मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२०

पडवीवरचा दासबोध, दिवस पहिला.

 

।।श्रीराम।।

पडवीवरचा दासबोध

लेखिका- आशालता उर्फ आक्का वेलणकर



दिवस पहिला

     सुटलो बुआ एकदाचा हातवारे करीत गणपती आला. पडवीवर आल्यावर तर नाचायलाच सुरवात केली.

            गद्र्यांचा गणपती, काळ्यांचा विलास, गोऱ्यांचा मधुकर जमलं त्रिकूट.

     आम्ही पण सुटलो‘ चला, आता कसं मोकळ मोकळं वाटतयं, आरडाओरडीने पडवी चांगलीच दुमदुमली.

     ‘निकाल लागला की काय?’ आजच तर परिक्षा संपल्या. सुटलो सुटलो काय? त्यांच्याच वयाची साठ्यांची सुधा बाहेर येत म्हणाली.

     ‘म्हटलं आजीबाई, कटकटीतून सुटलो, सकाळी वर्ग- दुपारी शाळा, संध्याकाळी खेळावं म्हटलं तर अभ्यासाचं लफडं, जरा म्हणून मोकळीक नाही. सुटलो या कटकटीतूनच‘. गणपती एका दमात बोलला, व लागला पुन्हा नाचायला.

     ‘अरे, पण जरा हळू ओरडा. आत आजी पोथी वाचत आहेत‘. सुधा समजवणीच्या सुरात म्हणाली.

     तोच आजी हातात दासबोध घेऊनच बाहेर आल्या.

     बसा बाळांनो, ‘ऐकलं मी सारं. विलास, कसली रे कटकट’?

     ‘मी नाही म्हणालो. हा गण्या म्हणाला कटकट‘ विलासने खुलासा केला.

     ‘धप्‘! पाठीत धपाटा बसला विलासच्या.

     ‘अरे अरे कां मारतोस त्याला? आजी म्हणाल्या.

     ‘तो बघा नं मला गण्या म्हणतो. ‘ गणपतीची तक्रार.

     ‘मला विल्या म्हणतोस ते नाही सांगितलेस?’ विलास त्याला मारण्यासाठी सरसावला.

     शहाणी सुधा दोघांना सावरीत दोघांच्या मध्ये जाऊन बसली.

     ‘हे पहा बाळांनो, देवाने गोड वाणी दिली आहे. तिचा वापर सरळच करावा. आजच करु या आपण निश्चय. सगळ्यांनी एकमेकांना सरळ नावानेच हाक मारायची. ठऱलं हं. आणि गणपती अभ्यासाला कटकट म्हणायचं कां? आजींनी विचारले.

            गणपती म्हणाला, ‘कटकट नाहीतर काय‘? सकाळी सहा नाही वाजत तोवरच ‘उठ क्लासला जायचय.‘ बाबांनी पांघरुण काढून घ्यावे. कसे बसे उरकून क्लासला जाऊ यावे. तोच पाणी जाईल, आंघोळ करुन घे लवकर. आईचे टुमणे, जरा तासभर जात नाही तोच मार सायकल, शाळा लांब. शाळा सुटल्यावर क्लास करूनच ये. ताईचे दरडावणे, नुसता वैतागलो मी1 दिवसभराचा दमलो तरी उद्याचा अभ्यास करुन ठेव मग नीज. आई गरजलीच, कटकट शिंची!

            आजी हसतच म्हणाल्या, तुमच्या हितासाठीच ना मोठी माणसे सांगतात. पहाटे उठायची सवय लावलीत, अभ्यास नियमित केलांत तर वर्गाला शिकवणीला जायची गरजचं काय? हे बघ पुढील वर्षाची तयारी आत्तापासूनच सुरु करुया. मग कटकट वाटणार नाही.

     या दासबोधात समर्थ लहानांच काय पण मोठ्यांना सुध्दा सांगत आहेत. प्रात:काळी उठावे.

     थांबा, तुम्हाला दाखवतेच म्हणजे पटेल, आजींनी दशक अकरा मधला समास तिसरा उघडला आणि म्हणाल्या हे बघा.

     बघू बघू’, मधुकर पुढे सरसावला. आजींचा दासबोध हाती घेतला. पाने परतली गेली. बोटाला थुंकी लाऊन तो पाने पुढे मागे करू लागला.

     मधू दादा पोथीला थुंकी नको लाऊस. सुधाने सुचवले.

     तिला शाबास म्हणत आजींनी नेमकी ओवी दाखविली.

     मधुकरने ओवी वाचली.

     प्रातःकाळी उठावें | कांहीं पाठांतर करावे |

     येथानशक्ती  आठवावें | सर्वोत्तमासी ||११-३-१५|| श्रीराम।।

     आजी म्हणाल्या, मधुकर, दासबोधच काय कोणतेही पुस्तक, ग्रंथ, वही थुंकी लाऊन उघडू नये. घाण सवयी टाकाव्यात. पुस्तकांची वह्यांची काळजी घेऊन वापरणेही देवपूजाचे ठरेल.

     इतक्यांत सान्यांची जया पळतच आली.

     आजी आज सहावी गोष्ट संपली. तुम्ही सांगितलंत मला फार आवडलं. केशव पण रंगतोय. आज ऐकतो आणि तिच गोष्ट दुसऱ्या दिवशी मला सांगतो. चांगल लक्षांत रहात त्याच्या. आमचे दोन तास सहज मजेत जातात. जया म्हणाली.

     कोण केशव? तो आंधळा होय, काळे आणि फाटके कपडे असतात त्याचे. बाबा म्हणतात, गरीब, भिकारी त्यांची मैत्री नको. विलास पटकन बोलुन गेला.

     जया म्हणाली, विलास, तो पैशाने गरीब असेल. पण मनाने आणि विचाराने श्रीमंत आहे. खूप शिकेन ही त्याची जिद्द आहे. त्याची शाळा आणि पुस्तके वेगळी आहेत. त्याला अवांतर ज्ञानाची गरज आहे. ज्याला ज्याची गरज असते ते त्याला देण हेच खरं दान. होय की नाही आजी”?

     आजी म्हणाल्या, विलास जयाचे म्हणणे बरोबर आहे. ती परीक्षा संपल्यापासून त्याला दुपारचे वाचून दाखवते. ही तिची देवपूजाच. अशी भक्ती देवाला फार आवडते.

     पण भक्ती का करायची”? मधुकरने हळूच विचारले.

     सुधाने दासबोध उघडला, आजी यात आहे नाही कां?” भक्ती कां करायची?

     हो तर, हे बघ दशक पहिला समास पहिला त्यातली ही ओवी बघं. असे म्हणून आजींनी ओवी दाखविली. भक्तिचेन योगें देव | निश्चयें पावती मानव | ऐसा  आहे  अभिप्राव  |  ईये  ग्रन्थीं ||१-१-|| श्रीराम।।

     म्हणजे आम्हाला समजेल असे दासबोधात आहे तर!” गणपती उत्सुकतेने म्हणाला.

     होय तर! आता ही दुसरी ओवी वाच,असे म्हणून आजींनी दासबोध त्याच्या हातात दिला. जयाचा भावार्थ जैसा | तयास  लाभ  तैसा | मत्सर धरी जो पुंसा|  तयास तेंचि प्राप्त ||१-१-३८|| श्रीराम।।  

     शाबास, छान वाचलेस, आजी म्हणाल्या. केशवला वाचून दाखवून  त्याचे ज्ञान वाढवले, तर देव तिलाही ज्ञानात कमतरता येऊ देणार नाही. कारण ती शुध्द विचाराने देवाचीचच पूजा करीत आहे. हीच पूजा देवाला आवडते.

     मग मी ही त्या पांगळ्या शेखरला माझ्या सायकलवरुन शाळेत किंवा त्याचे दुकानात पोहोचवत जाईन मग ती देवपूजाच ठरेल, कां?” गणपतीने विचारले.

     नक्कीच, आजी ठामपणाने म्हणाल्या.

     जरा दबलेल्या आवाजात विलासने विचारले, आजी तुम्हाला एक विचारु?’ तुम्हाला देव व देवपूजा खरी कोणती हे कळलं, आम्हाला ते का कळत नाही?

     आजी हसल्या, छान विचारलेस. सगळ्यांना बुध्दी देतो त्या गणपतीचा उत्सव तुझ्या घरी होतो नां?’

     हो तर! विलास म्हणाला. दहा दिवस असतो गणपती मखरांत. खूप मजा येते. आरत्या, प्रसाद, मिरवणूक मजाच मजा.

     हे बघ विलास, आजी म्हणाल्या, आरतीचा आरडा ओरडा नी प्रसादाची चंगळ यासाठी नसतो, आणि नसावा गणपती उत्सव. त्या गणेशाची मनोभावे पूजा करुन त्याची कृपा हा खरा प्रसाद मिळवायचा असतो.

     हो पण आजी, मधुकरने विचारले, असले कसले विचित्र देव हो. एकाला तीन तोंड, एकाला लांबलचक सोंड. ते नाक म्हणे त्याचं. एकाला शेपूट. त्यांची पूजा करुन प्रसाद कसा मिळवायचा?”

     बरं झालं विचारलंस, आजी म्हणाल्या. ही त्या त्या शक्तीची काल्पनीक रुपे मानवानेच दिली. त्यांचे अर्थ कळायला हवेत. त्यासाठी बुध्दी हवी, ही बुध्दी देणारी शक्ती म्हणजेच गणपती.

     आजी मी सांगू?’ सुधा आजींना थांबवत म्हणाली. त्या गणपतीचे सुपासारखे कान सारखे हलतात. म्हणजे वाट्टेल ते ऐकू नका. घाण विचार उडवुन लावा व चांगले ते ऐका. त्याचे बारीक डोळे सांगतात की बारकाईने सगळीकडे पहा. मोठे पोट सांगते की..

     तिला थांबवत विलास म्हणाला, खूप खा, लठ्ठ व्हा. सगळेच खदखदून हसले.

     आजींनी दासबोध त्याचे हाती देत म्हटले, हे बघ विलास, समर्थ म्हणतात, वाच तू. विलासने वाचले, जयाचें आठवितां ध्यान | वाटे परम समाधान | नेत्रीं  रिघोनियां  मन  |  पांगुळे  सर्वांगी ||१-२-||श्रीराम।।

     समजलं!’ आजी म्हणाल्या. बुध्दीला तरतरी आणून देणाऱ्या गणपतीचे जर मनोभावे पूजन केले, दर्शन घेतले तर खूप समाधान लाभते. आनंद होतो. थट्टा मस्करी, अभद्र बोलणे, यातून मन बाहेर पडते. व डोळ्यातच येऊन रहाते, कोण? आपेल मन, म्हणजे मनांत सारखी तीच मूर्ती येऊन ठसते. चित्त एकाग्र होते. मग आपसूकच सगळी कामे कशी छान पार पाडतात.

     सुधाने मध्येच हात वर केला. ती म्हणाली, ही ओवी बघा आजी. जयासि ब्रह्मादिक वंदिती | तेथें मानव बापुडे किती |असो  प्राणी  मंदमती | तेहीं गणेश चिंतावा ||१-२-२७||श्रीराम।।

     स्वच्छ मनाने ब्रह्मा विष्णू महेश हे देवादिक ज्याला वंदन करतात. त्यापुढे मानवाची काय पाड? मानव देवांच्या पेक्षा कमी शक्तीचा, कमी बुध्दीचा. त्याने गणेशाला वंदन करावेच.ज्याची बुध्दी मंद असेल त्याने तर गणपतीची उपासना जरुर करावी.

     सुधा म्हणाली, आजी तुम्ही आम्हाला गणपती अथर्वशीर्ष शिकवाल कां? आम्ही सगळेच पाठ करु. होय नारे?’

     सर्वांनी होsss म्हणून हात वर केले.

     शंकेखोर विलास हळूच म्हणाला, पण आजी विद्येची देवता सरस्वती. मग गणपतीची उपासना पूजा प्रार्थना करायची कीं सरस्वतीची?’

     छान विचारलेस. आजींनी उत्तर दिले. विलास, सरस्वती हे गणपतीचेच एक अंग. ती शारदा काय करते, माहीत आहे? ही सहावी ओवी वाच.

     विलासने ती ओवी वाचली. जे अनंत ब्रह्मांडें घडी | लीळा विनोदेचि मोडी। आपण आदिपुरुषीं  दडी  |  मारून  राहे ||१-३-||श्रीराम।।

     शाबास, आजी म्हणाल्या. गमतीचा खेळ म्हणून मुली भातुकलीचा खेळ खेळतात नां? तशी ती सारी विश्वरचना करते. प्राणी, पशू, पक्षी सारे अगदी आकाशातले चंद्र, सूर्य सुध्दा निर्माण करते आणि मनात आले की सारे मोडते. मुली खेळ आवरुन बोळकी टोपल्यात ठेवतात. तस्सेच माया करते. पुन्हा मोठ्या देवाच्या इच्छेने केले म्हणून नामानिराळी होते. विश्वजननीच ती.

     माझा पत्त्यांचा बंगला मधुदादाने फुंकरीने मोडला व साबासुबा आजोबांच्या जवळ जाऊन बसला तस्सच नां?’ सुधाने विचारले.

     बाईसाहेब, तिला अडवीत मधू म्हणाला, पत्त्यांचा बंगला बांधलास तू आणि मोडला मी तसे हे नाही. तीच बांधते आणि तीच मोडते असे आजी म्हणतात. कळलं! होय की नाहीं आजी?

     होय. ती महामंगला अचाट कर्मे करते. आजी म्हणाल्या.

     विलास पुढे सरसावून म्हणाला, थांबा आजी, आत्ता ही महामंगला कोण आली? मघाशी सरस्वती म्हणालात. मग शारदा म्हणालांत. लगेच विश्वजननी म्हणालांत आत्ता महामंगला म्हणता किती नांवे ही. एकीचीच की, या सगळ्या वेगवेगळ्या आहेत?’

     हे बघ विलास तू कमलताईंना काय म्हणतोस?’ आजींनी विचारले.

     ती माझी आई आहे. मी तिला आई म्हणतो. विलासने उत्तर दिले.

     ठिक आहे, हा मधू काय म्हणतो त्यांना?’ आजींनी परत विचारले.

     विलासची आई असे म्हणतो. विलासने सांगितले.

     आणि सुमन, तुझी मुंबईची बहीण काय म्हणते?’ परत एकदा आजींनी विचारले.

     काकू, विलास म्हणाला.

     आजी मी त्यांना मावशी म्हणते. सुधा म्हणाली. आई नी कमल मावशी बहिणी सारख्या वागतात.

     गणपतीने हटकले, तू बोलू नको मधे मधे. सांगा आजी पुढे?”

     आजी म्हणाल्या, हे बघा कोणी आई, कोणी मामी, कोणी काकू, तर कोणी आत्या, कोणी मावशी, तर कोणी वन्स, तर कोणी वहिनी, तर कोणी ताई माई बाई. काहीही म्हटले तरी कमलताई एकच. तशी शारदा अनेक नावांनी ओळखली गेली तरी चैतन्य शक्ती एकच. ही ओवी पहा. सुधाने ओवी वाचली. जें जें दृष्टीनें देखिलें | जें जें  शब्दें वोळखिलें | जें जें मनास भासलें | तितुकें रूप जयेचें ||१-३-२४||श्रीराम।।

     आजी म्हणाल्या, आपण जे डोळ्यांनी पाहतो ते तिचेच रूप. शब्दाने जे कळते ते तिचेच रूप. मनाने कल्पिले ते तिचेच रुप. अशी ही सरस्वती. तिची उपासना केली की कटकट हा शब्दच रहात नाही.

     आता पांच वाजायला आलेत. थोडे मोकळ्या हवेत फिरा आणि दिवे लागणीचे आंत आपापल्या घरी परता.

     गणपती झटकन उठून म्हणाला, मग आम्ही उद्या पण येऊ कां? आमच्या करीता दासबोध काय आहे ते कळेल.

     या. या बरं. आजींनी दासबोध बासनात बांधला आणि त्या पण उठल्या.

    समर्थभक्त सौ. मेधाताई कुलकर्णी, उस्मानाबाद, यांनी या भागाचे केलेल्या अभिवाचानाच्या ध्वनी फितीची लिंक पुढिल प्रमाणे.

https://drive.google.com/file/d/148Xvs5BRrsEuQFKQVxJt_W5-NfWtJyxO/view?usp=sharing 

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

 

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा