बुधवार, ३० डिसेंबर, २०२०

स्वयंपाकघरातील दासबोध, प्रस्तावना

 

।। श्रीराम ।।

सप्रेम नमस्कार,

     मी अनिल वाकणकर, आपणासमोर सद्गुरू परमपूज्य आक्का वेलणकर यांच्या सिध्दहस्त लेखणीतून साकार झालेल्या स्वयंपाकघरातील दासबोध या ग्रंथाचे भाग सादर करताना मला खूप आनंद होत आहे. श्रीमत् ग्रंथराज दासबोध हा रत्नाकर आहे. त्यातील वेचक रत्ने प. पू. आक्कांनी आपल्याकरीता वेचून आपल्यापुढे ठेवली आहेत. आजी आजोबा आणि नातवंडे यांचे एक वेगळेच जग असते. नातवंडे ही दुधावरची साय असते. ती खराब व्हावी, नासून जावी असे कुठल्याच आजी आजोबांना वाटत नाही. उलट ती दुधापेक्षा जास्त उपयुक्त व्हावी असेच वाटत असते.

     आपल्या नातवंडांना न दुखवता त्यांच्या कलाने घेऊन त्यांच्यावर चांगले संस्कार करण्याचे काम आजी आजोबा करीत असतात. ते कसे खुबीने करता येते याचे दिग्दर्शन प. पू. आक्कांनी या ग्रंथात केले आहे. आक्कांनी त्यांचे हा ग्रंथ लिहिण्याचे मनोगत या ग्रंथाच्या प्रस्तावनेत केले आहे. ते पुढील प्रमाणे आहे.

     (आज काल जेथे जावे तेथे हेच ऐकू येते. आक्का! आता तुम्ही तरी मुलांना काही सांगा, ऐकतच नाहीत. संस्कार वर्गात नावे घातली आहेत. जातात आठवड्यातून एकदा तासभर, पण काही उपयोग नाही. संस्कार!  संस्कार, हा वर्गातल्या घोकंपट्टीचा विचार नाही. रोजच्या व्यवहारात हसत खेळत वेळच्या वेळी मुलांची चूक त्यांच्या लक्षांत आणून द्यावी. योग्य ती सुधारणा तेव्हाच करवून घ्यावी. मुलांना पटलं की चांगला संस्कार आपोआप पक्का होतो. प.पू. गुरूदेवांची कृपा. प्रेरणा त्यांचीच, स्वयंपाकघरातील दासबोध हेच पटविण्यासाठी लिहावेसे वाटले. प्रेरणा कार्यान्विन त्यांनीच करवून घेतली. त्यांचेच चरणी अर्पण करते.

आशालता वेलणकर, अंबरनाथ.)

     अशा या ग्रंथाचे एकूण सात भाग आहेत. ते दररोज आपल्या समोर सादर करणार आहे. ही सद्गुरू सेवा सद्गुरू आक्कांच्याच चरणी समर्पण.

अनिल अनंत वाकणकर.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

स्वयंपाकघरातील दासबोध, भाग पहिला, रविवार

 

।। श्रीराम ।।

स्वयंपाकघरातील दासबोध

लेखिका- आशालता उर्फ आक्का वेलणकर

रविवार

     गोविंदरावांचे बंगलेवजा घर. नव्या जुन्याची सांगड घातली होती. बंगल्यासमोर छोटाच बगीचा. कण्हेर, जास्वंद पंचपाकळी, नेवाळी, मोगरा अशी मोजकीच झाडे समोरच्या बाजूला लावली होती. लिंबू, शेवगा, पेरू, बेल ही झाडे मागच्या अंगणात होती. पाणथळ भागात थोडा आळू व कर्दळी पण होत्या. कर्दळीच्या मोठ्या पानांचा फराळासाठी ताटल्यां ऐवजी उपयोग करीत असत. देवाच्या पूजेला फुलेही भरपूर असत.

     दाराशी राधाबाई उभ्या होत्या. तिघेही फाटक उघडून आत आले. चाणाक्ष मिलिंदने आजोबांचा हात सोडला. फाटक बंद केले. मीनलने आजोबांचा डावा हात सोडला आणि उजवा हात धरला.

     गुद्दागुद्दीला विषय मिळाला. मी एक तू दोन झालेच गुद्दे. मिलिंदची तक्रार तिची युक्ती तुझ्या लक्षांत नाही आली? ती त्या बाजूला कां गेली? आजी दाराच्या त्या बाजूला आहे नां? तिला आधी ही भेटणार, वा रे वा! मी नाही चालू देणार!

            आजोबा मिलिंदच्या कानाशी कुजबुजले आणि आजोबा वाकले. काय झाले आजोबा? मीनलने विचारले.

     थांब, बुटात खडा गेला गं! त्यांनी हात सोडवला आणि नसलेला खडा बाहेर काढला, तो पर्यंत मिलिंदने हात बदलला.

     बाळांनो! आपण आजीला एकदम भेटू. तुम्ही गळाभेट कंबरभेट घ्या, आणि मी?’ आजोबा म्हणाले.

     राधाबाई मिश्किलपणे हसल्या. त्यांनी खूणेनेच सांगितले, दृष्टीभेट!’ गोविंदराव खळखळून हसले. राधे गोविंद गोविंद राधे.

     मुले आजीला कडकडून भेटली. आजी म्हणाली, चला आत तरी जाऊ या! हातपाय धुवा आता सात दिवस राहणार आहात नां? चला आंत.

     घर बांधताना विचारपूर्वक बांधलं होत, अग्नीची दिशा अग्नेय, त्या दिशेला स्वयंपाकाचा ओटा होता. पश्चिम वरूणाची दिशा म्हणून माठ व साठवणीची पाण्याची भांडी त्याच दिशेला होती. उत्तर दिशेकडून वारा खेळत होता. अमोरा समोर दारे खिडक्या त्यामुळे हवा छान खेळत होती.

     दिवाणखाना स्वतंत्र ऐसपैस, मधली खोली व स्वयंपाक घर यामध्ये फळ्यांची काढघालीची भिंत होती. आपले तोंड पूर्वेला येईल असे देवघर होते. आटोपशीर स्वच्छ व सुंदर.

     उच्च स्थानी टाभराची कृष्णाची मूर्ती. त्याखाली पायऱ्या. पायऱ्यांवर महादेव, गणपती, देवीची मूर्ती होती. भिंतीला सद्गुरूंचा फोटो होता. मंदसा नंदादीप तेवत होता. जवळच एक आरामखुर्ची व एक स्टूल होते. त्यावर दासबोध ग्रंथ होता. 

     हातपाय धुवून गोविंदराव आराम खुर्चीत बसले व दासबोध वाचू लागले. तेथून स्वयंपाकघराकडे सहज बघता येई व वारा पण लागे. आज नातवंडांना आणायचे म्हणून पूजा झाल्यावर ते मुलाकडे गेले होते.

            मुलांना आत यायला वेळ कां लागतोय? हातपाय धुता धुता एकमेकांवर पाणी उडवण्याचा खेळ चालला होता. अरे काय करताय इतका वेळ?’ आजी म्हणाल्या.

     पाणी पंचमी चाललीय आमची!’ मिलिंदने उत्तर दिले.

     तुम्हाला हौद आवडलाय नां? आटपा लवकर, मी खायच करून ठेवलय, आज संध्याकाळी हौदात उतरा खूप डुंबा. आज रिकामाच करायचा आहे. बागेला पाणी सोडा व दुसरे स्वच्छ भरा. आता घरांत या बघू. आजी म्हणाल्या.

     खेळ आटोपला. हातपाय पुसले. पाट मांडले होते. त्यावर मीनल व मिलिंद बसले. बशीत दोन दोन लाडू होते.

     मीनलने लाडू फोडला, तोंडात टाकला एक घास. आजी पोळीचा कुस्कऱ्याचा केला न लाडू हां?’ मला आवडतो. मीनलने बोलता बोलता दोन घास खाल्ले.

     मिलिंदने बशी पुढे ढकलली. मला नको शिळ्या पोळीचा लाडू. मिलिंद फुरंगटून बसला.

     गोविंदराव खुर्चीतून उठले. दासबोधासह मिलिंदजवळ आले. आणि म्हणाले, असा रागावू नकोस, मग देवही रागावतो. पोळी कालची असली तरी साजूक तूप लावलेली पीठीसाखर घातलीय, वेलचीचा वास येतोय. पोळीचा मागमूसही लागत नाही. इतका चाळलाय कुस्करा. रव्याचाच वाटतोय. बघ कसा मस्त लागतोय. असे म्हणत आजोबांनी स्वत: एक घास घेतला आणि मिलिंदला भरवला. आहे नां छान?’

     हे बघ मधूचा, तुझ्या बाबांचा आयत्यावेळी बेत बदलला. निरोप आला की रात्री की, मुले सकाळी येतील. हिने सहा माणसांचा स्वयंपाक करून ठेवला होता. सहा जणांचे जिन्नस आम्ही दोघे कसे खाणार? पोळ्या उरल्या छान ठेवल्या.

            आजोबा!’ मिलिंदला म्ह्णाला, इथे फ्रिज नाही मग कशा झाकून ठेवल्या. फ्रिजमध्ये आठ आठ दिवस जिन्नस टिकतो.

     आजोबा म्हणाले, म्हणजे आठ दिवसाचे शिळे चव गेलेले, गारे गार पोटाला बाधक ते तू आवडीने खातोस! नि साजूक तुपाची कालची पोळी आज नको म्हणतोस?’

     आजोबा बोलत होते. त्याबरोबर घासही भरवत होते. आजोबांनी रिकाम्या भांड्यात हात धुतला. दासबोध उघडला हे बघ समर्थ वचन. आपण येथेष्ट जेवणें | उरलें तें अन्न वाटणें | परंतु वाया दवडणें | हा धर्म नव्हे ||१२-१०-१||श्रीराम|| 

     मीनल म्हणाली, आजोबा! तुम्हाला ओवीचे पान कसे बरोबर सापडलें?’ 

     अग! आम्ही रोज वाचतोना दासबोध! आजोबा म्हणाले, टदासबोध नुसता वाचायचा नसतो. त्याप्रमाणे वागायचे असते. खरे नां! आपण जेवल्यावर उरेल त्या अन्नाची नीटनेटकी विल्हेवाट लावली पाहीजे. काल हीने पोळी भाजी मोलकरणीला इथेच खायला लावली. सकाळी दोन पोरे घेऊन एक भिकारीण आली. तिला भात आमटी दिली. आमटी विटली नव्हती. चांगली उकळून गार करून ठेवली होती. तुमच्यासाठी लाडू केले.

     मीनलने शंका विचारली, आजोबा! सगळंच अन्न गाईला खायला घातलं असतं तर तिची भूक नसती का भागली? तो धर्म होणार नाही कां?’

     आजोबा म्हणाले, बरे विचारलेस! गायीचे खरे खाणे गवत. ती अन्न खाते. नाही असे नाही. पण माणसाचे खाणे तिला खायला लावून तिची प्रकृती बिघडवणे हा धर्म नव्हे. ते अधर्माचे वागणे होईल. डुकराला घाण खायला आवडते. त्याला चांगले अन्न देणे अधर्मच. त्याला आवडणारच नाही.

     मिलिंद म्हणाला, एकाला एक दुसऱ्याला दुसरे हा भेदभाव केला असे नाही का होत? आम्हाला चुट्ट या चुरम्याचे लाडू व भिकारणीला भात! मला फोडणीचा भात आवडतो.

            ते खरं!’ आजोबा म्हणाले, भिकारणीच्या पदरांत दोन तीन मुले होती. तिला भात आमटी मुलांना देऊन स्वत:लाही खाता आला. सर्वत्र भगवत् भाव असला तरी तारतम्य ठेवावे लागते. ज्याला जे योग्य ते त्याला द्यावे.

     जळीं स्थळीं काष्ठीं पाषाणीं | ऐसी वदे लोकवाणी |

तेणेंविण  रिता  प्राणी  |  येकही  नाहीं  ||७-४-४||श्रीराम||

पाण्यात भगवंत नव्हे, पाणीच भगवंत. समर्थ पाण्याला आपोनारायण म्हणतात. म्हणून पाण्याची पूजा जरूर करावी. कलशांत पाणी घालून  आपण कलशाची पूजा करतोच. पाण्याचा योग्य उपयोग केला तर तीपण पूजाच ठरते. पाणपोई घालावी. निदान कोणी पाणी मागितले तर नाही म्हणू नये. पाणी साठवून वापरास अयोग्य असे करू नये. सांडपाणीसुध्दा बागेला होईल असे करावे म्हणजे ती पाण्याची आपोनारायणाची पूजाच होईल. नदीची पूजा करून वंदन करून मगच नदीत उतरतात. पाण्याला जीवन पण म्हणतात. माणसाचे जीवन पाण्यावर अवलंबून असते.

तसेच भूमी म्हणजे पृथ्वी हे पण भगवंताचे एक रूप आहे. सडा संमार्जनाने तिची पूजा करावी. रांगोळी काढून सुशोभित करावे ही तिची पूजा. निजून उठल्याबरोबर भूमी दर्शन घेऊन आपण म्हणतोच.

समुद्रवसने देवि पर्वत स्तनमंडले ।

विष्णुपत्नि! नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे ।।

भूमीला स्पर्श करून वंदन करावे.

लाकडात म्हणजे वृक्षांत भगवंत आहेच. या कल्पनेने आपण कांही झाडांची पूजा करतो. पाहिलंत तुम्ही?’

मीनल म्हणाली, जेष्टी पोर्णिमेला बायका वडाची पूजा करतात.

आई तुळशीला रोज पाणी घालते व पूजा करते. मिलिंद म्हणाला.

आणि आजोबा! औदुंबर म्हणजे दत्तच समजतात. झाडाखाली लहानसे दत्ताचे मंदिर पण बांधतात. मिनल म्हणाली.

मिलिंद म्हणाला, आजी! मनूकाकाकडे मांदारातून गणपती तयार झाला. मांदाराची पण पूजा करतात. दसऱ्याला शमीची व आपट्याची पूजा करून त्याचीच पाने सोने म्हणून आपण वाटतो.

शाब्बास!’ आजोबा म्हणाले, खूप निरीक्षण करता हे. आनंद वाटला. सर्व ठिकाणी भगवंत वेगवेगळ्या रूपांत नटला आहे. तरी पण प्रत्येकाची आवड कांही वेगळीच असते. कोणाला देवी आवडते. कोणाला गोविंद.... होय ना गं?’ मुद्दामच राधाबाईंना विचारले.

त्या पोळ्या करता करताच म्हणाल्या, अहं! कृष्ण आवडतो.

आजोबा म्हणाले, बरं! कृष्ण तर कृष्ण! दैवते भिन्न असली तरी भक्ती भिन्न असत नाही. भाव शुध्द प्रेमाचा एकच हवा. तसे होत नाही. शैव व वैष्णव पंथावरून भांडणे होतात.  कट्टर वैष्णव दातसुध्दा आडवे घासत नाहीत. उभे घासतात, गंधही उभेच लावतात. सारवण उभेच म्हणजे उभे राहून नव्हे, सारवणाचा उभा हात फिरवतात. याचे उलट शैव, शिवाचे भक्त आडवे गंध, भस्म लावतील. स्मार्त एकादशी करतील. शंकराला रूद्राभिषेक करतील पण विष्णूचे दर्शनही घेणार नाहीत. पंथ भिन्न, मते भिन्न, मग हाणामारी. म्हणून समर्थ म्हणतात.

मीनल म्हणाली, आता पाहाते चटकन कोणते पान काढता ते!’

तोच आजीचा आवाज आला, पंधरावा दशक पहा!

हा काय आठवा समास निघाला!’ आजोबा म्हणाले, उगेंचि कासया तंडावें| मोडा अहंतेचें पुंडावें | विवेकें देवास धुंडावें | हें उत्तमोत्तम ||१५-८-४०||श्रीराम||

म्हणजे आजीला पण दासबोध येतोय, मीनल म्हणाली, कसं चटकन सांगितलं.

मीनल हीच कां ओवी काढली? माहीत आहे?’ आजी म्हणाल्या, तुम्ही एकमेकांशी भांडता नां! उगाच भांडता!

उगाच नाही भांडत!’ मिलींद म्हणाला, आजी तुला सांगतो, काल जेवता जेवता मला डास चावला, मी ताईला इथे डाव्या हाताला खाजव म्हटले तिने भलतीकडेच वर खाली खाजवले. मग मी दिला रपाटा.

तिनेही उट्टे काढले. रपाटे दोन मारले व म्हणाली, खाजव तुझ्याच हाताने माझाही डावाच हात आहे नां?’ 

आईपण रागावली, जेवताना कसले भांडता रे! या पातेल्यात हात धू. खाजवं, पुन्हा हात पूस मग जेव. मला आनंद एवढाच झाला की ताईला पण रागावून घ्यावे लागले.

आजोबा म्हणाले, मिलिंद! हे बाकी तुझे चुकलं हं. आपल्यामुळे दुसऱ्याला बोलणी बसली हा का आनंद वाटावा? हा आसूरी आनंद, खरं सांग तिचं काय चुकलं?’

तुझी आजी बघ कशी विवेकाने वागते! मी म्हटलं भाकरी कर, त्यावर ती म्हणाली, पुष्कळ दिवसांनी मुलं येताहेत, त्यांना मनापासून भाकरी आवडत नाही. पहिलेच दिवशी नाराज नको व्हायला पोळ्या करते. तुमच्या भाकरी करते. तिने दोघांनाही आनंद होईल असे केले.

काष्टी पाषाणी जर देव आहे! तर मीनलमध्ये देव नाही कां? नात्याच्या संबंधाने ती तुझी मोठी बहिण तू नेहमी माझं तेच खरं म्हणतास. तिने तुझे काम करावे असे तुला वाटते. मी मुलगा, बाबांचा, आजोबांचा लाडका. हा अहंपणा वाढतो. समर्थांची शिकवण अशी की, उत्तम काय असेल तर विवेकाने खऱ्या देवाला शोधावे.

तुझी आजी बघ कशी विवेकाने वागते. मी छोटी छोटी वांगी आणली, भऱल्या वांग्याची भाजी केली. थांब असे तोंड वाकडे करू नकोस, कोणालाच दुखवायचे नाही हे तिचे व्रत तिने तुझ्यासाठी उकडलेल्या बटाट्याची भाजी केली. सगळ्यांचा आनंद त्यात तिला आनंद. आनंद हा खरा देव तिला सापडला. आनंदा पाठोपाठ समाधान लाभतं पूर्ण समाधानी वृत्ती झाली की परम शांती अंगी बाणते.

ज्याचा स्वभाव शांत तो कोणाशीच भांडत नाही. पण इतर लोकही वाटेस जात नाहीत. भांडण उकरून काढत नाहीत. भांडण दूरच पण त्यांचेशी नम्रतेने वागतात.

आजोबा!’ मिलिंद म्हणाला, मग तो देव कुठे शोधायचा?’

आजोबा म्हणाले, शोधायला लांब नको जायला, इथेच आहे तो! बोलता बोलता आजोबांचा हात छातीशी लावलेला त्याच्या लक्षांत आले नाही.

इथेच म्हणजे या स्वयंपाकघरात आहे तो?’ मिलिंदने उत्सुकतेने विचारले. मग मला तर दिसत नाही. ते तुम्ही, ही ताई, नी ती आजी, हे देवघर, तो कृष्ण, हे समर्थ!’

आजोबा म्हणाले, आणि हा तू.

हो! हो! आणि हो मी!’ असे म्हणून त्याने आपला हात छातीला लावला.

इथेच! तू हात लावलास ना तिथेच देव रहातो!’ आजोबा म्हणाले.

आं’! म्हणजे? मला नाही कळलं. मिलिंद म्हणाला.

आजीच्या पोळ्या करून झाल्या. हात धुवून पुसत पुसतच त्या देवघरापाशी मिलिंदजवळ बसत म्हणाल्या. मिलिंद हे बघ मी सांगते.

मघाशी लाडू पाहून तू नाराज झालास. तेव्हा तुझ्या ह्रदयातल्या देवावर पाघरूण घातलेले होते. पण ह्यांनी काय जादू केली. जादू दासबोधाची.

काल तुम्ही चौघेजण जेवायला इक़डेच येणार होतात. पण ते आयत्यावेळी रद्द झाले. अन्न वाया जाईल इतके झाले. ह्रदयातला देव जागा आहे म्हणून न रागावता कोणाला काय द्यायचे ते एकविचाराने ठरले.

पोळ्या पण भिकारणीला दे, ते म्हणाले होते. पण मीनलला चुरम्याचे लाडू आवडतात हे मला माहित होते, म्हणून मी थोड्या पोळ्या मोलकरणीला देऊन बाकीच्याचे लाडू केले.

त्यांच्यातला देव जागा झाला. बोलता बोलता एक घास खाऊन तुला एक घास भरवला. आजोबांनी घास भरवला हा खरा आनंद तुला झाला. खरं सांग मोठा झालास तरी आईने भरवावे, हात खराब नको व्हायला असे अजून तुला वाटते नां?’

मिलिंदने टाळी वाजवली. मान डोलावली. ताईने लाडोबा म्हणून चापटी मारली.

आजी म्हणाल्या, बघ! त्या आनंदामुळे बोलता बोलता लाडू संपलासुध्दा. तुला पाण्याची आठवण झाली नाही. म्हणजे तू विठोबा झालास व हे संत नामदेव महाराज झाले. देव भक्त एक झाले. आनंद समाधान याने देहभाव गेला. तुला खाऊ घालताना जनीने म्हणजेच ताईने पाहिले व मला खूणावले सुध्दा आता कसा खाल्ला?’

मिलिंद म्हणाला, माझ्या मनासारखे झाले म्हणून मला आनंद झाला. लाडूचा आनंद नाही झाला. आजोबांच्या हातचा घास हा खरा आनंद होता.

म्हणजे आवडत नाही! हे मनावरचे मळभ! त्यांच्या हातच्या लाडवाने दूर झाले. आजी म्हणाल्या, लाडू खाऊन तृप्ती इतकी झाली की पाण्याची आठवण आली नाही. खरा आनंद झाला की मनुष्य असाच समाधानी होतो. आनंद आणि समाधान ह्याच त्या ह्रदयस्थ देवाच्या दर्शनाच्या खूणा. त्यामुळे शांतीचा पण लाभ झाला.

शांती? म्हणजे ती कशी?’ मिलिंदने विचारले.

हसतच आजी म्हणाल्या, लाडोबा म्हणून मीनलने चापटी मारली. चांगला आवाज पण ऐकला मी, पण तू आनंदात होतास, समाधानात डुंबत होतास म्हणून तुझ्या लक्षांतही आले नाही. आले असले तरी रागावला नाहीस शांत राहिलास व पुढचे काय ते ऐकण्याची उत्सुकता चेहऱ्यावर होती.

इतरवेळी ही चापटी सहन झाली असती कां? तिला बुक्की मारण्यासाठी हात उगारला असतास. मग धावाधाव, पळापळ, पाडापाडी, आईचे बोलणे, रडवेले. झाली गाडी सुरू आता कसे सगळे डबे शांतपणे रूळावरच स्तब्ध आहेत.

आवडत्या माणसाच्या संगतीत सारे कसे चूपचाप. ही आवडत्या माणसांची संगत म्हणजे संत संगत. संतांचे संगतीत संतग्रंथ संगत पण साधते. दासबोधात काय सांगितले आहे. संतवचनीं ठेवितां भाव | तोचि शुद्ध स्वानुभव | मनाचा  तैसाच  स्वभाव | आपण वस्तु ||८-१०-७७||श्रीराम||

संतांच्या संगतीत श्रवण घडते. श्रवणाने मनावरचे मळभ, दोष, आवड निवड, सारे विचार शुध्द होतात. दोषांचे पांघरूण दूर होते. मग आपला स्वभावच बदलतो. गरजा कमी होतात. देव सापडतो. आनंद होतो. जीवनाचे सार्थक होते.

आत्ताच बघ मनावरचे पांघरूण थोडेसेच जरी दूर झाले तरी त्या आनंदाच्या भरांत ताईची चापटी शाबासकी मिळाली. समजलास गप्पच बसलास कारण तुझ्या आतला देव खडबडून जागा झाला. समाधान आनंद शांती हे देवाचे खरे स्वरूप त्यालाच हे म्हणाले देव इथे रहातो.

म्हणजे माझ्या ह्रदयांत देव आहे असे समजायचे कां? जर असेल तर त्या देवाला भांडाव, रागवाव असे कां वाटते?’ मिलिंदने विचारले.

नावाचां पेढा हातावर ठेवतो. कोणाच्या? या लाडोबाच्या?’ असं म्हणत आजोबांनी त्याला आपल्या मांडीवर घेतले. पापा घेतला.

आजी म्हणाल्या, पुरे! पुरे! आता नाहीतर तो पोट भरलं म्हणेल नी जेवणार नाही. स्वयंपाक तयार आहे. जेवणाची वेळही झाली आहे. वेळेवर जेवले म्हणजे बरे. भूकेच्या पोटी अन्न खाल्ले की चांगले पचते. मी केर काढते. पाट पाणी घेऊ यां.

मीनल म्हणाली, आजी! मी केर काढते.

मिलिंद म्हणाला, मी पाट मांडतो आणि पाणी घेतो. तुम्ही माझ्या शेजारी पाटावर बसा.

आणि आजोबा! हळूच एक वांग खायला लावा. मीनल म्हणाली.

आजोबांच्या हातच एक लहानसं बांगं खाईन मी!’ मिलिंद म्हणाला. आता आवडत नाही असं कधी म्हणणार नाही. थोडच खाईन पण खाईन हे मी आज शिकलो.

आजीची शाबासकी पाठीवर मिळालीच. सारेच आनंदले.

।। जय जय रघूवीर समर्थ ।।