।।श्रीराम।।
पडवीवरचा दासबोध
लेखिका- आशालता उर्फ आक्का वेलणकर
दिवस २२ वा
आज तिघांच्याही हातात
खाऊचे पुडे होते. आनंदाने तिघांनी आजींच्या हाती पुडे दिले. नमस्कार केला.
‘हा काय प्रकार आहे?’ आजींनी
विचारले.
विलास म्हणाला, ‘आजी पंधरा वीस दिवस झाले आम्ही दुपारी येतो नां? त्याचे हे फळ. ते तुमच्या हवाली करावे असे
तिघांनाही वाटले.’
‘खाऊचे पुडे तुम्ही विकत आणलेत?’ आजींनी विचारले.
‘नाही!’ गणपती म्हणाला, ‘काल क्लबमध्ये कार्यक्रम होता. अर्थात तेथे
खादीची चळवळ होतीच. आनंदाची गोष्ट अशी, आम्ही तिघांनी अगदी कोणाला न सांगता स्वयंसेवकाचे
काम केले. ते इतके चोख झाले की समारोपाचे वेळी आमचा गौरव करून आम्हाला पाकीट व
खाऊचा पुडा दिला.’
विलास म्हणाला, ‘आजी! मधूदादाने इतके
मस्त भाषण केले की टाळ्या मिळाल्या. त्याने पाकीट संस्थेला देणगी म्हणून दिले.
आम्ही दोघांनी पण दिले. संस्था आपलीच आहे. आम्ही ही सेवा कर्तव्य म्हणून केली.
असेही तो म्हणाला. मग अध्यक्षांनी पुन्हा एकेक खाऊचा पुडा दिला. आम्ही एक पुडा
घरांत आईजवळ दिला व एक पुडा मारूतीरायांचा प्रसाद म्हणून येथे आणला. आम्हाला ही
प्रेरणा तुमच्यामुळे मिळाली नं?’
आजी आनंदून म्हणाल्या, ‘बाळांनो! सर्व कर्ता तो
परमेश्वर, निमित्त मात्र मी झाले. तरी तुम्ही वागलात ते फार छान वागलात हं.
समर्थांच्या संदेशाप्रमाणे महंतच झालात. दासबोध अभ्यासता अभ्यासता तुमची विचार
शक्ती वाढली. सगळ्यांना आनंद वाटेल असे वागावे हे तुम्हाला पूर्णपणाने पटले.
म्हणूनच प्रशंसेस पात्र झालांत.’
समर्थ म्हणतात, ‘ज्याला लोकसंग्रह करायचा आहे त्याने जगांत कसे
वागावे हे शिकावे. ज्याला समाजकार्य करावयाचे आहे त्याने नि:स्वार्थी असावे. पडेल ते कष्ट करण्याची तयारी
असावी. स्वत:तर
शिकावेच, पण जगाला आपलेसे करण्यासाठी ह्रदयांत प्रेमाचा साठा असावा. सुधा ही ओवी
वाच...’ आधींच
सिकोन जो सिकवी | तोचि पावे श्रेष्ठ पदवी | गुंतल्या लोकांस उगवी | विवेकबळें ||११-६-१०||श्रीराम||
आजी
म्हणाल्या, ‘लोकांची अडचण एकच असते कां? कोणी अभ्यासात अडतो. कोणी
प्रपंचातल्या अडचणींत सापडतो. कोणी आजाराने बेजार होतो. कोणावर कसाही प्रसंग येवो,
त्यांना मदतीचा जो हात देतो त्याला लोक सहजच मानतात. कालच तुम्हाला प्रचिती आली
नां?’
‘त्याच्यापुढेही कसे सावध असावे हे समर्थ सांगतात.
जया तू वाच...’ सांकडीमधें वर्तों जाणे | उपाधीमधें मिळों जाणे | अलिप्तपणें राखों जाणे | आपणासी ||११-६-१३|| श्रीराम||
विलास म्हणाला, ‘आजी!’ कोणत्या संकटात कसे
वागून बाहेर पडावे हे कळण्यासाठी बुध्दी चातुर्य पाहिजे नां पण!’
आजी म्हणाल्या, ‘बरोबर
आहे! म्हणून तर अनन्येतेने भगवंताचे नाम घ्यायचे. मनाला
शुध्द, स्वच्छ, पवित्र करणारा साबण म्हणजे नाम. बुध्दीला सतेज करणारी श्रध्दा.
चित्ताला एकाग्र करणारी निष्ठा जवळ असली की, उपाधीत न सापडता अलिप्तपणाने वागता
येते. आपोआप बुध्दी नि:स्वार्थी होते. समर्थ म्हणतात बघ,’ राखों जाणें नीतिन्याये
| न करी
न करवी अन्याये | कठीण प्रसंगीं उपाये | करूं जाणे ||११-६-१८||श्रीराम|| ऐसा पुरुष धारणेचा | तोचि आधार बहुतांचा | दास म्हणे
रघुनाथाचा |
गुण घ्यावा
||११-६-१९||श्रीराम||
‘जो नितीने वागतो, तो
अन्याय कधीच करीत नाही. म्हणून कठीण प्रसंगात धैर्याने तोंड देऊन तो स्वत: संकटातून बाहेर पडतो व इतरांना बाहेर
काढतो. प्रत्यक्ष रामप्रभू तस्सेच वागले. तो आदर्श समर्थांनी डोळ्यासमोर ठेवला.
प्रभू रामांच्या प्रेरणेने दासबोध रचला. त्यांत कल्पकता पूरेपुर आहेच. मायेच्या
कर्तृत्वाची नदीच्या रूपकात त्यांनी रचना केली.’
‘नदीतले भोवरे माणसाला गर्तेत पाडतात.
तशीच माया पण मी मी म्हणणाऱ्यांना चक्रातून सोडते. गणपती तू वाच या दोन्ही ओव्या.’ येक ते वाहतचि गेले | येक वळशामधें पडिले | येक
सांकडींत आडकले |
अधोमुख ||११-७-८||श्रीराम|| येक
बळाचे निवडले | ते पोहतचि उगमास गेले | उगमदर्शनें पवित्र जाले | तीर्थरूप ||११-७-१०||श्रीराम||
‘आता विलास वरवरचा अर्थ सांगशील?’
विलास
म्हणाला, ‘सोप
आहे!
काही लोक ओढ असलेल्या नदीच्या प्रवाहांत वाहून गेले. कोणी भोवऱ्यात सापडले. कडी
कपारीत खाली तोंड वर पाय अशा स्थितीत अडकून मेले. म्हणजे नाशच झाला. पण जे उगमाकडे
तोंड करून धाडसाने पोहत गेले, ते आनंद पावले. त्यांना तेथे उगमाचे दर्शन झाले.
तेही तिर्थाप्रमाणे श्रेष्ठ पदवी पावले.’
‘ठिक!’ आजी म्हणाल्या, ‘हे झाले भूतलावरच्या नदीचे वर्णन.
समर्थांना मायानदी बद्दल बोलायचे आहे. जे विवेकी आहेत, ते पोहोणारे. ज्यांच्याजवळ
विवेक नाही ते दृष्यातील लोभामुळे मायेतच गुरफटणारे.ते मी माझेच्या प्रवाहात
सापडून जन्ममृत्यूच्या धारेत वाहून गेले. कोणी मोहाच्या भोवऱ्यांत सापडले. एका
पापातून बाहेर पडावे तो दुसरे पाप अशा अडचणींत सापडल्याने उन्नती तर राहोच पण
अधोगतीला जाऊन मिळाले.’
‘ज्यांना आत्मज्ञान झाले. गुरूबोध
लाभला, त्यांचा सारसार विवेक जागा झाला. ते मायेचा उगम ज्या परब्रह्मापासून झाला
त्या मूळाकडे गेले. तेथे ब्रह्मस्वरूपत्व पावल्याने पवित्र व शुध्द झाले. तेथेच
आनंदाने राहिले. उलट काय झाले?’ उगमापैलिकडे गेले | तेथें परतोन पाहिलें | तंव तें पाणीच आटलें | कांहीं नाहीं ||११-७-२१||श्रीराम||
‘ज्यांना वृत्ती अंतर्मुख करता आल्या
त्यांना मायेत गुरफटण्याचे भयच नाही. ते ब्रह्म रुपाला जाणतात. ब्रह्मरुपच होतात.
मग व्दैत राहीलच कोठे? मायाच नाही. मग भ्रमही नाही. जो भ्रमरहीत तोच खरा भक्त.’
‘मधू! समर्थानी भक्ताची व्याख्या कशी छान
सांगितली आहे बघ.’ विभक्तपणें नसावें | तरीच भक्त म्हणवावें | नाहींतरी वेर्थचि सिणावें | खटाटोपें ||११-८-१३||श्रीराम||
आजी
म्हणाल्या, ‘अखंड
चिंतनाने पूर्ण ब्रह्मास जाणता येते. सेवा भावाने वागता वागताच ब्रह्मभाव निर्माण होतो.
जया, समर्थांचा हा गोड संदेश बघ. बाच तू...’ भल्यानें विवेक धरावा | दुस्तर संसार तरावा | अवघा वंशचि उध्दरावा | हरिभक्ती करूनी ||११-८-२५||श्रीराम||
‘बाळांनो! काल तुम्ही
विवेकाने वागलात. विवेकाचे महत्व कळले नां? विवेकी माणसाला हो
भवसागर सहज पार करता येतो. इतकेच नव्हे तर आपल्या भक्तीच्या जोरावर तो आपल्या
साऱ्या वंशाचा उध्दार करतो.’
विलास म्हणाला, ‘आजी! उध्दार करायचा
म्हणजे नक्की काय करायचे?’
‘सांगते!’ आजी म्हणाल्या, ‘आपल्या घरांत आधीत होऊन गेलेले अतृप्त आत्मे
असतील, त्यांना आपल्या भक्तीव्दारे मुक्त करावे. जर शुध्द विवेक जागा असेल तर
आपल्या कुटूंबाचाच विचार कशाला? साऱ्या विश्वातील
अतृप्त आत्मे, म्हणजे वासनेत अडकलेले जीव आपल्या शुध्द भक्तीने मुक्त होतील. इतके
सामर्थ्य त्या भगवंताचे नामांत आहे. त्या नाम सामर्थ्याने खरा परमात्मा कोण ते
कळते. गणपती ही ओवी बघ.’ तैसा परमात्मा परमेश्वर | बरा वोळखावा पाहोन विचार | तरीच पाविजे पार | भ्रमसागरचा ||११-९-८||श्रीराम||
आजी म्हणाल्या, ‘भ्रम म्हणजे भास. भ्रम मायेमुळे होतो. विवेकाने
ती माया ओसरली, दृष्यावरचे प्रेम ओसरले, की दिव्य चैतन्ययुक्त असलेले परमेश्वर रूप
आकलन होते. तोच त्रैलोक्याचा नायक विवेकाने त्यालाच ओळखावे. ओळखावे म्हणजे
अनुभवावे.’
गणपती म्हणाला, ‘त्रैलोक्य म्हणजे, स्वर्ग मृत्यू पाताळ नं?’
‘होय!’ आजी म्हणाल्या.
‘पण आजी!’ जयाने शंका
विचारली, ‘सर्व भूतमात्रांत असलेला परमात्मा पुन्हा साऱ्या
विश्वाला, त्रैलोक्याला व्यापतो. जरा आश्चर्यच आहे नाही कां?’
‘खरं आहे तुझे म्हणणे!’ आजी म्हणाल्या, ‘हेच
त्या भगवंताचे अलौकीकत्व. ते सहजी लक्षांत येत नाही. म्हणून काय करावे?’ आधीं देखिला देहधारी | मग पाहावें जगदांतरीं | तयाचेनियां उपरी |
परब्रह्म पावे ||११-९-२०||श्रीराम||
‘समजलं!’ आजींनी विचारले, ‘प्रथम भक्ती करता करता आपल्या देहातील चैतन्याचा,
स्वस्वरूपाचा अनुभव घ्यावा. मग आपोआपच दुसऱ्याच्या ठिकाणचे चैतन्य अनुभवास येते.
तूच सांगितलेस नां विलास? मधुने भाषण करून पाकीट परत दिले. देणगी म्हणून
दिले. तुम्हा दोघांनी त्याचे अनुकरण केलेत. म्हणजे तिघांच्या चैतन्याचा मिलापच
झाला. असा आनंददाई अनुभव जो जो वाढीस लागेल तो तो साऱ्या विश्वातील ईश्वर स्वरूप
अनुभवास येईल.’
मधुकर म्हणाला, ‘पण आजी! हा अभ्यास सतत
व्हायला हवा. तरच दिवसानुदिवस सद्गुणांत वाढ होत राहील.’
जया म्हणाली, ‘नाही तर तेरड्याचा रंग तीन दिवस, असंच होईल. मग
या करता काय करावे?’
आजी म्हणाल्या, ‘समर्थांची ही ओवीच तुला उत्तर देईल. वाच...’ वेषभूषण ते दूषण | कीर्तिभूषण तें भूषण | चाळणेविण येक क्षण | जाउच नेदी ||११-१०-७||श्रीराम||
‘आहे नां सोप? माणसाचा खरा दागिना
कोणता? हे पूर्णपणाने कळायला हवे. झकपक पोषाख केला,
दागदागीने घातले, तर देह सुंदर दिसेल. पण समर्थांची तळमळ मन सुंदर असायला हवं,
जेणे करून आपली किर्ती वाढेल असे कर्म सदैव व्हावे, आळसांत एक क्षणही न घालवता
अखंड मनन व्हावे ही आहे. विलास पुढची ओवी तू वाच...’ अखंड येकांत सेवावा | अभ्यासचि करीत जावा | काळ सार्थकचि करावा | जनासहित
||११-१०-१७||श्रीराम||
‘शाब्बास!’ आजी म्हणाल्या, ‘एकांताचा फार फायदा होतो. खळखळ करणारं मन स्वस्थ
करण्याकरिता ग्रंथ वाचन करावे. विचार शुध्द होण्यासाठी एकांतात चिंतन करावे. लेखन
करावे की चित्त शांत होते. मनुष्य देह सार्थकी लावायचा म्हणजे आपण जे गुण कमावतो
ते जनता जनार्दनाच्या सेवेस लावावेत. त्यासाठी समाजात मिसळावे लागतेच. निरीच्छ
वृत्ती असली की लोकांना आपले बद्दल अधिक आपुलकी वाटते. ह्याचा पण काल तुम्ही अनुभव
घेतलात. पाकीटाचा मोह धरला नाहीत, लगेच ते पैसे सत्कारणी लावलेत म्हणून तुम्हाला
योग्य असा खाऊ मिळालाच नां?’
‘आयुष्यभर एकच लक्षांत ठेवू या.’ उत्तम गुण तितुके घ्यावे | घेऊन जनास सिकवावे | उदंड समुदाये करावे | परी गुप्तरूपें ||११-१०-१८||श्रीराम||
‘जगांत आयुष्यभर शिकावे इतके ज्ञान पसरले आहे.
नव्या नव्या कला. नवे नवे गुण आत्मसात करून त्यात पारंगत होण्याचा प्रयत्न करावा.’
‘हे सारे शिकायचे कशासाठी? त्याचा
प्रसार करता यावा म्हणूनच नां? ज्यांना जेवढे देता
येईल तेवढे ज्ञान द्यावे. दानात दान ज्ञान दान.’
विलास म्हणाला, ‘पण आजी अन्नदान श्रेष्ठ दान नाही कां? भूकेल्या जीवाची भूक भागली की आनंद होतो.’
‘होतो! आजी म्हणाल्या, ‘पण तो आनंद पुन्हा भूक लागेपर्यतच टिकतो. पुन्हा
अन्नाची गरज भासतेच. तसेच वस्त्राचे, पैशाचे. कितीही गरजा भागवल्या तरी पुन्हा
वस्त्र फाटते, पैसे संपतात, गरज वाढतेच. ज्ञान दानाने आपले ज्ञान वाढते घेणाराचा
आनंद कायम टिकतो.’
‘एका विचाराची, सद्विचाराची जितकी माणसे एकत्रित
करता येतील तितकी करावीत. त्यालाच संघटना म्हणतात.’
सुधा म्ह्णाली, ‘आजी त्यासाठी आपापल्या घरातूनच सुरूवात करावी असं
मला वाटतं म्हणून आम्ही तीनही भावंड रोज सकाळी अथर्वशिर्ष म्हणतो व संध्याकाळी
रामरक्षा आणि भीमरूपी स्तोत्र म्हणतो.’
‘छान! छान!!’ आजी म्हणाल्या, ‘अशीच
प्रेरणा भगवंत देत राहो.’
विलास म्हणाला, ‘आजी माझ्या घरांत मी एकटाच. बहीण नेहमी येथे
नसते. मग मी कोणाला शिकवू? पण माझे खाऊचे पैसे साठले आहेत. त्यातून
बांबाच्याकडून एक हरतालिकेचा साचा आणवणार आहे.’
‘आमच्याकडे स्वयंपाकाला ताई येतात ना? त्या गरीब आहेत त्यांना मूर्ती बनवण्याचा नाद
आहे. शाडूची माती नी साचा त्यांना दिला तर त्या हरितालिका मूर्ती तयार करून
रंगवतील आणि विकतील. तर त्यांना खूप पैसे मिळतील. असे दान केले तर चालेल नां? हे योग्य दान होईल नां?’
‘होईल! होईल!’ आजी म्हणाल्या, ‘कोणी
कष्टाने, कोणी पैशाने, ज्याला जसे जमेल
तसे सेवा भावाने वागावे. म्हणजे आपल्या ह्रदयस्थ परमेश्वराला जाणले असेच
होईल. ब्रह्मदर्शनाचा आनंद रोज लुटता येईल. त्यांत खंड मात्र पडू देऊ नये. म्हणुन
तर प्रार्थना करायची. कोणाची?’
गणपती म्हणाला, ‘बलभीमाची!’
।। महारुद्र हनुमान की जय ।।
।। श्री समर्थ सद्गुरु स्वामी महाराज की जय ।।
।। जय जय रघूवीर समर्थ ।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा