बुधवार, २ डिसेंबर, २०२०

पडवीवरचा दासबोध, दिवस १९ वा

 

।।श्रीराम।।

पडवीवरचा दासबोध

लेखिका- आशालता उर्फ आक्का वेलणकर

दिवस १९ वा

     विलास सारखा कान चोळत होता. आजींनी विचारले, कानात काही गेलं कां? कान दुखतोय कां? चोळतोस का असा?’

     गणपतीकडे पहात विलास म्हणाला, सांगू का आता?’

     सांग! सांग!’ खुश्शाल सांग. गणपती म्हणाला.

     आजी, विलास म्हणाला, मी इकडे येण्याकरीता तयार झालो. याची वाट बघत उभा होतो पायरीवर. मला गुलाबाचे झाडावर फुलाभोवती तीन चार फुलपाखरे दिसली. माझे मन मोहून गेले. मी त्यांना कुरवाळावे म्हणून हळूच त्यांचे जवळ गेलो. आणि आता त्यांना धरणार तो हा गण्या आला नी त्याने कान पिरगाळला माझा. 

     गणपती म्हणाला, सुंदर फुलपाखरं! नाजूक प्राणी! लांबूनच सौंदर्य पहायचं की त्यांना धरून दुखवायचं? हे त्याला कळावे म्हणून मी कान धरला. पिरगळला नाही. नुसता कान धरला तर दुखतो ना? मग पाखरांनी पण असेच दुखेल हे नको कां कळायला?’

 


     सुधा म्हणाली, पण त्याला फुलपाखरू मिळालच नसत. ते भुरकन उडून जातं. आजी, फुलावर बसता बसता त्यांना कसं कळत हो?’

     मधू म्हणाला, पाखरं तर उडताततच पण आपल्याला डास चावतो ना? म्हणून त्याला मारायला जावं तर डास उडून जातो. फटका आपल्याला बसतो. आजी एवढ्याशा लहान प्राण्यांना ही धोक्याची सूचना कोण देतो हो?’

     आजी म्हणाल्या, आपल्याला जसं अंत:करण दिले आहे, तसे प्राणी लहान असो की मोठा असो सर्वांना अंत:करण आहेच. गंमत अशी, अंत:करण लहान नी मोठे असे नाही. सारखेच असते. समर्थ तेच सांगतात बघ... जाणीवरूपें अंतःकर्ण| सकळांचे येक हें प्रमाण | जीवमात्रांस जाणपण |ेकचि असे ||१०-१-१५||श्रीराम।।

     बाळांनो! अंत:करण म्हणजेच जाणीव. सर्व प्राणीमात्रांची जाणण्याची कला एकच. ही कला कोणाच्यात नाही असे होत नाही. विलासला सौंदर्याची जाणीव झाली. मधुला डासाच्या चावण्याची जाणीव झाली. डासाला प्राण रक्षणाची जाणिव झाली. पण प्रथम भुकेची जाणीव झाली. जाणीव म्हणजे अंत:करण सगळ्यांचे एकच. पण कृती भिन्न दिसली.

     मधुकर म्हणाला, आजी, विष्णू जर सगळ्यांचे पालन पोषण करतो तर प्राण्यांना देहरक्षणाकरीता पळून कशाला जायला पाहिजे?’

     छान विचारलेस!’ आजी म्हणाल्या, डासातल्या जाणीवेने अन्न मिळविण्यासाठी मधुला चावा घे व त्याचे रक्त शोषून घे असे सूचवले.

     जाणीव ही ज्ञानमय शक्ती आहे. तिलाच जगत् ज्योती असे म्हणतात. अन्न मिळवून देण्याचे काम विष्णूने केले. डास तृप्त झाला.

     आता मधूला देहदु:ख सहन होत नव्हते, म्हणून डास चावल्यावर त्याला मारावे असे कोणाला स्फूरले?’

     विलास म्हणाला, मधूच्या अंत:करणाला स्फूरले.

     आजी म्हणाल्या, अंत:करण म्हणजे विष्णूची शक्ती. त्या शक्तीने मधुला डासाला मार अशी प्रेरणा दिली. डास उडाला कारण डासाला संरक्षण दिले व चावा थांबला. म्हणजे मधुला पण संरक्षण दिले.

     जया म्हणाली, पण आजी! कधी कधी डास चावतो त्याच ठिकाणी आपल्या फटक्याने मरतो. ते कसे?’

     आजी म्हणाल्या, त्याक्षणी त्याची जाणीव मंद झाली. जाणीव नसणे म्हणजे नाश म्हणजे नेणीव. नेणीव हे तमोगुणाचे लक्षण, तमोगुण रुद्राचा. त्या नेणीवेमुळे बेसावध डास जागीच मेला. मग आपण म्हणतो रुद्राने संहार केला. डासाला मारताना आपण रुद्रासारखे उग्र बनतो. बाळांनो कधी कधी थोडी जाणीवही असते थोडी नेणीवही असते. बुध्दीला कधी ज्ञान होते तर कधी कळतच नाही. ध्यानी येत नाही.हे मिश्रण म्हणजे कोणता गुण?’

     सुधा म्हणाली, रजोगुण कां?’

     होय! आजी म्हणाल्या, रजोगुण असणारी बुध्दी म्हणजेच आपल्या देहातील ब्रह्मदेव.

     जया म्हणाली, पिंपळाचे झाडांत तिन्ही देव असतात. तसे आपल्या देहात पण आहेत की. मला मावशीने शिकवीले.... मूलतो ब्रह्मरूपाय। मध्ये तो विष्णू रूपीणी। अग्रतो शिव रूपाय। अश्वत्थाय नमो नम: ।। असे म्हणून पिंपळाला पाणी घालावे.

     मधूचे लक्ष दासबोधाकडे होते. वाऱ्याने पान उलटले. मधूच्या लक्षांत आली ओवी, तो म्हणाला, आजी! हे बघा काय म्हणतात, ब्रह्मा उत्पत्तिकर्ता चौंमुखाचा | येथें प्रत्ययो नाहीं त्याचा | पाळणकर्ता  विष्णु चौभुजांचा | तोही  ऐकोन जाणों ||१०-२-३||श्रीराम।।

     मग आपल्या बुध्दीला चार तोंडे आहेत कां?’ मधुने विचारले.

     बाळांनो!’ आजी म्हणाल्या, ही शास्त्राची सांकेतीक भाषा आहे. आपण शब्दश: अर्थ घ्यायचा नसतो. वेद हे ज्ञानाचे भांडार आहे. रजोगुणी देवता ब्रह्मदेव याला चारही वेदांचे संपूर्ण ज्ञान आहे. त्याच्यावर ही परब्रह्माची कृपाच आहे. ज्ञानसंपन्न बुध्दीच निर्मीती करू शकते. म्हणून चार तोंडे ही चार वेदांचे प्रतीक.

     जया म्हणाली, मग विष्णूचे चार हात म्हणजे?’

     आजी म्हणाल्या, जीवनांत उत्कर्ष साधण्यासाठी धर्म, अर्थ, काम, मोक्ष यांची गरज असतेच. हेच त्या पालनकर्त्या विष्णूचे चार हात. सद्धर्माने वागलो तरच अर्थ प्राप्ती. अर्थ प्राप्ती. अर्थप्राप्तीने वासना पूर्ती, प्रयत्न योग्य झाले तर ब्रह्मज्ञान होऊन मोक्षप्राप्ती. हे काम विष्णूचे.

     गणपती म्हणाला, आजी, मन, बुध्दी, चित्त, अहंकार, अंत:करण ही सगळी आतली सामग्री वायूरूपच नं? मग ब्रह्मा, विष्णू महेश म्हणजे रुद्र हे वायूरूपच होतील.

     आजी म्हणाल्या, समर्थांनी हेच स्पष्ट केलंय बघ, तें मूळमायेचे लक्षण | वायोस्वरूपचि जाण | पंचभूतें  आणि  त्रिगुण  |  वायोआंगीं ||१०-३-२||श्रीराम||  

     आणि बाळांनो! नुसते ब्रह्मा, विष्णू आणि महेशच काय सर्व देवता वायू रूपच. वायू हलला की आपण त्याला वारा म्हणतो. वायूचाच दुसरा भाग जगत् ज्योती. ही जगज्जोतच देवता रूपाने कार्य करते. जया तू ही ओवी वाच... म्हणोनि  वायोस्वरूपें देह  धरिलें | ब्रह्मा विष्णु महेश जालें | पुढें तेचि विस्तारलें | पुत्रपौत्रीं ||१०-४-२८||श्रीराम|| ‘

     आजी म्हणाल्या, ब्रह्मदेवाने चार तऱ्हेचे प्राणी निर्माण केले. १) स्वेदज, २) अंडज, ३) उद्भिज, ४) जारज.

     विलास म्हणाला, आजी! हे चार प्रकार काय मला नाही कळलं.

     सांगते!’ आजी म्हणाल्या, काही प्राणी घामातून तयार होतात. प्रथम नरमादी जोडी तयार झाली की निसर्ग नियमाप्रमाणे त्यांची वाढ होते. ही प्रथम जोडी तयार होते हीच ब्रह्मदेवाची इच्छा शक्ती. उवा, पिसवा, ढेकूण यांची उत्पत्ती घामापासून. घामाला स्वेद म्हणतात. ज म्हणजे जन्म. स्वेदापासून जन्म म्हणून स्वेदज.

     सुधा म्हणाली, अंडज म्हणजे अंड्यापासून जन्म. काही प्राणी अंडी घालतात. ती उबवतात. अंडी फुटून त्यातून पिलू बाहेर येते. पक्षी अंडज, सरपटणारे प्राणी अंडज. वटवाघूळ अंडज नाही. पंख आहेत उडतो तरी तो पूर्ण पक्षी नाही. पण उद्भिज म्हणजे काय?’

     मी सांगते!’ आजी म्हणाल्या, बिया रूजून माती आणि पाणी यांच्या मदतीने वनस्पती वाढतात. फुले फळे येतात. फळातल्या बीयांपासून पुन्हा झाडे वाढतात. काही झाडे त्यांच्या फांद्याना मुळे फुटून वाढतात. आंब्याच्या दिवसात कोयातून अंकूर फुटलेले तुम्ही पाहिले असतीलच. गवतासह सर्व वनस्पती उद्भिज मध्ये येते.

     पण आजी!’ विलासने शंका विचारली. प्रथम ब्रह्मदेवाने इतक्या झाडांच्या बीया किंवा फांद्या आणल्या कोठून?’

     हीच त्या ईश्वराची लीला. आजी म्हणाल्या. ब्रह्मदेवाच्या इच्छेने सृष्टी उत्पन्न झाली म्हणायचे ते यालाच. हे एवढे ज्ञान भांडार त्याचेजवळ आहे म्हणून त्याला म्हणायचे वेदज्ञ वेदवेत्ता.

     आणि चौथा प्रकार?’ जयाने विचारले.

     चौथा जारज, आजी म्हणाल्या. जार म्हणजे वार. सस्तन प्राण्यांची मादी तिच्या उदरांत वारेच्या आवरणांत अपत्याचे संरक्षण करून जन्म देते. स्तनातील दुधाने त्याचे प्रथम पोषण करते. सगळे चतुष्पाद प्राणी, माणूस, माकड, वटवाघूळ हे जारज या प्रकारांत मोडतात.

     मधुकर म्हणाला, जीव सृष्टी कशी वाढते हे समजले. पण नाश का पावते? नाश कशाने होतो?’

     विलास म्हणाला, प्राणीमात्रांचा, माणसांचा नाश मरणाने होतो. ईश्वराने काही आयुष्याची मर्यादा घातली. त्याप्रमाणे कांही निमित्त होऊन जीव सृष्टी नाश पावते. असेच ना आजी?’

     होय! ही त्या भगवंताची इच्छा. आजी म्हणाल्या, त्याच्या मनांत आता खेळ पुरे असे आले, तर प्रलयाचे निमित्त करून सारे ब्रह्मांडच चंद्र सूर्यासह आटोपते घेतो. सुधा या चारही ओव्या वाच... ऐका प्रळयाचें लक्षण | पिंडीं दोनी प्रळये जाण | येक निद्रा येक मरण | देहान्तकाळ ||१०-५-१||श्रीराम||

     आजी म्हणाल्या, पिंड म्हणजे देह. देहधारी आहेत त्यांचे प्रलय दोन. १) निद्रा म्हणजे गाढ झोप २) मरण म्हणजे देहाचा अंत. वाच पुढे.. देहधारक तिनी मूर्ती | निद्रा जेव्हां संपादिती | तो निद्राप्रळय श्रोतीं | ब्रह्मांडींचा जाणावा ||१०-५-२||श्रीराम||

     आजी म्हणाल्या, तीन देवता म्हणजे?’

     विलास म्हणाला, मी सांगतो. ब्रह्मा, विष्णू आणि महेश. यांना पण झोप येते. त्यांची कामे झोपेत थांबतात.

     आजी म्हणाल्या, अर्थातच ब्रह्मांडाचा प्रलय होऊ लागतो. ज्या क्रमाने पंचमहाभूते निर्माण झाली, त्याच्या उलट क्रमाने ती एकमेकांत मिसळतात.

     तिनी मूर्तीस होईल अंत | ब्रह्मांडास मांडेल कल्पांत | तेव्हां  जाणावा  नेमस्त  |  ब्रह्मप्रळये  जाला  ||१०-५-३||श्रीराम|| दोनी पिंडीं दोनी ब्रह्मांडीं | च्यारी प्रळय नवखंडीं | पांचवा  प्रळय  उदंडी | जाणिजे  विवेकाचा ||१०-५-४||श्रीराम||

     जया म्हणाली, आजी मी ब्रह्मांडाचा कल्पांत सांगते. सर्वप्रथम पृथ्वीचा नाश.

     गणपती म्हणाला, थांब जया! पृथ्वीवरील जीव सृष्टीचा नाश आधी. तो कसा मी सांगतो. खूप उन्हाने झाडे करपतील. पाऊस पडणार नाही. पाणी नाही. पिके पिकणार नाहीत. अन्न नाही, पाणी नाही. माणसे, जीव सृष्टी मरेल, जमीन भाजून निघेल. हलकी होईल. मग धों धों पाऊस पडेल.

     विलास कपाळावर हात मारून म्हणाला, आता काय उपयोग पावसाचा?’

     मधुकर म्हणाला, त्याशिवाय पृथ्वी पाण्यात कशी बुडेल. सगळीकडे पाणीच पाणी. पृथ्वी पाण्यांत विरेल. सूर्याच्या उष्णतेने, समुद्रातल्या वडवानलाच्या क्षोभाने पाण्याची वाफ होईल. पाणी आटेल. उष्णता वाढेल. त्या तेजाला वायू गिळेल. म्हणजे वाऱ्याने तेजाचा नाश होईल. उष्णता नष्ट होईल. वारा पोकळीभर फिरेल. आकाशांत लीन होईल. आकाश मूळमायेत नष्ट होईल. मूळमाया परब्रह्माच्या चरणाशी शांत होईल.

     विलास म्हणाला, पण परब्रह्माला पाय कुठे आहेत?’

     आजी म्हणाल्या, परब्रह्म ही एक सत् चित् आनंद रूप शक्ती आहे. होय नां? त्या दिव्य शक्तीला स्फूर्ती झाली होती. खेळ सुरू झाला होता. आता खेळ संपला ती स्फूर्ती थंडावली. दिव्य शक्तीत मिसळली. त्यालाच म्हणायचे चरणी लीन झाली. विसावली, शांत झाली. काम थांबले.

     या सर्व प्रलयांत महत्वाचा प्रलय कोणता असेल तर पांचवा. काय बरं नांव त्याचे?’

     विलासने सांगितले, विवेक प्रलय!’

     शाब्बास!’ आजी म्हणाल्या. हा प्रलय निसर्गाने होत नाही. आपण अभ्यासाने देह जिवंत असताना साधायचा आहे.

     आज आपल्याला भोवतालचे विश्व डोळ्यांना दिसते म्हणून कसे वाटते?

     जया म्हणाली, खरे आहे असे वाटते. कारण ते चटकन अनुभवास येते.

     आजी म्हणाल्या, बरोबर! समर्थ म्हणतात या दृष्याला नाश आहे म्हणून आत्मानात्म विचार करून....

     विलास म्हणाला, थांबा आजी! आत्मानात्म म्हणजे काय?’

     आजी म्हणाल्या, आत्मानात्म म्हणजे शाश्वत अशाश्वत. टिकणारे काय व न टिकणारे काय? जे टिकणार नाही तेच नाश पावते. त्यातील शाश्वताची म्हणजे जे टिकणारे आहे त्याची ओढ वाटावी. नाश पावणाऱ्या दृष्याचा निरास व्हावा. त्यावरील प्रेम कमी व्हावे. आसक्ती कमी व्हावी व दृष्याला बाजूला सारावे, याला म्हणतात विवेक प्रलय. सत्संगतीत हा विवेक प्रलय कसा साधावा हे सहज शिकता येते.

     विलास म्हणाला, म्हणजे आजी! फुलपाखराचे सौंदर्य डोळ्यांनी पहायचे. फुलांचे सौंदर्य डोळ्यानी आस्वादायचे. ह्रदयांत साठवायचे समाधान मानायचे. फुलपाखरू व फूल दोन्ही विसरायचे. फक्त सौंदर्याचा आनंद आत घ्यायचा. असे केले की विवेक प्रलय साधला कां?’

     मधुकर म्हणाला, असे सतत जमू लागलं की साधला म्हणायचं. काय? विवेक प्रलय? आणि हो फूल व फुलपाखरू जसं विसरायचं तसचं गणपतीने- गण्याने नव्हे कान पकडला हे ही विसरायचे. किती चोळून चोळून लालेलाल केला. अस करू नये याची जाणीव अखंड ठेवायची. जे कोणी आपल्या हिताचे सांगत असतील त्यावर चिंतन करायचे म्हणजे विवेक प्रलय साधला म्हणायचे. आधी विवेक जागा होऊदे मग विवेक प्रलय....

     आजी म्हणाल्या, पुष्कळ छान समजू लागल हं. अशीच शहाणी व्हा. किर्तीवंत व्हा.

।। जय जय रघूवीर समर्थ ।।

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा