।।श्रीराम।।
पडवीवरचा
दासबोध
लेखिका- आशालता
उर्फ आक्का वेलणकर
दिवस ३८ वा
विलास
आणि गणपती हातवारे करीत हळूहळू बोलत चालत होते. पाठोपाठ मधू आहे. त्यांचे लक्षही
नव्हते.
जागा
नक्की झाली. नगरपालीकेची आडकाठी येणार नाही. बाबांनी चौकशी केली आहे. आता सुरूवात...
तोच
मधू म्हणाला, ‘पहिला
पाऊस पडला आहेच आता वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठरवू. चार झाडे लावू या.’
विलास
म्हणाला, ‘आमच्या
मागच्या पडक्या भिंतीत दोन पिंपळाची झाडे वाढत आहेत. ती काढू नी तेथे लावू. मधूची
कल्पना चांगली आहे. एक उंबराचे व एक वडाचे झाड लावूया. पुढे सूरपांरब्या खेळता
येतील. इतक्यांत वाडा आलाच.’
सुधा
व जया पायरीवरून वाटच पहात होत्या. पाय धूवुन वंदन केले. सर्व आपापल्या जागी बसले.
‘काहीतरी मोठ्या
कार्याची आखणी चाललेली दिसते!’ आजी म्हणाल्या.
विलास
म्हणाला, ‘तुम्ही
कसे ओळखलेत?’
सुधा
म्हणाली, ‘आपला
चेहरा हा आरसाच नं? त्यात
पडलेले मनातल्या विचारांचे प्रतिबिंब आजींनी पाहिलं.’ मुले हसली.
‘आजी! प्लॅन पूर्ण
झाला की सांगणारच तुम्हाला.’ विलास म्हणाला.
‘आनंद आहे
बाळांनो!’ आजी
म्हणाल्या, ‘एक
लक्षांत ठेवू या...’ कोण्हास कांहींच न मागावें | भगवद्भजन वाढवावें | विवेकबळें जन लावावे | भजनाकडे ||१९-६-११||श्रीराम||
‘अगदी सोप आहे
नां?
विवेकाचा उपयोग पुरेपुर करायचा. पैशाचा संबध येऊच द्यायचा नाही. फक्त भजनाचा आनंद
लुटायचा. आणि तो सुध्दा कार्य करीत असतानाच.....’ उत्कट भव्य तेंचि घ्यावें | मळमळीत अवघेंचि टाकावें | निस्पृहपणें विख्यात व्हावें | भूमंडळीं ||१९-६-१५||श्रीराम||
‘बाळांनो! जगातल्या बऱ्याच उत्कट, दिव्य, भव्य
वाखाणण्यासारख्या गोष्टींचा आदर्श डोळ्यापुढे ठेवू या.’
आजी- ‘उत्कट भजन कोणाचे?’
सुधा- ‘संत मिराबाईचे, कान्होपात्रेचे,
नामदेवांचे.’
आजी- ‘उत्कट गायन कोणाचे?’
विलास- ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे.’
आजी- ‘उत्कट समाजसेवा कोणाची?’
मधुकर- ‘कै दाजी पटवर्धन. शिवाजीराव नांव
त्यांचे. कुष्टरोग्यांकरीता तपोवनाची स्थापना त्यांनी केली.’
जया- ‘आजी! समाजसेवक म्हणून विनोबाजींचं पण नांव घेता
येईल.’
विलास म्हणाला, ‘आजी! अशी उत्कट कार्य करणारांची खूप मोठी यादी
होईल. आम्ही उद्या गृहपाठ आणू कां? सगळ्यांची यादी एकत्र केली की खूपच नांवे
मिळतील.’
आजी म्हणाल्या, ‘हे सारे आदर्श डोळ्यापुढे ठेवून.....’
त्यांना थांबवत गणपती
म्हणाला, ‘नुसते
डोळ्यापुढे नांवे ठेवून नाही भागायचं. आम्ही त्यांची माहिती गोळा करू व
प्रत्येकाबद्दल १५ मिनिटे तरी बोलता येईल असा अभ्यास करू. आजी आमचं बाल वाचनालय
आता १०० पुस्तकांचे झाले आहे. काल विलासने आणि मी सर्वपुस्तकांचे दोन भाग केले.
भूता खेतांच्या जादूटोण्याच्या गोष्टी वेगळ्या केल्या व चरित्रात्मक पुस्तकांचा
गठ्ठा वेगळा केला.’
‘शाब्बास!’ आजी म्हणाल्या, ‘चांगलेच समर्थ महंत व्हाल हं! हे पहा समर्थ वचन...’ याकारणें सावधान असावें | जितुकें होईल तितुकें करावें | भगवत्कीर्तीनें भरावें | भूमंडळ ||१९-६-२६||श्रीराम||
‘विवेकाने काम केल्यावर घोटाळाच नाही.
खोटेपणाच्या कार्यात घोटाळे फार. आपण देवाच्या शोधाचे पवित्र कार्य करणार आहांत नं? मग या तयार होणाऱ्या संघशक्तीला
पवित्रता, मंगलता असणारच. जे झेपणार नाही ते करायला घ्यायचे नाही. कारण समर्थांनी
छान दृष्टांत दिला आहे बघ. मधू तू वाच...’ आपणासीं बरें पोहतां न ये | लोक बुडवावयाचें कोण कार्य | गोडी आवडी वायां जाये | विकल्पचि अवघा ||१९-७-१६||श्रीराम||
‘पोहता न येणारा स्वत: गचकेल व दुसऱ्याला पण बुडवेल.
दुसऱ्याची परमार्थाची गोडी वाढीस लागली पाहिजे. असे कार्य करायचे. दुसऱ्याच्या
ठिकाणी असलेली गोडी नष्ट होईल असे करायचे नाही. कार्यापूर्वीच दूरवरचा विचार
करायचा....’ अभ्यासें
प्रगट व्हावें | नाहीं तरी झांकोन असावें | प्रगट होऊन नासावें | हें बरें नव्हे ||१९-७-१७||श्रीराम||
सुधा म्हणाली, ‘आजी! प्रगट होऊन नासावे असे होणार नाही. आम्ही पाचच
नाही. माझी एक मैत्रिण गावाला गेली आहे. ती आमच्यात मिसळणारच. आम्ही सहाजण वार
वाटून घेऊ. सातव्या वारी सर्वजण जमू. तुम्ही निश्चित असा.’
विलास म्हणाला, ‘पण मंगलाला दासबोधातल्या ओव्या कशा
सांपडतील?
तिचा अभ्यास कसा होईल?’
जया म्हणाली, ‘आता मी करू गौप्य स्फोट. आजी! सुधाने एका वहीत रोजच्या होणाऱ्या
ओव्या अर्थासह लिहून ठेवल्या आहेत. २ दिवसांनी दासबोध पूर्ण होईल. मग आपला
नित्यपाठ दासबोध पण सुंदर अक्षरांत मधूदादा तयार करील.’
भान न राहून विलास उठला, ‘मी १० प्रती झेरॉक्स काढीन. वा! वा!! वा!!! नित्यपाठ दासबोध.’ नाचायलाच लागला. आजींचे डोळे भरून
आले. जयाने भजन सुरू केले. मधुकरने विलासला खाली बसवले. सर्वांनी टाळ्या वाजवून
भजन केले.
आजींनी डोळे पुसले. ‘समर्थांना मनस्वी खेद कशाचा असेल तर
मानवाचे ठिकाणी असलेल्या अवगुणांचा...’ सकळ अवगुणामधें अवगुण | आपले अवगुण वाटती गुण | मोठें पाप करंटपण | चुकेना कीं ||१९-८-८||श्रीराम||
मधू म्हणाला, ‘आजी! गुळाच्या भेलीत(ढेपेत) लहानसा दगड असला तरी तो
दगडच रहाणार. वर्षानुवर्षे गुळाच्या संगतीत राहूनही त्यांत काही बदल होणार नाही.
अंतरंगापर्यंत जाणारच नाही.’
गणपती म्हणाला, ‘नर्मदेतले धोंडे पाण्यांत आहेत तो
पर्यंत ओले. बाहेर काढले की, कोरडे ठणठणीत.’
सुधा म्हणाली, ‘आजी! आम्ही परवाच मारूती समोर शपथ घेतली की,
सोडलेले अवगुण परत चिकटू देणार नाही. उलट स्वत:लाच स्वत: तपासायचे, चाळायचे, गाळायचे. आजींना
चतुर्दश भुजा देवी बनवायचे.’ पुन्हा टाळ्या वाजल्या.
‘बाळांनो!’ आजी म्हणाल्या, ‘ही सारी सद्गुरू कृपा हं. आत्माराम
वोळला ग वोळला. खरंच सांगते ह्रदय प्रेमाने भरून आलंय. समर्थ म्हणतात...’ आपणास उपाधी मुळींच नाहीं | रुणानुबंधें मिळाली सर्वही | आल्यागेल्याची क्षिती नाहीं| ऐसें जालें पाहिजे ||१९-८-२७||श्रीराम||
‘आपण म्हणजे कोण कळले नां?’
‘हो तर! सच्चिदानंद रूप आत्माराम.’ विलास म्हणाला.
‘उपाधी रहित असलेले आपण देहात वस्तीला
आलो.’
आजी म्हणाल्या, ‘धर्मशाळेत प्रवासी जमतात नं, तसेच आपण शेजारी शेजारी, नातेवाईक, सगे
सोयरे, मित्र मित्र जमलो. कर्मांची देव घेव आनंदाने व्हावी. कोणाचे उणे दूणे पाहू
नये. उच्चनीच मानू नये. यालाच समभाव म्हणतात. असे जर वागता आले, तर दु:खाची झळ कमी
लागते. या एका मोहातून सुटलो की दुसरा टप्पा.’
‘तो कोणता?’ विलासने विचारले.
आजी म्हणाल्या, आळसें आळस
केला | तरी मग कारबारचि बुडाला | अंतरहेत चुकत गेला | समुदायाचा ||१९-९-७||श्रीराम||
‘आळस हा शत्रूच. आळसाने काम थांबवले तर
सगळ्या कार्याचाच नाश होतो. पुढाऱ्याने जर अंग काढले तर मागचा कामाचा व्याप
सांभाळणार कोण?
आळसाचे साम्राज्य पसरायला वेळ लागत नाही. काम तर थांबतेच पण जगात नाचक्की होते.
जमणार नव्हतं तर करावच कशाला? हे ही जगाचे बोल ऐकून घ्यावे लागतात. लोकांना भजन मार्गाला लावायचे.
कार्यरत व्हायचे व जगाला कार्यात मग्न ठेवायचे, हा हेतू राहूनच जातो. देह आहे तेथे दुखणे पाणी
असणारच. देहाला विश्रांती हवीच. पण आपल्या ऐवजी आधीच दुसरी योजना आणून ठेवावी. उणे
पडू देऊ नये. साधा व्यवहार पण काय सांगतो?’ कोणी येक काम करितां होतें| न करितां तें मागें पडतें| या कारणें ढिलेपण तें | असोंचि नये ||१९-९-१५||श्रीराम||
‘अशी कामे अर्धी राहिली की दु:खच.’
‘हा! मला खूप खेपा अनुभव आला आहे.’ विलास म्हणाला, ‘बाबांनी पण तेच बजावलं. अगदी सरळच
विचारलं. म्हातारा होऊन डोळ्यांनी दिसत नाही, कानांनी ऐकू येत नाही. पाय चालत
नाहीत असे होईपर्यंत काम करणार कां? इतर मदतनीस नसतील तरी चालू ठेवणार कां? समजा तरूणपणी बदलाची नोकरी असली तरी
व्यवस्था न चुकता पहाणार कां? इतका पुढचा ७०-८० वर्षांचा विचार कर. मग हात पाय घाल. नाहीतर एकटाच
आजींच्याकडे जातोस, वाचतोस तेवढे पुरे आहे. फार मोठे आव्हान मी स्विकारले आहे.’
‘तुझ्या बाबांचे म्हणणे आणि समर्थांचे
म्हणणे एकच आहे बघ...’ जो दुसऱ्यावरी विश्वासला | त्याचा कार्यभाग बुडाला | जो आपणचि कष्टत गेला |
तोचि
भला ||१९-९-१६||श्रीराम||
‘कार्याला सुरवात करताना स्वत:च्या
हिमतीनेच सर्व निभावुन न्यायचे आहे ही तयारी हवी. मदतीचे हात पुढे येतील. जरूर मदत
घ्यावी. पैशाची नको, कष्टाची. पण विश्वासघाताने फसण्याची पाळी येऊ नये. म्हणून
कोणतेही काम दुसऱ्यावर सोपवून बाजूस राहू नये. दुसऱ्याकडून ते न झाले तर आपल्यावर
दोष येतो.’
‘विश्वासघाताने प्रपंच चालवणारी माणसे
जगांत पुष्कळ आहेत. म्हणून कोणावर विश्वास ठेवावा, कोणावर नाही हे ही विवेकाने
ठरवायला हवे. स्वत: कष्ट सोसावे लागले तरी हरकत नाही. पण त्यात जो आनंद आहे तो
दुसऱ्याने काम करण्यांत नाही.’
‘बाळांनो! आणखी एक लक्षांत ठेवायला हवे. जगांत
बुध्दीमत्ता सगळ्यांना सारखी नसते. स्वभाव सारखे नसतता. कांही सज्जन काही दुर्जन
भेटतातच. म्हणून समर्थ सांगतात...’ दुर्जन प्राणी समजावे | परी ते प्रगट न करावे | सज्जनापरीस आळवावे | महत्व देउनी ||१९-९-२३||श्रीराम||
‘या करीता मन फार मोठे असावे लागते.
दुर्जनातला दुर्जनपणा ओळखायचा. पण प्रकट बोलून दाखवू नये. इतकेच नव्हे तर नाठाळपणा
कोणता हे आपण ओळखले आहे असे भासू सुध्दा द्यायचे नाही. उलट सज्जनांना वागवतो तसे
त्यांना मानमरातबीने वागवावे. क्वचित प्रसंगी त्याची त्याल लाज वाटून तो
सुधारण्याची शक्यता असते.’
‘आपल्या कार्याचा व्याप कितीही वाढला
तरी आपला नित्य नियम चुकवू नये. प्रथम अंगिकारलेल्या कामात खंड पडू देऊ नये.
प्रगती खुंटू देऊ नये. आपले भक्तीचे ध्येय पक्के जोपासावे...’ भक्तिमार्ग विशद कळे | उपासनामार्ग आकळे | ज्ञानविचार निवळे
| अंतर्यामीं ||१९-१०-४||श्रीराम||
‘कळलां कां अर्थ?’ आजींनी विचारले.
विलास म्हणाला, ‘मी सांगतो!’ ‘भक्तीमार्ग म्हणजे काय? भक्तीच्या व्दारे भगवंताला जाणणे,
म्हणजे भक्ती. पण भक्ती म्हणजे काय? कोणी विचारले तर? आपण म्हणजे साधकाने भगवंताहून वेगळा न
रहाणे म्हणज भक्ती. भक्ताची व भगवंताची एकरूपता म्हणजे भक्ती. भगवंताचे अखंड
अनुसंधान राखणे म्हणजेच उपासना. भक्तीने उच्चतम ब्रह्मज्ञान झाले तरी डंका न पिटता
शांत रहाणे म्हणजे भक्ती.’
‘बरोबर सांगितलेस!’ आजी म्हणाल्या, ‘मीपणा पूर्ण विलीन झाल्याशिवाय ही
एकरूपता येणार नाही. आता उपासना म्हणजे काय? कोण सांगतो?’
सुधा म्हणाली, ‘मी सांगू कां? मीपणा सहजासहजी भगवंताच्या चरणी विलीन
करता येणार नाही. त्यासाठी जो अभ्यास करायचा, जी साधना करायची त्याचे नांव उपासना.
जितक्या प्रमाणांत अहंभाव, मीपणा, कर्तेपणाचा अभिमान कमी कमी होईल तितक्या
प्रमाणांत साधकाची विचारशक्ती प्रगल्भ होते. प्रतिभा शक्ती वाढते. ती प्रतिभा कोठे
व कशी वाढते हे कळणे म्हणजे ज्ञान. अंतरंगातून प्रकाश पडतो. आतून आनंदाची उर्मी
येते. म्हणजे कसे होते सांगू? आजी ऐन मोक्याच्या वेळी रात्री विजेचे दिवे मालवतात. वीज खंडीत
होते. मग धावपळ. मेणबत्ती लाव. समई लाव. कंदील शोध. कुठूनतरी मिणमिण प्रकाश
निर्माण करतो. पंखे बंद उकडा खूप. पुरूषांना बायकांचा हेवा वाटतो, कारण त्या
पदराने वारा घेतात. बायकांना पुरूषांचा हेवा वाटतो कारण ते सदरा न घालता बसू
शकतात. हिंडू फिरू शकतात. चरफड चालू असते. असा अर्धा पाऊण तास जातो नी चटकन वीज
येते. दिवे लागतात. पंखे फिरतात. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांचे चेहरे खुलतता.
आले आले दिवे आले. मुले तर नाचतातच. म्हाताऱ्यांना पण आनंद होतोच. ते टाळ्या
वाजवतात. त्याही पेक्षा ज्ञानाचा आनंद मोठाच जीवनात हाच आनंद मिळवायचा असतो.’
‘शाब्बास!’ विलासने जोरात टाळ्या वाजवल्या.
‘विलास!’ आजी म्हणाल्या, ‘समर्थ भक्तांकडून कोणती अपेक्षा करतात
माहीत आहे?
वाच तू....’ जितुकें
कांहीं आपणासी ठावें | तितुकें हळुहळु सिकवावें | शाहाणें करूनी सोडावे | बहुत जन ||१९-१०-१४||श्रीराम|| आपण करावें करवावें | आपण विवरावें विवरवावें | आपण धरावें धरवावें | भजन मार्गासी ||१९-१०-१७||श्रीराम||
‘आजी!’ या दोन ओव्या म्हणजे आमचा शपथवीधीच. विलास
म्हणाला.
आजी म्हणाल्या, ‘स्वत: करून दुसऱ्यांना सांगण्यात एक आनंद वेगळा
असतो. आपण प्रचिती घेऊन दुसऱ्यास सांगितले की जरा जोर येतो सांगण्याला. साऱ्या
जीवनभर हे पथ्य पाळू या. भगवंत डोक्यावर घेईल आपल्याला नी नाचेल.’
विलास म्हणाला, ‘पण आजी! भक्त नी भगवंत एकच झाले की, भगवंत डोक्यावर
कोणाला घेणार?
त्याला आनंद देण्यासाठी आपण थोडे विभक्त होऊ, बाजूस राहू. त्याचे नाचून झाले की
त्याच्या ह्रदयांत पुन्हा दडी मारून बसू! हां असंच करू! वा! वा! वा!’
आजींना पण गंमत वाटली.
त्यांनी हात जोडले.
।। जय जय रघूवीर समर्थ ।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा