।।श्रीराम।।
पडवीवरचा दासबोध
लेखिका- आशालता उर्फ आक्का वेलणकर
दिवस ३३ वा
सगळी अगदी वेळेवर जमली.
त्रिकूट एका बाजूने. दुक्कल दुसऱ्या बाजूने. आजीपण आतून दासबोध घेऊन आल्या. सर्व
आपापल्या जागी बसले.
विलास उल्हसितपणे म्हणाला,
‘आजी! मला गंमत वाटते. ती
हीच की, पहिली पासून आठवी पर्यंत मी शाळेत जातोय, पण घंटेला माझी हजेरी कधीच लागली
नाही. कधी रस्त्यावर घंटा ऐकायची कधी प्रार्थना संपून मुले वर्गात गेली की मी हजर.
पण येथे ना घंटा ना तंटा. सकळे कसे वेळेवर येतात. कधीच कोणाला उशीर होत नाही. हे
कशाचे प्रतिक? हे कसे काय जमते?’
गणपती म्हणाला, ‘मला तर अडीच पासूनच वेध लागतो. चला निघू असं
सारखं मन म्हणतं.’
सुधा म्हणाली, ‘हा सगळा सत्संगाचा परिणाम. आजी आम्ही दोघींनी
विचार केला की, आता लवकरच शाळा सुरू होईल. तरी आपण आजींनी विचारू या, संध्याकाळी
जमू या कां?’
विलास म्हणाला, ‘दोघीच काय म्हणून? आम्ही
कां नको? बघा आजी एवढा चांगला दासबोधाचा अभ्यास करते आणि
भेद मानते. आम्ही येऊ, तुम्ही नको.’
सुधा म्हणाली, ‘आम्ही दोघीच येऊ, असे मी म्हटले नाही. आम्ही
संध्याकाळी जमू कां? आम्ही म्हणजे त्यांत आपण पांचजण आलो नाही कां? भेदाने तूच बघतोस, मी नाही.’
मधुकर म्हणाला, ‘या सगळ्या मी तू चा, भ्रमाचा, मायेचा,
विश्वपसाऱ्याचा सर्व श्रेष्ठ स्वामी तोच. तोच सारे निर्माण करतो व तोच सारे
मिटवतो.’
जया म्हणाली, ‘तो स्वामी कोण?
समर्थांनी सांगितले असेलच नां?’
‘तर! दासबोध अभ्यासायचा
या साठीच. समर्थ काहीच सांगायचं शिल्लक ठेवीत नाहीत.’ आजी म्हणाल्या. ‘ही बघ
सापडली ओवी. सुधा तू वाच...’ अशाश्वताचा मस्तकमणीं | जयाची येवढी करणी | दिसेना तरी काय जालें धनी | तयासीच म्हणावें ||१७-१-१७||
आजी म्हणाल्या, ‘कळलं का
जया? तो दिसत नाही, पण सगळे काही करतो तो अंतरात्मा.
हाच सगळ्या दृष्य आणि अदृष्य विश्वाचा धनी, मालक, कर्ता, शास्ता सर्वकाही तोच. या
सर्व अशाश्वत गोष्टीचा मुगुटमणी म्हणजे राजा. नुसता पुढारी नव्हे. शास्ता तो दिसला
नाही, तरी काय झालं? तोच सर्व श्रेष्ट. आणि मधू तू म्हणालास नां
भेदाबद्दल? तो अंतरात्म्यामुळे नव्हे. हा खेळ मायेचा. मग
अंतरात्म्याकडे वळले की, सगळेच आत्मरूप. म्हणजे मी तू गेलेच. अभेद, व्दैत नाहीच.
वेगळेपण नाही आणि त्याच मनाने जर अंतरात्म्याकडे पाठ केली की उद्भवला भेद. लगेच मी
तू व्दैत आलेच. म्हणजे ऐक्य मोडलेच. विभक्त झालोच. वेगळेपणे आले म्हणजे हा परिणाम
देहात्म बुध्दीचा.’
जया म्हणाली, ‘जर असे आहे, तर त्या मनाने कायमच अंतरात्म्याकडे
तोंड वळवावे. व त्याच्याच आज्ञेत कायम रहावे. यासाठी काय करावे?’
‘छान! छान!!’ आजी म्हणाल्या, ‘ही बघ
ओवी. मी सांगणार होते. तू विचारलेस ते पण छान झाले. तुमची जिज्ञासू वृत्ती वाढीस
लागत आहे हा आनंद. तू ही ओवी वाच....’ सत्संग आणी सत्शास्त्र श्रवण | अखंड होतसे विवर्ण | नाना सत्संग आणी उत्तम गुण | परोपकाराचे ||१७-१-२८||श्रीराम ||
‘आजी! मी सांगू अर्थ?’ जया म्हणाली. ‘साधकाने
संतांची संगती धरावी. कारण संत सान्निध्यात अध्यात्म ग्रंथांचेच वाचन व निरूपण
चालते. त्याचे श्रवण घडते. परमार्थात श्रवण हेच प्रमुख साधन आहे. असे सतत सत् कडे
नेणाऱ्या ग्रंथांचे विवरण, निरूपण कानी पडले की आपल्यातील दुर्गुण नाहीसे होतात व
सद्गुण जमा होतात. त्या सद्गुणातला मोठा सद्गुण परोपकार. आपण परोपकार वृत्तीने
वागता वागता पर म्हणजे दुसरा ही भावनाच नष्ट होते. आणि त्या वागण्याला कर्तव्याचे
रूप येते. डाव्या हाताने उजव्या हाताला खाजवले किंवा चोळले दाबले तर परोपकाराची
भावना वा शाबासकीची भावना असत नाही, अगदी तस्सेच होते.’
विलासने उस्फूर्तपणे
टाळ्या वाजवल्या आणि म्हणाला, ‘आजी! जयाने फार छान अर्थ सांगितला नाही कां? नुसता अर्थ न सांगता थोडा विस्तारही केला. पण
माझी शंका अशी आहे की, असे जरी असले तरी त्याला मोडता कोण घालतो?’
‘विलास! तूपण आता चांगला
विचार करू लागला आहेस!’ आजी म्हणाल्या, ‘रास्त
आहे तुझी शंका. हा खेळ खेळणारी आतच आहे. आपल्या जवळच आहे. बघ दासबोधातली ओवी....’ स्थूळाचें मूळ ते वासना | ते वासना आधीं दिसेना | स्थूळावेगळें अनुमानेना | सकळ
कांहीं ||१७-२-१७||श्रीराम||
आजी म्हणाल्या, ‘या
सगळ्या विश्व पसाऱ्या मागे परब्रह्माची इच्छा हेच कारण आहे. तसेच आपल्या प्रत्येक
कृतीमागे इच्छा, कल्पना, वासना असतेच मगच कार्य होते. ही वासना किंवा इच्छा दिसत
तर नाहीच. पण कार्य मात्र तिच्यामुळेच होते. सत्संगाला जा, श्रवणाला बस असे वासनाच
सांगते. आणि काही जाऊ नकोस, कशाला हवे श्रवण? त्यापेक्षा मस्त
झोप, असेही वासनाच सांगते. अशा सूक्ष्म वासनांचे रूप व कार्य लक्षांत येण्यासाठी
मनाने सूक्ष्म व्हायला पाहिजे. त्यासाठी हवा विवेक. मग लक्षांत येईल सगळ्याच वासना वाईट नसतात. विवेकाने वाईट वासना
उडवून लावायच्या. त्यांचे मूळ रूजू द्यायचे नाही. मग त्या फोफावणार नाहीत.
भक्तीच्या प्रेमाच्या वासना वाढीस लावायच्या, मग जगांत वाहवाच होईल. आदर्श कोणाचा
ठेवायचा? मातेचा. किती प्रेमाने बालकाचे रक्षण करते. किती
कष्ट सोसते.’
विलास म्हणाला, ‘त्या मातेची महती समर्थांनी गाइली नाही कां?’
आजी म्हणाल्या, ‘आपले सर्वस्व ती बाळाकरता अर्पण करते. ही प्रेमाची वासना, तिचे मोल करता येईल कां?’
सुधा म्हणाली, ‘असे विशुध्द प्रेम करता आले पाहिजे. त्यासाठी सतत
श्रवण तेही दासबोधासारख्या अध्यात्मग्रंथांचे, प्रचितीच्या अनुभवाच्या बोलांचे
श्रवण घडावे. आजी ही बघा ओवी याच पानावर आहे....’ श्रवणामध्यें सार श्रवण | तें हें अध्यात्मनिरूपण | सुचित करून अंतःकर्ण | ग्रन्थामधें विवरावें ||१७-३-२||श्रीराम||
आजी म्हणाल्या, ‘श्रवण अनेक प्रकारचे असते. टि.व्ही. तला संवाद
ऐकणे हेही श्रवणच व कीर्तन प्रवचन ऐकणे हेही श्रवणच. विवेकाने काय ऐकणे हिताचे हे
ठरवावे. संतांच्या मते ज्ञान वाढवायचे असेल तर आत्मस्वरूपाबद्दल ज्यांत उहापोह
केला आहे ते ऐकावे. त्यालाच अध्यात्म निरूपण म्हणतात. पुन्हा कसे ऐकावे हेही
सांगितले आहे. सुचित म्हणजे एकाग्र, अंत:करण एकाग्र करून
ऐकावे. ऐकलेला शब्द न शब्द ह्रदयांत ठसावा. एकही अक्षर गळून जाऊ नये. असे ऐकावे.
पुन्हा अभ्यास व्हावा या साठी तो ग्रंथ स्वत: एकदा वाचून ऐकलेल्या भागाची उजळणी
करावी. हे सारे कशासाठी? ज्ञानाचा भाग पक्का व्हावा यासाठी. नाहीतर कालचं काल आजचं आज. असं
व्हायचं. पुढच पाठ मागच सपाट. पुन्हा पाटी कोरीच. असे होऊ नये. असं झालं तर आयुष्य
वाया जाईल. अध्यात्म शास्त्रातलेच पण काय ऐकाव? मधू ही पुढची ओवी वाच...’ अष्टांग योग पिंडज्ञान | त्याहून थोर तत्वज्ञान | त्याहून थोर आत्मज्ञान | तें पाहिलें पाहिजे ||१७-३-२४||श्रीराम||
‘बाळांनो! तुम्हाला ऐकायला नवीनच. पण सोप आहे.
अहिंसा म्हणजे काय, कळलं? सत्य म्हणजे काय? कळल कां? सर्वांनी माना डोलावल्या. अस्तेय म्हणजे चोरी न करणे, ब्रह्मचर्य
म्हणजे कामावर, विकारावर ताबा मिळविणे. विषय ताब्यांत ठेवणे, अपरिग्रह म्हणजे कष्ट
केल्याशिवाय कोणी द्रव्यादिक दिल्यास ते मोफत न घेणे. हे किती झाले बरं शब्द? १) अहिंसा, २) सत्य, ३) अस्तेय, ४)
ब्रह्मचर्य, ५) अपरिग्रह या पाचाला योगमार्गात यम म्हणतात.’
‘आता नियम सांगते हं. शौच म्हणजे
शुध्दता सर्वच ठेवतात. मनाची सुध्दा शुध्दता राखायला हवी. संतोष म्हणजे समाधान. तप
म्हणजे सतत करायचा प्रयत्न. स्वाध्याय म्हणजे आत्मज्ञान प्राप्तीचा अभ्यास. आणि
ईश्वर प्रणीधान म्हणजे ईश्वराला अनन्य भावाने शरण जाणे. वंदन करणे, त्याची भक्ती
करणे. किती झाली नांवे. पांच. १) शौच, २) संतोष, ३) तप, ४) स्वाध्याय, ५) ईश्वर
प्रणिधान सर्व नांवे सांगितली.’
आजी
म्हणाल्या, ‘अष्टांग
योग साधनेतले दोन प्रकार सांगितले. १) यम, २) नियम, आता, ३) आसन, ४) प्राणायाम, ५)
प्रत्याहार, ६) धारणा, ७) ध्यान, ८) समाधी. अशा आंठ प्रकारांना मिळून काय म्हणायचे?’
सुधा
म्हणाली, ‘अष्टांग
योग साधन. जरा अवघड आहे. पण सावकाशीने पुन्हा सांगितलेत की लक्षांत ठेवू आम्ही.’
विलास
म्हणाला, ‘अहाहा! आंठच तर आहेत नांवे! मी सांगतो. यम, नियम, अहिंसा, सत्य,
तप....’
गणपती
म्हणाला, ‘पुरे
पुरे आठ नावांत अहिंसा नाही. विलासराव आपण उद्यापर्यंत पाठ करू हं! सगळेच हसले.’
‘बाळांनो! आजी म्हणाल्या, चार पांच वेळा श्रवण
घडले की, राहिल लक्षांत. तर काय! समर्थ म्हणतात, अष्टांग योग व त्या बद्दलची
माहिती ऐकावी. पिंड, म्हणजे शरीर, त्या शरीराची रचना, महती म्हणजेच पिंडज्ञान
ऐकावे.’
‘मग हळू हळू ज्ञानाची पातळी वाढते. पिंड
ज्ञानापेक्षा महत्वाचे तत्व ज्ञान. त्याहून आत्मज्ञा म्हणजेच ब्रह्मज्ञान. ते
ऐकावे.’
गणपती
म्ह्णा’ला,
म्हणजेच सर्व ज्ञानांत आत्मज्ञान हा राजाच. तो सर्वश्रेष्ठच असणारच.’
विलास
म्हणाला, ‘हे
कसे आहे सांगू?
शिपायापेक्षा हजारी. हजारी म्हणजेच हजार योध्यांचा प्रमुख हजारी श्रेष्ठ.
हजारीपेक्षा दहाहजारी, दहाहजारी पेक्षा सेनापती श्रेष्ठ. सेनापतीपेक्षा प्रधान
श्रेष्ठ, प्रधानापेक्षा राजा श्रेष्ठ. बरोबर ना आजी?’
आजी
म्हणाल्या, ‘बरोबर! अष्टांग योग सुध्दा बरोबर सांगशिल हं.
आजच प्रथम ऐकत आहेस जरा खिचडी झाली इतकेच. आत्ता आपण घेत आहोत ते शब्द ज्ञान. शब्द
पक्के लक्षांत आले की अर्थासह शब्द. तेही ध्यानांत आले की ग्रंथात शास्त्रात सांगितलेले
सिध्दांत ऐकून कळतील. तरी नुसते कळून उपयोगी नाही. अनुभव ज्ञान जमा झाले की, अधिकारी
झाला. अशा एखाद्या अनुभव ज्ञानी व्यक्तीचे अनुभव ऐकता एकता ओढ वाढते. ही ओढ
विषयज्ञानाची नाही हं! आत्मज्ञाननाची. तेथेही थांबून उपयोग नाही. याला म्हणतात
गुरू प्रचिती. मग तळमळ लागते. व पडताळा यावा असे मनापासून वाटते. तसे प्रयत्न सुरू
होतात. स्वत:ला
प्रचिती म्हणजे अनुभव आला की म्हणतात आत्मप्रचिती.’
‘शास्त्र प्रचिती, गुरूप्रचिती, व
आत्मप्रचिती असेच नां?’ विलास म्हणाला.
‘शाब्बास हं बाळा!’ गणपतीने पाठीवर शाबासकी दिली.
‘आजी! बघा नं! मला हा बाळा म्हणतो.’ विलासची तक्रार.
‘अरे! तो माझी नक्कल करतोय! रागवायचं कशाला?’ आजी म्हणाल्या. ‘आता तीन नांवे बरोबर सांगितलीस. समर्थ
म्हणतात,’ प्रत्ययज्ञाता
सावधान | त्याचें
ऐकावें निरूपण | आत्मसाक्षात्काराची खूण | तत्काळ बाणें ||१७-४-३०||श्रीराम||
‘आता आलं लक्षांत! स्वत:ला प्रचिती म्हणजे अनुभव कशाचा? आत्मज्ञानाचा. आत्मज्ञानाचा अनुभव
आल्यामुळे तो सावधान पणे विषय समजावून देतो. त्याचे निरूपण ऐकावे. म्हणजे
आत्मसाक्षात्कार लवकर होतो.’
‘तो पाल्हाळ न लावता मुद्याचे तेच पण
सोपे करून बोलतो. आपला विश्वास बसतो. आनंदही होतो. असे बोलणे समर्थांचे ते बघ
पांचव्या समासात किती सुंदर विचार सांगताहेत. देव कोठे शोधाल? विलास तूच वाच....’ सहज देव असतचि असे| सायासें देव फुटे नासे | नासिवंत देवास विश्वासे | ऐसा
कवणु ||१७-५-१४|| श्रीराम||
आजी म्हणाल्या, ‘नाशिवंत देव कोणते ते कळले आता? सगळ्यांच्या नजरा जयाकडे वळल्या.’
जया
पटकन म्हणाली, ‘मातीच्या
मूर्ती फुटणारच त्यावर प्रेम करीत बसू नये. चांदी सोन्याचे देव चोरीला जातील.’
आजी
म्हणाल्या, ‘मग
खरा देव अंतरात मंदिरात वैकुंठविहारी म्हणजे कोण बरं?’
गणपती
म्हणाला, ‘आत्माराम!’
‘शाब्बास हं बाळा!’ विलासने तिनदा शाबासकी दिली.
आजी
म्हणाल्या, ‘झाली
फिट्टंफाट.’
सगळेच हसले. समर्थांनी युक्ती सांगितली, अंतरीं वसतां नारायेणें | लक्ष्मीस काये उणें | ज्याची लक्ष्मी तो आपणें | बळकट धरावा ||१७-५-२४||श्रीराम||
‘फारसा खटाटोप न करता, अंतरंगातल्या नारायणाची
भक्ती करावी. निरंतर नाम घ्यावे. नुसते शांत बसून श्वासाकडे लक्ष द्यावे.
श्वासातून सोहंचा जप चाललेला आपला आपल्याला ऐकू येईल. असे अखंड नाम घेतल्यावर
लक्ष्मीला काय तोटा? ज्याची लक्ष्मी तो नारायण घट्ट धरून ठेवल्यावर
पाठोपाठ लक्ष्मी येणारच.’
‘शिवाच्या पाठोपाठ पार्वती म्हणजे शक्ती येणारच,’ गणपती म्हणाला.
‘रामाच्या पाठोपाठ सीता येणारच.’ विलास म्हणाला.
‘कृष्णाच्या पाठोपाठ राधा येणारच.’ जया म्हणाली.
‘विठोबाच्या पाठोपाठ रूख्मिणी येणारच.’ सुधा म्हणाली.
“आजींच्या पाठोपाठ आम्ही असणारच.” मधुकर म्हणाला, सगळेच मोकळेपणी हसले.
।। जय जय रघूवीर समर्थ ।।
8-Bitdochuan Casino | Dr. Maryland
उत्तर द्याहटवा8-BitDochuan 순천 출장안마 Casino offers a 남원 출장샵 unique 여주 출장샵 gaming experience, an online poker room, 서귀포 출장마사지 Casino. Hours. Monday, Friday, Saturday and 광주광역 출장마사지 Sunday.