच. तेथे चुकारपणा नकोच. पण अध्यात्म ज्ञानाची गोडी याच वयांत लागावी, समर्थ
अगदी तेच सांगतात. सुधा तू वाच...’ तें परब्रह्म जों कळेना | तो जन्ममृत्य चुकेना | चत्वार खाणी जीव नाना | होणें घडे ||१५-४-२४||श्रीराम||
‘मोठ्ठा देव, थोरला देव कोण हे जोपर्यंत
कळत नाही तो पर्यंत जन्म मृत्यू रहाट गाडगे सुरूच.’
विलास
म्हणाला, ‘पण
आजी!
चत्वार म्हणजे चार कळतं पण खाणी म्हणजे, दगडी, कोळसा, लोखंड, सोने आणी चौथी?’
गणपती
म्हणाला, ‘येडबंबू!
या खाणी नव्हेत. या भूगोलातल्या आपण मागे नांवे शिकलो स्वेदज, अंडज, उद्भिज, जारज.
विसरलास नां?’
आजी म्हणाल्या, ‘विसरू दे! पुन्हा सांगते. घामापासून तयार होतात
ते स्वेदज, अंड्यापासून उत्पत्ती ते अंडज, जमीन पाणी यांच्या संयोगाने अंकूर
फुटतात ते वृक्षवेली उद्भिज, वारेने वेष्टीलेले ते जारज. अशी चार प्रकारची जीव
सृष्टी भगवंताच्या आज्ञेने ब्रह्मदेवाने उत्पन्न केली.’
विलास
म्हणाला, ‘आजी! परब्रह्म म्हणजे नक्की कोण आणि कसे? हे ज्ञान मिळवले नाही तर पुन्हा सर्व
योनी फिराव्या लागतात त्या कशा?’
‘सांगते!’ आजी म्हणाल्या, ‘ज्ञान झाले की, मनुष्य साधना करण्याची
सोडतच नाही. त्यामुळे हळू हळू वासना शुध्द होतात. पण जर आत्मज्ञान झाले नाही तर
निश्चितपणे देह सोडताना कोणत्या ना कोणत्यातरी वासनेत जीव अडकतो. त्या
वासनेपूर्तीसाठी पुन्हा उच्च किंवा नीचयोनीत जावे लागते. गंमत म्हणून सांगते. समजा
मला देह सोडताना दूध प्यावेसे वाटले. तुझ्याजवळ मागितले. तू ते देत नाही म्हणालास.
दुधाची इच्छा असतानाच प्राण गेला तर दुधाच्या वासनेकरीता मला चोरून दूध पिणाऱ्या
मांजराचा जन्म येईल. कर्म धर्म संयोगाने मरता मरता तुझ्या बद्दल व्देषाचा भाग तसाच
माझ्या ठिकाणी राहील.’
‘आता अशाच काही कारणाने तू उंदीर झालास,
चिमणी झालास तर हे मागच्या जन्मीचे उट्टे काढण्यासाठी मी संधी शोधत राहीन व तुला
मारून तुझा नाश करीन. पुन्हा तेथेही वासना सोबत असणारच. सूक्ष्मरूपांत असलेली ही
वासना शुध्द करायची म्हणून अखंड नाम घेऊन समाधानी रहायचे.’
गणपती
म्हणाला, ‘जन्म,
मृत्यू,
वासना,
पुन्हा जन्म हे चक्र कधी संपते? आणि मनुष्य देह मिळतो केव्हा? मनुष्य देहात मागचे पुढचे वैर साधणारे
कोणी असतात की नसतात?’
आजी
म्हणाल्या, ‘छान
विचारलेस!
सतत नामस्मरणाने वासना क्षीण होतात. शुध्द होतात. मनुष्य देहातच नाम घेणे, ज्ञान
मिळवणे शक्य आहे. इतर योनीत बुध्दी असते, पण ती देह सांभाळण्यासाठीच वापरली जाते.
पापात्मक आणि पुण्यात्मक दोन्ही कर्मे घडत रहातात. पाप पुण्य समान झाले तर मनुष्य
योनी मिळते.’
‘मागच्या जन्मातली कर्मफले भोगावीच
लागतात. मग तू विचारलेस तसे जन्मापासून वैर साधणारे वा प्रेम करणारे जीव
एकमेकांच्या सन्निध येतात. ईश्वरी योजना या सदरांत कर्मे होतच रहातात. म्हणून
शहाण्या माणसाने काय करावे?..’ लोकांचे बोलीं जो लागला | तो अनुमानेंच बुडाला | याकारणें प्रत्ययाला | पाहिलेंच पाहावें ||१५-४-३१||श्रीराम||
‘विषयी लोकांच्या बोलण्याप्रमाणे वागून जगणारा पार
बुडतो. अनुमान म्हणजे तर्क. तर्काने उध्दार होत नाही. खऱ्या देवाच्या कृपेने स्वत:ला प्रत्यय यायला हवा. खरा प्रत्यय ज्ञानी तो
चतूर. स्वत:
अनुभव पडताळून पहातो तो शहाणा. त्यालाच म्हणतात, अंतर्निष्ठ. हे बघा समर्थांचे
म्हणणे. जया तू वाच...’ अंतरनिष्ठांची उंच कोटी | बाहेरीमुद्र्यांची संगती खोटी | मूर्ख
काये समजेल गोष्टी | शाहाणे जाणती ||१५-५-१९||श्रीराम||
आजी म्हणाल्या, ‘आल लक्षांत? जे आत्मज्ञान करून
घेऊन वागतात, ते उच्च प्रतीचे भक्त समजावेत. तेच खरे साधक. जे दृष्यावर प्रेम
करतात, विषय माझ्यासाठी आहेत म्हणून विषय सेवन करतात.स्वत:च्या देहसुखासाठी दुसऱ्याची पर्वाही करत नाहीत
त्यांच्या वाऱ्यालाही उभे राहू नये.’
‘वानराला कळले, मगरीला फळे मिळवून दिली. तरी तिची
बुध्दी खोटी ती मलाच खायला निघाली. म्हणून चतुराईने बोलून झाडावरचे काळीज आणून
देतो म्हणाला. मगरीच्या पाठीवरूनच पाण्याबाहेर आला. अशा दुष्टांची संगत नकोच
त्याला कळले.’
‘केवळ मी मोठा, हा अहंकार पोसला म्हणून सिंहाचे
काय झाले? सशाच्या बोलण्याचा पडताळा पहाण्यासाठी
विहिरीपाशी आला विहिरीत डोकांवून गुरगुरला. आवाज चांगलाच घुमला म्हणून व्देषाने
सिंहाला मारण्यासाठी उडी घेतली पण काय झाले? तोच नाश पावला.’
‘छान छान गोष्टी वाचून त्यावर मनन करावे.
चातुर्याने कसे वागतात? कोणाच्या वागण्याने काय साधले? कोणाचे वागणे कसे स्वार्थाचे? कोणाचे परोपकाराचे? असे चिंतन करावे. सार लक्षांत ठेवावे. तसे
चांगले आयुष्यभर वागावे.’
‘आजी! यालाच कां समर्थ
म्हणतात, आगांतुक गुणांची करी सोये बरोबर नां?’ विलास म्हणाला.
‘अगदी बरोबर!’ आजींनी शाबासकी
दिली. सर्वांनी तसे वागू या म्हणून टाळी वाजवली. मारूतीरायाला नमस्कार केला.
।। जय जय रघूवीर समर्थ ।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा