।।श्रीराम।।
पडवीवरचा दासबोध
लेखिका- आशालता उर्फ आक्का वेलणकर
दिवस ९ वा
‘मारुतीरायाचे आगमन झालं. कसं प्रसन्न वाटत नां?’ आजी म्हणाल्या, ‘तुम्हा
सगळ्यांना ज्ञानमार्ग प्राप्त होऊन प्रसन्नता वाटावी; अशी प्रार्थना करते मारुतीजवळ.’
विलास म्हणाला, ‘म्हणजे आम्ही आत्ता ज्ञान नाही मिळवत कां?’
कालच्या चार मुक्ती सांगू? १) सलोकता, २) समीपता, ३) स्वरूपता आणि
सायुज्यता. सायुज्यमुक्तीत आपण भगवंत झाल्याचा आनंद असतो हे ज्ञान नव्हे कां?
‘विलास!’ हे आता शब्दाने
कळलंय. शुध्द ज्ञान मार्ग नी भक्ती मार्ग भिन्न आहेत. पोहोचायचे ठिकाण एकच आहे.
आपण नवविधा भक्तीचा अभ्यास केला. आपला भक्तीमार्ग हळू हळू वाढीस लागेल. मग.......’ आजींना थांबवत गणपती म्हणाला, ‘आजी आमचा श्लोक पाठ
झालाय म्हणू मी?’
आजींच्या होकार नकार न
पहाताच त्याने म्हणायला सुरुबातही केली. श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं
पादसेवनम् । अर्चनं वन्दनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम् ॥
‘छान! मन लावून ऐकता. मला
आनंद वाटतो.’ आजी म्हणाल्या. ‘भक्ती
मार्गात प्रगती करतांना अनेक गुरू भेटतील. पण
भगवंताचे ज्ञान करून देणारे मात्र सद्गुरू भेटतीलच असेही सांगता येत नाही. ईश्वरी
योगायोगाने जमते ते.’
‘आता आपण अभ्यास करीत आहेत तो भगवद्भक्तीच आहे नं?’ मधुकरने शंका विचारली.
‘बरं विचारलंस!’ आजी म्हणाल्या. ‘भगवंताची दोन रूपे, १) सगुण आणि २) निर्गुण.
विश्वचालक दिव्य शक्ती भक्तासाठी नानाविध रूपे घेऊन भूतलावर अवतरते. ती सारी सगुण
रूपेच. मारूतीराय पण सगुणच. राम कृष्णादिक सगुणच. मधुकर आपण सगुणचे सगुमानेच सारे
विश्व भरले आहे.’
‘सगुणाची भक्ती करता करता गुणातीत असणारे भगवंताचे
निर्गुण रूपाचे ज्ञान ते शुध्द ज्ञान. त्यालाच म्हणतात ब्रह्मज्ञान.
म्हणजेच.......’
आजींना मध्येच थांबवून
विलास म्हणाला, ‘म्हणजेच खऱ्या देवाचे ज्ञान नं? ते ज्यांच्याकडून मिळते त्यांना सद्गुरु म्हणतात
कां? सद्गुरु भेटलेच नाही तर?’
‘थांब! तुला समर्थ वचनच
दाखविते. हे बघ.’ आजींना म्हटले. सद्गुरुविण ज्ञान कांहीं | सर्वथा होणार नाहीं | अज्ञान प्राणी
प्रवाहीं |
वाहातचि
गेले ||५-१-२१||श्रीराम||
‘खुद्द भगवंताचे दर्शन व्हावे असे ज्याला वाटते त्याने
सत्संग जरुर धरावा. सद्गुरुंना अनन्यतेने शरण जावे व ब्रह्मज्ञान करून घ्यावे.
कारण पुढे बघ समर्थ काय म्हणतात,’ आजी म्हणाल्या. जव नाहीं ज्ञानप्राप्ती | तव चुकेना यातायाती | गुरुकृपेविण अधोगती | गर्भवास चुकेना ||५-१-३५||श्रीराम||
‘सद्गुरुंची भेटी होणे ही ईश्वराची कृपा, व खरा
भगवंत कोण हे कळणे. आयुष्याचे सार्थक होणे ही सद्गुरुंची कृपा असे आहे हे कोडे.
परस्परावलंबी. खऱ्या ज्ञानाची ओढ लागली की, सदगुरुंची गाठ भेट होतेच.’
मधुकर म्हणाला, ‘पण आपले आई वडिल,
आपल्याला शिकवतात, ते
सद्गुरु नव्हेत कां?’
हे बघ समर्थांनी या
प्रश्नाचे उत्तर दिलंय. आजी म्हणाल्या. आपली माता आणी पिता | तेही गुरुचि तत्वता | परी पैलपार पावविता | तो सद्गुरु वेगळा ||५-२-७||श्रीराम||
‘ज्यांच्या ज्यांच्याकडून आपण विशेष काही शिकतो ते
गुरु. शाळेत तुम्ही शिकता ते शिक्षक तुमचे गुरुच.’ पण
समर्थ म्हणतात, जो
कोणी ज्ञान बोधी |
समूळ
अविद्या छेदी | इंद्रियेंदमन प्रतिपादी | तो सद्गुरु जाणावा ||५-२-२२||श्रीराम||
गणपतीने शंका विचारली, ‘पण बाकीचे जे देतात ते ज्ञानच असते ना? मग..’
‘बरोबर आहे तुझे म्हणणे!’ आजी म्हणाल्या, ‘त्या सर्व ज्ञानाचा पैसा मिळविण्यासाठी उपयोग
होतो. येथे ज्ञान म्हणजे स्वस्वरुपाचे ज्ञान. स्वस्वरुप ज्ञान म्हणजे ब्रह्म
ज्ञान. या ज्ञानाने मी कोण हे कळते. अज्ञान दूर होते. आपली इंद्रिये नाक, कान,
डोळा, जीभ इ. सारखी विषय सेवनाकडे वळतात त्यांना त्यांचे विषय प्रमाणात देऊन
त्यांना ताब्यात कसे ठेवावे हे सद्गुरु सांगतात.’
‘ते साधना करण्यासा सांगतात. त्या सांगण्यामागे
त्यांच्या तपश्चर्येती शक्ती असते.’ मुख्य सद्गुरूचें लक्षण | आधीं पाहिजे विमळ ज्ञान | निश्चयाचें समाधान| स्वरूपस्थिती ||५-२-४५||श्रीराम||
‘विमल ज्ञान म्हणजे शुध्द ब्रह्मज्ञान. त्यामुळे
ते अत्यंत समाधानी असतात. म्हणून शिष्यांची संकटे दूर करून त्यांना पूर्ण समाधान
कसे लाभेल हे सद्गुरु सांगतात.’
‘आपले सद्गुरु काळे का गोरे असे पाहू नये. रंगावर
ज्ञान अवलंबून नसते. तसेच वयावर पण ज्ञान अवलंबून नसते. त्यांचे नाक चपट की सरळ हे
पाहू नये. हा देहाचा आकार आपल्या स्वाधीन नसतो. कदाचित पुस्तकी विद्येच्या बाबतीत
ते अक्षरशत्रूही असतील.’
विलासने विचारले, ‘अक्षरशत्रू म्हणजे काय?’
जयानेच उत्तर दिले, ‘अजिबातच लिहिता वाचता न येणारे. शाळेची पायरी
सुध्दा न चढलेले. त्यांना अक्षरशत्रू म्हणतात.’
‘बरोबर!’ आजी म्हणाल्या, ‘तरी ते ब्रह्मज्ञानाने परिपूर्ण असू शकतील. बोली
भाषा अशुध्द असेल. पडक्या मातीच्या खोपटात किंवा झाडाखाली झोपडीत राहत असतील,
त्यांना तुमच्या आमच्या सारखा नातेवाईकांचा समुदाय भोवताली नसेलही. तरी त्यांच्या
ज्ञानात उणेपणा येत नाही. ते शिष्याचे बोट धरून त्याला धैर्याच्या मार्गाने संशय
रहित करून सोडतात.’
आपण सगळे बध्द आहोत.
म्हणजेच पूर्ण ज्ञान स्वस्वरुप ज्ञान आपल्याला झाले नाही. थोडा थोडा भक्ती मार्ग
चालू लागलो आहोत. अशांनी सद्गुरुंनी सांगितलेली साधना निष्ठेने करायला हवी.
कारण...
‘सांगा, मी वाचते आजी.’ सुधा म्हणाली. सेत पेरिलें आणी उगवलें | परंतु निगेविण गेलें | साधनेंविण
तैसें जालें | साधकांसी ||५-३-९||श्रीराम||
आजी म्हणाल्या, ‘शाळेंत गुरुजींनी शिकवले तरी घरी अभ्यास करावा
लागतोच नां? तसेच परमार्थात मार्ग कळला तरी चालावे लागते
आपल्यालाच. आळसाने अज्ञान फोफावते. व अज्ञानाने म्हणजेच अविद्येने आत्मज्ञान
मंदावते. म्हणून शिष्याने काय करावे.’
‘मी वाचतो’! विलास म्हणाला. मुख्य सच्छिष्याचें लक्षण | सद्गुरुवचनीं विश्वास पूर्ण | अनन्यभावें शरण | त्या नांव सच्छिष्य ||५-३-१९||श्रीराम||
‘हे अनन्यभावे शरण म्हणजे काय करायचे ते नाही कळलं?’ विलासने शंका विचारली.
‘सांगते नां!’ आजी म्हणाल्या, ‘लहान बाळ आईवर
सर्वस्वी अवलंबून असते की नाही? आईने मारले, आपण
त्याला जवळ घेऊन त्याचे रडे थांबवले तरी त्याला आईनेच जवळ घ्यावे असेवाटते की नाही? तसे आपल्या सद्गुरुंबद्दल आपल्या मनांत सतत
प्रेम असावे. त्यांचा शब्द ह्रदयांत साठवावा. आज्ञापालन तंतोतंत व्हावे. मग
सद्गुरु आपली सगळी ज्ञानशक्ती शिष्याकडे वळवतात. त्याच्या आयुष्याचे कोट कल्याण
होईल असेच करतात.’
‘रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद असेच होते नाही
कां?’ सुधाने विचारले. ‘आणखी
सांगू? जनार्दन स्वामी आणि एकनाथ, निवृत्तीनाथ आणि
ज्ञानदेव या आदर्श गुरु शिष्य जोड्या होत्या असे आई सांगत होती.’
‘अगदी बरोबर!’ आजी म्हणाल्या, ‘तुझी आई प्रपंच पण छान करते आणि परमार्थात पण
चांगले लक्ष आहे. समर्थ म्हणतातच.’ प्रपंच सुखें करावा | परी कांहीं परमार्थ वाढवावा | परमार्थ अवघाचि बुडवावा | हें विहित नव्हे ||५-३-१०३||श्रीराम||
गणपतीने शंका विचारली, ‘पण परमार्थ कशाने वाढतो?’
आजी म्हणाल्या, ‘सद्गुरु उपदेश करतात. शिष्याला बोध करतात.
म्हणजेच सद्गुरु व शिष्य यांचा जो अध्यात्मिक संवाद चालतो त्याला उपदेश म्हणतात.
त्या उपदेशाप्रमाणे तंतोतंत वागणे म्हणजे परमार्थ वाढवणे.’
‘बाळांनो! नाना तंत्र मंत्र
या जगांत आहेत. पण आत्मज्ञानासारखे श्रेष्ठ दुसरे कांहीच नाही.’ याकारणें ज्ञानासमान | पवित्र उत्तम न दिसे अन्न | म्हणौन आधीं आत्मज्ञान | साधिलें पाहिजे ||५-४-३२|| श्रीराम||
मधुकर म्हणाला, ‘आत्मा
हा दिव्य शक्तीचा अंश. असेच सद्गुरु सांगणार. तेच आत्मज्ञान कां? मग ते आम्हालाही आत्ता कळले.’
आजी म्हणाल्या, ‘एवढ्या सांगण्याने भागत नाही बाबा! तसे असते तर सगळेच सद्गुरु. सगळेच शिष्य. सगळेच
जग उध्दरले असते. आज भोवताली जी दारुण दु:खद परिस्थिती दिसते
ती दिसली नसती.’
‘जीव या भोवतालच्या दृष्यातील स्थूल नाशिवंत
वस्तूंवर अगाध प्रेम करतो. तेच सर्वस्व मानतो. तुला काय सांगू? क्रिकेट सारखा खेळ टि.व्ही. वर पहात असताना
पट्टीचा खेळाडू पहिल्याच चेंडूला बाद झाला तर क्रिकेट रसिक बेशुध्द पडतो. आता याला
काय म्हणावे? खेळ आहे हा. हार जीत असणारच. म्हणून
शाश्वत टिकणाऱ्या आत्म्यावरच प्रेम असावे.’
‘जगात किती तऱ्हेचे ज्ञान आहे? गणपतीला उत्तम गोष्टी सांगता येतात.
हाव भाव उत्तम आहे म्हणून तो ज्ञानात पारंगत म्हणता येईल कां?’
‘मधुकरला बासरी वादन छान येते.तरी ते
पूर्ण ज्ञान म्हणावे कां? जया भरतकाम वीणकाम छान जाणते ते शुध्द पूर्ण ज्ञान म्हणावे कां?’
‘माझं नका काही सांगू! मला काहीच करता येत नाही.’ विलास म्हणाला.
‘नाही कसं!’ गणपती म्हणाला, ‘भांडता येत छान. सारखा बहिणीशी भांडत
असतो.’
‘हो पण भांडण सोडवतोही. समेट घडवून
आणतो. दोन्ही येतं. तरी त्याला ज्ञान म्हणता येत नाही.’ आजी म्हणाल्या. ‘समर्थांनीतर खूपच मोठी यादी दिली आहे.’
‘आजी!’ मधुकर म्हणाला, ‘नृत्यकला, वादन, गायन हे जर ज्ञान
नव्हे तर त्यांत माणसे आयुष्यन् आयुष्य घालवतात. कला जोपासतात. दुसऱ्याला त्या
कलेत पारंगत करतात. म्हणूनच त्या कला जीवंत आहेत नां? नाहीतर त्या लोप पावल्या असत्या.’
‘तुझे म्हणणे बरोबर आहे.’ आजी म्हणाल्या, ‘त्या त्या कलेचे ते ज्ञान. या ज्ञानाने
कीर्ती वाढेल, नाव लौकीक राहील. पण जीवाचा उध्दार होणार नाही.’
सुधा
म्हणाली, ‘आजी
मी बारावी नंतर मेडिकललाच जावे असे बाबा म्हणतात. पण ते वैद्यकी ज्ञान हे सुध्दा
जर ज्ञान नसेल तर कशाला शिकायचे?’
‘सुधा!’ आजी म्हणाल्या, ‘त्या ज्ञानाने पैसा मिळतो. परोपकार
घडतो. दानधर्म करून नाव राखता येत. लोकांची दु:ख दूर होतात. त्यातही आनंद असतो. पण
त्याला आत्मज्ञान म्हणता येणार नाही. असे समर्थांना ठासून सांगायचे आहे.’ असो सकळ कळाप्रवीण | विद्यामात्र परिपूर्ण | तरी ते कौशल्यता, परी ज्ञान | म्हणोंचि नये ||५-५-३२||श्रीराम||
‘कारण या ज्ञानाने भ्रम दूर होत नाही.’
‘पण हा भ्रम निर्माण कोण करतो?’ विलासने विचारले.
‘आजींनी मागेच सांगितले,’ सुधा म्हणाली, ‘विसरलास कां? भगवंताची चैतन्य शक्ती खेळ मांडते.
खेळ मोडते! तीच माया खऱ्याचे खोटे करते. खोटे ते खरे वाटते. यालाच भ्रम म्हणतात.
होय नां आजी?’
‘शाब्बास!’ तो भ्रम ज्या ज्ञानाने जातो त्याला
आत्मज्ञान म्हणतात.’ आजी म्हणाल्या.
विलास
म्हणाला, ‘या
खोक्यांत माल भरायचा जरा अवघडचं!’ डोक्यावर थापट्या मारत राहिला.
‘बघ! आत्ता तू भ्रमानेच बोलतो आहेस.’ आजी म्हणाल्या, ‘डोक्याला हात लावतोस नी खोकं म्हणतोस.
जरा अवघड वाटेल. पण तसं नाही अवघड. आपण
युक्ती करूया. हा बसलाय न वकील. त्याच्यावर सोपवूया. तो आपली फिर्याद, तक्रारी नीट
ऐकून घेऊन वकीली करील.’
‘पण त्याला फी द्यावी लागेल नां?’ विलास म्हणाला.
‘मग द्यायची की भरपूर!’ आजी म्हणाल्या. मारूतीराया बलभीमा
। भजना लागो द्या प्रेमा ।।
मधुने टाळीचा ताल धरला. ठेक्यात सगळ्यांनीच
भजन म्हटले. मारुती राया बलभीमा । भजना लागो द्या प्रेमा ।।
थांबा. दोन तीनदा म्हणून झाल्यावर
गणपतीला स्फूर्ती आली. तुझी लेकुरे आम्ही सुजाण। सहज पचावे आत्मज्ञान ।।
शाब्बास!
शाब्बास! सर्वजणच
म्हणाले. टाळ्या वाजवल्या.
आजी म्हणाल्या,,,,
।। जय जय रघूवीर समर्थ ।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा