शनिवार, २६ सप्टेंबर, २०२०

षड्रिपु निरूपण, समास दुसरा-कोप निरूपण

 

।। समर्थ रामदास स्वामींचे अपरीचीत वाङ्मय ।।

।। षड्रिपु निरूपण ।।

समास दुसरा-कोप निरूपण

     कोपआरोपणा खोटी कोपें कोंपचि वाढतो ।

     मोडतो मार्ग न्यायाचा अन्याय प्रबळे बळें ।।१।।श्रीराम।।

     क्रोंध हा खेद संपादी जेथें तेथें चहूकडें ।

     विवेक पाहतां कैंचा शुध्दि तेथें असेचिना ।।२।।श्रीराम।।

     भ्रुकुटी कुटिला गांठी काळिमा वदनीं चढे ।

     कुर्कुरी बुर्बुरी रागें हस्तपायच चोळितो ।।३।।श्रीराम।।

     कुशब्द वोखटे काढी त्रासकें वचनें वदे ।

       घेतसे बालटें ढाले उणें काढी परोपरी ।।४।।श्रीराम।।

     बोलतां हिंसळे थुंका तायेताय उकावतो ।

     तांबडे जाहले डोळे रागें रागेंचि फूगला ।।५।।श्रीराम।।

     कंठ लल्लाटिंच्या शीरा फुगल्या घाम चालिला ।

     थर्थरां कांपतो रागें रूपें भूतची जाहला ।।६।।श्रीराम।।

     धर्ते लोक झिंजाडी सातां पाचांसि नावरे ।

     लिथाडी पछ्याडी कुस्ती मारामारी धबाधबी ।।७।।श्रीराम।।

     सुटलीं फिटलीं वस्त्रें नागवे दिसती जना ।

     लाज ते अंतरीं नाहीं मातले नीट धांवती ।।८।।श्रीराम।।

     अनर्थ मांडला मोठा लाथा बुक्क्या चप्रका ।

     कोपरें मारिती शिरीं काष्ठ पाषाण अर्गळा ।।९।।श्रीराम।।

     मुसळे मारिती काठ्या शिळा डांगाच ढेंकळें ।

     डसती झोंबती अंगा निकुरें लाविती कळा ।।१०।।श्रीराम।।

     एकांहीं धरिल्या शेंड्या वृषणी लाविती कळा ।

     पाडिले दांत भोंकांडें मस्तकें फोडली बळें ।।११।।श्रीराम।।

     ताडिले पाडिले पडले रक्तबंबाळ जाहले ।

     घरिचीं मारिती हांका हांका बोंबा परोपरी ।।१२।।श्रीराम।।

     दिवाणामाजिते नेले मारिले दंड पावले ।

     क्रोधानें करंटे केले क्रोध चांडाळ जाणिजे ।।१३।।श्रीराम।।

     भल्याने कोंप सांडावा शांतीने असतां बरें ।

     क्षुल्लकें कोप पाळावा भल्याचे काम तो नव्हे ।।१४।।श्रीराम।।

     इति क्रोध निरूपणं समाप्तम् ।।२।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा