मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२०

पडवीवरचा दासबोध, दिवस तिसरा

 

।।श्रीराम।।

पडवीवरचा दासबोध

       लेखिका- आशालता उर्फ आक्का वेलणकर

दिवस तिसरा

     गणपती धावतच आला. पण पडवीच्या पायरीवरच थबकला. पडवीवरची त्याची आवडती जागा विलासने आधीच पटकावली होती. दोघे एकमेकांकडे पहातही नव्हते. मधुकर आला पण दाराशीच घुटमळला.

     ये ना मधुदादा. सुधाने हाक मारली.

     हो. येतो.’ मधु पुटपुटला. पण पायरीवर गणपती होता बसलेला. इतक्यांत आजी बाहेर आल्या.

     आज काय झालयं तुम्हाला? तिघांचा हा असा त्रिकोन कधी पाहिला नव्हता. सुधा म्हणाली.

     गणपती पायरीवरुन उठला आणि आजींच्या उजव्या बाजूला बसला. तेव्हा मधुकर दारातून वर आला. पण विलासच्या शेजारी न बसता जरा बाजूला बसला.

     आजींनी ताडलं, काहीतरी बिनसलंय तिघांचं. बसा कोण बरं यायचं राहिलय?’ आजींनी विचारले. पण कोणीच उत्तर देईना.

     सुधाच म्हणाली, जयू येईल आत्ता. केशवच्या घरी गेलेली मी पाहिली दुपारी.

     आज मुगाचे लाडू खाल्ले कारे सगळ्यांनी?’ आजींनी विचारले.

     म्हणजे काय आजी?’ सुधा म्हणाली.

     अगं मुगदळाचे लाडू खाल्ले की असा चिकटा बसतो तोंडाला, तिघे बघ कसे लांब लांब बसलेत. काहीतरी खदखदतयं. गणपती तूच सांग. काय झालं?’ आजींनी गणपतीला बोलके केले.

     आजी मी सांगतो खर ते. (विलासकडे बोट दाखवून) मी याच्याकडे गोष्टीचं पुस्तक मागायला गेलो. तर खोट बोलला. पुस्तक नाही माझ्याकडे. पण ते चक्क टेबलावर होतं. म्हणून मी म्हटलं, ए खोटारड्या! हे काय पुस्तक आहे इथं. वाचून झालं की मी परत करीन! पण त्याने दिले नाही. मी बोलणार नाही. त्याचेशी.

     नको बोलूस जा. इथं कोणाचं अडलय?’ विलासला चेव आला. आजी हा शिष्टच समजतो स्वत:ला, गोष्टी खूप वाचतो. सांगतो छान म्हणून मी काल याला क्लबमध्ये चलतोस कां? विचारले, तेथे गोष्टी सांगण्याचा कार्यक्रम होता. तर चक्क नाही म्हणाला. मी तर त्याला आणतोच म्हणून निघालो होतो. मी खोटा ठरलो. माझा अपमान झाला. काय भाव खातो. (तोंड वाकडे करीत) म्हणे बोलणार नाही. गेला उडत!!! आजी दोघांच्या मध्ये बसल्या होत्या. त्यांनी दोघांच्या मांडीवर हात ठेवले. बाळांनो तुम्ही दोघ चुकत आत. अस वागणाऱ्याला समर्थ काय म्हणतात माहित आहे! सुधा तू वाचतेस? आजींनी ओवी दाखविली. अक्षरें गाळून वाची | कां तें  घाली पदरिचीं | नीघा न करी पुस्तकाची | तो येक मूर्ख ||२-१-७०||श्रीराम|| आपण  वाचीना  कधीं | कोणास  वाचावया नेदी | बांधोन ठेवी बंदीं | तो येक मूर्ख||२-१-७१||श्रीराम|| ते ऐकून गणपतीची कळी खुलली.

     आजी म्हणाल्या, टपुस्तके म्हणजे ज्ञानाचे भांडार. पुस्तके हवी तशी वापरू नयेत. काळजी घ्यावी. त्याला आवरण घालावे. स्पष्ट आवाजात वाचावे. स्वत: तर वाचावेच पण दुसऱ्याला देखील वाचायला द्यावे. असे जो करत नाही तो मूर्ख ठरतो.

     विलासचा चेहरा पडला तेव्हा समजावणीच्या सुरात म्हणाल्या, विलास तुला एक गंमंत सांगू? हे बघं. समर्थ म्हणतात, जो बालंबाल गप्पा घरात झोडतो, सारखी बडबड चालू असते. मित्रपरिवारात आपले तेच दडपत असतो. खरा तर धीट. पण चारचौघांत व्यासपीठावरून बोल म्हटलं की, माघार घेतो लाजतो तो पण......

     मूर्ख! मधुने वाक्य पूर्ण केले. आजी म्हणाल्या, मधुकर ही ओवी वाच. मधुने दासबोध हातात घेतला. नमस्कार केला ओवी वाचली. घरीं विवेक उमजे | आणि सभेमध्यें लाजे | शब्द बोलतां निर्बुजे | तो येक मूर्ख ||२-१-१८||श्रीराम||

     आजी हसून म्हणाल्या, झाली फिट्टंफाट! दोघेही सारखेच मग रुसता कशाला?’

     गणपती आजींना म्हणाला, आजी, तो पहा न(मधूकडे बोट दाखवुन) तो हसतोय आम्हाला.

     गणपती त्याचीपण गंमंत सांगते. सांगू का रे?’ सुधाने मधुकराला विचारले.

     मधूने नाकावर बोट ठेवले. आता कां?” दुसऱ्याला हसताना बरं वाटतं नाही कां? सांग सुधा सांग. काय झालं? विलासला उसळीच आली.

     आजी, सुधा म्हणाली, याला दोन दिवसापूर्वी बरं नव्हतं. चक्कर येते म्हणाला. म्हणून आईने चाटण तयार करुन त्याला देण्यासाठी मला पाठवले. तर त्याने चक्क त्यात पाणी मिसळून टाकून दिले. मला नको चाटण बिटण म्हणाला. मला रागच आला त्याचा. मी वाटी घेऊनघरी गेले आईने विचारलेच. चाटलं का ग त्याने? जरा तोंड वाकड केले असेल पण गुण येईल. खर सांगितल असत तर तिला वाईट वाटलं असतं? मी तोंड वळवलं. वाटी जागेवर ठेवावी म्हणून आंतच गेले. तेव्हापासून तो आमच्याकडे आलाच नाही. नाहीतर नाही जा. येथे कोणाचे अडलयं?’

            सुधा, हे बघ, मीच सांगते समर्थ काय म्हणतात ते, आजी म्हणाल्या. औषध ने घे असोन वेथा | पथ्य न करी सर्वथा | न मिळे आलिया  पदार्था | तो येक मूर्ख  ||२२||श्रीराम|| सगळेचजण एकदम म्हणाले, मूर्ख.

     सुधा म्हणाली, म्हणजे हा सगळा मूर्खांचाच बाजार. पण आजी आम्ही जे नेमके चुकलो ते समर्थांना आधीच कसे कळले? त्यांनी तर दासबोध कधीच रचला.

     आजी म्हणाल्या, सुधा आजच काय? समर्थांच्या काळाचे आधी सुध्दा समजात असे मूर्खपणाने, अज्ञानाने वागून आपलेच नुकसान करुन घेणारी माणसे खूप होती. आज आहेत. पुढे असणार आहेत. म्हणून ७४ ओव्यांचा समास मूर्ख लक्षणांचा लिहीला का माहीत आहे? या लक्षणांचा त्याग घडावा व समाज सुधारावा. किती उदात्त विचार संतांचा? मग आपण त्यांचा अवमान करायचा कां? आपला मूर्खपणा म्हणजे चूक आपल्याला कळली की ती दुरुस्त करायची? आपली एकी, संघशक्ती कायम ठेवायची? कसे वाटते तुम्हाला? तुम्ही काय करणार?’

     आम्ही मूर्खपणा सोडणार! सगळे एकदमच म्हणाले.

     गणपतीला मी पुस्तक देतो वाचायला. विलास म्हणाला, आम्ही सगळेच आळीपाळीने वाचू. पुस्तक न फाडता छान वापरू.

     मी पण पुढच्या महिन्यात क्लब मध्ये जाऊन गोष्ट दणक्यांत सांगेन. आजी, मी सभासदच होईन क्लबचा. गणपतीने आजींच्या हातावर हात मारुनच म्हटले.

     आजी, मधू जरा हळू आवजात म्हणाला, मला औषधांचा कंटाळा आहे खरा. पण मी पथ्याने वागेन. हयगय करणार नाही. 

     मग आपण सगळे शहाणे होणार. सुधा म्हणाली.

     व्हाल व्हाल. आजी म्हणाल्या. पण त्यासाठी सुध्दा एक पथ्य आहेच. अति क्रोध करूं नये | जिवलगांस खेदूं नये | मनीं वीट  मानूं नये  |  सिकवणेचा ||२-२-१०||श्रीराम|| हे सगळ्यांनी लक्षांत ठेवावे. अति राग- भिक माग असं होतं.  मैत्री तोडायला सोपी असते. जोडायला वेळ लागतो. थोडी सहनशिलता शिकावी. लहान असो मोठा असो कोणी काही सुचवले किंवा शिकवले तर रागावू नये. नीट विचार करावा.

     रागाच्या भरात  दुरुत्तरे केली जातात. तोंडात शिवी सुध्दा येते.म्हणून समर्थ पुढे म्हणतात, तोंडीं सीवी असों नये | दुसऱ्यास देखोन हांसों नये | उणें अंगीं संचारों नये | कुळवंताचे ||२-२-२७||श्रीराम||

            मधु म्हणाला, उणे अंगी संचरो नये मला नाही कळलं..

     सांगते, आजी म्हणाल्या. पुष्कळांना अशी सवय असते. दुसऱ्याचे अवगुण वेशीला टांगायचे. एखादा मनुष्य खानदानी घराण्याचा असेल, तर त्याच्या काही टाकावू सवयी प्रगट करुन त्याच्या बद्दलचा तिरस्कार आपण निष्कारण निर्माण का करा? दुसऱ्याला हीन लेखण्यात आपला काय फायदा? त्याची कमाई कष्टाची नाही. हे बडबडून जगाला पटवण्याचा उद्योग कां करा? त्याने आपली कीर्ती वाढणार आहे कां?’ समर्थ कसा प्रेमळ इशारा देतात बघ. अपकीर्ति ते सांडावी | सत्कीर्ति वाढवावी | विवेकें दृढ  धरावी | वाट  सत्याची ||२-२-४१||श्रीराम||

     समजलं बाळांनो, जगात फक्त भगवंत, त्याच्या प्राप्तीचाच प्रयत्न करावा. जेणे करुन आपला नाव लौकीक राहील असाच प्रयत्न व्हावा. यासाठी विवेक जागा हवा.

     आजी, जगांत आपल्याला सर्वांनीच मानावे असे तर वाटत असते. मग सगळे कीर्ती वाढेल असे कां वागत नाहीत?’ गणपतीने शंका विचारली.

     गणपती, चांगली शंका विचारलीस. आजी त्याची पाठ थोपटीत म्हणाल्या. गीतेत १६ व्या अध्यायात दैवी व आसुरी संपत्ती यांचे वर्णन आहे. त्यातली आसुरी संपत्ती म्हणजे कुविद्या. ती आड येते. त्या कुविद्येतलं एक लक्षण पहा.

     गणपतीच्या हाती दासबोध आला. त्याने ओवी वाचली. नेणे आणी नायके | न ये आणी न सीके | न करी आणी न देखे | अभ्यासदृष्टीं ||२-३-११||श्रीराम||   

     हे आमचेच वर्णन लिहिले आहे कां?’ विलासने विचारलेच.

     विलास,’ या वृत्तीची माणसे खूप असतात. आजी म्हणाल्या. म्हणून आपण कीर्तीमान होण्यासाठी या कुविद्येचा त्याग करावा. मधू आता दुसरी गोष्ट तू वाचतोस?

     मधुकरने दासबोध हातात घेतला. तोंडाकडे बोट गेले. पण सदऱ्याला पुसून ओवी वाचली. समयो नेणे प्रसंग नेणे | प्रेत्न नेणे अभ्यास नेणे | आर्जव नेणे मैत्री नेणे | कांहींच नेणे अभागी ||२-३-३८||श्रीराम।।

     आजी म्हणाल्या, असे अभागी आपण व्हायचे नाही.

     मग त्यासाठी काय करावे?’ जयाने विचारले.

     आता तूच वाच. आजींनी तिला ओवी दाखवली. नरदेहाचे  उचित | कांहीं करावें  आत्महित | येथानुशक्त्या चित्तवित्त | सर्वोत्तमीं लावावें ||२-४-१३||श्रीराम।।

     आजी, सर्वोत्तम म्हणजे भगवंतच नं? सांगू का रे आजींना?’ तिने सर्वांची संमती घेतली. आजी, आम्ही एक गंमत केली. परवा पुस्तकाबद्दल सांगितलेत ना? मग आम्ही सर्वांनी आपापली वाचून झालेली, पण घरात पडून राहिलेली पुस्तके जमवली. त्यांना आवरण घातले. अशी ५० पुस्तके झाली. ती शाळी सुरु झाल्यावर शाळेच्या वाचनालयास देणार. ही सर्वोत्तमाची पूजा ठरेल कां?’

     आजींनी होकार दिला. जया हे भगवद् भक्तीचेच काम झालं हं! पण त्याचबरोबर आत्महित म्हणजे स्वत:चे पण हित साधले असेही कार्य रोज व्हावे. ही पुढची ओवी बघ. परगुणाचा  संतोष  नाहीं | परोपकारें  सुख नाहीं | हरिभक्तीचा लेश नाहीं | अंतर्यामीं ||२-४-२५||श्रीराम||

     जया म्हणाली, आजी, म्हणजे असे वागणे नको. असेच नां?’

     बरोबर समजलं, आजी म्हणाल्या. ज्याला स्वत:ला शहाणे व्हायची इच्छा आहे, त्याला दुसऱ्याच्या चांगल्या गुणांचा आनंदच वाटावा. परोपकाराची एकही संधी दवडू नये. दिवसाकाठी थोडेतरी भगवंताचे भजन करावे. गाजावाजा नको. पण मनापासून सकाळ संध्याकाळ नमस्कार करावा.

     आजी, आम्ही सगळेच आता पुस्तकांत पाहूनच पण स्नान झाल्यावर अथर्वशीर्ष म्हणतो. विलासने सांगितले. आजींना आनंद वाटला.

     बाळांनो, मला खरंच आनंद वाटला हं. आजी म्हणाल्या. हे त्या शारदेचेच कौतुक हं. प्रत्येकाचे ठिकाणी सत्व, रज, तम गुण असतात. सत्वगुणें भगवद्भक्ती | रजोगुणें पुनरावृत्ती | तमोगुणें  अधोगती | पावति  प्राणी ||२-५-२||श्रीराम।।

     आपल्यातला चांगला गुण वाढीला लागला तर शुध्द भक्ती साधते. रजोगुणाने वासना वाढतात. पुन्हा जन्म घ्यावा लागतो. तमोगुणाने मनुष्याला पुन्ही हीन योनीत जावे लागते. यासाठी सावध व्हा. म्हणून लाल दिवा दाखवला.

     बघू तो लाल दिवा, विलास उद्गारला. आजींनी ओवी दाखवली. विलासने वाचली. दुसऱ्याचें सर्व जावें | माझेचि बरें असावें | ऐसें आठवे स्वभावें  |  तो रजोगुण ||२-५-१६||श्रीराम||

     लक्षांत आले कां?’ दुसऱ्याचे वाईट चिंतून आपले चांगले असावे असे स्वाभाविकपणे वाटणं शक्य असते. तेथे सावध रहावे. आजी म्हणाल्या.

     सुधाने विचारले, सावध रहायचे म्हणजे काय करायचे?

     हे बघ बटण दाबले. लाल दीवा गेला, हिरवा दिवा आला. तोही मार्ग समर्थांनी दाखवला आहे बघ. आजींनी ओवी शोधली.

     आजी मी वाचतो, गणपती म्हणाला. काया वाचा आणि मनें | पत्रें पुष्पें फळें जीवनें | ईश्वरीं  अर्पूनियां  मनें  |  सार्थक करावें ||२-५-३७||श्रीराम|| आजीने खूणेने सांगितले. पुढची पण वाच. येथानुशक्ती दानपुण्य | परी भगवंतीं अनन्य | सुखदुःखें परी चिंतन | देवाचेंचि करावें ||२-५-३८|| श्रीराम||

     शाब्बास, आजी म्हणाल्या. समजलं जया. पुस्तके द्या किंवा सदरा चड्डी  द्या, खाऊतला खाऊ द्या किंवा भुकेल्याला अन्न द्या व तहानलेल्या पाणी द्या. पण भगवंताला देत आहोत हा भाव असू दे म्हणजे ती भक्ती ठरते. सुखाचे, आनंदाचे काळातंच भक्ती घडते. दु:खात तिचा विसर पडतो. हा दु:खाचा प्रसंग काही विशिष्ट हेतूनेच घडवून आणला असे समजून त्याही प्रसंगी त्याचे स्मरण करावे. 

            आजी, सुधा म्हणाली, लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात सुध्दा स्नान संध्या सोडली नाही, गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला.

     आणि सावरकरांचे तर हालच हाल, मधू म्हणाला. तरी त्यांनी अंदमानात कमला काव्य रचले. तेही कोळशाने दगडी भिंतींवर लिहून मुखोद्गत केले.

     येईल त्या परिशस्थितीला तोंड द्यायचे पण भक्ती सोडायची नाही असे तुकाराम महाराजांच चरित्र सांगते. जया म्हणाली.

     खरं आहे, ईश्वरी कृपाच ही, आजींनी हात जोडले.

     आजी, आम्हाला आशीर्वाद द्या. आम्हीपण असेच मोठे होऊ. गणपती म्हणाला. सगळ्यांनीच आजींना नमस्कार केला.

     व्हाल. व्हाल बरं!’ आजी अश्रूपूर्ण नेत्रांनी म्हणाल्या.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा