।।श्रीराम।।
पडवीवरचा दासबोध
लेखिका- आशालता उर्फ आक्का वेलणकर
दिवस सातवा
गणपती, विलास, मधुकर तिघे
तीन रस्त्याने आले. पण वाड्यात एकदमच पोहोचले.
‘अगदी कसे ठरल्यागत निघालो आपण.’ विलास म्हणाला.
मधुकर म्हणाला, ‘तुम्ही कांही म्हणा. पण दुपारचे जेवण झाल्यापासून
चैनच पडत नाही. केव्हा एकदा बाहेर पडतो असे होते. उन्हाची जाणीव पण होत नाही. आजी
सांगतात त्याचेच विचार सारखे चालू होतात.’
गणपतीने पण दुजोरा दिला. ‘आज काय सांगणार! असे
सारखे वाटू लागते. ती बघ जया व सुधा पण आली. जशी कृष्णा आणि कोयना समोरासमोरुन
एकमेकीला भेटल्या.’
‘वा! वा! हा संगम कऱ्हाडजवळ तू पाहिलास वाटतं?’ असे म्हणतच आजी बाहेर आल्या.
विलास म्हणाला, ‘आजी! आम्ही बोलत होतो ते
ऐकलत तुम्ही. इतकं हळू बोलतोय तरी?’
‘बाळांनो!’ आजी म्हणाल्या, ‘तुम्हाला जशी ओढ लागलीय न, तस माझंही मन
तुमच्याकडे ओढलं जातच कीं! हेच मन जर भगवंताचेच चिंतन करील, भगवंताचेच कार्य करील, तर ती
भगवंताची सेवाच ठरेल. सेवेच्या फळाची
इच्छा न धरता समाधानी रहाता आलं की त्याचे नाव भक्ती.’
‘आजी! मी एक विचारू कां?’ विलास जरा संकुचित मनाने बोलला. ‘सगळेच संत सांगतात ईश्वराची भक्ती करावी. पण
भक्ती करायची म्हणजे काय करायचे? मला घोटाळाच वाटतो.’
‘विलास!’ आजी म्हणाल्या, ‘विचारलेस ते छान केलेस! हे बघ ज्या दिव्य शक्तीचे आपण अंश आहोत, त्या
दिव्यशक्ती बद्दल म्हणजेच त्या शक्तीच्या अस्तित्वा बद्दल इतकाही संशय मनात नसावा. त्यालाच शुध्द भाव म्हणतात. त्या शुध्द भावातून
भक्ती निर्माण होते.’
‘मी आईचा नाही, बाबांचा नाही, मित्रांचा नाही,
आजींचा नाही, मी फक्त देवाचा आहे. हा विश्वास पक्का झाला की त्याचे नांव भक्ती.
त्या विश्व चालवणाऱ्या शक्तीला आपण भगवंत म्हणतो. त्या भगवंताला आपला स्वामी मानले
की विद्याशक्ती उदय पावते. तेच भक्तीचे फळ.’
‘पण त्यासाठी काय करायचे?’ मधूने विचारले.
‘त्यासाठी श्रवण हाच एकच उत्कृष्ट मार्ग आहे.’ आजींनी दासबोध उघडत म्हटले. ‘समर्थांनी वासनेचा क्षय, भीतीचा लय, पण प्रेमाचा
उदय होण्यासाठी नऊ प्रकारच्या भक्तीचे वर्णन केले आहे. ही बघ भक्तीची पहिली पायरी.’ विलास तूच वाच.
विलासने दासबोध हाती घेतला
आणि ओवी वाचली. प्रथम
भजन ऐसें जाण| हरिकथा पुराणश्रवण | नाना
अध्यात्मनिरूपण | ऐकत जावें ||४-१-७||श्रीराम||
‘शाब्बास!’ आजी म्हणाल्या, ‘भगवंताची लीला, त्याचे कर्तृत्व. ऐकता ऐकता श्रवण
भक्ती घडते. दासबोधासारखेच संतांनी लिहिलेल्या ग्रंथांचे सावकाश वाचन केले तरी
श्रवण भक्ती घडते. ग्रंथ म्हणजे ज्ञानाचे भांडार. गणपती काय ऐकावे, तूच वाच आता.’
गणपतीने दाखवलेली ओवी
वाचली. नाना
पिंडांची रचना | नाना भूगोळ रचना| नाना सृष्टीची रचना | कैसी ते ऐकावी ||४-१-१५||श्रीराम||
आजी म्हणाल्या, ‘जगात
एका सारखे दुसरे असे काहीच नाही. किती नानात्व आपण सहाचजण येथे आहोत. पण सगळ्यांचे
रंग, रुप भिन्न भिन्न आहेत. त्यात एकत्व साधले या श्रवणानेच. आवडीने येता.....’
आजींना थांबवीत विलास
म्हणाला, ‘आई म्हणते, बरे आहे! आजींकडे जातोस ते. उन्हात खेळणे, पाणी ढसा ढसा
पिणे, गाssरs पाणी पिणे, मग
सर्दी खोकला दुखणे, औषध घेणे, बिल भरणे, सारे सारे थांबतय!!’
आजी म्हणाल्या, ‘ते तर खरंच! पण काही औषधे
माहीतही असावीत.’ हे बघा समर्थांनी दासबोधात लिहिले आहे. कोण्या दोषें कोण रोग | कोणा रोगास कोण प्रयोग | कोण्या प्रयोगास कोण योग | साधे तो ऐकावा ||४-१-२३||श्रीराम||
‘आजी!’ सुधा म्हणाली, ‘मी काल आईला तुळचीचं बी नको म्हणाले. मला मोरावळा
आवडतो. तो मागितला, तर आई म्हणाली, पित्त फार झाले तर मोरावळा खायचा. उन्हाळ्यांत
तुळशीचे बी चांगले. उन्हातून जाताना खिशांत, हातात कांदा ठेवावा. हे तिला
श्रवणानेच कळलं. वाचनाने समजलं. ती खूप जणांना औषधे
देते. तस्सेच देते, पैसे नाही घेत.’
‘फारच छान!’ आजी म्हणाल्या, ‘ही उत्तम भक्ती.’
विलास म्हणाला, ‘खूप श्रवणाने मनुष्य पंडितच होईल की!
‘होय होईल,’ पण समर्थ म्हणतात, तूच वाच आता. ऐसें
हें अवघेंचि ऐकावें| परंतु सार शोधून घ्यावें | असार तें जाणोनि त्यागावें | या नाव श्रवणभक्ति ।।४-१-२९||श्रीराम||
‘बाळांनो! श्रवण खूप झाले तरी
भाव शुध्द हवा.’ बहुत करावें पाठांतर | कंठीं धरावें ग्रन्थांतर | भगवत्कथा निरंतर
| करीत
जावी ||४-२-३||श्रीराम||
विलास चुळबुळला, ‘पाठांतराचे नावाने इथे बोऱ्या. मग किर्तन काय
करणार?’
आजी म्हणाल्या, ‘विलास, हताश होऊ नकोस. पेटी तबला टाळ घेऊनच
कीर्तन करायचे असे नाही. भगवंताची कीर्ती गाणे म्हणजे कीर्तन. कठीण ग्रंथांचा
अभ्यास करणे. त्याचा अर्थ प्रवचन पध्दतीने दुसऱ्यास सांगणे म्हणजे सुध्दा कीर्तनच.
भगवंताचे कर्तृत्व अवतार कथा सांगाव्यात. जेणे करून भक्ती मार्ग वाढीस लागेल असा
आपापल्या परीने प्रयत्न करावा. कारण सांगू?’ कीर्तनें माहा दोष जाती| कीर्तनें होये उत्तमगती | कीर्तनें
भगवत्प्राप्ती |
येदर्थीं
संदेह नाहीं ||४-२-२७||श्रीराम||
‘हे बघ! असे हरिगुण गाता
गाता आपले दोष आपल्याला स्पष्ट जाणवतात. अर्थातच ते टाकावेत असे वाटते. आपण जसे
जसे दोषरहित होऊ तसे तसे भगवंताचे नाम मुखात येऊ लागते. भगवंतच खरा आहे व
त्याच्याच सत्तेने जग चालते हे ज्ञान पक्के होते. ही जाणीव अखंड रहाणे म्हणजेच
नामस्मरण. नामस्मरणाने भगवंताचा विसर पडत नाही.’
विलासने शंका विचारली. ‘नाम म्हणजे नाव. भगवंत तर शक्तीरुप आहे. त्याला
तुमच्या आमच्या सारखा आकार नाही. मग नांव कसे आले?
कोणत्या नांवाने त्याला ओळखायचे?’
‘वा! वा! विलास छान विचारलेस!’ आजी म्हणाल्या, ‘हे बघ, त्या अनंत ज्ञानरुप, प्रकाश रुप
शक्तीला एकदा मी(आहे) अशी स्फूर्णा झाली. त्या स्पूर्णेतच, तीव्र इच्छेतच
अनेकत्वाची शक्ती आली. त्या स्फूर्णेला नाद असतो. ओठ बंद कर आणि घशातून हवा
नाकावाटे बाहेर ढकल. कसा आवाज येतो?’
विलासने
तसे केले. ‘हं
हं’
असा आवाज निघतो. हे अनुभवले सगळ्यांनीच तसे करून पाहिले.
आजी
म्हणाल्या, ‘हा
जो हं हं नाद तोच अहं. त्यालाच ओंकार असे म्हणतात. त्या ॐ मधून सारे विश्व उत्पन्न
झाले. जीवाला आनंद देणारा हा नाद हेच त्या भगवंताचे प्रथम नांव. आता आपण सगळेच
म्हणूया ॐ S S S!
आजींच्या पाठोपाठ सर्वांनी म्हटले. आता जरा दीर्घ उच्चार करून म्हणूया. म्हणून
झाल्यावर कसे मोकळे मोकळे वाटते. शांत वाटते. स्वत: सह जगाचा विसर पडतो. क्षणभर का होईना
आनंद वाटतो. डोळे आपोआप बंद होतात.’
सगळ्यांनी
तसे करून पाहिले. क्षणभर सगळे शांत वाटले.
विलास
म्हणाला, ‘आजी
असं रोज म्हणू या.’
आजी
म्हणाल्या, हे बघ समर्थ म्हणतातच.... स्मरण देवाचें करावें | अखंड नाम जपत जावें | नामस्मरणें पावावें | समाधान ||४-३-२||श्रीराम|| अशा समाधानातून आनंद मिळतो. आनंद हे
त्या भगवंताचे लक्षण.
‘पण आजी अखंड नाम घ्यायचे हे कसे जमावे?’ मधुकरने विचारले.
‘मधुकर! समर्थांनी ते पण सांगितले आहे बघ. वाच
ओवी.’
आजी म्हणाल्या.
मधुकरने
ओवी वाचली. चालतांबोलतां धंदाकरितां | खातां जेवितां सुखी होतां| नाना
उपभोग भोगितां |
नाम
विसरों नये ||४-३-७||श्रीराम||
आजी म्हणाल्या, ‘तुम्ही गोष्टीची पुस्तके वाचलीत नां? असे
नामस्मरण करुन कोण कोण पावन झाले बरं?’
‘ध्रुव,’ गणपती म्हणाला.
थांब मी सांगतो दुसरा ‘प्रल्हाद’ विलासने सांगितले.
मधुकरने ‘गजेंद्राचे नांव सांगितले.’
‘आणि आजी,’ जया म्हणाली, ‘रामायण लिहिणारे वाल्मिकी ऋषी! त्या वाल्याला सरळ राम राम म्हणता
येत नव्हतं. पण नारदमुनींनी युक्ती सांगितली. मरा मरा म्हण. पण सातत्याने म्हण.
चालेल. तसे म्हणता म्हणता, मरा चे राम झाले. वाल्या पार बदलला. वाल्मीक ऋषी झाला.’
‘आजी! हा नामाचा प्रभाव की नारदांची कृपा?’ सुधाने शंका विचारली.
‘नाम तर तारक आहेच!’ आजी म्हणाल्या, ‘पण नारद मुनींच्या म्हणजेच
सद्गुरुंच्या वचनावर श्रध्दा ठेवली. सातत्य राखलें. त्याचा हा परिणाम.’
मधुकर
म्हणाला, ‘सद्गुरु
कां म्हणायचे नारदांना?’
सांगते! आजी म्हणाल्या, ‘ज्यांच्या मुखी सदैव परमात्म्याचे
म्हणजेच भगवंताचे नाम असते, ध्यानी मनी माणसाच्या उध्दाराचाच विचार असतो, ते
देहावर प्रेम कमी करुन देवावर जास्त प्रेम करतात, जे स्वत: करता जीवन न जगता जनता जनार्दनाच्या
कल्याणाची तळमळ बाळगून जीवन जगतात ते सद्गुरु! त्यांनाच सद्गुरु म्हणावे. अशा
सद्गुरु बद्दल ह्रदयांत अखंड प्रेम असले की पादसेवन भक्ती घडते. आपण स्वत: होईल
तितकी त्यांची सेवा करावी व मनाने त्यांच्या बोध वचनाचा स्वीकार करून त्याप्रमाणे
वागावे म्हणजे पादसेवन भक्ती घडते.’
‘या भक्तीने काय साधते?’ जयाने शंका विचारली.
आजींनी तिच्या हाती दासबोध
दिला. जयाने दाखवलेली ओवी वाचली. पादसेवन तेंचि जाणावें | काया वाचा मनोभावें | सद्गुरूचे पाय
सेवावे | सद्गतिकारणें
||४-४-२||श्रीराम||
‘शाब्बास!’ आजी म्हणाल्या, ‘सद्गती म्हणजे भगवद्प्राप्ती. त्यासाठी संग त्याग
घडावा.’
‘संगत्याग म्हणजे काय?’ विलासने विचारले.
‘सांगते!’ आजी म्हणाल्या. ‘एक भगवंतच हवा. त्यापुढे कोणत्याही गोष्टींची
आवड, प्रेम न वाटणे म्हणजे संग त्याग. दुसरी गोष्ट, अहंकार
रुपी “मी” देवाला अर्पण करणे
त्याला निवेदन म्हणतात.’
‘या दोन्ही गोष्टी साधल्या तर काय होईल?’ सुधाने शंका विचारली.
आजींचे उत्तर अगदी ओठावरच
होते. ‘अगं विदेहस्थिती प्राप्त होते. देह असून
नसल्यासारखा. देहावरचे प्रेम कमी होते.’
‘पुढे मी सांगतो!’ गणपती
म्हणाला. ‘देवावर प्रेम जडते. पण मनातून जगातील हव्या
वाटणाऱ्या वस्तूंवरचे प्रेम कमी व्हायला हवे! त्याचे काय?’
‘पाहिलेली वस्तू हवी वाटणे म्हणजे वासना
नं?’
सुधा म्हणाली. ‘मग
ती वासना म्हणजे हवे वाटणे संपले की आपण खूप सुखी होऊ.’
‘होय! त्यालाच अलिप्तपणा म्हणतात.’ आजी म्हणाल्या, ‘असा अलिप्तपणा साधला की सुख नी दु:ख येवो वा जावो! अगदी सहजपणे मनुष्य त्याचा स्वीकार
करतो. त्या सुख दु:खाचा त्याच्यावर परिणामच होत नाही. त्याला समर्थ सहजस्थिती
म्हणतात.’
‘म्हणजे आजी!’ विलास म्हणाला, ‘दुसरे दोन देश क्रिकेट खेळत असता कोणी जिंको,
कोणीही हरो, आपण ना सुख ना दु:ख असे पहातो. तसेच नां?’
‘अगदी बरोबर! आणि विलास,’ आजी म्हणाल्या, ‘तो खेळ पहातांना खेळाडूंना हार जीत
सर्व विसरुन खेळातला आनंद ज्या आतल्या शक्तीमुळे मिळतो त्या आत्म्याचा अनुभव
क्षणभर का होईना येतो नां? त्याला म्हणतात उन्मनी अवस्था.
त्यावेळी दुसरे कसलेही भान असत नाही. फक्त आनंद! आनंद!! आनंद!!! आणि बाळांनो, हे आत्म्याचे
म्हणजेच आपल्या देहातील चैतन्याचे दर्शन कारणा कारणाने झाले तर तो अनुभव पक्का
होतो. त्यालाच “अनुभव
सिध्द” ज्ञान
असे म्हणतात. तेच ज्ञानाचे विज्ञान होय.’
विलास
म्हणाला, ‘आम्ही
प्रयोग शाळेत प्रयोग करतो. प्रयोगाने प्रमेय सिध्द करतो. तसच हे दिसतंय.’
‘होय, पण ते झालं ज्ञान!’ आजी म्हणाल्या. ‘त्या ज्ञानाचा स्वत:ला आंत अनुभव आला
म्हणजे होते विज्ञान.’
जया
म्हणाली, ‘म्हणजे
आजी!
साखर गोड असते हे ज्ञान व खाल्यावर कशी गोड असते हे कळते ते विज्ञान असंच नां?’ पण आजी सद्गुरुंकडून हे सारं कळते.
आम्ही अजून लहान आहोत. आता सद्गुरु प्राप्त होईपर्यंत आम्ही काय करावे?’
अगं
समर्थांना वाटलेच जया असा प्रश्न विचारणारच. त्यांनी आधीच लिहून ठेवलंय बघ. देव
ब्राह्मण माहानुभाव | सत्पात्र भजनाचे ठाव | ऐसिये ठाईं सद्भाव| दृढ धरावा ||४-४-२३||श्रीराम||
आता मी सांगतो पाचही भक्तीची नांवे. विलास
म्हणाला, “१)
श्रवण, २) कीर्तन, ३) विष्णूचे नामस्मरण, ४) पादसेवन, ५) अर्चन” आता राहिल्या चार.
‘त्या आता उद्या पाहू!’ असे म्हणून आजींनी दासबोध बंदच केला.
नमस्कार केला. सगळेच हसले व नमस्कार करून उठले.
।। जय जय रघूवीर समर्थ ।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा