मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२०

पडवीवरचा दासबोध, दिवस पाचवा.

 

।।श्रीराम।।

।।श्रीराम।।

पडवीवरचा दासबोध

लेखिका- आशालता उर्फ आक्का वेलणकर

दिवस पांचवा

     आज सगळे उल्हसित मनानेच आले होते. प्रत्येकाच्या हातात कागद होता. कालच्या ओवीचा अर्थ सगळ्यांनीच लिहून आणला होता. प्रत्येकाला वाटे माझा कागद आजींनी प्रथम पहावा. जो तो कागद पुढे पुढे करु पाही.

     आजी हसल्या, हे पहा आपण गंमत करु या. सगळेच स्पर्धक. सगळेच परिक्षक होऊ या. आणा कागद. सगळ्यांचे एकत्र करु या. आजींनी पत्ते पिसतात तसे कागद दोन तिन वेळा मागे पुढे केले. प्रत्येकाचे हाती एक एक कागद दिला. जयूचा गणपतीकडे गेला. गणपतीचा सुधाकडे आला. असे कागद वाटल्यावर आजी म्हणाल्या, हा निबंध नाही. साधा ओवीचा अर्थ आहे. मी सांगते तसेच नको पण जरा आसपास तसाच अर्थ आहे की नाही, हे प्रत्येकाने आपापल्या मिळालेल्या कागदावर पहायचे. शुध्द लेखनाच्या चुका बघत बसू नका. फक्त अर्थ पहा.

     सगळ्यांना आनंद झाला. सगळ्यांचाच अर्थ बरोबर होता. पुन्हा कागद ज्याचा त्याला दिला. कोणीच चुकले नव्हते. आळसही कोणी केला नव्हता. तरी गणपतीची तक्रार होती.

     आजी, विलासने पण छान लिहिले न? पण तो म्हणत होता की त्याला नीट येणार नाही. तो आज येणारच नव्हता.

     आजी म्हणाल्या, विलास! आपण सारे भगवंताचेच अंश आहोत. सर्वांना बुध्दी आहेच आहे. भगवंताचे जर अखंड स्मरण ठेवू तर आपण पुण्यवान. जर त्याला विसरुन कर्म करु तर आपण पापी.

     आपला जन्म व्हायच्या आधीच आपल्या मातेच्या उदरात असतानाच आपल्याला आपण कोण? हे ज्ञान झालेले असतेच. त्यालाच स्वस्वरुपाचे  ज्ञान असे म्हणतात. अगदी तुला मला सगळ्यांना सारखेच ज्ञान असते. पण जन्म झाल्यावर वातावरण, भोवतालची परिस्थिती बदलते. संस्काराप्रमाणे बुध्दी कोणाची जास्त विकास पावते कोणाची मंद होते. समर्थांनी स्पष्टच केलय बघ. जन्म कर्माची आटणी | जन्म पातकाची खाणी | जन्म काळाची  जाचणी  निच नवी  ||३-१-||श्रीराम||

     मागच्या जन्मी केलेल्या कर्मांचे भोग भोगण्यासाठीच हा जन्म मिळाला. भोवतालचे जग जीवाला आपल्याकडे खेचूनघेते. मग जीव सुखाच्या मागे  लागतो. देवाला विसरतो.

     विलासने विचारलेच, पण देव तर दिसत नाही. मग देवाचे स्मरण तरी कसे करायचे? व कां करायचे?’

छान! सांगते हं. आजी म्हणाल्या, तुला भूक लागते की नाही? थोडी भूक असेल तर लाडू चिवडा खातोस.पुष्कळ भूक असेल तर जेवतोस. बरोबर नां? त्यांतून तुला आनंद होतो. किती काळ टिकतो?’

     पुन्हा भूक लागेपर्यंत!’ विलासने उत्तर दिले.

     म्हणजेच खाण्याचे वा जेवणाचे सुख फार काल टिकत नाही. पुन्हा खावेसे वाटते. पण जो भगवंतात रमतो त्याची तहान भूकच हरपते.

     जीव पूर्ण सुखी व आनंदी असून जन्म घेऊन या देहात अडकतो. आणि भगवंताच्या ज्ञानाचा विसर पडतो. ही बघ ओवी.

     सुधाने दासबोध उघडलाच. जन्म सुखाचा विसर असे असेल बघ. आजी म्हणाल्या.

      सापडली, असे म्हणून सुधाने ओवी वाचली. जन्म सुखाचा विसर | जन्म चिंतेचा आगर | जन्म  वासनाविस्तार  विस्तारला  ||३-१-||श्रीराम||

     आजी म्हणाल्या, गणपती! अभ्यास झाला नाही. पेपर लिहिले. पण चांगले लिहिले गेले की नाही ही भीती. म्हणून चिंता वाटू लागली. मग काळजी जन्माला आली. मी पास होईन की नाही?’

     विलास! ओवीचा अर्थ कसा लिहावा ही भीती? त्यामुळे मला लिहिता येईल की नाही ही चिंता. पण प्रयत्न केला तर येत नां?’

     मधुकर म्हणाला, म्हणजे भीतीचे पोटीच चिंता उत्पन्न होते. मग भीतीच घालवून टाकायची. म्हणजे काळजीच करायला नको. असेच नां?’

     शाब्बास! अस्संच!” वासना म्हणजे इच्छा. इच्छा अगदी सूक्ष्म व चिकट असते. तिलाच कोणी कल्पना म्हणतात. या वासनेमुळेच जीवाला जन्म घ्यावा लागतो. तो देह धारण करतो. मातेच्या उदरात असतो तो पर्यंत म्हणतो. काय म्हणतो? गर्भीं म्हणे सोहं सोहं | बाहेरी पडतां म्हणे कोहं | ऐसा  कष्टी  जाला  बहु  गर्भवासीं  ||३-१-४७||श्रीराम||

     विलास म्हणाला, हे सोहं, सोहं काय भानगड आहे?’

            मधुकर म्हणाला, भानगड बिनगड नाही. आत्ताच आजींनी सांगितले नाही कां? जीव ईश्वराचा अंश आहे. सोहं म्हणजे मी ईश्वर आहे. कोहं म्हणजे मी कोण आहे?’

     मग सांगायच की, मी विलास आहे. मी मधुकर आहे.

     आजी हसल्या, विलास हे देहाचे नांव, देहाला ठेवलेले नांव. जीवाचे नव्ह. हे कोणाल कळते माहित आहे?’ आजींनी जयाला ओवी दाखवली. जो भगवंताचा भक्त| तो जन्मापासून मुक्त | ज्ञानबळें  विरक्त  सर्वकाळ ||३-१-५२||श्रीराम||

     विलास म्हणाला, आजी विरक्त म्हणजे जो कशात गुंतत नाही तोच नां? भगवंताचा भक्त जर गुंतत नाही तर सगळेच भगवंताचे भक्त कां होत नाहीत?’

     छान विचारलेस!’ आजी म्हणाल्या, असे विचारल्यानेच आपले अज्ञान दूर होते. आपल्याला ज्ञान होते.

     गणपती म्हणाला, त्याच्या विचारण्याने आम्हाला पण कळते.

     थांब तू मधे मधे बोलू नको. आजी सांगा, सगळेच कां भक्त होत नाहीत?’ विलासने विचारले.

     सांगते. आजी समजावू लागल्या. जन्माला येण्याच्या आधी मी ईश्वर आहे हे जीवाला माहित असते. पण विसरतो हे पुढे सांगितले आहेच. पुढे जरा १२-१५ दिवसांचा झाल्यापासून काय होते? सुख पावे मातेजवळी | दुरी करितांचि तळमळी| अति प्रीति  तये काळीं | मातेवरी  लागली ||३-२-१५||श्रीराम||

            प्रेमाचा विषय बदलला, माताच प्रिय वाडू लागली. कोठपर्यंत? चार मुलांच्यात मिसळण्या इतके वय होईपर्यंत. मग त्याला खाऊ, खेळणी, मित्र म्हणजे बरोबरीची मुले मुली हेच सदैव प्रिय वाटू लागले.

     बालपण दुखण्याशिवाय जात नाही. दात येणे, गोवर, कांजिण्या, खोकला, अपचन एक ना दोन! मरतो का जगतो असे होता होता औषधपाणी केले, त्याचा गुण आला. आता तो चांगला मोठा झाला.

     आजी तो म्हणजे कोण? त्याला काहीच नांव नव्हते कां?’ मधुने विचारले.

     मधू! समर्थांनी एका सामान्य माणसाचे उदाहरण दिले आहे. ती गोष्ट तुम्हाला सांगते आहे. आजी म्हणाल्या. नावच म्हणतोस तर आपण त्याला गोविंदा म्हणू. चालेल?’

     चालेल, जया म्हणाली. आजींना गोविंदा नांव फार आवडते. त्यावर आजी हसल्या.

     हं! मग काय झालं? गोविंदा मोठा झाला. लग्न ठरले. नोवरी आलियां घरा| अती हव्यास वाटे वरा | म्हणे मजसारिखा दुसरा | कोणीच नाहीं ||३-२-३९||श्रीराम||

     वारे गोविंदराव! म्हणजे आता तो बायकोवर प्रेम करु लागला. असच नां?’ गणपती म्हणाला.

     हो!’ आजी म्हणाल्या. पण पुढे दैवगती अशी की, ऐसी अंतरप्रीति जडली | सर्वस्वाची सांडी केली | तंव ते  मरोन गेली | अकस्मात  भार्या ||३-२-५८||श्रीराम||

     गणपतीच्या मांडीवर थाप मारुन विलास म्हणाला, अरेरे!

     फार वाईट झाले नाही! गणपतीने विलासच्या पाठीवर दोन चापट्या मारल्या.

     सुधाच्या, जयाच्या हे लक्षांत आले. त्या दोघी हसल्या.

     मधु म्हणाला, आजी पुढे काय झालं?’

     आजी म्हणाल्या, टकाय व्हायच? पुन्हा शुभ मंगल सावधान.ट सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या.

     तिच्या प्रेमापोटी भजन पूजन घडेना. कथा कीर्तन जाणे बंद. गोविंदराव दान धर्म कांहीच करेनासा झाला. देह व्याधींनी पीडला. चैनच चैन, कर्ज झाले. घरांत चोरी झाली. चारी बाजूंनी दु:खच दु:ख. मोठे दु:ख पाळणा हलला नाही.

     म्हणजे काय आजी? विलासने विचारले.

     आजींच्या हाताकडे बघ नां! त्याला बाळ हवे होते. ते झाले नाही. असेच नां आजी?’ गणपती म्हणाला.

     आजींनी होकारार्थी मान हलवली. खूप नवस सायास केले. उपास तापास केले. देव पावला एकदाचा. मग काय? लेंकुरें उदंड जालीं | तों ते लक्ष्मी निघोन गेली | बापडीं  भिकेसी  लागलीं  कांहीं खाया  मिळेना  ||३-४-१|| श्रीराम||

     गोविंदरावांचा खर्च खूप वाढला. मुले मोठी झाली. मुली लग्नाच्या झाल्या. मुलांची लग्ने झाली. मुलींच्या लग्नाकरिता खर्च करायला पैसा नाही. कर्जही कोणी देईना. म्हणून गोविंदराव कामधंदा बघायला दूर गांवी गेले.

     कष्ट करुन मिळवले. घरी आले तो गाठोड्यापाशी लेकरांची झटापट. बायकोचा तगादा सुरु झाला. हे आणलेत ते आम्ही खर्चाला वापरू. हे संपत नाही तो पुन्हा मिळवून आणा.

     गोविंदराव विचार करू लागले. कुठे गेले प्रेम?’ थकलास बाबा! असे म्हणायला आई तरी जवळ असायला हवी होती. कोणालाच कींव येत नाही. जातो बिचारा!  

     पुन्हा गाठोडी जमवली. परत घरी येतो तो दुष्काळ. पाऊस नाही. पीक नाही. अन्न नाही. मुले पण पटापट दुखण्याने गेली. बायकोपण अन्नान करीत उपासमारीने मेली. दोन चार मुले उरली. गोविंदराव कपाळाला हात लावून बसले.

     मग पुन्हा लग्न करायचे! विलास म्हणाला. सगळे हसले.

     आजी म्हणाल्या, तस्संच झाले. आता गोविंदराव म्हातारे झाले. बायको तरुण रुपवती. घरात सावत्रपणा वाढला. त्यामुळे भांडणे सुरु झाली. कशाला या फंदात पडलो असे झाले.

     मुलांनी वेगळे बिऱ्हाड थाटले. गोविंदरावांना घराबाहेर घालवले. तरुण बायको. म्हातारा नवरा. आता गंमत ऐका. अकस्मात धाडी  आली | कांता बंदीं धरून नेली| वस्तभावही गेली | प्राणीयाची ||३-५-२८||श्रीराम||  

     बायको मुसलमानांनी पळवली. बाटवली! किती दु:ख करणार? रड रड रडले गोविंदराव. आता गोविंदरावांना आठवले. द्रव्य नाहीं कांता नाहीं | ठाव नाहीं शक्ति नाहीं | देवा  मज  कोणीच  नाहीं  तुजवेगळें ||३-५-३४||श्रीराम|| 

     बाळांनो! आता मला सांगा!’ दिवस चांगले असताना, अंगात शक्ती असताना देवाला भजले नाही, पूजले नाही. जप जाप्य नाही. आता देव पावेल कां?’

     देह थकला. रोगांनी जोर केला. पेलाभर पाणी द्यायला पण जवळ कोणी नाही. फक्त मृत्यूने जवळ करावे तर तोही लवकर येईना.

     हालच हाल! अशी हाल अपेष्टांची पाळी  आपल्यावर येऊ नये म्हणून संत इशारा देत आहेत. कोणी नाही कोणाचे रे। सार सुखसंपत्तीचे।

     विलासने विचारले, आजी! त्या गोविंदरावांना कोणी आजी भेटल्या नाहीत कां?’

     आजी हसून म्हणाल्या, भेटल्या असतीलही. पण मनुष्य देह सुखाला लालचावला की तो कोणाचीही शिकवण मनांत धरीत नाही. कोणाला मानतच नाही. म्हणून या यातनेतून सुटावे, अशी इच्छा असेल तर समर्थ म्हणतात.....

     आजी पुढे काही बोलणार तोच जया म्हणाली, आज त्या गोविंदरावांच्या गोष्टीमळे आम्हाला वाचनच घडले नाही. मला सांगा कोणती ओवी वाचू?

     वाच! छपन्नावी वाच. आजी म्हणाल्या. फारच गोड इशारा. भगवद्भजनावांचुनी | चुकेना हे जन्मयोनी | तापत्रयांची जाचणी सांगिजेल पुढे ||३-५-५६||श्रीराम|| 

     विलासला शंका आलीच. आजी! भगवाताचे भजन केले की पुन्हा जन्म येतच नाही कां? असे असेल तर नेमके कोणते भजन करावे? आणि ते शाळाशाळातून पाठ कां करुन घेत नाहीत? दुसरच कशाला भाराभर शिकवत बसतात.

     सुधा म्हणाली, विलास! भजन म्हणजे, नुसती वन्दे मातरम्।  सारखी प्रार्थना नव्हे. सध्या या भारतात बंधूभाव नित्य असू दे मुले मुली शाळाशाळातून म्हणतातच नं? पण वर्गात आल्यावर बंधूभाव कितपत टिकतो? मारामारी भांडणे चालूच.

     विलास म्हणाला, लहान मुलेच काय मोठी माणसे पण खूप भांडतात.

     आजी म्हणाल्या, म्हणूनच आपण नेकीने वागू. भगवंताचे नित्य स्मरण, भजन म्हणजे काय? हे दासबोधातून समजावून घेऊ या. आयुष्यभर तसे वागू यां. त्यामुळे पांच घरे तरी सुधारतील की नाही?’

     नक्कीच सुधारतील. पांच घरे नाही तरी आम्ही पांचजण सुधारूच. मधू म्हणाला. आजींना आनंद झाला. सगळ्यांनी हात जोडले.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

 

 

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा