शनिवार, ३१ मार्च, २०१८

हिमालयाच्या सहवासात प्रस्तावना


प्रस्तावना
     हिमालयाच्या सावलीत हे माझे प्रवास वर्णनात्मक साहित्य वाचकांच्या समोर सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे. १४ मार्च २०१६ ते ३१ मार्च २०१६ या काळात मी एका प्रदिर्घ सहलीत सहभाग घेतला होता. नोकरीतुन स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर माझे महाराष्ट्रा बाहेर प्रवास करणे सुरु झाले.
नोकरीत असताना रजेची अडचण असायची. याच्याही पेक्षा मुख्य अडचण असायची ती दामाजीपंतांची. केंद्र सरकारमध्ये नोकरी करत असल्याने एल्. टी. सी. ची  सवलत मिळत असे परंतु त्यात मेख अशी होती, की सरळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे जाण्याकरीता कमीत कमी अंतराचे फक्त प्रवास भाडे मिळत असे. सहलीकरीता जायचे म्हणजे हे अडचणीचे होई. कारण प्रवास थांबत थांबत मुक्काम करीत करीत जावे लागते. प्रत्येक ठिकाणी हॉटेल अथवा तत्मम ठिकाणी मुक्काम करणे, सकाळच्या चहा पासुन सर्वच विकतचे पदार्थ घेणे याकरीताचा खर्च खूप होत असे त्यामुळे कधी एल् टी सी ची सवलत घेतली नव्हती. सरकारी नोकरीत पगारही बेताचाच असतो त्यातच मुलांची शिक्षणे याला प्राधान्य द्यावे लागते.
सेवा निवृत्ती घेतल्यानंतर मुलांची शिक्षणे पूर्ण झाली होती. त्यामुळे जबाबदारी कमी झाली होती. आता या काळात सहलीचा विचार करणे शक्य होते. तरीही मी या सहलीला तयार नव्हतो. परंतु त्या वैष्णो देवीनेच तिच्या दर्शनाला बोलावल्यामुळे मी सहलीला जायला तयार झालो. आम्ही ठरवलेली ही सहल कोणत्याही ट्रॅव्हेल एजन्सी मार्फत न करता नातेवाईकांचाच एक ग्रुप तयार करुन आमची आम्ही आयोजित केली होती. त्यामुळे आमचे वेळापत्रक, प्रवासाचा मार्ग आमचा आम्हीच ठरवला होता. त्यात आयत्यावेळी बदल करण्याचे स्वातंत्र्य आम्हाला होते.
या प्रदिर्घ प्रवासाचे वर्णन मी लिहायचा प्रयत्न केला आहे. या प्रवासात आम्ही जम्मु, काश्मिर, पंजाब, हिमाचल प्रदेश, हरीयाणा या राज्यांमधुन मुक्काम केले आणि तिथले निसर्ग सौंदर्य अनुभवले. काश्मिरमध्ये असताना एकीकडे बर्फात वावरण्याचा आनंद तर दुसरीकडे अतिरेक्यांच्या प्रभावाखाली असलेल्या भागात वावरत असल्यामुळे धास्ती अशा दुहेरी भावना होत्या. आमच्या सुदैवाने आम्हाला कोणत्याही वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले नाही.  श्रीनगरमधल्या लोकांच्या मनाचा मोठेपणाही अनुभवायला मिळाला. पंजाबमध्ये बाघा सिमेवरील बिटींग रिट्रीटचा भव्य सोहळाही अनुभवायला मिळाला. अमृतसरमध्ये जालियनवाला बागेच्यारुपाने ब्रिटिशांची क्रुरता पहायाला मिळाली. सुवर्णमंदिरामध्ये शिख समाजाची भक्ती पहायला मिळाली. कुरुक्षेत्रामध्ये महाभारतकालीन स्थळांना भेटी देता आल्या. अर्जुन  भिष्म, श्रीकृष्ण यांच्याशी संबधित क्षेत्रांचे दर्शन घेता आले. पानिपत मध्ये मराठ्यांच्या इतिहास अनुभवता आला.
प्रवासवर्णन म्हणजे टिपीकल इथुन आलो तिथुन गेलो असे न लिहीता भेट दिलेल्या स्थळांची जास्तित जास्त माहिती मिळवुन ती देण्याचा प्रयत्न केला आहे. आपण भेट देत असलेल्या स्थळांची माहिती असेल, त्याचे वैशिष्ट काय हे माहिती असले की, त्या स्थळाकडे पहाण्याचा दृष्टीकोन मिळतो. आमच्या कडे लोक जंजिरा किल्यावर जातात आणि म्हणतात की, तिथे बघण्यासारखे काहीच नाही. वास्तविक तिथे जाण्यापूर्वी त्या किल्याचा इतिहास त्याचे जलदुर्ग म्हणून असलेले महत्व विचारात घेऊन किल्ला पाहिला की, हा किल्ला उभा करण्यामागे निर्मात्यांचे कष्ट आणि त्यांची दूरदृष्टी याचा प्रत्यय येतो. किल्यात असणारे गाईड चुकीचा इतिहास सांगतात आणि आपण आपला गैरसमज वाढवुन परत येतो. असाच प्रकार श्रीनगर येथिल प्रसिद्ध अवंतीस्वामी मंदिराचे बाबतित होतो. मंदिराचा खरा इतिहास समजतच नाही. गाईड त्यांना सोयीची  माहिती सांगतात. असो मी काही त्यातला तज्ञ नाही परंतु मनात आले ते व्यक्त केले एवढेच.
हा माझा प्रयत्न आपल्यला आवडल्यास मला अवश्य कळवावा. आपला अभिप्राय मला लिहिण्याचा नवा उत्साह देईल.

अनिल अनंत वाकणकर.
   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा