।।श्रीराम।।
पडवीवरचा दासबोध
लेखिका- आशालता उर्फ आक्का वेलणकर
दिवस ३० वा
मुले जमली. आजी पण आल्या.
मधू तावातावाने म्हणाला, ‘सुधा माझे नांव सांगणार होतीस ना? सांग ना आत्ता आजींना.’
सुधा म्हणाली, ‘मग काय भीते कां तुला? सांगीनच. आजी! असा
छान दासबोध अभ्यासता अभ्यासता खोट वागण्याचा मोह टाळावा की नाही? पण मधुदादादा पहा काय म्हणतो...’
‘आम्ही सकाळी म्हणी पूर्ण करायचा खेळ खेळत होतो.
मी अर्धी म्हण सांगितली की त्याने पूर्ण करायची. त्याने सांगितली की मी पूर्ण
करायची. उदा. एक हात लाकूड मी सांगितले की त्याने सात हात ढलपी असं पूर्ण करायची.
खेळ खूप रंगला.’
मी म्हटलं, ‘ऐकावे जनाचे तो म्हणाला, करावे मनाचे. म्हण बरोबर
पूर्ण केली. त्याबद्दल वाद नाही. आमचा वाद असा जर दुसऱ्याचे ऐकून मनासारखे केले तर
फसवल्यासाऱखे होत नाही कां? तो म्हणतो नाही होत. दुसऱ्याला जरूर विचारावे पण तसेच वागावे असे
कोठे आहे?
आपल्याला आवडेल ते करावे. मी त्याला खोटारडा म्हटले. मग चुकले का माझे?’
आजी म्हणाल्या, ‘सुधा! थोडा विचार करावा.
दुसऱ्याला काय विचारले? सांगणारा कोणत्या पात्रतेचा? सांगितले ते योग्य की अयोग्य? तसे वागलो तर हित की अनहित? हा विचार करायला हवा. विचार केला नाही तर अर्धवटाचे
काम फसते. जर अनुभवी माणसाने सांगितले असेल तर जरूर ऐकावे. उन्हात न खेळता आपण
दासबोध वाचू या हे ऐकलंत आजचा तिसावा दिसस. कसे आनंदात दिवस जात आहेत. या ठिकाणी
तुझे मत बरोबर. ऐकावे जनाचे आणि तसेच वागावे. पण हितकारक गोष्ट नसेल तर करावे
मनाचे हेच बरोबर. म्हणजे परवा गणपतीने भावाला पुस्तके वाचायला दिली व आपण इकडे
आला. हे त्याने मनाचे केले. भावाचे ऐकून क्रिकेट खेळायला गेला नाही.’
‘विवेकी माणसाने कसे वागावे? हे मधूचे म्ह्णणे बरोबर. ते खोट ठरवत नाही.
समर्थ तेच सांगतात बघ..’ उदंडाचें उदंड ऐकावें | परी तें प्रत्ययें पाहावे| खरेंखोटें निवडावें | अंतर्यामीं ||१५-६-११||श्रीराम||
‘बुध्दी कुशल करायची ती खरे खोटे ठरवण्यासाठीच.
दुसऱ्याच्या म्हणण्याचा प्रत्यय काय येईल? याचा विचार करावा व
अनुभवाअंती विश्वास ठेवावा व वागावे. नाहीतर मार्ग सोडून द्यावा. पुष्कळ वेळा
प्रसंग पाहून दुसऱ्याचे ऐकून मन सांभाळावे लागते. आणि ही कसरत बायकांना फार करावी
लागते. दुसऱ्याचे ऐकून कामाचा विचका होता उपयोगी नाही. मने दुखावली तर वाकडेपणा
वाढीस लागतो. मत्सरी वृत्ती फोफावते. समर्थांनी तो पण इशारा दिला आहे बघ....’ अंतरीं पीळ पेच वळसा | तोचि वाढवी बहुवसा | तरी मग शाहाणा कैसा | निवऊं नेणें ||१५-६-१४||श्रीराम||
‘खरा शहाणपणा हाच. एकमेकांबद्दल मन
स्वच्छ राहील असे करावे. मन पारदर्शक ठेवावे. वाकडेपणाने वाकडेपणाच रहातो. मग
समाजकल्याणाचे काम शांतपणाने करता येईल?’
विलास
म्हणाला, ‘हा
शहाणपणा कायम टिकावा म्हणून काय करावे?’
आजींनी
त्यालाच ओवी वाचायला दिली... ‘प्रसंग जाणोनि बोलावें | जाणपण कांहींच न घ्यावें | लीनता धरून जावें | जेथतेथें ||१५-६-२३||श्रीराम||’
आजी म्हणाल्या, ‘कार्य करायचे म्हणजे दुसऱ्याशी संबंध
येणारच. मान अपमान झाला, अपशब्द ऐकला तरी शांत राहून सहन करून प्रसंग पाहून
मानावे. किंवा हसण्यावर घालवावे. पण काम साधावे. यश मिळाले तर मोठेपणा आपल्याकडे
घेऊ नये. आपण कोठेही गेलो तरी लीनपणानेच वागावे. असे केल्याने लोकांची पारख करता
येते. कोणाच्याही गुणावगुणांचा स्पष्ट उल्लेख करू नये. पण मनांत जाणून असावे.
गणपती आता तू वाच....’ बहुतीं कांहींतरी सांपडे | विचक्षण लोकीं मित्री घडे | उगेच बैसतां कांहींच न घडे | फिर्णें विवरणें ||१५-६-२५||श्रीराम||
आजी
म्हणाल्या, ‘पुष्कळ
माणसांशी संबंध आला की कोणाजवळ तरी घेण्यासारखा एखादा गुण असतोच की नाही? तो जरूर घ्यावा. सद्गुणांची खाणच
आपल्याला व्हायचय. पुष्कळांशी मैत्री आयुष्यांत उपयोगी पडते. माणसे जोडायची कठीण
असतात. तोडायला वेळ लागत नाही. यासाठी एकेठिकाणी बसून कसे चालेल? वेगवेगळ्या ठिकाणी फिरावे. जया आता ही
३०वी ओवी बघ...’ जो
बहुतांचें पाळण करी | तो बहुतांचें अंतर विवरी | धूर्तपणें ठाउकें करी | सकळ कांहीं ||१५-७-३०||श्रीराम||
आजी
म्हणाल्या, ही फार मोठी चांगली कला आहे हं! सगळ्यांना सामावून घेण. अंत:करणाचा ठाव घेऊन कोणाचे मन न दुखवता
त्यांना एकाच कार्याला लावायचे किंवा आपले कार्य साधून घ्यायचे. सगळी वित्तं बातमी
करून घ्यायची. आपले सर्वांगीण ज्ञान वाढीस लागले पाहीजे.’
‘बाळांनो! काहींना ज्ञान खूप असते, पण
आयत्यावेळी सूचत नाही किंवा आठवत नाही. या आठव नाठव यावरून समर्थांनी तिन वर्ग
केले. तूच पहा विलास...’ स्मरण म्हणिजे देव | विस्मरण म्हणिजे दानव | स्मरणविस्मरणें मानव | वर्तती आतां ||१५-७-३५||श्रीराम||
विलास म्हणाला, ‘म्हणजे माझ्यासारखे. ठिक आहे देव
नाहीतर नाही पण दानव पण नाही हे बरे. आता सतत स्मरण रहावे म्हणून प्रयत्न करायला हवां.
अगदी पूर्ण ज्ञानी असं जगात कोणी आहे कां? म्हणजे असेल कां असे मला म्हणायचे आहे?’
‘छान शंका आहे तुझी!’ आजी म्हणाल्या. ज्ञानी येक
अंतरात्मा | सर्वामधें सर्वात्मा | त्याचा कळावया महिमा | बुद्धि कैंची ||१५-८-२८||श्रीराम||
‘परमेश्वर ही सर्वांत अधिक ज्ञानी
शक्ती. सर्वांचे ठिकाणी आत्मरूपाने तोच वावरतो. परमेश्वराचा महिमा, कर्तृत्व
समजण्याकरीता बुध्दी सूक्ष्म असावी लागते. ती फारच थोड्यांना लाभते.’
मधुकर
म्हणाला, ‘तशी
बुध्दी लवकर तयार व्हावी म्हणून काय करावे?’
आजी
म्हणाल्या, ‘समर्थच
सांगतात बघ याचे उत्तर. वाच तू....’ उगेंचि कासया तंडावें | मोडा अहंतेचें पुंडावें | विवेकें देवास धुंडावें | हें उत्तमोत्तम ||१५-८-४०||श्रीराम||
‘कळलं उत्तर?’ आजी म्हणाल्या, ‘उगीच शब्दच्छल करीत बसण्यांत बुध्दीची
शक्ती वाया घालवू नये. अहंकाराचा बंडखोर पणा मोडून काढावा. म्हणजेच अहंकाराच्या
वर्चस्वाने नाशच होतो, विवेक जागा ठेवून खऱ्या देवाचा शोध घ्यावा. हे उत्तम.
याचसाठी हा मानव देह आहे. बाळांनो, पण काय होते माहीत आहे कां? जो सर्व श्रेष्ठ म्हणजे वडिल आहे
त्याला ओळखता येत नाही. म्हणून समर्थांनी एक युक्ती केली. एक फळ शिष्यासमोर ठेवले.
फळाहून वडिल म्हणज श्रेष्ठ कोण? फुल. फुलाहून वरिष्ठ पाने, पानाहून वरिष्ठ फांद्या. फांद्यांचा खरा
विस्तार कोणामुळे? झाडाच्या मुळ्यांमुळे. म्हणून मुळ्या श्रेष्ठ. मुळ्या वाढल्या
कोणामुळे?
पाण्यामुळे. म्हणुन पाणी श्रेष्ठ. जमीनीमुळेही मुळ्या वाढल्या. पण जमीन पाण्यातूनच
तयार झाली. म्हणून पाणी श्रेष्ठ.’
गणपती
म्हणाला, ‘पुढचं
मी सांगतो, आप तेजातून निर्माण झाले. म्हणून तेज श्रेष्ठ. तेज वायूतून आले, म्हणून
वायू श्रेष्ठ. वायू आकाशामुळे हालचाल करू लागला......’
आजी
म्हणाल्या, ‘कोणाच्या
सत्तेने?’
विलास
म्हणाला, ‘अंतरात्म्याच्या
सत्तेने. म्हणून अंतरात्मा श्रेष्ठ. म्हणजे...’
सुधाचे
लक्ष दासबोधात होते. ती म्हणाली, ‘आजी! ही बघा ओवी...’ सकळांवडिल अंतरात्मा | त्यासि नेणे तो दुरात्मा | दुरात्मा म्हणिजे दुरी आत्मा | अंतरला तया ||१५-९-१८||श्रीराम||
‘बाळांनो!’ आजी म्हणाल्या, ‘आपल्याला आज शब्दाने कळलयं.वर्षभरात
साधन करता करता अनुभवाने कळले तर आपण दुरात्मा होऊ कां?’
‘नाही! मुळीच नाही! दुरात्मा होणे नाही!’ विलासने अर्धवट उठूनच उत्तर दिले. ‘पण त्यासाठी रोज काय करायचे माहीत आहे?’ आजींनी विचारले. त्यांनी मधुला ओवी
वाचायला सांगितली..... नारायेण असे विश्वीं | त्याची पूजा करीत जावी | याकारणें तोषवावी |
कोणीतरी काया ||१५-९-२५||श्रीराम||
‘आजी!’ मधु म्हणाला, ‘नारायण म्हणजे अंतरात्मा कां? तो सगळ्या विश्वाला व्यापून आहे. तसा आपल्या
शरिरांत पण आहे. मग पूजा म्हणजे गंध, फूल वाहून नव्हे नां? ज्या ज्या देहाला आपण अन्न पाणी वा गरज असेल ती
वस्तू देतो तो आनंद आत्म्यापर्यंत पोचतो. म्हणून आपला देह वगळून दुसऱ्या कोणत्याही
देहाची सेवा केली तरी ती आत्म्यापर्यंत जाऊन पोहोचते. हीच खरी नारायणाची पूजा. म्हणजे
जो भेटेल त्याच्यावर देव म्हणून प्रेम करायचे. असेच नां?’
आजी म्हणाल्या, ‘अगदी बरोबर! जे जे भेट भूत....’
गणपती म्हणाला, ‘ते ते मानिजे भगवंत.’
आजी म्हणाल्या, ‘ठीक! यालाच खरी उपासना
म्हणतात. नुसते देवघरांत देवाच्या समोर आसन टाकून बसणे म्हणजे उपासना नव्हे. कोणाचेही
अंत:करण न दुखवणे म्हणजे उपासना. आपल्या बाळाचा घाम
आई आपल्या पदराने पुसते. पण दुसऱ्या बाळाचा घाम पुसायला त्याच्याच सदऱ्याचा वापर
करते. इतकाही दुरावा नको. ती खरी उपासना. एकपणाने सर्वत्र पाहणे ही उपासना.
अंतरात्म्याचा जवळ जो कोणी रोज पहायला जाईल तो अंतरात्म्याशी लवकर तदाकार होऊन
जाईल. जया आता दहावी समास काढ आणि वाच ही ओवी....’ विवरतां विवरतां सेवटीं | निवृत्तिपदीं अखंड भेटी | जालियानें तुटी | होणार नाहीं ||१५-१०-८||श्रीराम||
आजी म्हणाल्या, ‘त्या थोरल्या देवाची जो जो सेवा करावी, चिंतन
करावे तो तो साधक निवृत्ती पदाला पोहोचतो. लोभातून, मोहातून, मायापाशातून दूर
होतो. तदाकार होतो. अखंड तीच अवस्था अनुभवता येते. म्हणजेच भगवंताची व आपली कधीच
ताटातूट होत नाही.’
विलास म्हणाला, ‘आजी! सगळे हसतील. पण खरं
तेच सांगतो. इथून घरी गेलो तरी आजी बोलतच आहेत. आपण सहाही जण असेच अभ्यास करीत
आहोत असे कधी झोपतानापण दिसते. पाहता पाहता कधी झोप लागली ते कळतच नाही. परवा तर
मी सांगतो, मी सांगतो म्हणतच उठलो. आई जवळच होती. काय सांगतोस? तुला स्वप्न पडतंय काय? कोणाला सांगतोस? मी खरा
जागा झालो. आजी मी झोपेतून जागा झालो. पण खरा जागा होईन का हो?’
‘विलास! आजींच्या
पाणावलेल्या डोळ्यांकडे पहातच राहिला. त्याचे ही डोळे पाणावले होते. बाकीचे सारे
स्तब्ध होते.’
आजी म्हणाल्या, जगदीश वोळल्यावरी | तेथें कोण अनुमान करी | आतां
असो हें विचारी | विचार
जाणती ||१५-१०-१७||श्रीराम||
‘एकदा कां भगवंताने प्रसन्न होऊन कृपा
केली, की नुसते तर्क करीत कोण बसेल? कल्पनेच्या भराऱ्या कोण कशाला मारील? विचारवंताला हा विचार सहज समजतो.’
मधुकर
म्हणाला, ‘आजी! हा अनुभव सगळ्यांना लवकर यावा म्हणून
काय करावे?
दोन क्षणांपूर्वी विलास नेहमीचा वाटला नाही. तुम्ही पण त्याच्याकडे पहात होतात ते
पहाणे पण मला नेहमीचे वाटले नाही. काहीतरी वेगळे वाटले. दोघांच्याही डोळ्यांत पाणी
का आले?
वेगळे म्हणजे काय वाटले ते मलाही सांगता येणार नाही.’
आजी
गोडसं हसल्या, ‘मधू....
शाश्वतास शोधीत गेला | तेणें
ज्ञानी साच जाला | विकार सांडून मिळाला | निर्विकारीं ||१५-१०-२५||श्रीराम||’
‘शाश्वत कोण ते कळलं नां?’ सगळ्यांनी मूकपणाने माना डोलावल्या.
‘असा शाश्वताचा शोध घेता घेता विकार
रहित अवस्था होते. सारे चंचल विश्व मागे रहाते. निर्विकारी ब्रह्माशी तदाकार होता
येते. रोज अभ्यास हवा. नुसता अभ्यास असून उपयोग नाही. आपण स्वत: पूर्णत्वास जाऊन पोहोचावे व उर्वरीत
आयुष्यांत काय करावे? सुधा तू वाच....’ उपासनेचें उत्तीर्ण व्हावें | भक्तजनें वाढवावें| अंतरीं विवेकें उमजावें | सकळ कांहीं ||१५-१०-३३||श्रीराम||
आजी
म्हणाल्या, ‘जी
उपासना करून आपण ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतले. त्या उपासनेचे ऋण फेडणे आवश्यक
आहे. पैशाचे ऋण पैशाने फेडतात. ज्ञानाचे ऋण ज्ञानाने फेडायचे. आपल्या परिसरांत
भक्ती मार्ग वाढीस लागेल असे काहीतरी करावे. सदाचाराने वागून संघटना शक्ती
वाढवावी. आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करायलाच हवा. जो स्वस्थ बसला, तो फसला.
जनकल्याण हे एकच ध्येय असावे. सर्वांचे सेवेचे मार्ग भिन्न भिन्न असतील. पण ध्येय ठरवून
वागावे. सध्या आपण थोडेसे तसे करतोच आहोत नाही कां?’
सर्वांनी
हो म्हटले.
मधुकर
म्हणाला, ‘आजी! दर सहा सहा महिन्यांनी नवीन नवीन
कांही भर घालून आम्ही आणखी कांही चांगल्या सुधारणा करू. शिक्षण घेता घेता जेवढे
जमेल तेवढे तुमच्या देखरेखीखाली करूच.’
“शाब्बास!” आजी म्हणाल्या, “मारूतीराय आहेतच आपल्या पाठीशी.”
।। महारुद्र हनुमान की जय ।।
।। जय जय रघूवीर समर्थ ।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा