।।श्रीराम।।
पडवीवरचा दासबोध
लेखिका- आशालता उर्फ आक्का वेलणकर
दिवस ३४ वा
हातपाय धुवून वंदन करून
मुले उभीच राहिली. नित्याप्रमाणे आजींना वंदन करायचे म्हणून थांबली. आजी आल्या, पण
जरा दूर बसल्या. ‘बाळांनो! आज जरा लांबूनच
नमस्कार करा.’ आजी म्हणाल्या.
‘आज बैठकीवर कां बसत नाही?’ विलासने शंका विचारली.
‘आपल्या शेजारच्या मावशींना देवाज्ञा झाली. तिकडे
जाऊन आले. म्हणून बैठकीवर बसत नाही. स्नान करून येईपर्यंत उशीर होईल. वेळ जाईल. मी
स्नान मग करीन.’ आजींनी उलगडा केला. ‘सुधा! आतून चटई व दासबोध
घेऊन येशील?’
सुधा आत गेली.
मधुने विचारले, ‘आजी! आम्ही कितीतरी लहान
आहोत. पण तुम्ही नेहमी कर असे न म्हणता, करशील? असे विनंतीसारखे का
म्हणतां? आम्ही कर म्हटले तर ऐकणार नाहीं कां?’
‘तसे नव्हे!’ आजी म्हणाल्या, ‘आपल्या वाणीत आर्जव असावे. मृदू भाषणाने माणूस
सुखावतो. त्यात प्रेमाची भावना वाढते.’
सुधा दासबोध घेऊन आली. चौरंगावर दासबोध ठेवला.
आजींना चटई दिली. सुधाने विचारले, ‘आजी! मावशी गेल्या. तुम्ही त्यांचे घरी जाऊन आलात मग
स्नान कशाला करायचे?’
आजी म्हणाल्या, ‘आपल्या देहांत चैतन्य आहे, तोपर्यंत देह पवित्र
असतो. आत्मा देहाला सोडून गेला की दूषितता येते. तो मलीनपणा दु:खाची छटा घालवण्यासाठी स्नान करायची वहीवाट पडली.’
विलास म्हणाला, ‘मनुष्य मरतो म्हणजे श्वास बंद पडतो. हे
आत्म्याच्या सत्तेनेच, पण तो देहाला सोडून का जातो?’
आजी म्हणाल्या, ‘काल जे आपण म्हणालो की निरंतर नाम घ्यावे. त्याचे कारण हेच की आत्मा या देहाला सोडून केव्हा जाईल याचा नेम नाही. शेवटचा क्षण केव्हा येतो हे कोणाला कळत नाही. त्यावेळी भगवंताचे नाम आठवेलच असे सांगता येत नाही.’
गणपती
म्हणाला, ‘ज्या
देहाकरवी आत्मा सुख दु:ख भोगतो. तो देह तर पडला, मग आत्मा दुसऱ्या देहात जाऊन काय
करतो?
पुन्हा सुख दु:ख भोगत बसतो. मग भजनाचा भक्तीचा काय उपयोग?’
‘बरे विचारलेस!’ आजी म्हणाल्या. ‘भक्ती करून वासना शुध्द करता येतात.
वासनेच्या पायात दुसरा जन्म घ्यावा लागतो, तो वरच्या वरच्या पातळीतला मिळाला तर
आत्मा परब्रह्मात विलीन होणे सोपे जाते, व अशुध्द वासना, पापात्मक कर्मे यांनी
पुन्हा पुन्हा खालच्या पातळीत म्हणजे पशु पक्षी होत बसावे लागते. पुन्हा मानव देह
मिळायला वेळ लागतो.’
मधुकर
म्हणाला, ‘पाप
पुण्याचे गणित सोडवत बसावे लागेल.’
‘बरोबर!’ आजी म्हणाल्या, ‘म्हणून समर्थांचा आग्रह भगवंताने
दिलेल्या बुध्दीचा वापर करून परब्रह्माशी ऐक्य साधण्याचे ध्येय गाठावे. पण विषय
सुखाच्या नादात शुध्द ज्ञानाचा लोप होतो. देहातील जीवात्मा म्हणजेच जीव सारखा
जीवंत रहाण्याकरितांच धडपड करतो. गणपतीला दे आता दासबोध बघ १७वी ओवी....’ अखंड रडती चर्फडिती | विवळविवळों प्राण देती | मूर्ख प्राणी त्यास म्हणती | परब्रह्म ||१७-६-१७||श्रीराम||
आजी
म्हणाल्या, ‘जीवात्मा
व परब्रह्म यातला फरक कळला नं? अज्ञानामुळे विषय मिळाला नाही, मनासारखे झाले नाही की जीव दु:ख करीत
बसतो. कधी रडतो. कधी तडफडतो. शेवटी वैतागतो. कधी अविचाराने आत्मघात करतो. आपणच
आपला प्राण घेतो. नाश पावतो. आणि अज्ञानामुळे अशा दु:खमय जीवाला म्हणजेच जीवात्म्याला
लोक परब्रह्म म्हणतात. त्यांना मूर्खच म्हणावे नाहीतर काय? ज्ञान मिळवायचे ते याच करीता. जीव व
परब्रह्म यातला फरक लक्षांत यावा. जीवाला उपाधी आहे. परब्रह्माला उपाधी नाही. मधु
पुढचीच ओवी वाच.’ परब्रह्म जाणार नाहीं | कोणास दुःख देणार नाहीं | स्तुती निंदा
दोनी नाहीं |
परब्रह्मीं ||१७-६-१८||श्रीराम||
‘परब्रह्म ही शक्ती शाश्वत असणारी. ती
कधी कोठे जात नाही. येत नाही. देहाची उपाधी परब्रह्माला नाही. परब्रह्म आनंदमय
असल्याने कोणालाही दु:ख देत नाही. परब्रह्माची कोणी स्तुती केली वा निंदा केली तरी
त्याची बाधा परब्रह्मास नाही. परब्रह्म ही चीज आकारी नाही. तर त्याला विकार कोठून
असणार?
अतिशय सूक्ष्म असूनही अतिशय अवाढव्य ब्रह्मांडाला व्यापून असणारे परब्रह्म
अनुभवाने जाणायचे असते.’
आजी
म्हणाल्या, ‘बाळांनो! हे जाणणे सुध्दा त्यानेच दिलेल्या
जाणीव शक्तीने जाणवायचे असते. त्याच शक्तीने अनुभवायचे असते. पण
केव्हा?
देहाचा अंत व्हायच्या आतच. अंतकाळी कशी स्थिती होते? समर्थ वर्णन करतातच. विलास तू वाच
शेवटची ओवी...’ अंतकाळ
आहे कठीण | शरीर सोडिना प्राण | बराड्यासारिखें लक्षण | अंतकाळीं ||१७-६-३२||श्रीराम||
आजी म्हणाल्या, ‘या जीवाचा देहावर इतका लोभ असतो की,
शरीर सोडताना वासनेत गुंतल्यामुळे सुटता सुटत नाही. त्यामुळे सामान्यांत सामान्य
मनुष्य एखाद्या भणंग भिकाऱ्यासारखा दीनवाणा होतो. अशी स्थिती येऊ नये म्हणून आपला
खरा मित्र शोधावा. कोण बरं आपला खरा मित्र?’
‘गणपती विलास खरे मित्र मित्र असे उत्तर
नक्कीच नसणार,’
जया म्हणाली.
‘पैसा हा आपला खरा मित्र कां?’ विलासने शंका विचारली.
आजींनी
नकारार्थी मान हलवली. ‘मग सद्गुरू आपले मित्र कां?’ तरी आजींनी मान हलवली.
‘मग आपला मित्र कोण? आजी आम्ही हरलो. तुम्हीच सांगा,’ गणपती म्हणाला.
आजी
म्हणाल्या, ‘समर्थच
सांगतील. मधू तू वाच आठवी ओवी.’ आपला आपण करी कुडावा | तो आपला मित्र जाणावा | आपला
नाश करी तो समजावा| वैरी ऐसा ||१७-७-८||श्रीराम||
‘आपणच आपला मित्र. आपणच आपला शत्रू! अय्या! हे कसे?’ जया आश्चर्याने म्हणाली.
मधुकर
म्हणाला, ‘आपण
म्हणजे कोण?
देह नव्हे नक्कीच आणि आपला म्हणजे कोणाचा? चागलंच कोड आहे हे! ते सुटण्याचा मार्गपण सांगतात समर्थ.’
विलास
म्हणाला, ‘काही
अंकातून शब्दकोडी असतात व शेवटच्या पानावर नाहीतर कोड्याच्या खालीच उलट्या
अक्षरांत उत्तरे आसतात. मधुदादा सारखी हुशार मुले कोडी सोडवून पहातात. माझ्यासारखे
बुध्दु थोडा प्रयत्न करून सरळ उत्तर बघतात. त्यात आनंद असत नाही. आजी कोड सुटेल
अशी जवळची ओवी सांगा.
आजींनी
ओवी सांगितली, जो आपला आपण घातकी | तो आत्महत्यारा पातकी | याकारणें विवेकी | धन्य साधु ||१७-७-१०||श्रीराम||
मधु
म्हणाला, ‘मी
प्रयत्न करू?
आपण म्हणजे जीव. देह सुखाला घट्ट धरून बसतो. पूर्ण आनंदाचा मार्ग चोखाळत नाही. शिव
स्वरूप होत नाही. आपला म्हणजे आत्म्याचा उन्नतीचा मार्ग शोधणे सोडून देतो म्हणजे
नाशच.’
सुधा
म्हणाली, ‘पण
आत्मा अविनाशी नं? मग त्याचा नाश कसा?’
जया
म्हणाली, वासनेची फळे भोगण्यासाठी पुन्हा नवा देह धारण करून उपाधीत अडकणे म्हणजे
नाशच नव्हे कां?
गणपती
म्हणाला, ‘मग
काय करायचं?’
आजींनी
अकरा बोटे दाखवली. सुधाने बरोबर ताडले व अकरावी ओवी काढली... पुण्यवंता
सत्संगती | पापिष्टां असत्संगती | गति आणी अवगती | संगतीयोगें ||१७-७-११||श्रीराम||
आजी
म्हणाल्या, ‘पुण्यवान
कोण हे आपल्याला कळले. तसेच अत्यंत पापी कोणाला म्हणायचे? ते पण कळले. सगळ्यांना सारखी गती कशी
मिळणार?
जशी संगत तशी गती. सत्संगती लाभण्यासाठी सुध्दा पूर्वपुण्याई लागते. अर्थातच
चांगल्या संगतीचे फळ चांगले. वाईटाचे वाईटच असणार. या बद्दल दोष देता येणार नाही.’
विलास
म्हणाला, ‘म्हणजे
करावे तसे भरावे.’
‘होय!’ आजी म्हणाल्या. ‘पण करतो जीव आणि भरावे म्हणजे भोगावे
लागते आत्म्याला.हीच ती गुंतागुंत. विलास तू वाच शेवटची ओवी...’ देह जैसें केलें तैसें होतें | येत्न केल्यां कार्य साधतें | तरी मग कष्टावें तें | काये निमित्य ||१७-७-३०||श्रीराम||
आजी
म्हणाल्या, ‘देहाला
जसे वळण लावावे तसं करण्यास तत्पर असतो. मग निष्कारण कष्ट करून भलत्याच मार्गास
कशाला जा? मधू आता उलगडलं कोडं? म्हटलं तर अवघड काहीच नाही. हा सगळा
खेळ वागेश्वरीचा. वागेश्वरी म्हणजे, वागदेवता. किती सूक्ष्मपणाने पण कसे सुंदर कार्य
चालले आहे पहा! त्या शारदेचे कौतुक करावे तेवढे थोडेच!’
‘भगवंताने मानवाला दिलेली मोठी देणगी
कोणती असेल तर वाणी. बोलण्याची शक्ती. जो जो विचार करावा तो तो मति गुंग होते.’
सुधा
पुढचाच समास काढ आणि वाच तू.... नाभीपासून
उन्मेषवृत्ती| तेचि परा जाणिजे श्रोतीं | ध्वनिरूप
पश्यंती | हृदईं
वसे ||१७-८-१||श्रीराम|| कंठापासून नाद
जाला | मध्यमा
वाचा बोलिजे त्याला | उच्चार होतां अक्षराला | वैखरी बोलिजे ||१७-८-२||श्रीराम||
आजी
म्हणाल्या, ‘नाभीपाशी
म्हणजे बेंबीपाशी जे स्फुरण होते त्यास परावाणी म्हणतात. ॐकार रूपाने ही शारदा
शक्ती नाभीपाशी वास करते. म्हणजे रहाते. ही सच्चिदानंदची ज्ञानमयी शक्ती. तीच
स्फुरणरूप वृत्ती ह्रदयांत शिरली की ध्वनीचे रूप तिला प्राप्त होते. किती तऱ्हेचे
आवाज! तेथे तिला कसे प्राप्त होतात हे तर मोठेच कोडे नाही कां? तिला पश्यंती वाणी म्हणतात. तो ध्वनी
कंठात येतो व नादाचे रूप प्राप्त होते. तिला मध्यमा वाणी म्हणतात. शब्दस्वरूपांत
तिचा उच्चार होतो तेव्हा वैखरी वाणी म्हणतात. दिवसाकाठी कीती कोट्यावधी शब्दांचा
वापर मनुष्य करतो. सर्व शब्दांचे स्थान एकच नाही. काही अक्षरे कंठातून वर टाळूच्या
स्पर्शाने, कांही दांत जीभ यांच्या सहाय्याने, तर काही नाकातून, काही जीभ उलटी
करून, तर काही ओठांच्या सहाय्याने मनुष्य उच्चार करतो. काय शारदेचे कौशल्य हे!
अक्षरांपासून शब्द. शब्दांना अर्थ तो तरी एक कां? एकेका शब्दाला दोन चार अर्थ. ही सारी
मनोगत स्पष्ट करण्याची किमया ज्याचे सत्तेने निर्माण झाली तो मोठा देव. त्याच्या
अनुभवासाठी त्यानेच दिलेली वाणी कशी वापरावी आलं ना ध्यानात? आणखीही करामत आहे, त्या वाणीची! धन्य
ती जगज्ज्योती!’ अंतःकर्ण
प्राणपंचक | ज्ञानेंद्रियें कर्मेंद्रिये पंचक | पांचवें
षयपंचक| ऐसीं हे पांच पंचकें ||१७-८-१५||श्रीराम||
‘हा खरा अध्यात्माचा अभ्यास. अंत:करण पंचकाची नांवे कोण सांगेल?’
‘मी सांगते!’ सुधा म्हणाली. तिने
नांवे सांगितली. अंत:करण,
मन, बुध्दी, चित्त, अहंकार.’
आजी
म्हणाल्या, ‘आतां
बाहेरील ज्ञान आत घेणारी इंद्रिये:’
गणपती
म्हणाला, ‘डोळा...’
‘थांब गणपती! डोळा हा अवयव आहे इंद्रिय म्हटल्यावर
नेत्रेंद्रिय म्हणावे.’ आजींनी दुरुस्ती सूचवली.
गणपती
म्हणाला, ‘चुकलो! १) नेत्रेंद्रिय, २) कर्णेंद्रिय, ३)
घ्राणेंद्रिय, ४) रसनेंद्रिय, ५) त्वगींद्रिय. ही पांच ज्ञानेंद्रिये झाली.’
विलास
म्हणाला, ‘मी
विषय पंचक सांगतो. १) शब्द, २) स्पर्श, ३) रूप, ४) रस, ५) गंध.’
‘ठीक! आता मधु कर्मेंद्रिये सांगेल.’ आजी म्हणाल्या.
मधु
म्हणाला, ‘हस्त,
पाद, वाणी, गुद आणि शिस्न ही पांच कर्मेंद्रिये.’
जया
म्हणाली, ‘मी
प्राण पंचक सांगते. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. म्हणजे सर्व मिळून पांचा
पांचा पंचवीस तत्वे झाली. या पंचवीसांना सूक्ष्म देह म्हणतात.’
आजी
म्हणाल्या, ‘ही
ओवी बघ. समर्थ काय म्हणतात?’ आत्मानात्माविवेक करितां | सारासारविचार पाहातां | पंचभूतांची माइक
वार्ता | प्रचित
आली ||१७-९-११||श्रीराम||
‘विलासने पंच महाभूतांची नांवे
सांगितली. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही मायेने निर्माण केली. ती एकांत एक
मिसळणार, म्हणजेच नाश पावणार. आणि ताय पाचांचा हा देह.’
आजी
म्हणाल्या, ‘बरोबर! हा देह नाश पावणार. आज मावशींचा देह
सुटला. उद्या आजींचा.’
‘नको! नको!!’ विलास ओरडला. ‘आम्हाला दासबोध शिकायचा आहे. शहाण
व्हायचंय.’
आजी
हसल्या. ‘अरे
मी नसले तरी दासबोध रहाणारच नं? मग काय करायचे समर्थ सांगतात बघ.’ जें आपणांस नव्हे ठावें | तें जाणतयास पुसावें | मनोवेगें तनें
फिरावें | हें
तों घडेना ||१७-१०-५||श्रीराम||
‘मनाच्या वेगाने शरीर कधीच फिरू शकणार
नाही. नेहमी जिज्ञासू वृत्ती धरावी. जे येत नाही ते जाणकारास विचारावे. ज्ञानचक्षूने
जगाकडे पहावे.’ खरें
खोटें येकचि जालें |
विवेकानें
काये केलें | असार सांडून
सार घेतलें |
साधुजनीं
||१७-१०-२२||श्रीराम||
‘बस्सं! एवढेच केले की कोडे सुटले. संत ज्या
मार्गाने गेले. त्याच मळलेल्या वाटेने जायचे सोपा मार्ग.’ म्हणौन संतसंगेचि जावें | सत्शास्त्रचि श्रवण करावें | उत्तम
गुणास अभ्यासावें | नाना
प्रयेत्नें ||१७-१०-३०||श्रीराम||
आजी
म्हणाल्या, ‘प्रथम
गुणवाने व्हायचं. सद्गुणामुळे श्रवणाची गोडी वाढेल. श्रवण करता करता ज्ञान वाढेल.
ज्ञानी बुध्दीमान सर्वत्र वंद्य ठरतो. कोणासारखा?’
विलास
म्हणाला, ‘मारूतीराया
सारखा.’
।। महारूद्र हनुमान की जय ।।
।। जय जय रघूवीर समर्थ ।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा