सोमवार, ७ डिसेंबर, २०२०

पडवीवरचा दासबोध, दिवस २५ वा

 

।।श्रीराम।।

पडवीवरचा दासबोध

लेखिका- आशालता उर्फ आक्का वेलणकर

दिवस २५ वा

            अगदी तावातावाने तिघे बोलत आले. आश्चर्य, चीड, संताप यांनी भरलेले बोलणे होते. चपला काढून पाय धुवून पडवीवर आले तरी बोलणे चालूच होते.

     सुधा म्हणाली, कसली येवढी चर्चा रंगलीय?’

            विलास म्हणाला, आज आखाड्यात कुस्तीची स्पर्धा होती. आम्ही तिघे गेलो होतो पहायला. मोठी प्रतिष्ठीत माणसेही खूप होती.

     पण त्याची तावातावाने चर्चा आत्ता कशाला?’ सुधाने विचारले.

     गणपती म्हणाला, सुधा! अग, खेळ नी खेळातला आनंद बाजूलाच राहिला व तेथे महाभारत घडले! ते कसे? नी त्याला जबाबदार कोण?’ हे आजींना विचारायचे आहे. इतक्यांत आजी बाहेर आल्या.

     विलास म्हणाला, आजी! आज आम्ही महाभारत पाहिले.

     आजी म्हणाल्या, आज रविवार नव्हे! मग महाभारत कुठे नी कसे घडलं?’

     मी सांगतो!’ गणपती म्हणाला, समर्थ व्यायाम शाळेच्या पटांगणावर कुस्तीची स्पर्धा होती. खूप गर्दी जमली होती. खेळ छान रंगला होता. दोन कुस्त्या पार पडल्या आणि तिसऱ्या वेळेला निर्णयात काही चूक झाली. बोलणे अटीतटीवर गेले. साराच रंग बदलला. आनंदावर विरजण पडले. मारामारी सुरू झाली. आम्ही तिघांनी काढता पाय घेतला.

     आजी! सगळ्यांच्या ह्रदयांत भगवंत असतो नां? मग चांगला खेळ चालला होता. तो भांडण कशाला जुंपावे? कोणी भांडताहेत तर कोणी तटस्थ, कोणी टाळ्या वाजवत होते. तऱ्हाच तऱ्हा, पण मी म्हणतो सर्वांचा आत्मा जर एकच आहे तर असे कां व्हावे?’

     आजी म्हणाल्या, आत्मा एकच आहे हे खरे. तो सर्व ठिकाणी व्यापून आहे खरा. पण गंमत अशी सर्वच प्राण्यांत, माणसांत सारख्याच सामर्थ्याने प्रगट होत नाही. हा भेद गुणामुळे होतो. सात्विक वृत्तीचा मनुष्य आत्म्याच्या शक्तीने पण न्यायाकडे झुकतो. तडजोड करतो. भांडण मिटवतो. पण रजोगुणाचा प्रभाव पडला तर तोच आत्मा आपले तेच खरं असे म्हणतो. म्हणून संघर्ष वाढतो. तमोगुणी मनुष्याचा आत्मा उगाचच गोंधळ माजवतो. दुसऱ्याला दु:ख देतो. स्वत: आसूरी आनंद मिळवतो.

            एकच आत्मा आपल्या देहांत किती भिन्न भिन्न कामे करतो, ऐकतो, बोलतो, चालतो, सारे देह व्यापार त्याच्याच सत्तेने चालतात. आनंदाचा अनुभव तोच देतो. सुख दु:ख त्याचेच मुळे भोगावे लागते. स्पर्धेत वा युध्दात त्याचेचमुळे जिंकतो. हरणारा त्याचेच मुळे हरतो.

     हे सारे लक्षांत घेऊन समर्थ सांगतात. आत्मा नस्तां देहांतरीं | मग तें प्रेत सचराचरीं | देहसंगें आत्मा करीं | सर्व कांहीं ||१३-१-२१||श्रीराम||

     देह व आत्मा एकमेकांशिवाय काम करू शकत नाहीत. देह नाशिवंत आहे. आत्मा शाश्वत आहे. जीवदशेमुळे आत्म्याला क्लेश भोगावे लागतात. म्हणून ज्ञानी माणसान काय करावे?’

     मधुकर म्हणाला, आत्मानात्म विचार करावा. त्यालाच नित्यानित्य विवेक म्हणतात कां?’

     आजी म्हणाल्या, तुझ्या प्रश्नाचे उत्तर या ओवीत आहे बघ. देह अनित्य आत्मा नित्य | हाचि विवेक नित्यानित्य | अवघें  सूक्ष्माचें  कृत्य |  जाणती  ज्ञानी  ||१३-१-२३||श्रीराम||

     गणपती म्हणाला, आजी! नित्य कशाला म्हणायचे व अनित्य कशाला म्हणायचे? ते एकदा सांगता कां!

            सांगते आजी म्हणाल्या, जे जे आकाराला आले ते अनित्य. जे जे जड पंचमहाभूतापासून बनले ते ते अनित्य. जे जे अति सूक्ष्म, त्याला आकार नाही. पंचमहाभूतापलिकडे ते नित्य. लक्षांत ठेवायला अगदी सोपे आहे बघ. दिसेल तें नासेल | आणि येईल तें जाईल | जें  असतचि  असेल  |  तेंचि  सार ||१३-२-२||श्रीराम||

     विलास म्हणाला, म्हणजे आजी! आत्मानात्म, सारासार, नित्यानित्य, शाश्वत-अशाश्वत हे सगळे एकाच अर्थाचे शब्द.

     होय!’ आजी म्हणाल्या, क्रम लावायचा झाला तर आत्मानात्म विवेकानंतर नित्यानित्य विवेक ही निवड होईल. मग सारासार विचाराने शाश्वत अशाश्वत विचार पक्का होतो. बाळांनो कापूस पिंजून सरकी काढतात तसा हा शब्दांचा पसारा मांडता आला किंवा आवरता आला तरी ब्रह्म स्वरूप होणे जड जाते. कां बरे? समर्थच सांगतात, मधू तूच वाच. संगत्यागेंविण कांहीं | परब्रह्म होणार नाहीं | संगत्याग  करून  पाहीं | मौन्यगर्भा ||१३-२-१७||श्रीराम||

            आजी म्हणाल्या, जो पर्यंत देहात्म बुध्दी मुळे मीपणा शिल्लक आहे, तोपर्यंत परब्रह्म स्वरूप आकलन व्हायचे कठीण. त्या मीपणाचा नि:शेष त्याग घडला की परब्रह्माचा अनुभव दूर नाही.

     विलास म्हणाला, हे मौन्य गर्भ ही काय भानगड आहे?’

     भानगड नाही!’ आजी म्हणाल्या, जे वाणीने वर्णन करता येत नाही ते. जे शब्दाच्या पलीकडे आहे ते. शब्दातीत असे कोण आहे? फक्त परब्रह्म, मौन्य गर्भ म्हणजे परब्रह्म. त्याला अनुभवायचे म्हणजे काय करायचे? जया तू वाच... खोटें सांडून खरें घ्यावें | तरीच परीक्षवंत म्हणावें | असार  सांडून  सार  घ्यावें  |  परब्रह्म तें  ||१३-२-२७||श्रीराम||

     जयाने ओवी वाचली व अर्थपण सांगते म्हणाली, जो खरा परीक्षावंत आहे तो खोटे काय ते ओळखून त्याचा त्याग करतो व खरे ते घेतो. तसेच असार ते टाकून परब्रह्म स्वरूप सार ते घ्यावे.

     मधू म्हणाला, आजी! हे सगळं जगत असार. आपला देह सुध्दा असार. मग अनुभव कोणी घ्यायचा?’

     छान विचारलेस!’ आजी म्हणाल्या, हे सर्व सोडायचे म्हणजे टाकून कोठे पळून जायचे नाही. या देहाचा नाश करायचा नाही. या सर्वांवरची आसक्ती सोडून देह असतानाच त्या परब्रह्माची मन बुध्दीने ऐक्यता साधायची. नेहमी स्वानंदात रहायचे. हे मानव देहांतच शक्य आहे. ब्रह्मदेवाने चार तऱ्हेची सृष्टी उत्पन्न केली. अंडज जारज श्वेतज उद्बीज | पृथ्वी पाणि सकळांचे बीज | ऐसें  हें  नवल  चोज| सृष्टिरचनेचें ||१३-३-१४||श्रीराम||

     विलास म्हणाला, हे चांगले लक्षांत आहे. अंड्यातून जन्म ते अंडज, वारेने वेष्टीलेले व पूर्ण वाढ झाल्यावर जन्म ते जारज, घामातून जन्म ते स्वेदज, व जमिनीतून अंकूर फुटून वर वाढ होते ते उद्भीज. या सगळ्यांना जमीन व पाणी यांची फार गरज असते. ईश्वराचे सगळ्यांत मोठे कौतुक ते हेच.

     आजी म्हणाल्या, बाळांनो! या परब्रह्माच्या प्रेरणेने हा खेळ चालतो. विश्वाचा हा गुंतागूंतीचा खेळ अवलोकन करताच वृत्ती शून्य, सूक्ष्म करून त्या दिव्य चैतन्याचा अनुभव घ्यायचा. ही कुशलता फक्त मानवातच आहे. वेवसाये प्रवृत्ती निवृत्ती | दोहिंकडे पाहिजे प्रचिती | प्रचितीविण अनुमानें असती | ते विवेकहीन ||१३-३१९||श्रीराम||

     हे अनुमानानेच म्हणजे तर्कानेच अनुभव आला म्हणतात ते विवेकहीन. ते प्रचिती येईपर्यंत अभ्यास म्हणजे उपासना करीत नाहीत ते पण विवेकहीन.

     मधु म्हणाला, आजी! तुम्ही हे सांगता आहात ना, तेव्हा मला गणितातल्या पदावलीची आठवण झाली. मयूर कंस, चौकोनी कंस, गोल कंस असे एकात एक कंस शिवाय अंश व छेद. मोठी पदावली सोडवताना कुशलताच असते. बुध्दी एकाग्र करावी लागते. उणे अधिक चिन्हे लक्षांत ठेवावी लागतात. आधी आतले आतले गोल कंस काढून सगळ्यांत शेवटी मोठा कंस काढायचा आणि एवढा सगळा खटाटोप करून उत्तर शून्य किंवा एक. तसेच आहे हे. फक्त बाहेरून आत जायचे आहे. बाहेरचे दृष्य हे नको ते नको करीत शाश्वत एकीकडेच यायचे आहे.

     आजी म्हणाल्या, शाब्बास! यालाच म्हणतात स्थूलातून सूक्ष्माकडे जायचे म्हणजेच बहिर्मुख वृत्ती अंतरमुख करायची. मग काय होते? सुधा वाचेल आण. दृश्य हलकालोळें नेलें | जड चंचळ वितुळलें | याउपरी  शाश्वत  उरलें  |  परब्रह्म तें ||१३-४-२४||श्रीराम||

     विलास म्हणाला, आजी! माझी शंका अशी की, ज्या क्रमाने सृष्टी उत्पन्न होते त्याच क्रमाने....

     त्याला अडवीत गणपती म्हणाला, चुकतो आहेस, ज्या क्रमाने उत्पन्न होते त्याच्या विरूध्द क्रमाने नाहीशी होते.

     बरोबर!’ विलास म्हणाला, बोलता बोलता चुकत होतो. पण मला म्हणायचय की शेवटी महाप्रलयांत काहीच रहात नाही. रहातं फक्त परब्रह्म. बस्स समजला परब्रह्माचा विचार. मग हे सोडा ते जोडा, उपासना करा, नाम घ्या हे सारं करायच काही कारणच नाही. आत्ताच आपल्याला कळले, या उपरी शाश्वत उरले। परब्रह्म ते।। 

     आजी हसल्या, विलास! आत्ता कळले ते शब्दाने की अनुभवाने?’

     शब्दाने कळले, संतांच्या ग्रंथाव्दारे कळले. विलास म्हणाला.

            सुधा म्हणाली, मग शब्दांचं ज्ञान खरं की, अनुभवाचं ज्ञान खरं?’

     थांब सुधा!’ तिला थाबवून आजी म्हणाल्या, विलास शालेय अभ्यासक्रमांत प्रत्येक विषयावर पुस्तके असतात. सहा विषयांची सहा पुस्तके. काही मार्गदर्शक पुस्तके. सारांश एका विषयाकरीता दुप्पट बारा पुस्तके जमली, वाचली, टाचणे काढली. आपल्याला पूर्ण अंदाज आला की, उत्तरे अचूक असली तर १०० पैकी ९०च पुढचे गुण मिळतीलच. मागील दोन चार वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवल्या तरी १०वी पास म्हणतील का? तसा दाखला मिळेल कां? उत्तीर्ण झाल्याचा आनंद मिळेल कां?’

     तो कसा मिळेल?’ विलास म्हणाला, परिक्षा देणे भाग आहे. उत्तरे तपासून निर्णय लागे पर्यंत वाट पहाणे भाग आहे. निकाल जाहिर झाला त्यात आपला क्रमांक सापडला की त्या भोवती आपण शाईने गोल काढतो. सर्वांना सांगत सुटतो. तो उत्तीर्ण होण्याचा आनंद वेगळा.    

            सुधा म्हणाली, त्यात सुध्दा फरक आहे बघं. नुसता निकाल कळला उत्तीर्ण, पण गुण कुठे कळले? गुणांची यादी मिळाली की पक्केच झाले किती गुणांनी उत्तीर्ण? वर्ग कोणता? तो आनंद खरा.

     बस्स!’ आजी म्हणाल्या, अगदी तस्संच आहे हे. येथे लेखी पेपर असतो. तेथे आचाराला महत्व असते. नरदेहात जन्म मिळाला मग प्रपंच करता करताच मन सर्व विषयातून काढून सतत परब्रहमाचे अनुसंधान ठेवता ठेवता अचानक अनुभवाचा क्षण येऊन ठेपतो. मग तो आनंद काही वेगळाच.  

     मधुकर म्हणाला, नाथांना पैची चूक सापडली. ते टाळी वाजवून नाचू लागले. सापडली रे सापडली, तसा हा परब्रह्माचा अनुभव म्हणजे सत् चित् आनंद याच्या अनुभूतीचा आनंद. याची देही याची डोळा अनुभवायचा. तो आनंद वेगळाच नाही कां?’

     अगदी बरोब्बर!’ आजी म्हणाल्या, अवघड नाही. छंद लागला पाहिजे. समर्थ सांगतात बघ, त्या जगोद्धाराचें लक्षण | केले पाहिजे विवरण | सार  निवडावें  निरूपण | यास बोलिजे ||१३-५-२१||श्रीराम||

     मानव देह जगदोध्दाराकरीता मिळाला आहे.

     जया म्हणाली, पण आधी स्वत:चा उध्दार नाही साधला, तर जगाचा कसा साधणार?’

     विलास म्हणाला, बघा आजी! पुन्हा माझा घोटाळा होतोय. स्वत:चा उध्दार करायचा म्हणजे?’

     मधू म्हणाला, चुकला पीर आला पुन्हा मशिदीत.

     आजी म्हणाल्या, येऊ दे! आपण देऊ या आश्रय. विलास हे विश्व कोणी उत्पन्न केले?’

     विलास म्हणाला, परब्रह्माच्या प्रेरणेने ब्रह्मदेवाने उत्पन्न केले.

     आजी- शक्ती कोणती वापरली?’

     माया, चैतन्य ही शक्ती वापरली, विलास म्हणाला.

     आजी- किती जिन्नस वापरावे लागले?’

     विलास- पंचमहाभूते आणि तीन गुण. नावे सांगू?’

     आजी- नको! लक्षांत आहेत तुझ्या. आता सांग हा अफाट विश्वपसारा शाश्वत की अशाश्वत?’

     विलास- अशाश्वत. आज आहे उद्या नाही. सारखा बदल. कालांतराने नाहीसे होणार म्हणून अनित्य, असार, अशाश्वत.

     आजी- मग शाश्वत कोण तू का मी?’

     विलास- दोघेही नाही, फक्त परब्रह्म शाश्वत.

     आजी- हे तुला कशाने कळले?’

     विलास- समर्थांच्या दासबोधातून कळले, बुध्दीत जाऊन घट्ट बसले. चित्तापर्यांत पोहोचले.

     आजी- या कळण्यालाच ज्ञान म्हणतात, या ज्ञानानेच मी कोण हे अखंड लक्षांत ठेवणार नं?’

     विलास- होय! सोहं! सोहं! सोहं!

     आजी- मग हे लक्षांत ठेवून गप्पच बसणार कां? विसरून जाणार? कां झोपून दिवस घालवणार?’ 

     विलास- विसरायचे कशाला? लक्षांत ठेवणार आणि नुसत लक्षांत नाही ठेवणार. माझ्यातले दोष काढून टाकून लक्षांत आलयं त्याप्रमाणे वागणार.

     आजी म्हणाल्या, दे टाळी! तू तसे वागणार याला म्हणायचे स्वत:चा उध्दार, जगाला सांगणार याला म्हणायचे जगदोध्दार. दुसऱ्याला सांगण्याने आपले ज्ञान वाढते. असार काढावे सार घ्यावे. आटोक्यांत असेल तेवढे सांगावे. याचे नाव निरूपण. हेच व्रत आपण सर्वजण घेऊ या. आज पांच आहोत, पंचवीस व्हायला वेळ नाही लागणार.

     आजी!’ विलास म्हणाला, आता अगदी पक्क कळलं. रोज आपण करतो तो व्यवहार सगळा चोख करायचा. अंतरात सोहं लक्षांत ठेवून करायचा. आसक्ती व हेतू रहित करायचा. फक्त आनंद मिळवायचा, जगाला वाटायचा. आनंद! आनंद! आनंदात डुंबायचे!’

     शाब्बास!’ आजी म्हणाल्या.

 

।। जयजय रघूवीर समर्थ ।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा