मंगळवार, १ डिसेंबर, २०२०

पडवीवरचा दासबोध, दिवस १७ वा

 

।।श्रीराम।।

पडवीवरचा दासबोध

लेखिका- आशालता उर्फ आक्का वेलणकर

दिवस १७ वा

     आजींचे भजन अगदी रंगात आले होते. गुरू महाराज गुरू जय जय परब्रह्म सद्गुरू। चारी मुक्ती दायक दाता उदार कल्पतरू SSS गुरू......

     सगळीजण पडवीवर जमले. आजींच्या भजनाचा ठेका धरून चक्क फेर धरून भजनही म्हणू लागले. त्या आवाजानेच आजी बाहेर आल्या. तरी मुले फेर धरून भजन म्हणण्यांत रंगली होती. आजी म्हणाल्या, वा! वा! वा! सद्गुरू महाराज की जय। महारूद्र हनुमान की जय। जय जय रघूवीर समर्थ ।

     मोठ्या आनंदाने एकमेकांना नमस्कार करून सर्वजण स्थानापन्न झाले. सुधा म्हणाली, आजी मी दासबोध बाहेर आणला. आज काय खूण पहावी म्हणून उघडला तो काय? नि नि नि अ अ अ बाई बाई किती शब्द हे. हे कोणाचे वर्णन?’

     आजी म्हणाल्या, ज्याच्या सत्तेने व इच्छेने आपल्या प्रयत्नांना यश येणार त्या परब्रह्माचे वर्णन आहे हे. आज तुम्ही भजनांत रमलात. आता खेळच घेऊया. नि म्हणजे नाही आणि अ म्हणजे पण नाही. मी शब्द सांगते. बोट दाखवीन त्याने अर्थ सांगायचा. चालेल?’

     हो! हो! चालेल नाही चुकणार आम्ही. विलासने सांगितले.

     हं! सुरू हं! आजी- निराकार?’

     गणपती- आकार नाही.

     आजी- निराभास?’

     जया- भासच नाही.

     आजी- नि:काम?’

     विलास- कामच नाही, काम म्हणजे वासना.

     आजी- नि:कलंक?’

     मधू- कसलाही कलंक नाही.

     आजी- नि:संग?’

     सुधा- कशाचाही संग नाही.

     असा बराच वेळ खेळ चालला. विलास म्हणाला, आजी! हे नाही नाही हे समर्थांनी कोणाबद्दल सांगितले?’

     आजी म्हणाल्या, ज्या परब्रह्माची सत्ता विश्वावर चालते त्याचे असे नाही शब्दांतच वर्णन करणे भाग पडते. कारण तो या दृष्य विश्वाच्या पलीकडे आहे.

     त्याच्या सारखा तोच. पण सद्गुरू माऊली त्या परब्रह्माचा अनुभव आत कसा घ्यायचा ते सांगते. विलास तू वाच.. परब्रह्म म्हणिजे सकळांपरतें | तयास पाहातां आपणचि तें | हें कळे अनुभवमतें | सद्‍गुरु केलियां ||९-२-२९||श्रीराम॥

     सामान्य माणसाला वाटते आपणास परब्रह्म दर्शन व्हावे. पण ते जवळ असून दिसत नाही?’ आजी म्हणाल्या, जया तू वाच.... दृश्य सबाह्य संचलें | परी तें विश्वास चोरलें | जवळिच नाहीसें जालें | असतचि कैसें ||९-२-||श्रीराम॥

     छान!’ आजी म्हणाल्या, हेच परब्रह्माचे वैशिष्ट्य, विश्वातील सर्व पाण्याला ते व्यापून आहे तरी...

     तरी ते भिजत नाही, गणपतीने वाक्य पूर्ण केले. 

     आजी म्हणाल्या, सर्व अग्नीला व्यापून आहे पण..

     विलास- पण ते जळत नाही.

     आजी- ते वाऱ्यात आहे पण..’

     मधुकर- ते उडून जात नाही.

     आजी- ते सोन्यात आहे पण….’

     सुधा- पण त्याचे दागिने करून घालता येत नाहीत.

     शाब्बास!’ आजी म्हणाल्या, मी देह आहे हे अज्ञान, कल्पना, भ्रम दूर जायला हवा तसेच मी ब्रह्म आहे. ही पण कल्पनाच. कल्पनेला मर्यादा असतात. परब्रह्म व्यापक आहे. मर्यादे पलिकडे आहे.

     मग ते परब्रह्म सापडेल कसे? अनुभवायचे कसे?. गणपतीने शंका विचारली.

     समर्थच युक्ती सांगतात बघ, आजींनी गणपतीला दासबोध देऊन ओवी दाखवली. अन्वये आणी वीतरेक | हा शब्दभेद कोणी येक | निशब्दाचा अंतरविवेक | शोधिला पाहिजे ||९-२-२१||श्रीराम॥

     आजी म्हणाल्या, मोगरीच्या फुलांत परब्रह्म वासरूपाने असतो. पाण्यांत चव रूपाने असतो. असे त्याला दृष्यांत पहाणे याला अन्वय म्हणतात. फूल सुकते. वास येत नाही. पण दुसऱ्या फुलांत वास असतोच. जगाच्या पाठीवरचा वास सर्वस्वी गेला असे कधीच होत नाही. पाणी संपलं, आटलं किंवा सांडल तरी दुसऱ्या पाण्याला चव असतेच. असे दृष्याला म्हणजे दिसणाऱ्या वस्तूला बाजूला सारून जे असतेच असते ते परब्रह्म असे पहाणे म्हणजे व्यतिरेक.

     वास कसा शब्दाने सांगता येतो कां?’ आजींनी विचारले.

     नाही!’ सगळ्यांनी एकदम उत्तर दिले.

     आजी म्हणाल्या, जे शब्दाने सांगता येत नाही तेथे गप्प राहून आंत अनुभव घ्यायचा याला विवेक म्हणतात. आतां मौन्य न भंगावें | करून कांहींच न करावें| असोन  निशेष  नसावें  |  विवेकबळें  ||९-२-४१||श्रीराम॥

     विवेकाने मौनात राहून सर्व कांही करून अलिप्त असावे, सगळ्यांत असून कशातही अडकून पडू नये.

     मधुकर म्हणाला, म्हणजे कमळासारखे म्हणाना, चिखलात असून अलिप्त, निर्मळ.

     कमळ कुठे सगळ्यांना पहायला मिळते?’ जया म्हणाली. आजी मी सांगते, परब्रह्म लोण्यासारखे. ताकात असून ताकापासून अलिप्त. ताकात न मिसळता रहाणे.

     मधुकर म्हणाला, आजी! जरा अवघडच आहे हे करून अकर्ता, भोगून अभोक्ता. तो असतो तरी कसा?’

     आजी म्हणाल्या, हे बघ! समर्थांनी किती योग्य शब्दांत वर्णन केले आहे, ... तैसा साधु आत्मज्ञानी | बोधें पूर्ण समाधानी | विवेकें  आत्मनिवेदनी  |  आत्मरूपी  ||९-३-३२||श्रीराम||’

     खरा खरा आत्मज्ञानी म्हणजे स्वस्वरूप जाणणारा, सद्गुरू बोधाने, परिपूर्ण, ज्ञानाने, पूर्ण अनुभवी असतो. पूर्ण समाधानी असतो, विवेकाने आत्मनिवेदन केल्यामुळे तो आत्मस्वरूपाकार बनतो.

     आजी! माझी एक शंका आहे. गणपती म्हणाला, अभ्यासाने जर हे सहज शक्य आहे तर, सगळेच का तसा अभ्यास करत नाहीत?’

     आजी म्हणाल्या, छान विचारलंस हो!’  येका जाणण्यासाठीं | लोक पडिले अटाटी | नेणपणें  हिंपुटी  होती | जन्ममृत्यें ||९-३-४४||श्रीराम||

            ज्ञान प्राप्ती व्हावी असे तर सगळ्यांनाच वाटते. पण गंमत काय होते, खटपट करूनही अज्ञान आड येते. देहात्मबुध्दी अज्ञान वाढवते. देहात्मबुध्दीची प्रजा वाढते. मनूष्य जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकतो. यातून बाहेर पडायचा एकच मार्ग आहे. विलास तू वाच. जाणता तो कार्य करी | नेणता कांहींच न करी | जाणता तो पोट भरी | नेणता भीक मागे ||९-४-६||श्रीराम||

     मीच सांगतो अर्थ, विलास म्हणाला, जाणता म्हणजे आत्मज्ञानी उद्योग करतो. नेणता म्हणजे अज्ञानी आळसांत दिवस घालवतो. उद्योगधंदा काहीच नाही मग पोट कसे भरणार? उद्योगी मनुष्य नीटनेटके पोट भरतो. आळशी मात्र भीक मागतो.

     आजी म्हणाल्या, ठीक! म्हणजे जीवनांत काय करायला हवे ते कळले. जया आता तू वाच. प्रपंच अथवा परमार्थ | जाणता तोचि समर्थ |नेणता  जाणिजे  वेर्थ|  निःकारण  ||९-४-१९|| श्रीराम||

     जयानेच अर्थ सांगितला, प्रपंचात काय किंवा परमार्थात काय ज्ञान हे असायलाच हवं. ज्ञानी मनुष्यचं प्रपंच चांगला करील व त्याला परम्रार्थही उत्तम साधेल. अज्ञानी माणूस मात्र दोन्हीकडे फजित पावेल. त्याचे आयुष्य वाया जाईल.

     विलास म्हणाला, आपले आयुष्य असे वाया जायलां नको. होय नां गणपती?’

     गणपती म्हणाला, आपल्याला वैभव शिखर गाठायचं आहे.

     आजी म्हणाल्या, मग त्यासाठी लक्षांत ठेवायला हवे. मधू ओवी वाचेल.जेथें जाणपण  खुंटलें | तेथें  बोलणेंही तुटलें | हेतुरहित जालें | समाधान ||९-४-४२||श्रीराम।।

     मधू म्हणाला, आजी! हे पथ्य तुम्हीच समजाऊन सांगा.

     सांगते!’ आजी म्हणाल्या. मी देव आहे हा अनुभव येणे हे खरे ज्ञान. हा अनुभव जितका पक्का होईल तितक्या प्रमाणांत, मी देह आहे हे अज्ञान दूर होईल. अज्ञानाचा विचार लोप पावतो हे ठिक आहे. त्याची आत्ताच जोपासना करायची. तो ज्ञानाचा विचार ब्रह्मानंदात मिसळून टाकता आला पाहिजे. मग बोलणे खुंटतेच. वासन क्षीण होते. हाव नष्ट होते. लोभाची नांगी पडते. मोह गळून जातो. आणि खरे खरे समाधान पदरी पडते.

     तरी संत संगती हवीच. नाहीतर घसरण सुरू होण्याची भीती असते. भोवताली असलेल्या ज्ञानी अज्ञानी माणसांच्या वल्गनेत सापडलो तर? फजितीच.

     तर्काचे, अनुमानाचे ज्ञान खरे नव्हे. कोणी वादंग घालतील, कोणी भलतेच प्रश्न विचारतील तरी गांगरून जाऊ नये. सद्गुरुंवर हवाला टाकावा. उपास्य देवतेचा आदर्श डावलू नये. शांत राहून विचार करावा.

     जे ब्रह्मांडी ते पिंडी या न्यायाने, पिंडात छपन्न कोटी देवता कुठे आहेत? असे कोणी हटकले तर?’

     तारतम्य विचार करावा. शब्दाला शब्द अर्थ न घेता साधर्म्य विचार पहावा. ब्रह्मांडाला आधार पंचमहाभूतांचा तसाच पिंडाला पंचमहाभूतांचा आधार आहे.

     आजी! ही पांच महाभूते शरीरात कशी? मी सांगू?’ जया म्हणाली. आजी हो म्हणाल्या.

            दृष्यात जशी जमीन, डोंगर, वनस्पती आहे तशी देहात मांस, हाडे, केस आहेत.

     जया सांगू लागली, बाहेर नद्या आहेत तशा शरीरात रसवाहिन्या, रक्त वाहिन्या आहेत.

     या नद्या म्हणजे आप तत्व झालं. गणपती म्हणाला.

     मधुकर म्हणाला, बाहेर सूर्य आहे, तसा देहात पण तेज म्हणजे अग्नी आहे. पोटात जठराग्नी आहे. आपले शरिर गरम असते कारण रक्तात तेज आहे. या तेजामुळेच इच्छा वासना उत्पन्न होतात. कधी कधी शरीरांतला अग्नी भडकला तर क्रोध उफाळतो. डोळे लाल होतात.

     सुधा म्हणाली, आजी! ज्ञानाला अग्नीच म्हणतात नां?’

     आजी म्हणाल्या, होय! ज्ञान सतेज असेल, तर ज्ञान चक्षु उघडला म्हणतात.

     मी आता वायू तत्व सांगतो, गणपती म्हणाला, आपला श्वासोच्छवास तो वायूच. वायूमुळच उचकी लागते. ढेकर येतो. आणि आजी हवा सरकली म्हणतो. ( गणपतीने विलासच्या अंगावर कलून मांडी वर करून चक्क कृती करून दाखवली) तो पण वायूच. सगळेच हसले.

     आपल्या शरीरातील पोकळी ते आकाश तत्व. विलास म्हणाला.

     छान सांगितलत हं!’ आजी म्हणाल्या. बरचं लक्षांत ठेवलंत. यालाच खरे श्रवण म्हणतात. श्रवणाने मनन घडते. मननात श्रवण केलेला विषय पक्का होतो. आणखी एर मोठ्ठा फायदा कोणता?’ जितुकें  अनुमानाचें  बोलणें | तितुकें  वमनप्राये त्यागणें | निश्चयात्मक तेंचि बोलणें | प्रत्ययाचें ||९-५-३९||श्रीराम||

     अनुमान व अनुभव यात फरक आहे बरं! सत् श्रवणाने अनुमानाला म्हणजे तर्काला वावच मिळत नाही. संतांचे अनुभवाचे बोल आपल्या खोट्या कल्पनांना उडवून लावतात. जो जो चिंतन घडेल तो तो आत अनुभब येत राहील. अनुभव ज्ञानाने आपला आत्मज्ञानाचा पाया पक्का होईल.

     मग तार्कीक ज्ञानाकडे कोणीही आपल्याला खेचले तरी समर्थ ठामपणाने सांगतात, असले बोलणे ओकारी प्रमाणे त्याज्यच समजावे. जराही मनावर घेऊ नये. आंत निश्चय पक्का असावा. कोणता?’

     सोSहं, विलास म्हणाला.

     मी देह नाही. गणपती म्हणाला.

     मी देवच आहे. जया म्हणाली.

     प्रचितीचे ज्ञान हेच खरे ज्ञान. मधुकर म्हणाला.

     सद्गुरुंना अनन्यभावाने शरण जावे. त्यांनी दाखवलेल्या मार्गाने चालावे. सुधा म्हणाली.

     आजी म्हणाल्या, चारी मुक्ती दायक दाता। उदार कल्पतरू । गुरू महाराज गुरू। जय जय परब्रह्म सद्गुरु।।

     मुलांनी आजींच्या भोवतीच फेर धरला व भजन रंगले. आनंदाने गर्जना केली.

।। महारूद्र हनुमान की जय । जय जय रघूवीर समर्थ ।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा