सोमवार, ३० नोव्हेंबर, २०२०

पडवीवरचा दासबोध, दिवस १६ वा

 

।।श्रीराम।।

पडवीवरचा दासबोध

लेखिका- आशालता उर्फ आक्का वेलणकर

दिवस १६ वा

            मधुकर, गणपती, विलास जरा लवकरच जमले. पण शिस्त पाळायची म्हणून वाड्याच्या बाहेरच, सावलीत थांबले.

     मधू! काल तू म्हणालास आपण सारे त्याचेच. विलासने विचारले. मान्य आहे. पण बघ, मी आईचा. आई माझ्यावर प्रेम करते. मला खायला देते. मी बाबांचा. बाबा माझे. ते मला पैसे पुरवतात. माझे लाड करतात. मला खेळ आणून देतात. तसा देव जर आपला व आपण देवाचे तर देव आपले लाड कां करत नाही? आपल्यावर प्रेम का करत नाही?’

     मधुकर म्हणाला, करतो तर! हे बघ त्याने आपल्याला किती सुंदर शरीर दिले आहे. त्या शरीराला नाक, कान, डोळे, तोंड, हातपाय दिले ही त्याचीच कृपा. रात्री आपण झोपतो. रात्रभर तो श्वास चालवतो. हे त्याचे आपल्यावर प्रेम आहे म्हणूनच नां? बाबा खेळ देतात. तसे आपल्या भोवती बघ केवढे सुंदर खेळच खेळ दिले आहेत. त्याच्याकडे कसे जायचे. त्याला कसे पहायचे. हे आजींच्याकडून शिकू या आपण. चल सुधा व जया पण आलीच. सगळे एकदम पडवीवर जमले.

     आजींना पण आनंद झाला. या बाळांनो! तुम्ही किती ओढीने नी गोडीने येता, ही अभ्यासाची गोडी हं! तुम्हाला पाहिले की अगदी राम कृष्ण भेटल्याचा आनंद होतो मला. बसा!’

     एकमेकांना नमस्कार करून सर्व बसले.

     मधुकर म्हणाला, आजी! आमची शंका अशी आहे की, तो मोठा देव आपल्या जर ह्रदयांत आहे तर त्याचे दर्शन का होत नाही? म्हणजे तो दिसत कसा नाही? आणि त्याचे आपल्यावर आई वडिलांप्रमाणे प्रेम आहे हे दिसल्याशिवाय कळावे कसे?’

     आजी म्हणाल्या, छान विचारलेस! उन्हात खेळायच्या ऐवजी आपण समर्थांचा दासबोध अभ्यासूया असे मी सुचवले बरोबर नां?’

     सर्वांनी माना डोलावल्या.

     आजी म्हणाल्या, सगळे जमू लागलात. मनाच्या ओढीने आपण समर्थांच्या समर्थ विचारांच्या सान्निध्यात असतो. हाच सत्संग. सत्संग घडणे, ज्ञानात वाढ होणे हाच भगवंताकडून मिळालेला खाऊ म्हणजेच प्रसाद आहे.

     आता त्या ज्ञानाला आत साठविण्याची काळजी तोच घेतोय. त्याने आपल्याला ऐकण्यासाठी कान, पहाण्यासाठी डोळे, बोलण्यासाठी तोंड दिले. एवढे देऊनही तो थांबला नाही. जे ऐकले, जे पाहीले ते आठवावे व बोलता यावे यासाठी बुध्दी दिली. आई बाबांना सुध्दा करता येणार नाही असे त्याचे प्रेम आहे बरं! जगात सगळ्या गोष्टी पैशान घेता येतील. मिळवता येतील. पण ही जी जाणीव शक्ती भगवंताने दिली आहे ती कोणत्याही बाजारात मिळणार नाही. म्हणून आता आपण काय करायचे?’

     मन लावून अभ्यास करायचा. गणपती म्हणाला.

     एकाग्र चित्ताने ऐकायचे. मधुकर म्हणाला.

     होय! बरोबर आहे, आजी म्हणाल्या. समर्थ बघ काय म्हणतात ते... अर्थांतर पाहिल्यावीण | उगेंचि करी जो श्रवण | तो श्रोता नव्हे पाषण | मनुष्यवेषें ||८-६-||श्रीराम।।

     आपण काय ऐकले? त्याचा भावार्थ लक्षांत ठेवून अभ्यास करावा. पण तो सगळ्यांनाच नाही जमत. कारण? गणपती तूच वाच ओवी.... दुश्चीतपणें नव्हे साधन | दुश्चीतपणें न घडे भजन | दुश्चीतपणें नव्हे ज्ञान | साधकांसी ||८-६-२२||श्रीराम।।

     छान! आलं ना लक्षांत?’ आजी म्हणाल्या, चित्त एकाग्र नसेल तर अभ्यास होणार नाही. झाला तरी लक्षांत काही रहाणार नाही. मग ज्ञान तरी कसे होणार? ज्ञान म्हणजे?’

     विलास म्हणाला, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. ऐकायची आवड आहे. मग आजी! चित्त ऐकाण्याकडे का न लागावं?’

     विलास! ही ओवीच सांगते बघं. आजी म्हणाल्या. विलासने ओवी वाचली... आळसें नित्यनेम राहिला | आळसें अभ्यास बुडाला | आळसें  आळस  वाढला  |  असंभाव्य  ||८-६-३२|| श्रीराम।।

     अगदी खरयं आजी! दररोज दुपारची शाळा असते. पण शनिवारी सकाळी असते. लवकर उठायचा आळस येतो. मग शाळेची घंटा होईल म्हणून आंघोळीचा आळस येतो. सगळेच काम बिघडते. विलास म्हणाला.

     बाळांनो! हे लक्षांत घेऊनच समर्थ सांगतात बघा. आजी म्हणाल्या, जया, तू वाच ओवी. निद्रा आळस दुश्चीतपण | हेंचि मूर्खाचें लक्षण | येणेंकरिता  निरूपण|  उमजेचिना ||८-६-३६||श्रीराम।।

     आजी! या तीन गोष्टींपासून जर आपण दूर राहिलो तर ह्रदयस्थ देवाची भेट नक्की होईल कां?’ जयाने शंका विचारली.

     शंकाच नको. आजी म्हणाल्या. आळस, झोप व दुश्चित्तपणा ज्याचे जवळ नाही त्याचे हातून पुण्यकर्म म्हणजे चांगलेच कर्म घडणार. पाप कर्म घडणारच नाही. पापाचे फळ...

     विलास म्हणाला, थांबा आजी! पापाचे फळ ते दु:ख पुण्याचे फळ ते सुख.

     आणि पुढे?’ आजी म्हणाल्या, आता तुम्हीच सांगा. विलास म्हणाला. सगळेच हसले. आजी पण हसण्यांत सामिल झाल्या. पापाचें फळ तें दुःख | आणी पुण्याचें फळ तें सुख | पापपुण्य अवश्यक | भोगणें लागे ||८-७-|| श्रीराम।।

     आणि गंमत अशी की..... पापपुण्य  समता  घडे  |  तरीच  नरदेह  जोडे| येरवीं हा जन्म न घडे | हें व्यासवचन भागवतीं ||८-७-२१||श्रीराम।।

     मागच्या अनेकानेक जन्मातील पापपुण्य समान झाले की, हा सुबक नरदेह मिळतो. पांच ज्ञानेंद्रीये, पाच कर्मेंद्रीये पण देहाला प्राप्त झाली आहेत.

     मी सांगतो ज्ञानेंद्रीयांची नांवे.’ गणपती म्हणाला, डोळे, नाक, कान, जीभ, त्वचा.

     मी कर्मेंद्रीये सांगते, सुधा म्हणाली, हस्त म्हणजे हात, पाद म्हणजे पाय, वाणी म्हणजे जीभ, आणि .... आणि...

     मधु म्हणाला, शिस्न.

     आजी म्हणाल्या, बरोबर! या दहांचा चांगला उपयोग करून घेतला की आत्मदर्शन झालेच म्हणून समजा. मधू वाच तू.... देवास वोळखों जातां | तेथें जाली तद्रूपता | देवभक्तविभक्तता | मुळींच नाहीं ||८-८-१५||श्रीराम।।

     ठिक!’ आजी म्हणाल्या. लहान बालकाने, आई! आई!! म्हणून आक्रोश करावा. आईचा शोध घ्यावा व आई सापडल्यावर आईच्या मांडीवर विसावावे. आईला घट्ट धरून तिच्या कुशीत शिरावे. मग त्याला तहान नाही. भूक नाही. आई मिळाली. पूर्ण समाधान. आईशी एकरूपता. तसा भक्त भगवंताचा मनापासून शोध घेऊ लागला तर त्याच्याशी एकरूपता सहजच येईल. मग आनंदच आनंद. समाधान भंग पावत नाही. दु:खाचा वारा शिवतच नाही.

     आजी! तुम्ही बोलता न, विलास म्हणाला, तेव्हा अगदी असं वाटतं की खरचं आपल्याला देव भेटलाच. पण घरी गेलं की.....

     सुधा म्हणाली, विसरायला होत कां?’

     विलास म्हणाला, विसरायला होत नाही. पण शंकाच शंका, कां? केव्हा? कस? केव्हा आजींना विचारू अस होते.

     आजी हसल्या, विलास! आत्ता आपण अभ्यास करतोय. अभ्यास पूर्णत्वाला गेला, अनुभव येऊ लागला की तू पार बदललास असे तुझं तुलाच कळेल. समर्थ म्हणतात, प्राप्त जालियां आत्मज्ञान | तैसें दृश्य देहभान | दृष्टीं पडतां समाधान| जाणार  नाही  ||८-८-४२||श्रीराम।।

     आत्मज्ञान होणे हीच भगवंताची कृपा. ज्ञान झाल्यावर समाधान कायम टिकणे हाच त्याच्या प्रेमाचा अनुभव. बरं कां विलास. असा अनुभव ज्यांना सतत येतो. त्यांना म्हणतात सिध्द.

     आजी! आता आपण कोण? आपण म्हणजे मी कोण?’ विलासने विचारले.

     सारखी शंका विचारतोस नां? मग तू सध्या बध्दच!’ गणपती म्हणाला.

     त्याला हिणवू नकोस रे. सुधा समजावणीच्या सुरांत म्हणाली. विलास! आपण ज्ञानाची इच्छा करीत अभ्यास करीत आहोत, म्हणून आपण मुमुक्षु.

     पण आजी! जया म्हणाली. श्रवण करीत आहोत, नाम घेत आहोत. स्तोत्र म्हणत आहोत. शंका विचारून ज्ञान वाढवीत आहोत. म्हणजे आपण साधक आहोत असे म्हणायला काय हरकत आहे?’

     शाब्बास!’ विलास म्हणाला, जया म्हणते बरोबर. आता आपण साधकाचे सिध्द व्हायचे बस्सं.

     मधुकर म्हणाला, निदान आज आजी पुढे काय सांगतात ते ऐकायला सिध्द होऊ या. मग खरी सिध्दावस्था येईल तेव्हा येवो.

     आजी हसल्या, मधू! विलास!’ संदेहरहीत साधन | तेचि सिद्धाचे लक्षण| अंतर्बाह्य  समाधान  |  चळेना ऐसें ||८-९-१३||श्रीराम।।  

     शंका आणि संशय यात फरक आहे. शंकांचे निरसन झाले की ज्ञान दृढ होते. संशयाने मन दोलायमान होते. निश्चय ढळतो म्हणून संशय रहित साधना करायला हवी. मधुकर ही पुढची ओवी वाच. अभ्यासाचा मुगुटमणी | वृत्ती राहावी निर्गुणीं| संतसंगें  निरूपणीं  |  स्थिती  बाणे  ||८-९-२१||श्रीराम।।

     बस्सं! आजी हाच अभ्यास पक्का हवा. मनांत विचारपण ब्रह्माचेच असावेत. बुध्दीने सद्ग्रंथातील ज्ञान ग्रहण करावे. चित्ताने परमेश्वराचे चिंतन करावे. संतांच्या संगतीत नेहमी रहाता यावे. श्रवण घडावे ही सदैव इच्छा असावी मग नक्कीच साधेल. मधुकर म्हणाला.

     आजी म्हणाल्या, मारूतीराय पाठीशी असल्यावर तो खंड पडू देणार नाही. ही शक्ती पाठीशी असावी म्हणून सगुण उपासना.

     ज्ञान मिळवता मिळवता कोणी म्हणतात, कशाला रोज रोज उपासना करा. गुरूवारी भजन म्हणू झालं. पोट लागलंय नां पाठीला. ती  सोय आधी पहायला हवी. कोणी म्हणतात, पुण्य असेल पाठीशी तरच नाम येईल नां मुखातून? आणि आत्तापासून कशाला नामस्मरण करां? अंतकाळी मुखांत नाम आले की साधले.

     कोणी म्हणतात, कशाला हवा देवधर्म? कशाला करा तीर्थ यात्रा? भक्त पुंडलीकाने आई वडिलांची सेवा केली. श्रेष्ठ ठरला. कशाला हवेत दुसरे देव? किती विचारांचा गोंधळ हा! जितकी माणसे तितके विचार!’

     या विचार वादळांत सापडलो की करीत असलेली साधना पण बंद पडायची भीती. विलास! त्याच वेळी कृपाळू देव माऊली प्रमाणे धावून येतो. भक्ताला पडता पडता सावरतो. हाताशी धरून योग्य मार्गाला लावतो.

     विलास म्हणाला, तेच! तेच मला विचारायचं आहे! हा भगवंत पडणाऱ्याला सावरतो, उभा करतो, मार्गी लावतो, पण पुन्हा बाजूला का जातो? एकदम पोटाशी धरून आपल्यातच का मिळवून घेत नाही?’

     आजी म्हणाल्या, हे बघ विलास! तुला आत्ता सातवीत इंग्रजीत साठ, गणितात सत्तर.....

     नाही आजी! इंग्रजीत ८५, सायन्स ९० इतर विषयांत ७५चे पुढेच मार्क आहेत पण गणोबाच का गचकतो. जेम तेम ५० विलास म्हणाला.

     ते राहो! माझे आकडे चुकले असतील. आजी म्हणाल्या, पण मला असं म्हणायचं आहे की इतके चांगले गुण असल्याव एकदम बी. ए. पास कां म्हणत नाहीत? सातवीतून आठवीत, आठवीतून नववी करायलाच हवं नां? म्हणजेच थोडा थोडा अभ्यास वाढवून पुढे जाणे योग्य. होय नां? तस्संच परमार्थात आहे बघं! साधकाची प्रगती त्याच्या कुवतीप्रमाणे हळू हळू होऊन तो एकरूपतेस पात्र झाला की भगवंताला हाक मारावीच लागत नाही.

     गणपतीने विचारले, पण अशी अवस्था येईपर्यंत काय करावे?’

     तूच वाच ओवी. आजी म्हणाल्या.....संतवचनीं ठेवितां भाव | तोचि शुद्ध स्वानुभव | मनाचा तैसाच स्वभाव | आपण वस्तु ||८-१०-७७||श्रीराम||

     छान!’ आजी म्हणाल्या, एक निष्ठेने संतांच्या वचनावर विश्वास ठेवावा. तसे आचरण करावे. मग स्वरुपानुभव येऊ लागतो. मन पालटत जाते. आपले अज्ञानाचे वागणे बदलते. आपण परब्रह्मरूप आहोत हा मनाला पडताळा येतो. मग आपण काय, सगळे दृष्यच परमात्मरूप दिसते.

     विलास म्हणाला, हे विश्वची माझे घर असे संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. तसे आपल्याला पण ठासून म्हणता येईल कां?’

     कां नाही? आजी म्हणाल्या. नुसत्या म्हणण्यापेक्षा तसे वागता येईल म्हण. हेच पूर्ण ऐक्य. हेच खरे समाधान. हात खरा आनंद. हे खरे वैभव बरं!’

     बस्स! आपण ते मिळवणारच! सगळे एकदमच वैभव शिखरावर जाऊ! मग आनंदाचे डोही आनंद तरंग!

     आजी म्हणाल्या, छान! यशस्वी व्हालं!”

।। जय जय रघूवीर समर्थ ।।

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा