।।श्रीराम।।
पडवीवरचा दासबोध
लेखिका- आशालता उर्फ आक्का वेलणकर
दिवस ३२ वा
जया व सुधा आधी आल्या. कालच्या विषयाची उजळणी
चालली होती. इतक्यांत तिघेही आले. पंचमहाभूतात जे दृष्यस्वरूपात दिसतात त्यांची
पूजा जमेल. आता अदृष्य पण महत्वाचे असे दोन राहिले.
विलास म्हणाला, ‘तोच विचार मी करीत होतो. पृथ्वीची पूजा करता
येईल, स्वच्छता सडा संमार्जन रांगोळी यांनी सुशोभित करून. पाण्याची, तेजाची पूजा
करता येईल. पण वायूची पूजा कशी करायची?’
मधु म्हणाला, ‘तू कोणतीही शंका विचार आजी दासबोधाचा आधार घेऊन
उत्तर देणारच बघ.’
इतक्यांत आजी बाहेर आल्या.
वंदन आटोपले. प्रार्थना झाली. ‘विचारा! काय विचारणार आहात?’
विलास म्हणाला, ‘पृथ्वी, आप, तेज यापेक्षा वायू श्रेष्ठ पण वायूतर
दिसत नाही. वायूत हालचाल झाली की आपण वारा म्हणतो. त्या वायूत घटक किती? ऑक्सीजन, हायड्रोजन, नैट्रोजन, ओझोन, वाफ, धूळ,
कचरा, धूर असतोच. भूमीपासून आकाशापर्यंत सर्व पोकळी त्याने व्यापली आहे. तोच जास्त
श्रेष्ठ नाही कां?’
आजी म्हणाल्या, ‘हो तर! तो आहे म्हणूनच
श्वास आहे. म्हणून आपण आहोत....’ वायोकरितां श्वासोश्वास | नाना विद्यांचा अभ्यास | वायोकरितां शरीरास | चळण घडे ||१६-६-२||श्रीराम||
‘येथे करिता या शब्दाचा अर्थ म्हणून किंवा मुळे
असा आहे. वायूमुळेच आपण श्वास घेऊ शकतो.’
गणपती म्हणाला, ‘अन्नाशिवाय माणूस दोन दिवस राहू शकतो.
पाण्याशिवाय फार तर सात आठ तास राहू शकतो. म्हणजे शरीराला अन्नापेक्षा पाण्याची
गरज जास्त असते. पण पाण्यापेक्षा वायू आवश्यक. कारण श्वासाशिवाय माणूस जगूच शकत
नाही. जरा गर्दीच्या ठिकाणी हवा कोंडली तर जीव गुदमरतो. तो वायूदेव मोठा.’
आजी म्हणाल्या, ‘वायूमुळे नाना
मंत्र, प्रार्थना, भजने म्हणता येतात. शब्दांचे उच्चार होतात. विद्याभ्यासाला
वायूच कारणीभूत. जीभेवरून वारे गेले, तर मनुष्य बोलू शकत नाही. या वायूमुळेच शरीर
हालचाल करू शकते.’
मधुकर म्हणाला, ‘वायू मोठा उपकारक. रक्ताची शुध्दी वायूनेच होते.
मलमूत्र विसर्जन वायूमुळेच होते. उचकी, ढेकर, शिंक, जांभई सर्व वायूमुळेच.’
आजी म्हणाल्या, ‘त्याने मोठे काम कोणते केले माहीत आहे. तूच
वाच...’ देव कारागृहीं होते |
हनुमंतें
देखिलें अवचितें | संव्हार करूनी लंकेभोंवतें | विटंबून पाडिलें ||१६-६-३०||श्रीराम||
‘सीतेचा शोध या हनुमंतामुळेच लागला.
रामाची आज्ञा असती तर सीतेला खांदयावरून आणून रामापुढे हजर केली असती. पण पक्का
आज्ञाधारक ब्रह्मचारी, जन्मजात सोन्याचा लंगोट होता त्याला. तो जो कोण ओळखेल तोच
तुझा सद्गुरू त्याची आई एकदा त्याला म्हणाली होती.’
‘रामाने ते ओळखले. तेव्हापासून रामाला
शरण जाऊन त्याचा दास बनलेला हा हनुमंत म्हणजेच मारूती.’
विलास
म्हणाला, ‘आजी! त्याला एवढी शक्ती कोठून आली? कोणी दिली?’
आजी
म्हणाल्या, ‘वायू
म्हणजे पवन. या पवनाचे मूळ अंतरात्मा, त्या अंतरात्म्या मुळेच सर्वांना शक्ती,
बुध्दी, युक्ती मिळते. तोच मारूतीच्या शरीरांत होता. तुमच्या आमच्या शरीरांत पण
आहे. वाच ही ओवी....’ आत्म्यावेगळें काम चालेना | आत्मा दिसेना ना आडळेना | गुप्तरूपें विचार नाना | पाहोन सोडी ||१६-७-१०||श्रीराम||
आजी
म्हणाल्या, ‘कसा
जादुगारासारखे काम करतो.’
गणपती
म्हणाला, ‘आजी! जादुगार म्हणालांत न म्हणून मला आठवण
आली. सांगू गंमत. माझ्या मामाचे मित्र जादूगार होते. विंचवाच्या पाठीवरचे बिऱ्हाड,
असा त्यांचा संसार. मी त्यांना काका म्हणत असे. काका काकू व मीही होतो त्यांचे
बरोबर. गाडीने मनमाडला जायचे होते. स्टेशनवर आलो तो गाडीने शिटी दिली होती. सिग्नल
मिळाला होता. गाडी चालू झाली. आता हो कसे? हे इतके सामान दोन चार पेट्या, भले
मोठे पोते भांड्यांचे आणि आम्ही तिघे. डोळ्यासमोरून गाडी चालली. मी खट्टू होऊन
पहात होतो. काय आश्चर्य. अगदी शेवटचा डबा आमच्यासमोर आला. गाडी थांबली. काका
पेट्या उचलून गाडीकडे धावले. घाम पुसत आम्ही त्यांचे मागे चाललो. गाडीत चढलो.
सामान नीटनेटके लावले. घाम पुसत आम्ही बसलो. तोपर्यंत पोर्टरची स्टेशन मास्तर
गार्ड यांची धावाधाव. सर्व काही ठीक असताना गाडी कां थांवली? ड्रायव्हर आपल्या जागी गेला. गार्ड परतला.
काकांनी दारात उभे राहून रूमाल हलवला. गाडी चालू झाली. ऑं! अस कस झालें. अशी होती काकांची जादू.
गुप्तपणे विचार नाना. मला मजाच वाटली.’
आजी
म्हणाली, ‘गम्मतच
झाली नां?
कोणाला काही कळलच नाही. तस्साच हा आत्मा शरीरांतच राहून सर्व काही करतो पण दिसत
नाही. गणपती, तूच वाच ही ओवी.....’ आत्मा शरीरीं वर्ततो | इंद्रियेंग्राम चेष्टवितो | नाना सुखदुःखें भोगितो| देह्यात्मयोगें ||१६-७-१४||श्रीराम||
विलास
म्हणाला, ‘आजी! मी सांगू का अर्थ? हा आत्मा सर्व प्राणीमात्रांच्या
शरीरात राहतो. इंद्रिय ग्रामे म्हणजे सगळी १० इंद्रिये भराभर कामे करू लागतात. काम
सांगू?
डोळा पहाण्याचे काम करतो. कान ऐकण्याचे. नाक वास घेण्याचे, श्वास घेण्याचे काम
करतो. जीभ चव घेण्याचे व बोलण्याचे पण काम करते. पाय चालण्याचे काम करतात.’
‘आणि हात मारण्याचे काम करतात.’ असे म्हणून गणपतीने एक लहानशी चापटी
विलासला मारली.
विलास
म्हणाला, ‘तेच
हात शाबासकी देण्याचे काम का करत नाहीत?’ असे म्हणून त्याने शाबासकीच्या तीन
चापट्या गणपतीच्या पाठीवर मारल्या.
सगळे
हसले. त्यानंतर मधुकर म्हणाला, ‘विलास! ही सगळी कामे दिसणाऱ्या इंद्रियांची झाली. आपल्या शरीरांत काम
करताने तर दिसत नाहीत पण काम तर चालू आहे. फुप्पुसात रक्त शध्द होते. ह्रदयांत
शुध्द अशुध्द दोन्ही तऱ्हेचे रक्त साठवले जाते. शुध्द रक्त शरीरभर रक्त वाहिन्या
नेतात. अशुद्द रक्त पुन्हा ह्रदयांत साठवीले जाते. आणि शुध्द करण्याकरीता
फुपुस्सांकडे पाठवीले जाते. पोटात अन्न पचते. हे सारे कोणामुळे घडते?’
विलास
म्हणाला, ‘आत्म्यामुळे.’
आजी
म्हणाल्या, ‘बरोबर! एका देह संगतीमुळे त्याला सुख दु:ख पण भोगावी लागतात. तसा हा अनेकनेक
कामे करवून आत्मा अनेकानेक नावांनी ओळखला जातो. भली मोठी यादीच आहे. कोण वाचतो?’
‘मी वाचतो!’ गणपती म्हणाला, जीवात्मा शिवात्मा
परमात्मा | जगदात्मा विश्वात्मा गुप्तात्मा|आत्मा अंतरात्मा सूक्ष्मात्मा |देवदानवमानवीं||१६-८-६||श्रीराम|| नादरूप जोतीरूप | साक्षरूप सत्तारूप | चैतन्यरूप सस्वरूप | द्रष्टारूप जाणिजे ||१६-८-८||श्रीराम|| नरोत्तमु विरोत्तमु | पुरुषोत्तमु रघोत्तमु | सर्वोत्तमु उत्तमोत्तमु | त्रैलोक्यवासी ||१६-८-९||श्रीराम||
आजी
म्हणाल्या, ‘आत्मा हा सूक्ष्म आहे. ज्याची दृष्टी
सूक्ष्म बनते त्यालाच हा आत्म्याचा खेळ पाहता येतो.’
सुधा
म्हणाली, ‘आत्मा
तर सूक्ष्म मग पाहता कसा येईल? त्याला समजून घ्यायचं म्हणजे अनुभव घ्यायचा. पण हे सामान्यांचं काम
नव्हे असेही समर्थ मुद्द्म सांगतात. मी वाचू आजी? ...’ सूक्ष्म दृष्टीं आणितां मना | शरीराचा अंत लागेना | मा तो अंतरात्मा अनुमाना | कैसा येतो ||१६-८-२९||श्रीराम||
आजी
म्हणाल्या, ‘अनुमान
म्हणजे तर्क, तर्काने कल्पनेने त्याला जाणता येणार नाही. आपल्याच शरीरातल्या
घडामोडी आपल्याला जाणता येतात कां? क्ष किरणांनी फोटो काढला की, हाड कोठे
मोडले?
शीर कुठे तुटली हे कळते नां, तसेच सूक्ष्म ज्ञानाच्या डोळ्याने कळते.’ सकळास मूळ सांपडे
| ऐसें
पुण्य कैचें घडे| साधुजनाचें पवाडे | विवेकीं मन ||१६-९-१०||श्रीराम||
आजी
म्हणाल्या, ‘मूळ
म्हणजे परब्रह्म. सरसकट सगळ्यांना त्याचे ज्ञान होत नाही. पूर्व पुण्याई लागते. ही
पुण्याई म्हणजे साधना. उपासना, प्रयत्न आणि अंतरीची ओढ असेल तरच त्याला अनुभव
येईल. कांही थोडी संत मंडळी असतात, त्यांना ब्रह्मदर्शन घडते. आणखी एक गंमत सांगू? सामान्य माणसाचे ठिकाणी विवेक जागाच
झालेला नसतो. त्यामुळे काय गंमत होते?’ विवेकेंचि तो मुख्य राजा| आणी सेवकाचें नांव राजा | याचा विचार समजा | वेवाद खोटा ||१६-९-१५||श्रीराम||
‘सिंहासनावर बसतो तो खरा राजा म्हणजे
प्रजेचे पालन करणारा राजा. आणि राजा नावाचा सेवक पण असतो. म्हणून दोघांची पात्रता
एकच कां? हे
विवेकाने ओळखावे, उगाचच वाद न घालता खरे खोटे ओळखावे. यालाच ज्ञान म्हणतात.
ज्ञानाचे समजणे हिताचे. वितंडवादाने नुकसानच की! म्हणून बाळांनो! वादविवाद टाळावा.’ समजणें जें विवेकाचें | तेंहि आत्म्याविण कैचें | कोणीयेकें जगदीशाचें | भजन करावें
||१६-१०-२७||श्रीराम||
‘व्यवहार काय किंवा परमार्थ काय? नीट ध्यानात येण्यासाठी विवेक हवाच.
आणि हा विवेक याच देहांत जागा व्हायला हवा. म्हणजे सहाय्य कोणाचे हवे?’
विलास
म्हणाला, ‘प्रयत्नाचे!’
आजी
म्हणाल्या, ‘ते
तर खरेच!
प्रयत्न हवाच. प्रयत्न तरी कोणाच्या अस्तित्वामुळे होतील?’
गणपती
म्हणाला, ‘आत्म्याच्या!’
आजी
म्हणाल्या, ‘शाब्बास!’
विलास
म्हणाला, ‘मी देऊ का शाबासकी?’
आजी
म्हणाल्या, ‘एकट्याने
पाठीवर नको. टाळ्या वाजवून देऊ या. सर्वांनी टाळ्या वाजवल्या.’
‘असाच एकोपा भजनात पण असावा. म्हणू या
का भजन?’
‘मारूती राया बलभीमा, भजनालागो द्या
प्रेमा,’
आजींनी नीट सांगितले. पाठोपाठ सर्वांनी छान म्हटले. असे भजन एकदिलाने करून त्या
जगदीशाला आळवायचे.
विलास
म्हणाला, ‘म्हणजे
काय होते?’
आजी
म्हणाल्या, ‘भगवंत
भक्ताचे पाठीशी उभा रहातो. भक्ताला एकाकीपणा जाणवतच नाही. संकटाचे भय नष्ट होते.
समर्थ म्हणतात,’ समर्थाची
नाहीं पाठी| तयास भलताच कुटी | याकारणें उठाउठी| भजन
करावें ||१६-१०-३०||श्रीराम||
‘बाळांनो! ओवीतला समर्थ शब्द ते स्वत:करिता वापरीत नाहीत. समर्थ म्हणजे
बलवान व्यक्ती. रामरायाला ते समर्थ म्हणत. अशी शक्ती जर आपल्या पाठीशी असेल तर
कोणाची हिंमत आहे की यावे नी ठोसा मारावा. अपाय करावा. पुन्हा शब्दाचा खोल अर्थ
लक्षांत घेऊया. सामर्थ्य संपन्न गुरखा किंवा पोलीस आपल्या संरक्षणास हवा असाही
त्याचा अर्थ नव्हे. सर्वांत सामर्थ्यवान कोण असेल तर आत्मारामच. अंतरात्माच. तो
चोख काम करीतच आहे. त्याच्या बद्दलचा विश्वास आपल्या मनांत पक्का हवा. असा विश्वास
ज्याचा पक्का असतो. त्याचे रक्षण अंतरात्मा करतोच. म्हणून कंटाळा न करता, आळस न
करता भजन करावे.’
विलास
म्हणाला, ‘आजी! भजन करायचे म्हणजे अभंग गायचे की,
स्तोत्र म्हणत बसायचे?’
आजी
म्हणाल्या, ‘छान
विचारलेस!
मनात नाही भाव नी नुसतं रामा रामा रामा, रामा आत्मारामा आत्मारामा अस चढ उतर
आवाजात म्हटले म्हणजे भजन नव्हे. आत्माराम सर्वश्रेष्ठ असून तोच माझे रक्षण करीत
आहे. म्हणूनच मी आहे हे अनुसंधान अखंड ठेवणे याला भजन म्हणतात. अशी वागणूक ज्याची
असते त्याला कोणी शत्रू असतच नाही. त्याची सर्वत्र वाहवाच होते. मग कोणी मारण्याचा
प्रसंगच कसा येईल? असा भक्त सदैव काय करतो?’ भजन साधन अभ्यास | येणें पाविजे परलोकास | दास
म्हणे हा विश्वास | धरिला पाहिजे ||१६-१०-३१||श्रीराम||
‘भगवंताचे अखंड स्मरण, नित्य नियमाने
वागणे, आणि सतत प्रयत्नशील असणे म्हणजेच अभ्यास. असा अभ्यास जो करतो तो या लोकांत
तर नावाजला जातोच पण परलोकांतही, अन्य राष्टांत, क्षेत्रात चमकतोच. लोक आपणहून
त्याला बोलावतात. आपला विश्वास पक्का असायला हवा.’
‘जगातली बरीच कामे विश्वासावर चालतात.
आमचा सोनारावर विश्वास आहे. न्हाव्यावर आहे. फक्त देवावर पक्का विश्वास नाही. तसे
नको.’
‘ईश्वर भक्ती हेच ध्येय असावे. नाम हे
तारूच समजून जीवन जगावे. कठीण आहे कां? मनात आले तर कठीण काहीच नसते. होय नां?’
“अगदी खरं!” मुले म्हणाली. उत्फूर्तपणे जयघोष
केला.
।। जय जय रघूवीर समर्थ ।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा