शनिवार, २६ डिसेंबर, २०२०

पडवीवरचा दासबोध, दिवस ३७ वा

 

।।श्रीराम।।

पडवीवरचा दासबोध

लेखिका- आशालता उर्फ आक्का वेलणकर

दिवस ३७ वा

     सगळी जमली. वंदनादिक आटोपले. विलासने शिशातून एक कार्ड काढले. कोणाचे पत्र आले आहे? सुधाने विचारले.

     विलास म्हणाला, मुद्दामच आणले आहे दाखवायला. पत्र पाहिल्यावर मला वाटले छापलेलेच आहे. निळ्या शाईमुळे लिहिलेले पत्र आहे हे कळले. माझ्या मावशीने पाठविलेले पत्र आहे हे. सुट्टीत का आला नाहीस?  तिने विचारले आहे. मला चार मावश्या. सगळी छोटी मिळून १०/१२ भावंडे तेथे जमली होती. फक्त मीच नव्हतो. अक्षर दाखवण्यासाठी कार्ड आणले आहे.

    सर्वांनी कार्ड हातात घेऊन पाहिले. अगदी पहिल्या अक्षरापासून तो शेवटच्या अक्षरापर्यंत एक टाकी लेखन. कोठ कुठे खाडाखोड नाही. व्यवस्थित लेखन अगदी नेटके पणे. लेखनावर व्यवस्थितपणे शुभनाम. कोठे डाग नाही.

     आजींनी पण कार्ड पाहिले. आजी म्हणाल्या, मी शिकत होते तेव्हा आम्हाला कित्ता असायचा. अक्षर लेखनाची वही वेगळी. पुस्तीची वही वेगळी. रोज अक्षरलेखन १० मिनिटे असायचेच व आठवड्यांतून पुस्तीचा एक तास असे. पुस्तीला गुण देत व ते भाषेच्या गुणांत मिळवत. प्रत्येक पेपरवर सुध्दा पाच गुण अक्षर व नेटकेपणासाठी राखून ठेवलेले असायचे.

     आता अक्षरलेखनाकडे दुर्लक्ष व्हायला लागले आहे. अक्षर घोटल्याशिवाय सुंदर कसे येईल? अक्षरावरून माणसाचा स्वभाव कळतो. आजींनी तीन तऱ्हेचे ३ क बोटांनी काढून दाखवले. व्यवस्थित चौकोनात बसेल असा क संयमशिलतेचे लक्षण दाखविते. एक गोल नीट आणि दुसरा फाटा खाली लोंबता क की अस्ताव्यस्त वागणूक  ओळखली जायची. लेखनात वाचनात व्यवहारां, कोणत्याही क्षेत्रात कष्ट आहेतच. जया १३ वी ओवी काढ. १९/१ बघ. काया बहुत कष्टवावी | उत्कट कीर्ति उरवावी | चटक  लाऊन  सोडावी  |  कांहीं  येक ||१९-१-१३||श्रीराम||

            आजी म्हणाल्या, काया म्हणजे शरीर, शारिरीक कष्टाशिवाय कोणतेच काम होत नाही. स्वत: कष्ट करून जो काम करतो त्याची वाहवा होते. लोकांना त्याची आवड उत्पन्न होते. मरावे परी कीर्ती रूपे उरावे असे म्हणतातच.’

     जीवनात सगळंच सुंदर असावे असा संतांचा कटाक्ष असतो. अक्षर सुंदर असावे. तसे बोलणे पण सुंदर असावे. नुसतेच वरपांगी गोड नको. हसत हसत बोलणे असेही नको. त्याला हसत हसत दात पाड म्हणतात. बोलतांना हसत बोलायचे पण अंतरंगात कुटील असेही नको. गणपती, समर्थ काय म्हणतात बघ. गणपतीने ओवी वाचली... हेत समजोन उत्तर देणें | दुसऱ्याचे जीवीचें समजणें | मुख्य चातुर्याचीं लक्षणें |  तें  हें  ऐसीं  ||१९-२-||श्रीराम||

     आजी म्हणाल्या, आपल्याशी जो बोलतो, त्याचा बोलण्याचा हेतू लक्षांत घेऊन उत्तर देता आले पाहिजे. दुसऱ्याच्या मनातला आशय ओळखणे ही एक चतुरताच आहे. चेहऱ्यावरचा भाव ओळखण्याची कला अवगत करून घ्यायला हवी. चेहरा वाचणे असे त्याला म्हणतात. चेहरा हा आरसाच आहे. अंत:करणातील विचारांचे प्रतिबिंब तेथे छान उमटते. ज्याला अंत:करण वाचता येते तो चतूर.

     गणपती म्हणाला, जगांत वावरायचे म्हणजे कीती किती गोष्टी शिकायच्या? हे सारे काही शाळेंत शिकवत नाहीत. व्यायाम शाळेत व्यायाम शिकवतात. शिवण क्लासात फक्त शिवण. नृत्याच्या वर्गात फक्त नृत्य. आ!, ते तरी सोपे असते कां? माझी आतेबहीण नृत्य विद्यालयात जाते. फक्त डोळ्यांची वेगवेगळी हालचाल व त्यानुसार भिवया मान हलवणे याला तिन चार महिने लागतात. त्यापेक्षा दासबोधाने आम्हाला खूप खूप शिकवले.

     आजी म्हणाल्या, माणसाने आयुष्यभर विद्यार्थीच रहावे. आयुष्य संपेल पण शिकणे संपणार नाही. तेथे आळस डोकावता उपयोगी नाही. विलास ही ओवी बघ.. शोध घेतां आळसों नये | भ्रष्ट लोकीं बैसों नये | बैसलें तरी टाकूं नये | मिथ्या दोष ||१९-२-१२||श्रीराम||

     आजी म्हणाल्या, मग तो शोध कशाचाही असो. हाती घेतलेल्या कामाची तड लागेपर्यंत आळस येता कामा नये. समजा भ्रष्ट लोकांशी संबंध आला तर गुणदोषाची चर्चा करू नये. खोटे आरोप करीत बसण्यांत वेळ घालवू नये. खरी परीक्षा नाही तर मौनच धरावे. आपली वाणी विटाळू नये.

     समाजात आपल्याला मानावे असे वाटत असेल तर काय करावे?’ मधूने शंका विचारली.

     आजी म्हणाल्या, आधी उत्तमोत्तम म्हणून घेण्यासाठी आपल्या जवळ उत्तम गुणांचा साठा हवा. चातुर्याने त्या गुणांचा उपयोग समाज कार्याकरीता करता यावा. समर्थांनी तोच विचार मांडला आहे.... उत्तम गुण प्रगटवावे | मग भलत्यासी बोलतां फावे | भले पाहोन करावे | शोधून मित्र ||१९-२-१५||श्रीराम||

     आजी म्हणाल्या, समाज हिताचे काम एकट्याच्याने होणारे नसते. त्याची पायाभरणीच भक्कम सांगितली बघ. आपल्यातले उत्तम गुण समाजाला दिसले की लोक आपणहून चौकशी करतील. सहाय्य देतील. सर्वांच्या स्वभावाची पारख करून मित्र जोडावा. मित्र म्हणून कोणाला निवडावे? यासाठी विवेक हवाच. सज्जन, कार्यतत्पर लोक पाहूनच मैत्री करावी. ती कायम टिकणारी असते.

     गणपती म्हणाला, आजी! या दासबोधाच्या निमित्ताने आम्ही पांचही जण समविचारी झालो आहोत. आयुष्यभर कायम एकमेकाला मदत करीत राहू. तुम्ही बघालच आमची संघटना.

     आजी म्हणाल्या, बाळांनो! यशस्वी होण्याचे आणखी एक तंत्र आहे. मधू तू ते तंत्र बघ... जगामधें जगमित्र | जिव्हेपासीं आहे सूत्र | कोठें तरी सत्पात्र | शोधून काढावें ||१९-२-१९||श्रीराम||

     मधू म्हणाला, आजी! शारदेची कृपा असली की वाणी मधूर रहाणारच. सत्य स्पष्ट, स्पष्ट पण मधूर अशा वाणीने लोकांना प्रसन्न ठेवता येते. या प्रसन्नतेतूनच चांगले मित्र जोडता येतात.

     आजी म्हणाल्या, त्यावर एक पथ्य आहे. आपापसातील मतभेद बाजूला ठेवता आले पाहिजेत. एकमेकांला समजून घेणे हे फार महत्वाचे. सर्वगुण संपन्न उपजताच कोणी नसतो. पण प्रयत्न केला तर तसे होता येते.

     विलास म्हणाला, तो नेमका प्रयत्नाचा मार्ग सांगा, आम्ही तो अंगीकारू. त्याच मार्गाने जाऊ.

     आजी म्हणाल्या, हाच तो मार्ग, जो गेला महिनाभर तुम्ही हाताळता आहातच. आजींनी ओवी दाखवली, विलासने वाचली... सकळामधें विशेष श्रवण | श्रवणाहून थोर मनन | मननें होय समाधान | बहुत जनाचें ||१९-२-२२||श्रीराम||

     विलासनेच अर्थ सांगितला, सर्व उपायात श्रेष्ठ उपाय श्रवण. संत वचनांच्या श्रवणाने उत्तम गुण अधिकच वाढीला लागतात. दुसरा फायदा असा की ज्यांच्यात मिसळून काम करायचे त्यांचे समाधान व्हायला हवे. आपल्यातील चांगल्या गुणांनी ते समाधान त्यांना प्राप्त करून देता येते. त्यातून आपल्यालाही आनंद मिळतो. तसं वागतील तर सारेच भाग्यवान होतील.

     आजी म्हणाल्या, भाग्यवान व्हावे असे साऱ्यांनाच वाटत असते. पण मार्ग सापडत नाही. कळत वा नकळत पाप कर्मे केली जातात.

     मधू म्हणाला, कुकर्माने पैसा मिळवला, चांगला विनियोग करून चांगला उद्योग सुरू करून पापकर्म सोडून देता येणार नाही कां?’

     आजी म्हणाल्या, नाही! एक खोटे पचवण्यासाठी १० वेळा खोटे बोलावे लागते. म्हणून पापापासून पुन्हा पापच घडते. करंट्याचे वर्णन समर्थ असेच करतात.... पापाकरितां दरिद्र प्राप्त | दरिद्रें होये पापसंचित | ऐसेंचि होत जात | क्षणक्षणां ||१९-३-२||श्रीराम||

     आजी म्हणाल्या, वाईट मार्गातल्या पैशाने सत्कर्म करावेसे वाटणार नाही. पापाचा पैसा व्यसनातच जातो. वित्त हानी होते. शेवटी अन्नान दशा होते. दारिद्र्य घालविण्यासाठी पुन्हा पापच. अशी साखळीच सुरू होते. त्याची घसरण पण समर्थांनी छान वर्णन केली आहे. जया तू वाच. आजींनी ओवी दाखवली... हारवी सांडी पाडी फोडी | विसरे चुके नाना खोडी | भल्याचे  संगतीची  आवडी  |  कदापी नाहीं ||१९-३-७||श्रीराम||

     जया म्हणाली, हे हरवे, विसरे, सांडी, फोडी हे तर माझ्या हातून नेहमीच घडतं. आई तर मला धांदरट म्ह्णते. असं करू नये हे सांगण्याकरीता मला ओवी वाचायला दिली कां? अर्थ मुळीच कठीण नाही. काम करतांना चित्त स्वस्थ नसते. घाई गडबड म्हणून हे असे होते. हे आत्ता मला कळलं. त्याने नुकसान होते. नुकसाने हेच दारिद्र्य. मी तर म्हणते पैशाचे दारिद्र परवडले, भीक तरी मागता येईल. विचाराचे दारिद्र नको. आचाराचे दारिद्र नको.

     आजी म्हणाल्या, घाबरू नकोस! ते येणार नाही! कारण सद्ग्रंथ वाचनाची गोडी लागलीय. चूक कळण्या इतकी जाण आलीय. वाईट संगत कळू लागलीय. म्हणजे पाया पक्का होऊ लागला आहे. पाया पक्का तर इमारत पक्की... राखावीं बहुतांची अंतरें | भाग्य येतें तदनंतरें | ऐसीं हें विवेकाचीं उत्तरें | ऐकणार नाहीं ||१९-३-१८||श्रीराम||

     दरिद्री माणसाला भाग्य हवे असते. पण विवेक नसतो.

     आजी! अशांना शहाणे करण्याचा कारखाना आमचे विलासराव काढणार आहेत. गणपती म्हणाला.

     विलास म्हणाला, आजी! तुमचे आशिर्वाद पाठीशी असतील तर गाढवाचे घोडे करायचा कारखाना उघडीन. परवाच्या मारामारी पासून मी पक्का प्लॅन आखतोय. गणपतीने आत्ता उगाच स्फोट केला. मी एकदम उद्घाटनानाला तुम्हाला बोलवणार होतो. गणपतीच्या पाठीत धपका बसलाच.

     आजी म्हणाल्या, मारूतीराय पाठीशी आहे. कराल! सुंदर काम कराल! पण घाई नको. घरांतील वडील माणसांची संमती घ्या. चोरून लपून गुपचूप नको. म्हणजे भलताच प्रसंग उद्भवणार नाही. सुधा हे वाच.... झिजल्यावांचुनी कीर्ति कैंची | मान्यता नव्हे कीं फुकाची | जिकडे तिकडे होते चीची | अवलक्षणें ||१९-३-२४||श्रीराम||

     कुलक्षणे जात नाहीत तो पर्यंत छी: थू होते.’ आजी म्हणाल्या. शरीराने, मनाने, धनाने समाजाकरीता झिजावे. मगच कीर्ती वाढते, लोक वाखाणतात. पडेल तो शब्द झेलतात. कामाचा म्हणजे कार्याचा वाढावा होतो. त्यासाठी पथ्य.... याकारणें अवगुण त्यागावे | उत्तम गुण समजोन घ्यावें | तेणें मनासारिखें फावे| सकळ कांहीं ||१९-३-३०||श्रीराम||

     जितक्या प्रमाणात सद्गुण वाढीस लागतील, तेव्हा शुध्द मनांत शुध्द कर्मांचा संकल्प. भगवंताला मनांत घट्ट धरून ठेवा. अंहकार वाढणार नाही. कर्तेपण चिकटून घेतले नाही की आपोआपच काम होईल... नाना उत्तम गुण सत्पात्र | तेचि मनुष्य जगमित्र | प्रगट कीर्ती स्वतंत्र | पराधेन नाहीं ||१९-४-||श्रीराम||

     बाळांनो! असा गुणवंत जो होतो, जगमित्र होण्यासाठी एकदम अमेरीकेत नको जायला! गल्लीत, गावात,  भागांत मित्र परिवार वाढवावा. सत्कर्म करून माहित व्हायला हवं. गुन्हेगाराचे नांव सर्वतोमुखी असते, पण अपकीर्ती! म्हणून कार्यकर्त्याने काय करावे?’ राखे सकळांचें अंतर | उदंड करी पाठांतर | नेमस्तपणाचा  विसर | पडणार नाहीं ||१९-४-७||श्रीराम||

     बाळांनो! पाठांतर म्हणजे नुसत्या शालेय कविता नव्हेत, किंवा गणितातले आडाखे नव्हेत. संत वचने, ग्रंथ निरूपणांला उत्तम भाग पाठ असेल तर बोलण्यांत त्याचा उपयोग करता येतो. भोवतालच्या लोकांवर त्याचा चांगला परिणाम होतो... उत्तम गुणें श्रृंघारला | तो बहुतांमधें शोभला | प्रगट प्रतापें उगवला | मार्तंड जैसा ||१९-४-१५||श्रीराम||

     सूर्यप्रकाशामध्ये तो उठून दिसतो. परमार्थातले खरे वर्म ध्यानांत आले कां?’ दुसऱ्याच्या दुःखें दुखवे | दुसऱ्याच्या सुखें सुखावे | आवघेचि  सुखी  असावे  |  ऐसी वासना  ||१९-४-२३||श्रीराम||

     जगदीश्वराच्या उत्कृष्ठ सेवेची वासना वाढीस लागो. ही मारूतीरायाला प्रार्थना करते. मात्र एक करायचं!’

            काय ते सांगा. आम्ही करू!’ गणपती म्हणाला.

     दुसरे तिसरं कांहीच नाही. कठीण नाही. समर्थांची शिकवण लक्षांत ठेवायची. तस्संच वागायचं, आजी म्हणाल्या.... देह मुळींच केला वाव | तरी भजनास कैंचा ठाव | म्हणोन  भजनाचा  उपाव  |  देह्यात्मयोगें  ||१९-५-||श्रीराम||

     देहाची हेळसांड करून चालणार नाही. देहाला वाजवीपेक्षा महत्व नको. केसांची निगा जरूर राखावी. तेल लावायलाच हवे. पण कामिनी ऑईलच हवं हा हट्ट नको.

     विलासचा हात डोक्यावरून फिलला. हळूच वास घेतला. आजी! मी हेच तेल लावले हे तुम्ही कसे ओळखले? आता मी साधे तेल पारीत जाईन. महागड्या बाटलीचे पैसे....

     गाढवाचे घोडे कारखान्याला!’ गणपतीने वाक्य पूर्ण केले. सारेच हसले. आपण सगळेच लक्षांत ठेवू या. आजी म्हणाल्या. साधी रहाणी उच्च विचारसरणी.... कर्तुत्व वेगळें करावें | मग त्या देवासी पाहावें | तरीच कांहींयेक पडे ठावें | गोप्यगुह्य  ||१९-५-२४||श्रीराम||

     मी कर्ता हा भाव बाजूला ठेवून कर्म केले की भगवंताचा खरा पत्ता आपल्याला लागतो व त्याचा महिमा लक्षांत येतो. देवाची व आपली सदैव भेटी. त्याच्या ह्रदयांत आपण व आपल्या ह्रदयांत तो. सर्वांनी टाळ्या वाजवल्या.

 

।। जय जय रघूवीर समर्थ ।।

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा