मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२०

पडवीवरचा दासबोध, दिवस दुसरा

 

।।श्रीराम।।

पडवीवरचा दासबोध

       लेखिका- आशालता उर्फ आक्का वेलणकर

दिवस दुसरा

     अरे मीच पहिला आलो कां? अजून कोणीच आले नाही. गणपती पडवीवर चढता चढता म्हणाला.

     सुधा माजघरातून बाहेर येत म्हणाली, मधुदादा नी मी आधीच आलोय म्हटलं. इतक्यांत विलास पण आला.

     आजी माझघरांत भजन म्हणत होत्या. गुरु महाराज, गुरु जय जय, परब्रह्म सद्गुरु. सगळे तेथे थांबले. आजींचे भजन आटोपले.

     या बाळांनो, आपण पडवीवरच बसू या. असे म्हणत त्या उठल्या. पडवीवर सगळेच आपापली जागा घेऊन बसले.

     विलास म्हणाला, आजी तुम्ही काय म्हणत होतात?”

     आज गुरुवार आहे नां? मी गुरुदेवांचे भजन म्हणत होते. आजींनी सांगितले.

     गुरुदेव! आजपर्यंत ब्रह्मदेवाचे नांव ऐकले होते. त्याला चार तोंडे आहेत, महादेव ऐकले होते, आई बेल वहाते त्याला. मग हे गुरुदेव कोण?” विलासने विचारले.

     सगळ्या देवतांपेक्षाही मोठे. आजी म्हणाल्या. मोठे म्हणजे उंच धिप्पाड असे नव्हे. परमपूज्य गुरुनाथ देव. देव हे त्यांचे आडनांव. मी लहानपणीच त्यांच्याकडून गुरुमंत्र घेतला. म्हणून जप करते त्या मंत्राचा.

     गणपतीने विचारले, आजी! त्या मंत्राचा जप केल्याने अभ्यास येतो कां? पैसे मिळतात कां?  मनुष्य श्रीमंत होतो कां?”

     छान विचारलसं, आजी आनंदाने म्हणाल्या. सद्गुरु स्वत: तर तरतातच. पण आपल्या शिष्यांनाही तारतात. जगात सगळं नाहिसे होईल, पण सद्गुरु पद नाहिसे होणार नाही. तू म्हणतोस ते सगळं सगळं मिळतं. हे बघ समर्थ काय म्हणतात, हरीहर ब्रह्मादिक | नाश पावती सकळिक | सर्वदा अविनाश येक  सद्‍गुरुपद ||१-४-२९||श्रीराम।।

     अशा सद्गुरुंची कृपा होण्याकरीता सतत संत संगत असावी.

     हो, पण आजी संत शिष्ठच असेल तर संगत कशी धरणार? माझ्या वर्गातला अजित संत बोलतच नाही कोणाशी. खेळायला पण थांबत नाही. त्याची संगत कशी करावी?’ मधुने विचारले.

     अजित आडनावी संत आहे. आजी हसून म्हणाल्या. मी आडनावी संतांबद्दल नाही बोलत. जे वागणूकीने, गुणांनी आदर्श असतात ते संत. परोपकार वृत्ती असते ज्यांची ते संत. क्रोध, लोभ ज्यांनी जिंकले ते संत. अशी कितीतरी संतांची नावे तुम्हाला माहीत असतील.

     सुधा म्हणाली, रागाला जिंकलेले संत एकनाथ महाराज. त्यांचा फोटो आहे आमच्याकडे.

     आणि परोपकार करुन दुसऱ्याला चांगल्या मार्गाला लावणारे गोंदवलेकर, त्यांना तर ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात. ते पण संतच नं?” मधू म्हणाला. शिर्डीचे साईबाबा, शेगावचे गजानन महाराज हे पण संतच.

     पुरुषच संत असतात असे नाही म्हटलं. सुधा म्हणाली. संत जनाबाई, कान्होपात्रा, मीराबाई कितीतरी नांव देता येतील.

     ही झाली होऊन गेलेल्या संतांची नावे. आजींनी मूळ धागा पकडला. अलिकडच्या काळात सुध्दा संत नाहीत कां? संत सदा आनंदरुप असतात. तृप्त असतात.हे पहा संत रामदास स्वामी दासबोधात सांगतात, संत आनंदाचें स्थळ | संत सुखचि केवळ | नाना संतोषाचें मूळ  ते हे संत  ||१-५-१६||श्रीराम||

     अशा संतांच्या सहवासात दु:ख विसरायला होतं.

     ते संत असं काय देतात आपल्याला?” विलासने शंका विचारली.

     बाबा रे संत काय देतात? किती देतात? हे घेणाऱ्याच्या कुवतीवर अवलंबून असते. आजींच्या डोळ्यातून दोन टपोरे थेंब बाहेर आले. संत श्रेष्ट सद्गुरु माऊली. अनाथांची सावली. सुधा वाच ही ओवी. मोक्षश्रिया आळंकृत | ऐसे हे संत श्रीमंत |जीव दरिद्री असंख्यात | नृपती केले ||१-५-२१||श्रीराम||

     छान, आजी म्हणाल्या. दुसऱ्यांना दु:खातून, संशयापासून अज्ञानातून मुक्त करायचे. आनंदी करुन सोडायचे. हेच दागिने त्यांचे अंगावर असतात. ते वृत्तीने श्रीमंत असतात. ते संत विषयासक्त व अज्ञानी, त्यामुळे दरिद्री अशा भाग्यहिनांना श्रीमंत करुन सोडतात. राजासारखे वैभवशाली बनवतात. आत्मज्ञानाने परिपूर्ण करुन सोडतात. खरे वैभव प्राप्त करुन देतात. मात्र ते वैभव गणपती म्हणतो तसे पैशांचे नव्हे हं! खरे वैभव कोणते सांगू? पूर्ण समाधान. परम शांती, अखंड आनंद. हे खरे वैभव. हे संतांकडून सद्गुरुकडून मिळते.

     त्यासाठी काय करावे? ते कसे मिळवावे?’ मधुकरने विचारले.

     हे बघं. समर्थांनी किती सोपा मार्ग सांगितला आहे. वाच. आजी म्हणाल्या.

     मधुकरने दासबोध आपल्या मांडीवर घेतला. आजींच्याकडे पाहून नमस्कार केला. आजींनी दाखवलेली ओवी तोडत वाचली. आपुले शक्तिनुसार  भावें पुजावा परमेश्वर | परंतु पुजूं नये हा विचार | कोठेंचि नाहीं ||१-६-१३||श्रीराम||

     मग आजी, त्या परमेश्वराची पूजा घरातली सगळीच माणसे करु लागली, तर फुले, निरांजनाच्या वाती, उदबत्या कितीतरी लागतील?’ मधूला शंका आलीच. त्याने ती विचारली पण!

     सुधा म्हणाली, देवघरातल्या देवांची पूजा सगळ्यांनी नाही करायची.”                    ‘माझे बाबा सकाळी पूजा करतात. मग आईचे अंग धूणे झाले की ती देवाला फूल, पान वहाते. तुळशीला पाणी घालते. आजी जपाला देवापाशी बसते. ती पण फूल पान वहाते. मला प्रार्थना म्हणायला शिकवते. मग मी नमस्कार करते. आजी, अशी सगळ्यांनी पूजा कली तर चालते की नाही?’

     चालते बरं! आजी म्हणाल्या, फक्त देवघरातल्या देवांची पूजा म्हणजे परमेश्वराची पूजा असे नव्हे. विलासने परवा आपल्या वाढदिवसाच्या दिवशी केशवला सदरा चड्डी दिली, ही परमेश्वराचीच पूजा. गणपती शेखरला सायकलवरून दुकानात पोचवतो ती पण पूजाच. थांबा दाखवते. आजींनी मधूकडून दासबोध घेतला. आणि ओवी वाचली. मागां वाल्मीक व्यासादिक | जाले कवेश्वर अनेक| तयांपासून  विवेक  सकळ  जनासी  ||१-७-२३||श्रीराम||परोपकाराकारणें | नाना निश्चय अनुवादणें | सेखीं  बोलीले  पूर्णपणें | संशयातीत ||१-७-२७||श्रीराम||

     बाळांनो कवी म्हणजे ईश्वरी शक्तीच. केवळ जगांतील अज्ञानी लोकांचे अज्ञान जावे, सर्वांना ईश्वराची ओळख व्हावी, म्हणून त्यांनी आपापल्या काव्यातून सुंदर सिध्दांत मांडले. त्यानुसार आपण वागलो तर कोट कल्याण होईल. वाल्मीकीने कोणता ग्रंथ रचला बरं?’

     जया चटकन म्हणाली, रामायण आणि व्यासांनी महाभारत रचले. खूप पुराणे लिहिली. तुम्ही विचारणारच, म्हणून मी आधीच सांगितले.

     अगाऊच नाहीतर काय? स्वत:ला मोठी शहाणी समजते नां?’ विलासने शेरा मारला.

     पण तुला कोणी विचारलंय मी कशी आहे ती? आधी स्वत: शहाणा हो. जयाने टोला मारला.

     भांडू नका, आजींनी जयाला खुणावले. विलास मी खरचं विचारणार होते. तिचे म्हणणे खोटे नाही. व्यासांनी जगाला किती भरभरुन ज्ञान दिले. त्यांची स्मृती म्हणून आपण वर्षातुन एक दिवस त्यांची पूजा करतो. केव्हा बरं?’

     सांगा, विलासराव सांगा ना आता. जया म्हणाली. आता का खाली बघता?’

            सुधाने पटकन सांगितले, आषाढातल्या पोर्णिमेला व्यास पोर्णिमा म्हणतात. कोणी कोणी गुरु पोर्णिमा म्हणतात.

     शाब्बास, आजी म्हणाल्या. वाल्मीकींनी, व्यासांनी पुष्कळ ग्रंथकर्त्यांनी आपल्यावर उपकार केले आहेत. त्यांच्या अनुभव ज्ञानाने आपले सगळे संशय दूर होतात. अज्ञान नष्ट होते. बुध्दी स्वच्छ होते, देवाची खरी पूजा होते. हातून परोपकार घडतो. मैत्रीची भावना वाढीस लागते. उत्तम गुण अंगी येतात. हे बघा आठव्या समासात समर्थ काय म्हणतात?

     आजींच्या तोंडून शब्द बाहेर पडायचा अवकाश विलासने चटकन दासबोध हाती घेतला. जरा खालीवर पाहिले व ओवी वाचली. जेथें भगवंताच्या मूर्ती | तेथें पाविजे उत्तम गती | ऐसा निश्चय  बहुतां ग्रंथीं | महंत बोलिले ||१-८-२८||श्रीराम।।

     मी अर्थपण सांगतो आजी, ऐका, श्रोतेहो, मी काय सांगतो ते ऐका. या दासबोधात रामदास म्हणतात(जीभ चावून) नाही नाही. श्रीसमर्थ रामदास स्वामी म्हणतात की, आजपर्यंत थोर थोर ग्रंथकारांनी खूप ग्रंथ लिहिले. सर्वांनीही आपापल्या ग्रंथात ठामपणे सांगितले आहे की, ज्या ठिकाणी भगवंताची मूर्ती असेल म्हणजे देऊळच असायला हवे कां? येथे आपला गणपती आहेच(गणपतीच्या मांडीवर चापटी मारून). हं तर काय मी म्हणत होतो, जेथे भगवंताची मूर्ती असेल, आपापल्या घरी भगवंताची पूजा होत असेल, जेथे भजन पूजन चालू असेल तथील लोकांना म्हणजे पूजा करणाऱ्याला हं, उत्तम गती मिळते.

     सुधाने हसत विचारले, पण बुआ गती म्हणजे काय हो?’

     ग्रंथ आजींच्या हाती देत विलास म्हणाला, एवढही कळत नाही कां? गती- गती- गती म्हणजे वेग समजलं?’

     आजी हसल्या, सुधा मी सांगते, उत्तम गती म्हणजे जीवाला ध्येय प्राप्त करुन घेता येते. जीवनात श्रेष्ट वस्तू कोणती असेल तर खऱ्या देवाला ओळखणे. सर्वांत मौल्यवान वस्तू म्हणजे ब्रह्म. परब्रह्म परमात्मा म्हणजेच खरा मोठा देव. त्याला ओळखणे म्हणजेच शाश्वत संपत्ती मिळवणे. ही संपत्ती हे वैभव ज्याला मिळते त्याला उत्तम गती मिळाली असे म्हणतात.

     जया म्हणाली, आजी आपण प्रयत्न केला तर आपल्याला मिळेल कां ते वैभव? कोणते? पूर्ण शांती परम आनंद...

     तिला मध्येच अडवीत विलास म्हणाला, ह्य:! चुकलं साफ चुकलं, पूर्ण समाधान, परमशांती, अखंड आनंद, आजी बरोबर आहे नां?’

     होय, बरोबर, सतत हाच विचार मनांत ठेवला तर काय अवघड आहे?’ आजी म्हणाल्या. गणपती ही ओवी वाच. आहे तरी परम सुगम | परी जनासी जाला दुर्गम | कां जयाचें चुकलें वर्म | सत्समागमाकडे ।।१-९-२।।श्रीराम।।

     छान, आजी म्हणाल्या, खरं तर परमार्थ म्हणजे उच्च ध्येय गाठणं, उत्तम वैभव मिळवण सोपं आहे. पण संत समागम घडत नाही. संत सन्निध्यात परमार्थ सहज घडतो. मार्ग सापडतो. चाचपडावे लागत नाही. हो! आणखी एक गंमत पहा. समर्थ म्हणतात, अनंत जन्मींचें पुण्य जोडे | तरीच परमार्थ घडे | मुख्य  परमात्मा  आतुडे  अनुभवासी  ||१-९-२४||श्रीराम||

     मधुकरने शंका विचारली. मागच्या जन्मीचे पुण्य आहे की नाही हे कसे ओळखावे? म्हणजे आम्ही गोटेच रहाणार कां?”

     नाही. दंगामस्ती ऐवजी उन्हाचे वेळी थोडावेळ दासबोध अभ्यासूया असे सांगितल्यावर ऐकलेत. ते मागचे काही पुण्य गाठीस होते म्हणूनच. निराश नाही व्हायचं. प्रयत्न केल्यावर साधत नाही असे जगात कांहीच नाही. आजी म्हणाल्या. आपल्याला धडधाकट देह मिळाला आहे. घरची आर्थिक स्थिती बरी आहे. शाळेत शिक्षण घेता येत आहे. दोन वेळचे जेवण आनंदाने घेता येत आहे. कमतरता नाही. म्हणून आपण लक्षांत ठेवायचे. सांगते हं. आजींनी ओवीवरुन नजर फिरवली. हं सापडली ऐका, सांग नरदेह जोडलें | आणि परमार्थबुद्धि विसर्लें | तें  मूर्ख  कैसें  भ्रमलें  मायाजाळीं  ||१-१०-३३||श्रीराम||

     आपल्या ठिकाणी काहीही व्यंग नाही. म्हणून २४ तासांपैकी काही भाग तरी परमार्था करीता देह वापरावा. समर्थांनी किती पोटतिडकीने सांगितले आहे पहा. देह परमार्थीं लाविलें | तरीच याचें सार्थक जालें | नाहीं तरी हें वेर्थचि गेलें | नाना आघातें मृत्यपंथें ||१-१०-६१||श्रीराम||

     म्हणून बाळांनो, लहानपणापासूनच चांगल्या सवयी लावून घेऊ या. खरे ज्ञान मिळवू या. उच्च ध्येय गाठू या. देहाचे सार्थक करू या. आवडेल ना तुम्हाला.

     गणपती म्हणाला, आवडेल नां म्हणजे काय? आवडेलच हो. आत्ताच करु या सुरुवात. काय म्हणायचं ग सुधा? हं आठवलं.

     गुरु महाराज गुरु। जय जय परब्रह्म सद्गुरु। गणपतीच्या म्हणण्याला सर्वांनीच दुजोरा दिला. मग पांच मिनिटे भजन रंगले. नमस्कार करुन घोष केला.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा