।।श्रीराम।।
पडवीवरचा
दासबोध
लेखिका- आशालता
उर्फ आक्का वेलणकर
दिवस ३९ वा
तिघे
आले. जया व सुधा अजून आल्या नाहीत. कां बरें? तिघे विचार करीत आहेत तोच माजघऱांतून आवाज आला.
चला, बाहेरच बसू या. मुलं येतीलच आत्ता. आजींचाच आवाज.
विलास म्हणाला, ‘त्या दोघी लवकर येऊन गप्पा मारीत
होत्या कां?’
‘गप्पा नव्हतो
मारत!’ सुधा
म्हणाली. ‘आईने
आजींच्या करतां औषध दिले होते ते द्यायला आले. आजी माजघरांतच निजल्या होत्या
म्हणून आत गेलो दोघीच. औषध
मग घेते म्हणाल्या. म्हणून आम्ही हट्ट धरून बसलो. आत्ताच थोडे चाटण घ्या. नाहीतर आम्ही
परत जातो.’
मधू
म्हणाला, ‘आजी! आज बरं वाटत
नसेल तर राहू दे. आम्ही आपापसांत थोडी चर्चा करतो. मागची उजळणी घेतो. प्रार्थना
म्हणतो, तुम्ही आत विश्रांती घ्या.’
आजी
बसत बसत म्हणाल्या. ‘बाळांनो! दासबोध हीच
माझी विश्रांती. तसा फार मोठा आजार नाही. ऋतु मानांत बदल झाला की वृध्दावस्थेकडे
झुकणाऱ्या देहात पण कांहीतरी बदल होतो. थोडे पित्त झाले आहे. डोके गरगरते म्हणून
पडले होते. पोरींनी हट्टच धरला म्हणून चाटण घ्यावेच लागले. आता गरगरणे थांबेल. बस
सुधा. जया दासबोध आणलास कां? बसा.’
मधू
म्हणाला, ‘आजी! आता दोन
दिवसांनी शाळा सुरू होणार. महिना कसा मजेत गेला. आम्हाला खूप खुराक मिळाला.
विवरावे, विवरवावे. यावरच मी सकाळपासून विचार करीत होतो. विवरणे म्हणजे विवेकाने
विचार करणे. म्हणजे आता नक्की कसे व काय करायचे? विचारपूर्वक निर्णय म्हणजे तो कसा
घ्यायचा? त्रास
होत नसेल तर सांगा हं!’
‘त्रास? बाळांनो! हे तर माझे
औषध आहे. शक्तीवर्धक औषध आहे.’ आजी म्हणाल्या. ‘हे बघ विवरणाकरित ओवी किती छान आहे.
वाच..’ परब्रह्महि अचळ| आणि पर्वतासहि म्हणती अचळ | दोनीहि येक केवळ |
हें
कैसें म्हणावें ||२०-१-२१||श्रीराम||
आजी
म्हणाल्या, ‘या
ओवीवर मनन करू लागलो की, आधी वरवरचा अर्थ बघावा. मग खोलात शिरावे. परब्रह्म अचल
आहे. अचल म्हणजे हालचाल करीत नाही. स्थीर आहे. गेल आलं नाहीसं झालं असे काही होत
नाही. आहे तस्से रहाते. हा सगळा त्या अचलाचा विचार विस्तार झाला. आता दुसरा चरण
पहा.’
‘पर्वताला पण
अचल म्हणतात. पर्वत स्थिर असतो. हालत नाही. जागा सोडत नाही. म्हणजे अचल असतो. आता
विचार करायचा, अचलपणा म्हणजे हालचाल रहितता, हा गुण
परब्रह्मात व पर्वतात सारखाच आहे. म्हणून पर्वताला परब्रह्म म्हणून चालेल कां? परब्रह्म
सूक्ष्म आहे. पर्वत स्थूल आहे. परब्रह्म हे भूत म्हणजे मायेकरवी तयार झालेले नाही.
त्याला आकार नाही. पर्वत हा पृथ्वीचाच भाग म्हणजे पंचमहाभूतातील शेवटचे भूत.
त्याला आकार नाही. म्हणूनच पर्वाताला कालांतराने नाश आहे. परब्रह्माला नाश नाही.
एवढ्याकरीता परब्रह्म आणि पर्वत एकच म्हणता येणार नाही. त्यांत जमीन अस्मानाचा फरक
आहे.’
‘मधू! ओवी वाचून
झाली, की त्यावर खोल विचार करून निर्णय घेणे म्हणजे विवरणे.’
सुधा
म्हणाली, ‘छान
लक्षांत आले! पण
आता माझी शंका अशी की, आकाश व्यापक, तसे पाणी, पृथ्वी, अग्नी, वारा हेही व्यापकच.
मग आता ही सगळी परब्रह्मापेक्षा अपूर्णच हे कसे पहायचे?’
आजी
म्हणाल्या, ‘वरील
सर्वांना मर्यादा आहेत. त्यांची शक्ती स्वयं नाही. पंचभूतात ती मोडतात, म्हणून
परब्रह्म पूर्ण आणि ही सारी भूते अपूर्ण.’
‘म्हणजे
सर्वश्रेष्ठ परब्रह्मच!’ विलास
म्हणाला.
‘होय!’ आजी
म्हणाल्या. ‘आता ही
दुसरी ओवी बघ...’ आत्मत्वीं जन्ममरण लागे | आत्मत्वीं जन्ममरण न भंगे | संभवामि युगे युगे | ऐसे हें वचन ||२०-१-२६||श्रीराम||
‘पुन्हा पुन्हा जन्म कां घ्यावा लागतो?’ आजींनी
विचारले.
सुधाने
उत्तर दिले, ‘जीव
वासनेत अडकतो. वासनेप्रमाणे जीव नवा देह धारण करतो. जीव हा आत्म्याचाच भाग म्हणून
त्याला जीवात्मा म्हटले तर?’
‘बरोबर आहे!’ आजी
म्हणाल्या. ‘जीवात्मा
देहात्म बुध्दीने देहच आत्मा आहे असे मानून वासनेच्या जाळ्यात अडकतो. आता श्रवणाने
देहाचे नश्वरत्व लक्षांत आले की मी देह आहे, म्हणायचे ऐवजी जाणीव शक्तीने जीव काय
म्हणतो? मी
आत्मस्वरूप आहे.’
मधू
म्हणाला, ‘आत्मस्वरूप
म्हणजे शीवस्वरूप म्हणून तोच जीवात्मा शिवात्मा होतो. आजी शिवात्मा झाल्यावर जन्ममरण
नसते कां?’
‘असते!’ आजी
म्हणाल्या, ‘जिवात्म्याला
किंवा शिवात्म्याला जन्म मरण चुकत नाही फक्त शिवात्मा म्हणजे ईश्वर कर्माच्या अधीन
न होता कर्माला आपल्या ताब्यात ठेवतो. ईश्वर म्हणजे शिवात्मा जरूर पडेल तेव्हाच
जन्म घेऊन भूतलावर अवतरतो. त्यांना.......’
‘अवतार म्हणतात!’ गणपतीने
आजींचे वाक्य पूर्ण केले. ‘अवतार
स्वतंत्र असतात. जीवाने जन्म घेतलला देह व जीवात्मा परतंत्र असतात.’
विलास
म्हणाला, ‘सर्वश्रेष्ठ
असलेले परब्रह्म कोठे गेले?’
आजी
म्हणाल्या, ‘कोठेही
गेले नाही आणि आलेही नाही. ही ओवी वाच तू...’ परब्रह्मायेवढें थोर नाहीं | श्रवणापरतें साधन नाहीं | कळल्याविण कांहींच नाहीं | समाधान ||२०-९-९||श्रीराम||
‘बाळांनो! जीवाची उपाधी
कोणती?’
आजींनी विचारले.
विलास
म्हणाला, ‘शिवाची
म्हणजे शिवात्म्याची उपाधी कोणती?’
मधू
चाचपडत म्हणाला, ‘मला
वाटते हे विश्व.’
‘बरोबर आहे!’ आजी
म्हणाल्या, ‘ठामपणाने
सांगा हे सारे दृष्य ही मायिक करणी आहे, हा ब्रह्मांडाचा पसारा ही शिवात्म्याची म्हणजेच
विश्वात्म्याची उपाधी आहे. या उपाधी बाहेर तो गेला की, शुध्द ज्ञान झाले म्हणायचे.
तरी पूर्ण मी सुटलेला नाही. महतत्वापर्यंत शिरल्यावर तेथे मनाची गतीच खुंटते. नि:शब्दता येते.
ते निश्चल ठिकाण म्हणजे परब्रह्म. ही शून्यावस्ता म्हणजे परब्रह्माशी एकरूपता. ही
एकरूपता साधण्यासाठी मूळ मायेच्या पसाऱ्यातून सुटायचे. म्हणजे विवेकाने वागून फक्त
भगवंताचा पाईक म्हणून काम करायचे.’
विलास
म्हणाला, ‘असे
वागता येण्यासाठी समोर अगदी जवळचा आदर्श कोणता?’
‘आपल्या आईचा’, आजी
म्हणाल्या.
‘आँ.....’ गणपती बघतच
राहिला. विलास बावचळला.
आजी
म्हणाल्या, ‘आई
म्हणजे जन्म देणारी नव्हे. आत्ता जिच्या मांडीवर आपण बसलो आहोत ती.’
मधू
म्हणाला, ‘पृथ्वी
ही माता, सूर्य हा पिता. परवाच आपण पाहिले. पण गेले डोक्यातून. जवळची म्हटल्यावर
मी पण हीच आई समजलो.’
‘याला आधार ओवी
बघ,’ आजी
म्हणाल्या.... खाणी
वाणी होती जाती | परंतु तैसीच आहे जगती | ऐसे
होती आणी जाती |
उदंड प्राणी
||२०-९-९||श्रीराम||
‘या पृथ्वीच्या पाठीवर चारही खाणीतले
अनेकानेक प्राणी जन्माला येतात नी जातात. पण पृथ्वी मात्र जशीच्या तशीच रहाते. आजी
म्हणाल्या, मी सगळ्यांना वागवते हा फुंज नाही. पोषण करते हा अभिमान नाही. आल्याचा
आनंद नाही. गेल्याचे दु:ख नाही. सृष्टी उत्पन्न होते नी जाते तरी जी शक्ती जशीच्या तशीच
रहाते ती शक्ती म्हणजे परब्रह्म. खोल विचार केला की महाप्रलयांत पृथ्वी नाश पावते.
पंचमहाभूते अगदी मूळ स्फूर्णा म्हणजे चैतन्य सुध्दा ज्या दिव्य शक्तीतून बाहेर
पडते, त्यांत जाऊन मिसळते. तरी सुध्दा ज्यात वाढ होत नाही वा घट होत नाही त्या
दिव्यशक्तीचे नांव.....’
‘परब्रह्म!’ विलास टाळी देऊन म्हणाला, ‘पण हे सारे ऐकताना सोपे वाटतं. नंतर ते
घोटाळ्याचे कां होतं? सगळ्यांच्या एकदम लक्षांत कां येत नाही?’
‘हा सगळा खेळ गुणांचा!’ आजी म्हणाल्या, ‘जया समर्थांनी गुणांचे वर्गीकरण केले
आहे. बघ तू वाच....’ शुद्ध नेणीव तमोगुण | शुद्ध जाणीव सत्वगुण | जाणीवनेणीव रजोगुण | मिश्रित चालिला ||२०-३-७||श्रीराम||
अर्थ सोपाच होता. जयाने
सांगितला.
आजी म्हणाल्या, ‘छान देहात वावरणारा जीव गर्तेत का पडतो? परब्रह्माला कां विसरतो ते पहा....’ अधोमुखें भेद वाढतो | ऊर्धमुखें भेद तुटतो | निःसंगपणें निर्गुणी तो | माहांयोगी ||२०-३-२२||श्रीराम||
आजी म्हणाल्या, ‘जीव या विश्वपसाऱ्यात फसतच जातो.
त्याला मायेच्या जाळ्यांत सापडणारा, विषय सेवनांत आनंद मानणारा, अधोमुख म्हणतात.
त्यामुळे भेदाची भावना वाढते. मी तू पणा जास्तच फोफावतो. अनेकपणाचा अनुभव जास्त
येतो. पण तोच जीव जर ब्रह्मज्ञान युक्त होईल तर त्याला उर्ध्वमुख म्हणतात. जो भक्त
ब्रह्मरूप होतो. तो व्दैताने वागत नाही. भेद कमी होतो. सर्वसंग परित्याग करता
येतो. तो अखंड निर्गुण परब्रह्माशी समरस होतो. समर्थ त्याला महायोगी म्हणतात. ही
स्थिती बाणण्यासाठी काय करावे?’ रात्रंदिवस पाहावा अर्थ | अर्थ पाहेल तो समर्थ | परलोकींचा निजस्वार्थ
| तेथेंचि घडे
||२०-३-२९||श्रीराम||
ओवी ऐकल्यावर विलास
गडबडलाच, ‘आँ! रात्रंदिवस पैशाचा हव्यास धरलां तर
सगळंच मुसळ केरात गेलं.’
आजी हसल्या आणि
म्हणाल्या, ‘नाही! मुसळ केरात नाही जाणार. अर्थ या
शब्दाला अनेक अर्थ आहेत. अर्थ म्हणजे पैसा, असा येथे शब्द प्रयोग नाही. संतांच्या
वचनाचा भावार्थ लक्षांत यावा. असा तत्वबोधाचे चिंतन करणाराच आत्मज्ञानाचा स्वार्थ
साधू शकेल.’
गणपतीने शंका विचारली, ‘पूर्ण आत्मज्ञानी कसा वागतो?’
आजी म्हणाल्या, ‘त्याची भावना काय असते हे ही ओवीच
सांगते बघ, वाच...’ पृथ्वीमधें जितुकीं शरीरें | तितुकीं भगवंताचीं घरें | नाना सुखें येणें द्वारें| प्राप्त होती ||२०-४-४||श्रीराम||
‘प्रत्येक शरीर हे देऊळच. त्यातला भगवंत
म्हणजे आत्मा. हे आत्मज्ञानी पक्के जाणून असतो. मग शरीर कीडा मुंगीचे असो वा
शेणकिड्याचे वा अवतारी पुरुषाचे असो. प्रत्येक शरीरांत भगवंत आहेच व त्या घरातला
जीव सुख दु:खे
भोगतोच. त्याच्या पुढचा विचार असा......’ जगदांतरीं अनुसंधान | बरें पाहाणें हेंचि ध्यान | ध्यान आणी तें ज्ञान | येकरूप ||२०-४-१२||श्रीराम||
आजी म्हणाल्या, ‘आत्मज्ञानी मनुष्य जगाकडे वेगळ्या
दृष्टीने पहातो. ईश्वराच्या इच्छेने प्रत्येक घटना घडते असे त्याचे अनुसंधान सतत
असते. या एकच विचाराने त्याला स्वत:चा विसर पडणे याला ध्यान म्हणतात. पूर्णत्वाला
नेऊन पोहोचवणाऱ्या ध्यानाला शुध्द ज्ञान म्हणतात.’
विलास म्हणाला, ‘ही ज्ञानाची पायरी आम्ही चढू शकू कां?’
‘कां बरं शंका आली?’ आजी म्हणाल्या, ‘समर्थ म्हणतात ते खोटे कां?’ उपासना म्हणिजे ज्ञान | ज्ञानें पाविजे निरंजन | योगियांचें समाधान
| येणें
रितीं ||२०-४-२२||श्रीराम||
‘आपण श्रवण व्दारे उपासना करीतच आहोत.
दिवसानुदिवस उपासना वाढेलही. उपासना ही ज्ञानाची पूर्णावस्था. या शुध्द ज्ञानानेच
ब्रह्माची प्राप्ती होते. ब्रह्मपद प्राप्ती हेच खरे समाधान. असे योगी लोक मानतात.
त्यांच्या दृष्टीकोनाप्रमाणेच आपला दृष्टीकोन ठेवून आपण वागू या. त्याच मार्गाने
जाऊया. कोणता मार्ग?’ सकळ कर्ता परमेश्वरु | आपला माइक विचारु | जैसें कळेल
तैसें करूं |
जगदांतरें ||२०-४-२९||श्रीराम||
आजी म्हणाल्या, ‘ब्रह्मांडाचा कारभार ज्याच्या सत्तेने
चालतो तोच खरा परमेश्वर. त्याच्या आज्ञेत रहावे. मायेच्या कक्षेत असलेले आपण, आपले
कर्तेपण खोटेच. हे सदैव लक्षांत ठेवून वागावे. भगवंत प्रेरणा देईल तेवढे काम
त्याचेच समजून त्याच्याच करिता करायचे. कर्तेपण आपल्याकडे घ्यायचे नाही. मग सोपेच
आहे.’
‘बाळांनो! शेतकरी शेतात किती बी पेरतो? समर्थांचा दृष्टांत पहा....’ बीज थोडें पेरिजेतें | पुढें त्याचें उदंड होतें | तैसें जालें आत्मयातें | खाणी वाणी प्रगटतां ||२०-५-१४||श्रीराम||
‘बी थोडे पेरले तरी......’
‘थांबा आजी!’ सुधा म्हणाली, एका बीजापोटी। तरू
कोटी । कोटी सुमने फळे । आधी बीज एकले ।। ‘बी थोडे धान्य पुष्कळ मिळते.’
आजी म्हणाल्या, ‘तसेच एक आत्मरूप चार खाणी, चार वाणी
केवढा विस्तार झाला हा? एकच परब्रह्म अनेक रूपांत सहज लीला म्हणून प्रगटले.’
‘त्याचाच खेळ त्यानेच दिलेल्या दृष्टीने
पहायचा. पण तेथेही आळस आड येतो. याला काय म्हणावे?’ येथें जेणें आळस केला | तो सर्वस्वें बुडाला | देव
नाहीं वोळखिला |
विवेकबळें ||२०-५-२७||श्रीराम||
‘मनुष्य देह मिळून सुध्दा जो आळसात दिवस
घालवतो. तो खऱ्या देवाला कसा ओळखू शकेल? आपल्याच हाताने आपल्या पायावर धोंडा मारून
घेतल्यागतच होणार. मग काय करायचे.’
‘मी सांगतो!’ विलास म्हणाला, ‘चले जाव चळवळ करायची! घोषणा देऊन नाही थांबायच. त्याला पार
घालवूनच घ्यायचं. त्याला म्हणजे कोणाला?’
गणपती म्हणाला, ‘आळसाला!’
‘शाब्बास!’ विलासने गणपतीच्या पाठीवर थाप मारली.
मधूने विलासला तश्शीच
दोनदा शाबासकी दिली.
जया सुधाने टाळ्या
पिटल्या. आळसा आळसा चले जाव!
आजी हसल्या...
।। जय जय रघूवीर समर्थ ।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा