मंगळवार, ८ डिसेंबर, २०२०

पडवीवरचा दासबोध, दिवस २८ वा

 

।।श्रीराम।।

पडवीवरचा दासबोध

लेखिका- आशालता उर्फ आक्का वेलणकर

दिवस २८ वा

     आपापल्या घरातच पण रोजच्यापेक्षा नवीन काहीतरी काम करून ते आजींना सांगायचं असे मुलांनी ठरवले होते. जो तो कसा मी आधी, मी आधी सांगेन या भावात होता.

     आजी आल्या. स्थानापन्न झाल्या. वंदनादिक आटोपले. मुलांच्या चेहऱ्यावरचा भाव आजींनी जाणला. आज कळ्या फुलल्या आहेत सगळ्यांच्या, आजी म्हणाल्या.

     विलास म्हणाला, आजी तुम्ही अरिंग मिरिंग करा म्हणजे भांडणच होणार नाहीत. सगळ्यांनाच वाटतय आपण आधी सांगावे.

     हे बघा!’ आजी म्हणाल्या, आपण नावाच्या आद्याक्षराप्रमाणे संधी देऊ चालेल कां? सर्वजण हो म्हणाले. साहजिकच ग गणपती.

     पहिला क्रमांक गणपतीचा. न रागावता विलास म्हणाला, पहिला डाव या भूताचा.

     गणपती पण म्हणाला, मारूतीराय महत् भूत. आपण सारी सामान्य भूतें. आजी, आज रोजच्यापेक्षा नवीन काहीतरी चांगलं काम करायचं आम्ही ठरवलं होतं. मी काय काम केलं ते सांगतो. बाबांची खोली, छत, भिती, मांडणी, टेबल, खुर्ची सर्व मी झाडून अगदी झकपक केली. आई तर म्हणाली, अगोबाई आज कोणतं भूत संचारलं? मारूती आला वाटतं मदतीला! बाबांनी शाबासकी दिली. आईने गरम गरम छानसा शिरा केला. खाऊ मिळाला मनासारखा.

     आता ज म्हणजे जया.

     जया म्हणाली, आजी! आमच्याकडे सगळीच कामे मोलाने होतात. आई रोजच घाईत असते. सकाळी माझी वेणी घालून तिला सारे आवरून शाळेत जायचे असते. म्हणून मी आजपासून माझी वेणी मीच घालायची ठरवली. केस लांब आहेत. जरा वेळ लागला, मग आईने शिकवले. पण आज मी घातली वेणी रोजही घालणार. आई म्हणाली, शहाणी बाळी माझा वेळ वाचला.

     शाब्बास! स्वत:ची कामे स्वत: करण्यास काहीच हरकत नाही. आता कोण? म म्हणजे मधुकर.

     मधुकरने मांडी सारखी केली व गंभीरपणे म्हणाला, आजी! मला सगळ्यांत कंटाळा कशाचा असेल तर चक्कीत जाऊन दळण आणण्याचा. त्यातून दोनदा जावे लागते. एकदा दळण टाकायला. दुसऱ्यांदा आणायला. कंटाळा म्हणण्यापेक्षा लाज वाटते. पण मी आता ठरवले. आईने खस्ता तरी किती खायच्या? घरातली सगळी कामे तिच करते. मीहून आईला सांगितले व दळण आणूनपण दिले. ती म्हणाली, मधू! आज कुठला देव पावला मला?” त्यावर मी म्हणालो, आई मी आजपर्यंत विचारच केला नाही की आईला किती त्रास होतो? आई तुझी सेवा हीच देवपूजा. मी अंगात ताकद आहे तोपर्यंत आयुष्यभर न कंटाळता दळण आणणार. अस म्हटल्यावर आईने चक्क मला जवळ घेतले व कपाळ हुंगले. तो स्पर्श शिऱ्यापेक्षा गोड वाटला मला.

     आता व म्हणजे विलास माझा नंबर. विलास म्हणाला, आजी! मी मुळांत आळशी. उशिरा उठणे हा माझा हातखंडा. आंघोळ शाळेत जायच्या आधी करायची हेच मला आवडत आलं. पण कालपासून विचार करून पक्क ठरवलं. आई उठल्याबरोबर उठायचं. प्रातर्विधी आटोपून स्नान सूर्यनमस्कार मगच चहा प्यायला. १२ पैकी ५ नांवे पाठ झाली. अगदी मोठ्याने मित्राय नम:। म्हणून नमस्कार घातले. आई म्हणाली, सोनाराने कान टोचलेले दिसतात. मला खरा आनंद कोणता झाला सांगू? बाबा म्हणाले, आजींच्या दासबोधाने विलास खूप सुधारला नाही कां? आपण एकदा आजींना घरी बोलावू या. मी म्हटले नुसते आजींना नको. आम्ही सहाजण आहोत, आजींच्यासह. सगळ्यांनाच बोलवूया. आई बाबा हो म्हणाले. हा खरा आनंद. मी मरेपर्यंत नियम पाळणार. स्नान सूर्यनमस्कार मग चहा.

     छान! छान! प्रात:स्नानाने बुध्दीवर चांगला परिणाम होतो. आजी म्हणाल्या. आता राहिली सुधा.

     सुधा म्हणाली, आजी! आजोबांना डोळ्याचं ऑपरेशन झाल्यापासून नीट दिसत नाही. त्यांनी सुधा गीता वाचतेस कां? म्हटले की, मला संस्कृत येत नाही. मला वेळ नाही. मला अभ्यास आहे. एक का दोन हज्जार सबबी सांगून टाळत होते. पण मी आज त्यांना १२वा व १५वा अध्याय वाचून दाखवला, खरं तर आजी, मी गीता उघडली १२ वा अध्याय असे पान काढले व मला पाठ आहे म्हणून घडाघड म्हणत सुटले. आजोबांनी शाबासकी दिली. पण म्हणाले, सुधे! पाठ असल्यागत घडाघड वाचलेस मग संस्कृत येत नाही का म्हणत होतीस?” मला कबूल करणे भाग पडले. मी रोज १२वा, १५वा अध्याय म्हणेनच पण रोज एक अध्याय वाचायला शिकेन. चुकले तर तुम्ही सांगा. खरं बोलण्याचा व रोज वाचेन म्हटल्याचा आजोबांना आनंद झाला. वाड्यातल्या लहान मुलांना १२ वा अध्याय व रामरक्षा शिकवीन.

     आजींनी अश्रूपूर्ण नेत्रांनी गुरूदेवांना वंदन केले. बाळांनो! वाचलेल्या शिकलेल्या दासबोधाचा चांगला परिणाम झाला हं. पुन्हा आज एकच दिवस नव्हे तर ठरवलेला नियम आयुष्यभर पाळणार आहांत याचा फार आनंद झाला. समर्थ तेच म्हणतात पहा... रूप लावण्य अभ्यासितां नये | सहजगुणास न चले उपाये| कांहीं तरी धरावी सोये | अगांतुक गुणाची ||१४-६-१||श्रीराम||

     आजी म्हणाल्या, रूप, सौंदर्य, शरिराचा रंग, ठेवण हे सारे निसर्गाने दिले आहे. अभ्यास करूनही ते बदलता येणार नाही. पण जे चांगले गुण आपल्यात नाहीत ते जरूर शिकावेत. अंगी बाणवावेत. त्यांचा साठा करावा. समाजाच्या उन्नती करता त्यांचा उपयोग करावा.  

     विलास म्हणाला, पण आजी! उन्नती पैशाशिवाय होते कां?’

     आजी म्हणाल्या, याचे उत्तर समर्थांनीच दिलयं बघ. तूच वाच... अंतर्कळा शृंघारावी | नानापरी उमजवावी | संपदा मेळऊन भोगावी | सावकास ||१४-६-१०|| श्रीराम||

     आजी म्हणाल्या, जाणीव शक्ती सगळ्यांतच आहे. नाना तऱ्हेच्या ज्ञानांनी ती परिपूर्ण भरावी. त्या ज्ञानाचा स्वत:साठी, जनतेसाठी उपयोग करावा. स्वकष्ट करूनच द्रव्य मिळवावे. त्या द्रव्याचा स्वत:करीता माफक प्रमाणांत उपयोग करावा. बाकीचे समाज सेवेला लावावे. 

     जया म्हणाली, आजी! नुसत्या द्रव्याने सेवा न करता, अंगमेहनतीने समाजसेवा करता येत नाही कां?’

     कां नाही?’आजी म्हणाल्या, हे बघ नं? एकवीसाव्या ओवीत समर्थ सांगताहेत. वाच तू.. तनें मनें झिजावें | तेणें भले म्हणोन घ्यावें | उगेंचि कल्पितां सिणावें | लागेल पुढें ||१४-६-२१||श्रीराम||

     आजी म्हणाल्या, सगळ्याचेच जवळ द्रव्य असते असे नाही. शरीर कष्ट, लोककल्याणाची मनापासून इच्छा बाळगून जो वागतो. तो लोकप्रिय होतो. उगाच कल्पना चित्र रंगवत बसण्याने दु:ख करण्याची पाळी येईल. मी यँव करीन टँव करीन या बढाया मारण्याने पण नाश होतो. त्याचे नुकसान तोच करून घेतो. म्हणून मनुष्याने काय करावे?’ समजले आणी वर्तले | तेचि भाग्यपुरुष जाले| यावेगळे  उरले  |  तें  करंटे  पुरुष  ||१४-६-२५||श्रीराम||

     असा आपल्या सहांत कोणी करंटा राहील कां? सांगा बरे! चांगले वागावे हे आपणहूनच ठरवलेत नां? गुणगौरव झालां नां? योग्य बक्षीस मिळाले नां? आनंद व्दिगुणीत झाला नां? हेच खरे भाग्य. मोठेपणी मोठे कार्य साधले की मोठे भाग्य मिळेल. तुम्हाला माहीत आहे कां? महात्मा गांधींना बापूजी म्हणत. परदेशस्तांनी श्री बापूजी भारत इतका जरी पत्ता लिहिला तरी ते असतील तेथे त्यांना पत्र मिळत असे. हे कशाचे प्रतिक? त्यांचे नांव सर्वतोमुखी झाले हेच खरे भाग्य.

     मधुकर म्हणाला, त्यासाठी आत्तापासून काय करावे बरें?’

     आजी म्हणाल्या, समर्थाच्याच मार्गाने जाऊ या. वाच ते काय म्हणतात. सर्वप्रकारें नेमक | शास्त्रोक्त करणें कांहींयेक | त्याहिमध्यें अलोलिक | तो हा भक्तिमार्ग ||१४-७-६||श्रीराम||

     आजी म्हणाल्या, आपल्याला जे कार्य करायचे असेल ते नियमित व शास्त्रोक्त पध्दतीने करावे. उत्कट भक्ती मार्ग अवलंबिला तर आणखीच वाहवा!

     विलास म्हणाला, ही उत्कट भक्ती म्हणालांत ती कोणती? कशी?

     आजी म्हणाल्या, भक्ती कशी करावी? वाच... काया वाचा जीवें प्राणें | कष्टे भगवंताकारणें | मनें घेतलें धरणें | भजनमार्गीं ||१४-७-८||श्रीराम||

     शरीराने भगवंताकरिता जेवढे कार्य करता येईल, तेवढे करावे. प्रत्येक काम भगवंताचेच करीत आहोत या भावनेने करावे. मधुने आईचे कष्ट कमी केले. जयाने आईचा वेळ वाचवला. अशी कामे देवपूजाच. वाणी मधूर असावी, दुसऱ्याचे मन न दुखवणारी असावी. ज्याच्याशी बोलतो त्याला प्रसन्नता वाटावी. ही भगवंताचीच पूजा. प्राण पणाला लावून कर्म केले की मन भजनाकडे वळत रहाते. भगवंताचा विसर पडतच नाही.

     जया म्हणाली, आजी! सहजच विचारते हं, पण असं का वागायचे?’

     आजी हसल्या, जया! समर्थांना नक्कीच कळले होते, जया असला प्रश्न विचारेल. मग आजी गांगरतील तेव्हा उत्तर देऊनच ठेवावे. ही बघ ओवी, जो दुसऱ्याचें  अंतर  जाणे | देशकाळ प्रसंग जाणे | तया पुरुषा काय उणें | भूमंडळीं ||१४-७-२८||श्रीराम||

     आपल्या कामात दुसऱ्याने मदत करावी असे स्वाभाविकपणे वाटते नां? त्याची मेख अशी, आपल्या अंतरंगावरून दुसऱ्याचे अंतरंग ओळखावे. न सांगता जाणूनच पडेल ते काम करावे. मग दुसरे आपल्याला मदत करतातच. ही चतुराई प्राप्त होणे हीच भगवंताची कृपा. यालाच म्हणायचे की, भगवंत पाठीशी उभा आहे.

     मधुकर म्हणाला, पण श्रेष्ठ कोण, भक्त की भगवंत? भक्ताने भगवंताची सेवा करायची की भगवंताने भक्ताची सेवा करायची?’

     आजी म्हणाल्या, छान शंका आहे तुझी. भगवंताने मानवाला बुध्दी दिली. त्या बुध्दीचा योग्य वापर करून भगवंताला भक्ताने ह्रदय सिंहासनावर बसवावे. प्रेमाचा झरा जवळच असल्यावर निराधारपणा राहीलच कसा? समर्थ म्हणतात, आधीं देवास वोळखावें | मग अनन्यभावें भजावें | अखंड  ध्यानचि  धरावें  |  सर्वोत्तमाचें  ||१४-८-३||श्रीराम||

     विलास म्हणाला, हं आलं लक्षांत. हा देव म्हणजे मातीचा कृष्ण व धातूचा मारूती नव्हे. हा सर्वोत्तम म्हणजे आपल्याच ह्रदयांतला आत्मा.

     गणपती म्हणाला, आत्मारामाचे भजन म्हणजे नुसते राम राम राम राम सीताराम सीताराम म्हणणे नव्हे. न सांगताच दुसऱ्याचे काम केले की तो आत्माराम प्रसन्न होतो. खाऊ न मागता मिळतो. बाबांचा प्रसन्न चेहरा अजून डोळ्यासमोर येतो. आजी तुम्हाला मी गंमंत सांगितलीच नाही. सगळी खोली आवरून झाली. कचरा टाकायला बाहेर गेलो. परत आलो तो काय पाहिले? बाबांनी आईला हाताला धरूनच आणले व अगदी लहान मुलासारखे आनंदून आईला स्वच्छ खोली दाखवू लागले. आईचा चेहरा उजळला. माझे अंग मळकट घामेजलेले झाले होते तरी मला तिने आपल्या मिठीतच घेतले. पाठीवरु हात फिरवला. अजून जाणवतोय तो स्पर्श.

     आजी म्हणाल्या, तो जो आनंद अजून अनुभवता आहेस न तेच, तेच बरं सर्वोत्तमाचे ध्यान.

     सुधा म्हणाली, पण आजी! असे जाणून कौतुक करणारी सगळीच माणसे नसतात. चांगलं काम करूनही कशाला केलंस हे? असं कोणी झिडकारले तर आनंद कसा वाटेल?’

     विलास म्हणाला, पण मी म्हणतो की, झिडकारणारा माणूसच नां? त्याला ते काम चांगल का दिसू नये? मग त्यानी झिडकारलं तर आपण काय करावे?’

     वा! वा!’ आजी म्हणाल्या, हे समर्थ वचनच वाच.. गरळ आणि अमृत जालें | परी आपपण नाहीं गेलें | साक्षत्वें आत्मयांस पाहिलें | पाहिजे तैसें ||१४-८-१९||श्रीराम||

     आजी म्हणाल्या, गरळ म्हणजे विष व अमृत यांची चव एकच असेल कां? आणि कार्य तरी? विषाने प्राण जातो. अमृताने तरतरी येते. दोन्ही स्वभावधर्माने भिन्न असले तरी द्रवरूपता म्हणजे आपतत्व एकच असते. तसे वागणे भिन्न वाटले तरी त्या देहातल्या आत्म्याला साक्षीत्वावे, तटस्थतेने पाहिले पाहिजे. याला म्हणतात देवास ओळखणे. गुणामुळे त्यांच्या वागण्यात फरक पडला. एकाने कौतुक केले. तो सत्वगुणी, दुसऱ्याने झिडकारले तो तमोगुणी. पण आत्मा एकच हे जाणले की, .. देह देउळ आत्मा देव | कोठें धरूं पाहातां भाव | देव वोळखोन जीव | तेथेंचि लावावा ||१४-८-२९||श्रीराम||

     विलास म्हणाला, पण आजी! देहरूपी देवळातला देव आत्मा. मग देवळावर प्रेम करायचे की देवावर?’

     जया म्हणाली, देह जन्मतो. देह मरतो. मग देहावरचे प्रेम फुकटच जाणार. आत्मा जन्म घेत नाही. म्हणून मरत नाही. त्याच्यावरचे प्रेम खरे.

     आजी म्हणाल्या, शाब्बास! अगदी समर्थांच्या वचनाचा अर्थ सांगितलास, जें होते आणी सवेंचि जातें | तें तें प्रत्ययास येतें | जेथें होणें  जाणें नाहीं तें | विवेकें वोळखावे ||१४-९-१५||श्रीराम||

     एकदा का विवेकाने कळले की दृष्य सर्व, त्यात देह आलाच, नाहीसे होणार तरी परब्रह्म शाश्वत रहाते. तोच आत्मा. त्याला अखंड स्मरावे. व काम करावे. खोटें आवघेंचि सांडावें | खरें प्रत्ययें वोळखावें | मायात्यागें  समजावें  |  परब्रह्म  ||१४-९-१५||श्रीराम||

     सुधा म्हणाली, आजी! आलं लक्षांत, मी खोट बोलत होते. चुकारपणा करीत होते. तो खोटेपणा सोडला. खेळाबद्दलची आसक्ती सोडली व आजोबांना गीता वाचून दाखवली. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद तोच परब्रह्म. मी समजावे कां?’

     होय!’ आजी म्हणाल्या, आनंद! शुध्द आनंद! हे त्या परब्रह्माचे एक लक्षण आहेच. मायेचा त्याग घडल्याशिवाय मात्र तो दिसत नाही. माया दिसे परी नासे | वस्तु न दिसे परी न नासे | माया सत्य वाटे परी मिथ्या असे | निरंतर ||१४-१०-१||श्रीराम||

     आता आलं लक्षांत, मधू म्हणाला, खोटे ते खोटेच. जे कधी नाहीसे होत नाही ते परब्रह्म सत्य. त्याचीच प्राप्ती व्हायला हवी.

     सुधा म्हणाली, मधुदादा! तो भगवंत ह्रदयांत आहेच. फक्त त्याचा अनुभव यायला हवा. असंच ना आजी?’

     असंच! अगदी अस्संच! येईल हो अनुभव! सगळ्यांना येईल!!

     मारूतीराया लेकरांना नीट सांभाळ!

।। जय जय रघूवीर समर्थ ।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा