।।श्रीराम।।
पडवीवरचा दासबोध
लेखिका- आशालता उर्फ आक्का वेलणकर
दिवस आठवा
विलास नी गणपती खडीसाखरेचा पुडा घेऊनच आले होते.
मधुकर आल्यावर त्यांनी हस्तोंदोलन केले.
‘आजी!’ विलास आनंद ओसंडतच
म्हणाला, ‘आज मधूला तुमच्या हातानेच खाऊ द्या.’
‘असं काय केलं त्याने?’ सुधाने विचारले.
‘तुला माहीत नाही?’ जया
म्हणाली, ‘त्याने सूर्यनमस्कार स्पर्धेत भाग घेतला होता.
१०८ सूर्यनमस्कार त्याने न दमता घातले. पहिले
बक्षीस मिळाले त्याला.’
आजींनी मधुला खडीसाखरेचा
पुडा दिला. मधुने तो स्विकारला व आजींना परत देत म्हणाला, ‘तुम्हीच सगळ्यांना २-२ खडे सगळ्यांना द्या व
उरलेली खडीसाखर गुरवार प्रसादासाठी तुमच्याजवळ ठेवा.’
आजींनी त्याचे कौतुक केले.
‘दासबोध केवळ वाचण्यासाठी नाही, आचरण्यासाठी आहे.
हे आज तुम्ही प्रत्यक्ष दाखवलेत. मधुने खाऊ माझा,
म्हणून घरी नेला असता तर गैर कांही नव्हते. त्याची त्यागाची वृत्ती खाऊ पुरती कां
होईना पण तयार झाली हाही एक आनंदच.’
गणपती म्हणाला, ‘आजी! खरा आनंद आणखी
वेगळाच आहे. सांग ना मधू तूच सांग. आमच मघाशीच ठरलं तसं.’
मधूने उलगडा केला. ‘आजी! मला बक्षीस म्हणून
सुंदर मारुतीची मूर्ती मिळाली आहे. बाबांना दाखवायची
म्हणून मी आज इथे आणली नाही. तुम्हाला पण आवडेल. आम्ही असं ठरवलंय की उद्या शनिवार
आहे. सकाळीच या पडवीवच्या कोनाड्यात आपण मारूती ठेवू या. त्याच्यासमोर दासबोधाचा
अभ्यास. चालेल ना तुम्हाला. तुम्ही हो म्हणणार हे आम्ही गृहीतच धरलंय.’
आजींनी मान हलवली.
सर्वांनी टाळ्या वाजवल्या.
विलास म्हणाला, ‘आणि आजी नुसता मारुती येथे ठवून गप्प नाही
बसायचं. मधूने आम्हाला पध्दतशीर नमस्कार घालायला शिकवायचे. आम्ही १२/१५ करीत करीत
सहा महिन्यात १०८ नमस्कार घालू अशी तयारी करायची.’
जया आणि सुधा म्हणाल्या, ‘आम्ही पण शिकू की!’
‘वा! वा!! मग फारच छान!’ गणपती म्हणाला.
‘बाळांनो! तुम्हा सर्वांना
वंदन भक्ती साधणार हं!’ आजी म्हणाल्या, ‘हे बघ
समर्थ काय म्हणतात.’ सुधाने दासबोध उघडला. पशुपति श्रीपति आणी
गभस्ती| यांच्या दर्शनें
दोष जाती |
तैसाचि
नमावा मारुती | नित्य नेमें विशेष ||४-६-६||श्रीराम।।
‘गभस्ती म्हणजे .....’ आजी विचारणार तोच जया म्हणाली, ‘मी सांगते गभस्ती म्हणजे सूर्य. शंकर विष्णू
सूर्य या सर्वांना नमस्कार करावा. मारुतीला विशेष नमस्कार करावा. तो आता कोनाड्यात
येणार.’
आजी म्हणाल्या, ‘खरंच, आनंदाची गोष्ट आहे. नमस्काराने आपले दोष म्हणजे
अवगुण जातात. अंगी नम्रपणा येतो. कोणालाही नमस्कार करताना तो बाह्यांगाला नसून
त्याच्या आतल्या भगवंताला आहे हा भाव पक्का होतो व व्हावा.’ पुन्हा गंमत अशी की, नमस्कारास वेचावें नलगे | नमस्कारास कष्टावें नलगे| नमस्कारास
कांहींच नलगे | उपकर्ण सामग्री ||४-६-२२||श्रीराम।।
‘पुन्हा दुहेरी फायदा असा,’ मधू म्हणाला, ‘दुर्गुण गेले की, पाप पण लयाला जाते.
नियमाने नमस्कार घातले तर शरीर पण निरोगी रहाते.’
आजी
म्हणाल्या, ‘आणि
दास्यभक्तीचा पाया पक्का होतो.’
‘आजी मी वाचतो दास्य भक्ती.’ आजींनी ओवी दाखवली. विलासने वाचली. सातवें
भजन तें दास्य जाणावें | पडिलें कार्य तितुकें करावें |
सदा सन्निधचि
असावें | देवद्वारीं ||४-७-२||श्रीराम।।
मधू म्हणाला, ‘दास्य म्हणजे दास व्हायचे. पण कोणाचे? मारुती रामाचा दास होता. समर्थ पण रामाचे
दास म्हणवून घेत. संत ज्ञानेश्वर निवृत्ती नाथांचे दास म्हणून ओळखले जात.’
‘आपण कोणाचे दास व्हायचे?’ विलासची शंका, ‘दास्यत्व पत्करायाचे म्हणजे २४ तास
नोकरा सारखे राबायचे कां?’
‘विलास!’ आजी म्हणाल्या, ‘आपण जनता जनार्दनाचे दास. म्हणजेच
पर्यायाने भगवंताचे दास होऊ या. त्यासाठी काय करायचे?’ वचनें बोलावीं करुणेचीं | नाना प्रकारें स्तुतीचीं | अंतरें निवतीं
सकळांचीं | ऐसें वदावें ||४-७-२६||श्रीराम।।
‘बस्स! अखंड साधना घडेल. जगमित्र होता येईल.’
सुधा
म्हणाली, ‘जगमित्र
नावाच्या भक्ताला सर्व प्राणीमात्रात भगवंत दिसत होता. तो जगाशी फारच प्रेमळ बोले.
बादशहाने त्याला जंगलातून वाघाला आणायला सांगितले. बादशहाचे मनांत वाघ याला खाईल,
लोक याला फार मानतात. परस्पर काटा काढू. पण उलटेच झाले. जगमित्राने जंगलात जाऊन
वाघाची प्रार्थना केली. भला मोठा वाघ डरकाली फोडत बाहेर आला. भक्ताने त्याला
नमस्कार केला. बादशहाच्या दर्शनाकरिता येण्याबद्दल विनवले. कुत्रा कसा माणसाबरोबर
चालतो, तसा वाघ त्याचे मागोमाग चालत गावात आला. मज्जाच मज्जा. बादशहा पुरा घाबरला.
मस्त आहे गोष्ट.’
आजी
म्हणाल्या, ‘खरंच
आहे!
त्याने भगवंताशी सख्य जोडले की भक्ताची इच्छा जाणून भगवंतच वाघाच्या रुपात
प्रगटले. बादशहाला धडा शिकवला. भगवंत एक दिव्य शक्ती, दिसत नसली तरी भक्ताची इच्छा
ओळखून तो व्यक्त रुपांत प्रकटतो. भक्तांची संकटे दूर करतो. म्हणून आपण काय करावे?’
गणपतीने
दासबोधा हातात घेतला. ‘सांगा पाहू कोणती ओवी वाचू?’
आजींनी
ओवी दाखवली. गणपतीने वाचली. देवासी परम सख्य करावें | प्रेम प्रीतीनें बांधावें | आठवे
भक्तीचें जाणावें | लक्षण
ऐसें ||४-८-२||श्रीराम।।
‘देवाशी सख्य करायचे म्हणजे काय करायचे?’ गणपतीने विचारले.
‘भगवंताला आवडेल असेच वागायचे.’ आजी म्हणाल्या. ‘भगवंताला
कथा कीर्तने आवडतात. त्याने तल्लीनता येते. तेवढा काळ आयुष्याचा सार्थकी लागतो.
फालतु गप्पा गोष्टी पेक्षा भगवंताचे लीला चरित्र गाइल्याने भक्ती दृढ होते. इच्छा
पूर्ती साठी भगवंताचे भजन नको. देव कृपेचा सागरच आहे. शरण आलेल्या भक्ताला देव कधी
दूर लोटत नाही. देव भक्त एकत्र होतात.’ “बाळांनो! सख्य देवाचें तुटेना| प्रीती देवाची विटेना| देव कदा
पालटेना| शरणागतांसी ||४-८-३०|| श्रीराम।।“
ही शरणागती झाली की, ‘बुध्दी तल्लख होते. खरा देव कोण? राम, कृष्ण, मारुती देव नाहीत कां? असे चिंतन आत चालू रहाते.’
जया म्हणाली, ‘आजी सापडली ओवी. मी वाचते.’ तस्मात् वि चार करावा | देव कोण तो वोळखावा | आपला आपण शोध
घ्यावा | अंतर्यामीं ||४-९-७||श्रीराम।।
विलास म्हणाला, ‘आजी
हरवलेले शोधतात. गणित चुकले, शास्त्राचा प्रयोग चुकला तर मार्गदर्शकात शोधतात.
आपला आपण शोध घ्यायचा म्हणजे आपण कां हरवले आहोत?’
‘होय!’ आजी म्हणाल्या, ‘समर्थ अनुभव ज्ञानाने ठामपणाने सांगतात. आपण कोण? म्हणजेच मी कोण? हे
आपल्याला कळत नाही. आपण देहालाच मी म्हणतो. विलास! आपण
सारी माणसे आहोत नां? माणूस म्हणजे काय?
देह+मन+आत्मा मिळून माणूस तयार होतो. देह पांचा भूताचा. भूते कोणती?’
सुधा म्हणाली, ‘मी सांगते! पृथ्वी, आप, तेज,
वायू आणि आकाश.’
‘बरोबर!’ आजी म्हणाल्या. ‘देह नाश पावतो.
मरतो. मन वायूत मिसळते. कारण ते वायुरुप. मग रहातो आत्मा. तोच खरा देव. आत्मा हा
खरा मी. मधुकर आता तू हे वाच.’
मधुकरने दासबोध घेतला.
तोंडाकडे बोट गेलेच. पण जीभ चावली. बोट सदऱ्याला पुसले व वाचले. आपण मिथ्या साच देव | देवभक्त अनन्यभाव | या वचनाचा
अभिप्राव |
अनुभवी
जाणती ||४-९-२२||श्रीराम।।
‘छान!’ आजी म्हणाल्या, ‘एकदा का आपल्याला हे पक्के कळले की कान
मी नाही. कान जातो. ऐकू येत नाही. डोळे मी नाही. देह असतानाच डोळे जातात. सारेच
अवयव थकतात. तुटतात, फुटतात. निष्क्रीय होतात. फक्त आत्मा तुटत नाही. फुटत नाही.
तो खरा देव. तोच देहाला सांभाळतो. देहाकडून काम करुन घेतो.’
“त्या खऱ्या देवाशी एकरुप होणे, म्हणजेच आत्मनिवेदन. आत्मनिवेदन
भक्तीने देव भक्त वेगळेपणा पार नष्ट होतो. ऐक्याची भावना वाढते. शुध्द भक्ती
साधते. आत्ताच आपल्याला अनुभव आला नाही कां? मधूच्या कष्टाने, तालीम, सराव करुन
त्याने १०८ सूर्य नमस्कार घातले. बक्षीस त्याला मिळाले. पण त्याने तुम्हाला आनंद
झाला. दासबोधा श्रवणाने अतूट मैत्रीचा आनंद खडीसाखर आणून तुम्ही प्रगट केलात नं? मधूला बक्षीस मिळाले. तो मारुती
पूर्णपणे त्याच्या मालकीचा. पण येथे कोनाड्यात स्थापन करु हे पण प्रीतीचेच लक्षण
नव्हे कां?
त्याने त्याचा आनंद सर्वांना वाटला. पडवीला नुसतीच शोभा नाही तर देवळाचे स्वरुप
येईल. हा आनंद झरा, हे ऐक्य सतत टिकले की आत्म्याचे दर्शन, आत्मानुभव दूर नाही.”
‘बाळांनो! अशी भक्ती करता करता ज्याला मुक्ती
म्हणतात अगदी सहज प्राप्त होते. मधूचा
मारुती आपणा सर्वांचा झाला नं? तसाच मुक्तीचा आनंद सर्वांना मिळेल.’
विलास
म्हणाला, ‘पण
आजी मुक्ती म्हणजे काय?’
सांगते! आजी म्हणाल्या, ‘काळजीतून मुक्त होणे म्हणजे मुक्ती.
संशयातून बाहेर पडणे म्हणजे मुक्ती. संकटाचा बाऊ न वाटणे म्हणजे मुक्ती.
अज्ञानातून मोकळे होणे म्हणजे मुक्ती. वासनेच्या जाळ्यांतून सुटणे म्हणजे मुक्ती.
मुक्तीचेच दुसरे नांव आहे मोक्ष.’
‘माझ्याकडे आहे मोक्षपट.’ विलास म्हणाला. ‘चिंचोक्यांच्या चार दळांनी दान टाकून
सोंगटी त्या मोक्षपटावर फिरते व मोक्ष मिळतो.’
‘विलास! ते खेळातले मोक्षपद मिळवायचे सुध्दा
कठीणच.’
आजी म्हणाल्या. ‘मोक्षाच्या अलिकडे सापाचे तोंड असलेले घर असते. दान योग्य नाही पडले
तर सापाचे तोंडातून पार खाली पहिल्या ओळीत म्हणजे रसातळांत जावे लागते. हा साप
म्हणजेच मोह हे विश्व हाच मोक्षपट. येथे जीवाचे कर्तव्यरुपी दान यथायोग्य पडले
नाही, तर मोहरुपी सर्प वासनेच्या गर्तेत पाडते व माणूस अधोगतीला जातो. वागू नये
तसा वागतो.’
‘म्हणून भक्तीतून ज्ञान उदयाला येईपर्यंत
सतत प्रेमोत्कर्ष साधायचा म्हणजे मुक्ती मिळते. मुक्ती तरी कोणती हवी? सुधा ही बघ ओवी. वाच.’ लोकीं राहावें ते सलोकता | समीप असावें ते समीपता | स्वरूपचि व्हावें ते स्वरूपता |
तिसरी मुक्ती ||४-१०-२४||श्रीराम।।
‘हे पहा बाळांनो! भगवंताचे भक्त रहातात तेथे सगुण दर्शन
होते तेथे रहाणे म्हणजे सलोकता.
देहपतनानंतर
भक्ती केल्यामुळे भगवंताच्या सन्निध कोणत्याही स्वरुपात राहणे म्हणजे समीपता. मग
फुलांच्या माळा वा दागिने रुप कोणतेही असो. सुगंधीत वस्तू, पशू, पक्षी या
कोणत्याही रुपात देवाजवळ रहाणे म्हणजे समीपता.
देवासारखेच
रुप, दागदागिने मिळून त्याच्या सेवकांत रहाणे ही स्वरुपता. पण या तीनही मुक्ती
नाशिवंत आहेत. वागण्यांत चूक झाली, तेथला आनंद ओसरला, आपला पुण्य संचय संपला किंवा
तेथेही सूक्ष्म वासनेच्या गर्तेत सापडलो की पुन्ही भूतलावर जन्म घ्यावा लागतो.’
गणपती
म्हणाला, ‘मग
आजी, मला पुन्हा माणूसच कर. म्हणजे माणसाचाच जन्म दे. म्हणावे. पुन्हा देवाचे भजन
पूजन करीत आनंदात रहावे हे बरे नाही कां?’
‘चांगली आहे तुझी कल्पना.’ आजी म्हणाल्या. ‘पण गणपती भक्ती करता करता भक्ताची
अत्यंत प्रेम वस्तू कोणती?’
‘भगवंत!’ गणपतीने उत्तर दिले.
‘बरोबर, मग त्या प्रेम वस्तूशी एकरुप
झाल्यावर भवद्स्वरुप बनणे जास्त चांगले नाही कां? भगवंतच व्हायचे. या जन्म मृत्यू लाभ
हानी साऱ्या कटकटीतून मिटायचे. याला म्हणतात सायुज्य मुक्ती. ही चौथी मुक्ती.
मधुकर तू वाचतोस. ३०वी ओवी बघ.’ निर्गुणीं अनन्य असतां | तेणें होय सायोज्यता | सायोज्यता म्हणिजे स्वरूपता | निर्गुण भक्ती ||४-१०-३०||श्रीराम||
‘पण आजी स्वस्वरुपात समरस होणे, निर्गुण
भक्ती हे नाही काही लक्षांत आलं.’ विलास म्हणाला.
‘येईल! येईलं हं! उद्या त्या बुध्दीमतां वरिष्टम् ची
स्थापना करीत आहात नं? तो देईल बुध्दी.’ आजी म्हणाल्या.
‘आजी! आम्ही सकाळी सहा वाजता येऊ.’ मधुकर म्हणाला.
‘मी कोनाडा सुशोभित करीन.’ विलास म्हणाला.
‘मी रांगोळी काढून पडवीला शोभा आणीन.’ जया म्हणाली.
गणपती
म्हणाला, ‘मी
मारुतीची गोष्ट सांगेन. कीर्तन भक्ती हं.’
सुधा
म्हणाली, ‘मी
भीमरुपी स्तोत्र म्हणेन. आजी पूजा सांगतील. मधुकर पूजा करील. मग आपण आरती करुन
प्रसाद वाटू.’
‘पण मारुतीची आरती कोणाला येतीय?’ विलास म्हणाला.
‘अरे आजी आहेत नं आपल्या?’ मधू म्हणाला आणि सगळेच हसले.
।। जय जय रघूवीर समर्थ ।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा