मंगळवार, ८ डिसेंबर, २०२०

पडवीवरचा दासबोध, दिवस २६ वा

 

।।श्रीराम।।

पडवीवरचा दासबोध

लेखिका- आशालता उर्फ आक्का वेलणकर

दिवस २६ वा

 

    

     सगळी मुले जमली. पण जयाचा चेहरा रडवेला होता. तिला काय होतय? सगळ्यांनाच जाणायची उत्सुकता होती. पण नुसत्या खाणाखूणा चालल्या होत्या.

     इतक्यांत आजी आल्या, नित्याप्रमाणे वंदन प्रकार झाला. विलासने खूणेनेच जयाकडे बघा सूचवले.

     आजींनी प्रेमाने तिच्या पाठीवर हात फिरवला आणि जया चेहरा कां उतरलाय? कांही होतय कां?’ असे विचारले.

     जयाने डोळे पुसले. नाक पुसले. जया म्हणाली, आजी! आज सकाळीच माझे मामा आले. त्यांनी माझ्याकरीता कृष्णाची किती छान मूर्ती आणली होती. फारच सुंदर होती. मी सगळ्यांना दाखवायला येथे आणणार होते. म्हणून मूर्ती बाजूला ठेवून खोका शोधायला आत गेले. एवढ्यात शेजारचा बंडू आला. त्याने  ती मूर्ती उचलली व घरी जाऊ लागला. इतक्यांत मी आले. त्याला हाक मारून थांबवले, तो उंबरठ्यावर अडखळला ....

     विलास म्हणाला, आणि पडला असेल. मूर्ती फुटली असणार! मातीची मूर्ती फुटली तर फुटली.

     आजी म्हणाल्या, विलास! तिला वाईट वाटणे स्वाभाविक आहे. तुम्हाला सर्वांना दाखवून तिला आनंद मिळणार होता. नुकतीच मूर्ती मिळाली नी लगेच फुटली, याचेच तिला वाईट वाटत आहे. शहाणी आहे ती. तिची समजूत पटेल लवकर. जया पूस डोळे.

            हे बघ! प्रत्येक निर्मित वस्तूला कालमर्यादा असते. ती वस्तू कोठे तयार होते?  कोठे जाते?  किती दिवसांनी नाहिशी होते?  हरवते, फुटते कां चोरीला जाते हे त्या वस्तूचे दैवच. कोण ठरवतो हे?  हे सारे आपल्या हाती नाही. पृथ्वी रचते आणि खचते! हे तो प्रत्यया येते. तू वर्तमान पत्र वाचतेस नां? धडाधड इमारती कोसळतात. झाडे मोडतात. कडे कोसळतात, पूल उध्वस्थ होतात. मग लहानशी मातीची मूर्ती धक्का लागला जोरात. पडली हातातून फुटली. आता दु:ख करू नकोस. मूर्ती पाहिल्यावर ज्या क्षणाला तुला आनंद झाला तो क्षण फक्त आठव. मूर्ती ह्रदयांतच कायम राहील. आता ही ओवी वाच. ऐसा पांचा भूतांचा विस्तार | नासिवंत हा निर्धार | शाश्वत आत्मा निराकार  |  सत्य जाणावा  ||१३-६-११||श्रीराम||  

     पांच भूतांची नांवे मी सांगतो. गणपती म्हणाला, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही प्रलयाच्या वेळी नाश पावतात.

     आकाश नाश पावत नाही ना आजी?’ विलासने विचारले.

     आजी म्हणाल्या, चैतन्य परब्रह्मात मिसळले की आकाश हे नांव लोप पावते. शुध्द चैतन्य व्यापकतेने सर्वत्र असतेच असते. फक्त ते आकारास येते ते ते लवकर वा उशिरा पण केव्हातरी नाश पावते.

     सुधा म्हणाली, आजी! आकारिले तितुके नासे हे जरी खरे असले तरी ते नाहीसे होऊ नये असेच आपल्याला वाटते. ती वस्तू आपलीच आपल्याच जवळ असावी असे वाटते. त्या असण्यातच आनंद वाटतो. हा तर आपला नित्याचा अनुभव म्हणून चित्र, फोटो, मूर्ती, जवळचा माणूस नाहीसा झाला की वाईट वाटते.

     आजी म्हणाल्या, बरोबर आहे तुझे म्हणणे! पण बुध्दीला जरा उजाळा मिळाला तर सूक्ष्म बुध्दीने लक्षांत काय ठेवायचे? वाच तू... निराकार जाणावा नित्य | आकार जाणावा अनित्य | यास बोलिजे नित्यानित्य |िचारणा ||१३-६-१५||श्रीराम|| 

     नित्य, अनित्य विवेक जागा असला की वस्तूचा नाश पावणे हा धर्म लक्षांत येतो व दु:ख होत नाही. होऊ नये. आज पर्यंत किती कपडे फाटले? कपबशा किती फुटल्या? तुमच्या हातातल्या बांगड्या किती वाढवल्या? त्याबद्ददल शोक करत बसलो कां? असं व्हायचंच असं म्हणून नित्य असणाऱ्याला जाणू या. विलास तू वाच आता.... जेथें नाहीं विवंचना | तेथें कांहींच चालेना | खरें  तेंचि  अनुमाना|  कदा नये ||१३-६-२९||श्रीराम||

     मधुकर म्हणाला, मी सांगतो अर्थ. जो सूक्ष्म विचार करीत नाही, सारासार विचार करीत नाही, तो खरा देव कसा जाणू शकेल? अनुमानाने परब्रह्म कसे जाणता येईलं? नुसत्या तर्काने परब्रह्म कळू शकणार नाही. आजी मी शालेय जीवनातील गंमत सांगतो.

     परीक्षा देण्याकरीता शाळेत गेलो. करायचे काय पुष्कळ कागद? असे म्हणून चालेल कां? लिहायला बसलो, कशाला हवा कागदाला समास? दोन शब्दांत योग्य अंतर सोडा, कशाला ते? पुष्कळ कशाला लिहा? होईना कां खाडाखोड अस सगळं म्हणत कसाबसा पेपर लिहिला, अभ्यासाचा योग्य मजकुराचा विचारच केला नाही तर पास होण्याचा आनंद कसा मिळेल. उत्तीर्ण हेच ध्येय डोळ्यापुढे ठेवून अभ्यास करायला हवा. गबाळेपणा, अस्ताव्यस्तपणा टाकून नेटके स्वच्छ सुंदर हवे तेच लिहिले तर उत्तीर्ण होण्याचा आनंद मिळेल. शालेय जीवनात उत्तीर्ण होण्यातला आनंद हीच ब्रह्म प्राप्ती. असं म्हणायला काय हरकत आहे?’

            शाब्बास मधू!’ आजी म्हणाल्या. हरकत तर नाहीच उलट ध्येय डोळ्यासमोर अखंड असावे व प्रयत्न करावा. गणपती समर्थांचा हाच विचार तू वाच... याकारणें सर्व सांडावें | येक देवास धुंडावें | तरीच वर्म पडे ठावें | कांहींयेक ||१३-७-२१||श्रीराम||

     आजी म्हणाल्या, सर्व काही सांडावे म्हणजे काय कळलं नां?’

     विलास म्हणाला, उन्हातून हुंदडणे, उगाच मारामारी होईल असे वेडेवाकडे बोलणे, अभ्यासाव्यतिरिक्त वेळ वाया घालवणे सोडावे. व ध्येय हाच देव तो हाती लागेपर्यंत प्रयत्न सोडू नयेत. मग यश हमखास मिळतेच. यश हेच वर्म.

     ठिक!’ आजी म्हणाल्या, समर्थच नव्हे तर भगवंताचं सुध्दा तेच म्हणणे आहे, काय म्हणतात, सर्व सांडून शोधा मजला | ऐसें देवचि बोलिला | लोकीं शब्द अमान्य केला | भगवंताचा ||१३-७-२३||श्रीराम||   

     गीतेत भगवंत अर्जुनाला सांगतात. पण विषय सुखाच्या नादात लक्षांत कुणाच्या रहातयं! असं कां होतं?’

     गणपती म्हणाला, मी सांगू? विवेक बुध्दी झोपी जाते!

     मधुकर म्हणाला, विवेकाचा पाया पक्का हवा असा समर्थांचा आग्रह आहे. विवेकाचें फळ तें सुख | अविवेकाचें फळ तें दुःख | यांत  मानेल  तें  अवश्यक| केलें पाहिजे  ||१३-७-२८||श्रीराम||  

     विलास म्हणाला, सुख सोडून दुःखाच्या मागे कोण लागेल? विवेकानेच वागावे हे उत्तम.

     आजी म्हणाल्या, हे कळूनसुध्दा सामान्य माणसाची फसगत होते ती कशी? दृष्य डोळ्याला दिसते. प्रत्यक्ष हाताने स्पर्श करता येतो. देवाण घेवाण करता येते. त्यावरून मन काढावे याला माणूस तयार होत नाही. दिसते ते खोटे आणि दिसत नाही ते परब्रह्म खरे हेच मानायला सामान्य माणूस तयार नसतो. विश्वाचा कर्ता परमेश्वरच हेही तो मानित नाही. झाड मी लावलं पाणी मी घातले, त्या झाडावर फळे-फुले आली हे कर्तृत्व माझे. असे प्रत्येक कामात माणसाला वाटते. हेच अज्ञान मोठ्या देवाच्या आड येते. निमित्त आपण होतो. फांदी रुजावी, खाली मुळ्या फुटाव्यातव फांदीला डोळा असतो तेथून नवा अंकूर बाहेर यावा. गुलाबी कोवळी पाने हिरवी व्हावीत ही किमया कोणाची? त्याला कळ्या लागल्या. फुले उमलली. फुलांत वास कोणी घातला? हेच माणूस विसरतो. सुधा तू वाच.... येथें कर्ताचि दिसेना | प्रत्यये आणावा अनुमाना | दृश्य सत्यत्वें असेना | म्हणोनियां ||१३-८-३४||श्रीराम||  

     हे सारे विश्व निर्माण करणारा विश्वाच्या आधी होताच व आताही आहेच. अत्यंत सूक्ष्म शक्ती व तितकीच व्यापक असल्याने ब्रह्मदेव निर्माण करून मायेकरवी सृष्टी उत्पन्न करून आपण अलिप्त राहिला. मायेच्या निर्मिती मुळे सत्यत्वाचा भास होतो.

     बाळांनो! थोरा थोरांना चक्रावुन सोडणारी ही माया! तुम्ही तर अजून लहान आहात. आजी म्हणाल्या, पण एकच लक्षांत ठेवायचे, त्या चैतन्याचा एक कण आपल्यांत वावरतो आहे.

     विलास म्हणाला, त्यालाच आत्मा म्हणतात नां?’

     होय!’ आजी म्हणाल्या, तो काय काय करतो?’

     सुधा म्हणाली, इंद्रियांकरवी सर्व कामे, देणे घेणे, बसणे, रडणे, हसणे, सर्व सर्व कामे तोच करवून घेतो. तो सर्व कामांचा साक्षी.

     आजी म्हणाल्या, म्हणूनच या देहाच्या संगतीने आत्म्यास सुख दु:खे भोगीवी लागतात. वाच ओवी.... वाढणें मोडणें जाणें येणें | सुख दुःख देहाचेनि गुणें | नाना प्रकारें भोगणें | आत्मयांस घडे ||१३-९-९||श्रीराम||

            छान! या देहाशी संबंध आल्यामुळे चैतन्यरूप आनंदरूप असलेल्या आत्म्याचे नांव जीवात्मा, त्यालाच सारे वाढणे, नाश पावणे, सुख दुःखाचा अनुभव घेणे भोगावे लागते. त्याला एकच का काम असते? नामही एक नाही व कामही एक नाही. जगामध्यें जगदात्मा | विश्वामधें विश्वात्मा | सर्व  चालवी  सर्वात्मा | नाना  रूपें ||१३-९-२८||श्रीराम||

     तोच परमात्मा जगाला चालवतो. विश्वाच्या अंतर्यामी राहून विश्वात्मा बनतो. सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी तोच अंतरात्मा किंवा सर्वात्मा म्हणून तोच चालवतो.

     मधुकर म्हणाला, आजी! हे कसं झालं सांगू? नाटकांत बालगंधर्व सौभद्रमध्ये सुभद्रा. तेच शांकुतल मध्ये शकुंतला, तर एकच प्याला मध्ये सिंधूचे काम करतात, तर मानापमान मध्ये भामिनी होतात. बालगंधर्व एकच पण रूपे वेगवेगळी अर्थात कामे पण वेगवेगळी.

     शाब्बास! बरोबर सांगितलेस!’ आजी म्हणाल्या. म्हणून त्याच्या अनेक रूपाचे मूळ कोण म्हणून तू बालगंधर्व सांगितलेस ना? तसेच त्या परब्रह्माचे, परमात्म्याचे लक्षण सदैव जाणावे. तोच थोरला देव, त्याची लीला ती हीच. देही आत्मा देह अनात्मा | त्याहून  पर  तो परमात्मा | निरंजनास उपमा | असेचिना ||१३-१०-७||श्रीराम||  

     विलास देह कसा?’

     विलास म्हणाला, अनात्म म्हणजे अशाश्वत, असार.

     आजींनी विचारले, आत्मा कसा?’

     गणपती म्हणाला, शाश्वत, सार.

     आजी म्हणाल्या, देहापेक्षा त्यात रहाणारा आत्मा श्रेष्ठ. आत्म्यापेक्षा परमात्मा श्रेष्ठ. पण त्याची गंमत अशी की, तो भिन्न गुणांच्या देहात स्वस्थपणाने वावरतो. सुधा ही पुढची ओवी वाच... पुण्यात्मा आणी पापात्मा | दोहिंकडे अंतरात्मा| साधु भोंदु सीमा | सांडूंच नये ||१३-१०-१२||श्रीराम||

     आजी म्हणाल्या, आत्मा एकच असला तरी एक देह तमोगणाचे अधिक्याने पाप करतो. दुसऱ्या देहांत सत्वगुणाच्या अधिक्याने पुण्यकर्म करतो. म्हणून दोघांनाही साधू म्हणजे, चांगला माणूस म्हणून चालेल कां? किंवा दोघांना भोंदू म्हणून तरी चालेल कां? त्या त्या गुणांमुळे साधू तो साधूच व भोंदू तो भोंदूच.

     म्हणून समर्थ म्हणतात ज्याचा विवेक जागा आहे त्याने काय करावे?’ तैसें निंद्य सोडून द्यावें | वंद्य तें हृदईं धरावें | सत्कीर्तीनें भरावें | भूमंडळ ||१३-१०-२०||श्रीराम||   

     आजी म्हणाल्या, आता आपल्याला सार असार कळलंय. नित्य अनित्य कळलयं आणि मोठा देव कोण हे पण कळलयं.

            म्हणून निंद्य गोष्ट सोडायची. संतांना, सज्जनांना मान्य असेल तीच गोष्ट करायची आणि सत्कर्म करीत आयुष्य सार्थकी लावायचे म्हणजे कीर्ती सहजच वाढेल.

     मधुकर समर्थ काय म्हणतात तू वाच.... मुख्य मनोगत राखणें | हेंचि चातुर्याचीं लक्षणें | चतुर तो चतुरांग जाणें | इतर तीं वेडीं ||१३-१०-२५||श्रीराम||

     आजी म्हणाल्या, बाळांनो! एवढे पथ्य सांभाळले की, भगवंत  आपल्यावर कृपा करणारच. दुसऱ्याचे मनोगत जाणावे. दुसऱ्याचे मन कधी दुखवू नये. आपण थोडी झीज सोसावी. म्हणजे परोपकार वाढतो. परस्पर एकोपा वाढतो. संघर्ष माजत नाही. आणि जर का दुसऱ्याचे मन दुखावले गेले तर एकरूपता साधायची कठीणच. उलट कलह माजेल. बेबनाव होईल. अर्थातच जगण्याला कांहीच अर्थ रहाणार नाही.

     म्हणून एकोप्याने वागून सदा आनंदच भोगावा. आनंदच वाटावा. आनंदातच रहावे आनंद घ्यावा. आनंद द्यावा.

     आजींनी डोळे मिटून नमस्कार केला.

     मुलांनी जयघोष केला.

।। जय जय रघूवीर समर्थ ।।

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा