मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२०

पडवीवरचा दासबोध, दिवस सहावा.

 

।।श्रीराम।।

पडवीवरचा दासबोध

लेखिका- आशालता उर्फ आक्का वेलणकर

दिवस सहावा

     मधुकर आजींना सकाळीच सांगुन गेला. मी लवकरच येतो. पण मी आल्याशिवाय दासबोध सुरु करु नका.

     गणपती, विलास, सुधा चौघेही वेळेवर आले. मधुकरला थांबू या म्हटले तर शिस्तीचे उल्लंघन केले असे होईल. मग आजींनी युक्ती काढली.

     गणपती आज संकष्टी आहे. पुन्हा अंगारिका चतुर्थी आहे. आजी म्हणाल्या.

     अंगारिका म्हणजे काय?’ विलासने विचारले.

     मंगळवारी संकष्टी असली की त्याला अंगारिका संकष्टी म्हणतात. सुधाने खुलासा केला.

     बरोबर! तुम्ही रोज अथर्वशिर्ष म्हणता नं? बघू या बरं कोणाकोणाचे पाठ आहे ते?’ आजींनी विचारले.

     आम्ही दोघे एकदम म्हणतो. विलास म्हणाला, माझं पाठ आहे पण एकटा म्हणू लागलो की चुकतो. आम्ही दोघे रोज एकत्र म्हणतो.

     चालेल!’ आजी म्हणाल्या.

     दोघांचे म्हणून झाल्यावर, .आता आम्ही दोघी एकदमच म्हणतो. जया म्हणाली. दोघींचे म्हणून होते नाही तो मधू पळतच आला.

     स्वारी कोठे गेली होती?’ गणपतीने विचारले.

     मधुकरने घाम पुसला. सांगतो!’ मधू सांगू लागला. सकाळीच सुहासकडे गेलो होतो. तो तापाने आजारी आहे. त्याला दवाखान्यात नेले. तेथेच चार दिवस ठेवणार आहेत. त्याचेजवळ दोन तास बसलो. आजी त्याच्या घरात सगळेच कसे आजारी हो. त्याच्या लहान बहीणीच्या डोक्यांत उवा झाल्याचे निमित्त. फोड आले आहेत. औषध लावताना रडते. वडिलांच्या पायाला भेगा पडल्या आहेत. जळवात आहे म्हणे. त्यात माती शिरली आहे. पाय सुजलाय. ठणकतो सारखा. चालता येत नाही.

     सुहासची आई सगळ्यांचं करून करून दमते. त्यांना दमा सर्दी खोकला. सारखं कांही ना कांही होतच असतच. सगळेच त्रस्त. पैसा आहे पण सुख नाही.

     परस्पर दवाखान्यातुन आलास कां? पाणी पी जरा. आजी म्हणाल्या, बाळांनो! या सगळ्या भोगांना, दु:खांना काय म्हणतात माहीत आहे?’

     विलास म्हणाला, हा सगळ्यांचा भोग. दुसरं काय?’

     ते खरंच!’ आजी म्हणाल्या, समर्थ दासबोधात त्याला अध्यात्मिक ताप म्हणतात. ही बघ ओवी.

     सुधाने दासबोध उघडला. आजींनी ओवी दाखवली. देह इंद्रिय  आणी  प्राण| यांचेनि  योगें आपण | सुखदुःखें सिणे जाण | या नाव आध्यात्मिक ||३-६-१३||श्रीराम||

     यात ताप कोठे आहे?’ गणपतीने विचारले.

     आजी हसल्या. गणपती! या देहावर जे प्रतिकूल आघात होतात. त्यांना ताप म्हणतात. आत्त सुहासचा ताप म्हणजे त्याच्या शरिरातली उष्णता वाजवीपेक्षा जास्त वाढली. तोही अध्यात्मिक ताप. नाना तऱ्हेची देहाची दुखणी, यादीच करायची म्हटली तर घामोळ्या पासून गंडमाळा पर्यंत, नखुर्ड्या पासून कुष्टरोगापर्य़ंत सर्व दुखणी या अध्यात्मिक तापात येतात. पैसा असून मनुष्य दु:खीच असतो.

     यातून कोणीही मोकळा नसतो. नाही कां? जयाने शंका विचारली. काही ना काही कुरकुर असतेच प्रत्येकाची. याला कारण काय बरं?’ आजी म्हणाल्या, ऐसा आध्यात्मिक ताप | पूर्वपापाचा संताप | सांगतां  सरेना  अमूप  |  दुःखसागर ||३-६-५५||श्रीराम||

     विलास म्हणाला, पूर्व पापे म्हणजे मागील जन्मातले पाप कां? मागची सत्कर्माची फळे म्हणजे सुख आणि दुष्कर्माची फळे म्हणजे नाना दुखणी असेच नां?’

     शाब्बास!’ आजी म्हणाल्या, आता बरंच कळायला लागलं हं. कोणतेही कर्म चांगले अगर वाईट त्याचं फळ भोगावेच लागतं. बर एवढ्यानेच भागत नाही. पुढे पहा समर्थ काय म्हणतात......

     विलासने ओवी वाचली. सर्व भूतांचेनि संयोगें | सुखदुःख उपजों लागे | ताप होतां मन भंगे | या नाव आदिभूतिक ||३—७-२||श्रीराम|| 

            ही भूतं कोण?’ विलासने विचारले.

            मधुकर म्हणाला, घाबरलास कां भूताला. अरे ही झाडावरची भूते नव्हेत. सारीच हसत हसत टाळ्या वाजवू लागले.

     आजी म्हणाल्या,मुंगी पासून शिंगी पर्यंत कोणाचेही चावणे म्हणजे अधिभूतीक म्हणजेच अधिभौतिक ताप. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यांच्यापासून होणाऱ्या त्रासाला काय म्हणायचं?

     अधिभौतिक ताप. सुधाने सांगितले.

     आजी म्हणाल्या, इतकेच नव्हे तर.... हरपे विसरे आणी सांडे | नासे गाहाळे फुटे पडे | असाध्य होय कोणीकडे | या नाव आदिभूतिक ||३—७-४५||श्रीराम|| 

     वस्तू हरवतात. विसरुन रहातात. पुन्हा मिळत नाहित. नासधूस होते. कांही वस्तू गहाळ होतात, काही खाद्य पदार्थ नासतात. काही फुटतात, तुटतात. तो पण एक तापच. काही वेळेला वस्तू कोठे आहे हे माहित असते पण मिळणे दुरापास्त होते. तो पण आदिभौतिक तापच.

     विलास म्हणाला, कालच्या गोष्टीत गोविंदरावांची बायको मेली. पोरे मेली ते स्वत: खूप म्हातारे झाले. आजारी पडले. तो कोणता ताप?’

     हे बघ विलास, आजी म्हणाल्या. समर्थांनी ते पण सांगितलंय. किती सूक्ष्म निरिक्षण श्रोत्यांना वा ग्रंथ वाचकाला कोणतीच शंका राहू नये. अशी काळजी घेतलीय समर्थांनी. याला म्हणतात जन कल्याणाची तीव्र तळमळ. वाच तूच आजींनी ओवी दाखवली. बाळपणीं मरे माता | तारुण्यपणीं मरे कांता | वृद्धपणीं मृत्य सुता | या नाव आदिभूतिक ||३-७-८०||श्रीराम|| 

     अबब ८० नव्हे ८७ ओव्या. प्रत्येक ओवीत पाच पाच सहा सहा दुखण्यांची नांवे! काय मेंदू होता समर्थांचा! विलासने मान हलवीत नमस्कार केला.

     अरे एवढ्याने काय भागतय? पुढे बघ समर्थ काय म्हणतात ते. आजी म्हणाल्या. शुभाशुभ कर्मानें  जना | देहान्तीं येमयातना | स्वर्ग नर्क भोग नाना| या नाव आदिदैविक ||३-८-२||श्रीराम|| 

     आजी थांबा. गणपती म्हणाला, पहिला, देहाची दु:खे, दुखणी पाणी काय नांव? अध्यात्मिक ताप. दुसरा इतर माणसे, पशू पक्षी वनस्पती निसर्ग यांच्यापासून होणारा त्रास, आदिभौतिक आणि आता हा आदिदैविक. तीन तीन ताप. तीन डिग्री तापापेक्षा जास्तच की हो!

            होय ना बाबा!’ आजी दुजोरा देत म्हणाल्या. तरी माणूस सावध होतो आहे कां? पुन्हा गर्तेतच पडतो आहे. काय करतो तो.... ? मधुने वाचले, डोळे झांकून स्वार्थबुद्धीं | नाना अभिळाश कुबुद्धीं | वृत्ति भूमिसी  सांधी | द्रव्य दारा  पदार्थ ||३-८-६||श्रीराम||   

     हे वृत्ति भूमिसी नाही कळलं, गणपती म्हणाला.

     सांगते!’ आजी म्हणाल्या. पोट भरण्याचे मुख्य साधन जमीन म्हणजे शेती. शेती व्यवसाय करणारी माणसे स्वार्थ बुध्दीने भाऊ असो. नातलग असो वा शेजारी असो. दोघांच्या जमीनीची सीमा म्हणजे हद्द या हेतूने ठेवलले दगड दर नांगरटीला फूट फूट सरकवतात. दोन चार वर्षांत कैक एकर जमीन हडप केली जाते. मोजणी वार दर दहा बारा वर्षांनी मोजणी करतात तेव्हा हे उघडकीला येते. असे करणाऱ्यास यम यातना भोगाव्या लागतात.

     दुसऱ्याचे द्रव्य चोरणे, बायको पळवणे म्हणजे अपहरण करणे म्हणजे पापच. वस्तू लांबवणे, फसवणूक करणे म्हणजे पापच. त्याने सुध्दा यमयातना भोगाव्या लागतात.



     आजी!’ त्यांना थांबवत विलास म्हणाला. मी काल आईबरोबर ब्रह्मपिता ब्रह्मकुमारी यांचे प्रदर्शन बघायला गेलो होतो. यम यातना काय भयंकर चित्रे होती. ती जीव म्हणून एक म्हातारा दाखवला होता. शिंगे व शस्त्रे असलेले यमदूत त्याला कसा त्रास देत होते, हे त्या चित्रांत होते.

     आजी! एका चित्रांत त्याला उलटे टांगून खालून त्याच्या नाका तोंडात धूर जाईल असा तिखट धूर केला होता. दुसऱ्या चित्रांत त्याचे हात पाय एकाच वेळी सुतार लाकूड कापतो ना तसे करवतीने कापत होते. तिसऱ्या चित्रांत लोखंडी पत्रा तापवून लालबुंद केला होता. त्यावरुन त्याला त्याला सरपटत जायला लावत होते. तसा तो न गेल्यास त्याला काटेरी तारेने मारत होते. खूप चित्रे होती. मला पाहता पाहता भीतिच वाटली. खरं आहे का हो हे? त्यावेळी जीवाला मी विलास होतो. मी हे पाप केले म्हणून असे भोगावे लागते. हे आठवते कां हो?”

     विसाल अगदी रडवेला झाला. सगळेच गंभीर चेहऱ्याने बसले.

     आजी म्हणाल्या, असली पापकर्मे आपले हातून होऊ नयेत म्हणून तर भगवंताचे स्मरण करायचे. त्या चैतन्य शक्तीला साक्ष ठेवून काम केले तर आदिदैविक ताप भोगावाच लागणार नाही. आणि हे बघ यमनगरी लांब कोठे नाही. या मृत्यू लोकातच नीच योनीत जो हा त्रास भोगावा लागतो तोच यमयातनेचा प्रकार.

     हे बघ! मध मिळवण्यासाठू मोहोळ जाळतात. म्हणजे खालून जाळ करून भाजून काढणे नव्हे कां? तापलेल्या डांबरी सडकेवर बाज(खाट) आपटून ढेकूण खाली पडतात. तडफडतात आणि मरतात. हे तापलेल्या भूमीवरुन चालण्यासारखेच झाले. नाना तऱ्हेचे घाण पदार्थ खाऊनच जीवन जगणारे प्राणी आपण पहातोच. असला जन्म आपल्याला नकोच. म्हणून मृत्यू येण्यापूर्वीच देवाला आपलासा करायचा.

     पण आजी, मृत्यू केव्हा येणार हे कसे कळायचे?’ जयाने विचारले.

     बाई गं!’ आजी म्हणाल्या, हे कळत नाही हीच तर मोठी समस्या आहे! जन्म भगवंताच्या हातात. केव्हा कोठे कसा होणार हे त्यालाच माहीत. जीवाचा जन्मपण जीव जाणत नाही. तसेच मृत्यूचे. राव असो वा रंक असो. मृत्यूच्या तावडीतून कोणीच सुटत नाही. तो केव्हा, कोठे आणि कसा येणार हे पण कळत नाही. हे पण भगवंताच्या इच्छेवर. विवाह योग पण त्याच्या इच्छेनुसार.

     भगवंताच्या सतत स्मरणाचा अभ्यास जर माणूस करील तर त्याला मृत्यूचे भय वाटणार नाही. नीच योनीत जावे लागेल हे पण भय नको. पुण्यकर्मच हातून होतील. मृत्य न म्हणे थोर थोर | मृत्य न म्हणे हरीहर | मृत्य न म्हणे  अवतार|  भगवंताचे  ||३-९-४०||श्रीराम||  असे जरी आहे, तरी समर्थ दिलासा देतात. असो ऐसे सकळही गेले | परंतु येकचि राहिले | जे स्वरुपाकार  जाले  |  आत्मज्ञानी  ||३-९-५९||श्रीराम|| 

     टाळी वाजवून विलास म्हणाला, मग आजी, आपण ते स्वरुपाकार होणे म्हणजे काय? तेच वाचू या. आपल्याला मृत्यू......

     त्याला थांबवत सुधा म्हणाली, हं विलास, मृत्यू येणार नाही असे नको म्हणूस. आपली उन्नती होईल. हा देह जरी पडला तरी देव पुन्हा चांगले काम करायला चांगला देह देईल. देवाचे विस्मरण होणारच नाही.

     आजी! आई सांगत होती. एका बाईने एक माकड आणि एक कोंबडा पाळला होता. ती देवभक्त होती. ती भजन करायची तर कोंबडा आणि माकड पण नाचायचे. दोघांना मरण आलेच. पण एक राजपुत्र झाला आणि एक प्रधानपुत्र झाला. कळू लागल्यापासून ते देवाचे भजन पूजन आवडीने करायचे.

     जया म्हणाली, अगं, ती बाई म्हणजे महानंदा. छान आहे ती गोष्ट. मी वाचली. आपल्या पुस्तकाच्या संचात आहे ते पुस्तक.

     आजींनी मूळ मुद्दा जोडला. म्हणून बाळांनो, ही उदाहरणे लक्षांत ठेवून आपण शुध्द भक्ती करुया. त्यांनी ओवी वाचली.  भगवंत भावाचा भुकेला | भावार्थ देखोन भुलला | संकटीं  पावे  भाविकाला  |  रक्षितसे ||३-१०-१०||श्रीराम||   

     भाव म्हणजे काय कळल कां?’ आजींनी विचारले. त्यावर विलासने अंगठा हलवला.

     आजी म्हणाल्या, देव आहेच अशी मनाची खात्री पक्की असणं याला म्हणतात श्रध्दा. ही पक्की श्रध्दा वाढीस लागणे म्हणजे भाव. हा शुध्द भाव पाहून देव धावून येतो. संकटकाळी भक्ताला तारतो.

            गणपती म्हणाला, पण खोटी वर वर श्रध्दा दाखवून भक्ती केली तर?’

     आजींनी गणपतीला दासबोधातील ओवी दाखवली. त्याने ती वाचली. जरी भाव असिला माईक | तरी देव होये माहा ठक | नवल तयाचें कौतुक | जैशास तैसा ||३-१०-१४|| श्रीराम||

     आजी अगदी गहीवरून म्हणाल्या, देवापाशी खोटेपणा चालत नाही. बाळांनो तुम्ही अजून लहान आहात. जगाचे बरे वाईट अनुभव तुम्हाला यायचे आहेत. म्हणून आत्ताच लक्षांत ठेवू या. सुधा वाच. जो अन्न देतो उदरासी | शेरीर विकावें लागे त्यासी | मां जेणें घातलें जन्मासी | त्यासी कैसें विसरावें ||३-१०-५५||श्रीराम||

     पगार घेऊन नोकरी केली तरी शरीर विकल्यासारखेच झाले. सुटी असली तरी कोठे जातो? का जातो? हे सांगून जावे लागते. कामावर केव्हा बोलावतील याचा नेम नाही. वरिष्ठांना जर इतके मानतो. तर देवाला कां न मानावे?’

     पण आजी!’ विलास म्हणाला, भगवंताला प्रसन्न करण्याकरिता भगवंताचे भजन कसे करावे?’

     छान समर्थच जाणीव देतात बघ. विषयजनित जें जें सुख | तेथें होतें परम दुःख | पूर्वीं गोड अंतीं शोक |ेमस्त आहे ||३-१०-६५||श्रीराम||

     म्हणून विषयसुखात, खाण्यापिण्यात, चैनीत गुंतून न पडता नेमाने भगवंताचे भजन करावे. आज मधूने देवाची उत्तम पूजा केली. तसे परोपकाराचे काम मनापासून करावे. संधी वाया दवडू नये. म्हणजे भगवंत आपल्यासाठी काय करतो याचा अनुभव आपल्याला येईलच.

     आजी! आम्ही सगळे तसे वागू. सर्वजण म्हणाले. 

।। जय जय रघुवीर समर्थ ।।


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा