सोमवार, २६ मार्च, २०१८

हिमालयाच्या सहवासात भाग ७


७) गुलमर्ग आणि श्रीनगर दर्शन
            आज दिनांक २० मार्च. आज सकाळी सात वाजताच तयार होऊन डेकवर आलो. आज मुद्दामच कोणतेही गरम कपडे घातले नव्हते. आजचे तापमान ८ अंश सेल्सिएस एवढे होते. त्यामुळे थंडी होतीच परंतु ती बोचरी वाटत नव्हती. रेग्युलर टि शर्ट आणि जीन्सची पॅंट घातली होती तरी बेअरेबल वाटत होती.
     काल ठरल्याप्रमाणे फोटोग्राफर हजर झालेला होता. सर्वप्रथम आठवले दांपत्याचे फोटो सेशन झाले. आज सुरेश आठवले यांचा वाढदिवस होता. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांचे दोघांचे त्यांच्या मोबाईलमध्ये फोटो काढुन दिले. त्यानंतर छोट्या शिकाऱ्यामध्ये काश्मिरी ड्रेसमध्ये बसुन आमचे दोघांचे फोटो सेशन करुन झाले. आम्ही फक्त चार पाच फोटो काढायचे असे ठरवले होते. परंतु प्रत्यक्ष पंधरा फोटो काढुन झाले. त्यानंतर एकेकाचे करत सर्वांचेच फोटो सेशन झाले. एकीकडे कापड खरेदी सुरु होती. सगळ्यांनीच श्रीनगरची आठवण म्हणून ड्रेसपिसची खरेदी केली. दरम्यान नाश्ता आला. आज आलु पराठा आणि लोणचे असा नाश्त्याचा बेत होता.
     आज आमचा श्रीनगर दर्शनाचा कार्यक्रम होता. त्यानिमित्ताने फारुकभाईंनी आम्हाला श्रीनगरच्या इतिहासाची आणि प्रेक्षणिय स्थळांची माहिती दिली. श्रीनगर हे जम्मु आणि काश्मिर या राज्याचे राजधानीचे शहर समुद्रसपाटी पासुन १७०० मिटर उंचीवर आहे. हे शहर हाऊस बोट आणि सरोवरांकरीता प्रसिद्ध तर आहेच. या व्यतिरिक्त पारंपारीक हस्तकला आणि सुक्यामेव्याकरीताही हे शहर प्रसिद्ध आहे. या शहराचा इतिहास तसा खूप प्राचीन आहे.
     या शहराचे मूळनांव सूर्यनगरी असे होते. श्रीनगर या शहराच्या नांवातच खरं म्हणजे त्याचा अर्थ सामावला आहे. श्री म्हणजे लक्ष्मी याचाच अर्थ हे शहर लक्ष्मीचेच नगर आहे. राजा प्रवरसेन दुसरा याने या नगरीची स्थापना २००० वर्षांपूर्वी केली  असावी याचे काही पुरावे उत्खननात सापडले होते असे म्हणतात. काही इतिहासकारांच्या मते हे शहर सम्राट अशोकाने स्थापन केले. श्रीनगर येथे अनेक सिनेमांचे शूटींग केले जात असे. जुन्या जवळ जवळ प्रत्येक सिनेमात काश्मिरचे दृष्य असणारे कमीत कमी एखादे तरी गाणे असायचेच. अगदी मराठी सिनेमातही हे चिंचेचे झाड या गाण्यात काश्मिर मधिल दृष्ये आहेत.
     श्रीनगरमध्ये निशात गार्डन, चश्मेशाही गार्डन, शालिमार गार्डन, गुलमर्ग, सोनमर्ग, पहलगाम ही पर्यटकांची आवडती ठिकाणे आहेत. हल्लीच श्रीमती इंदिरा गांधी यांच्या नावाने तुलिप गार्डन तयार करण्यांत आले आहे. येथे असणाऱ्या हजरत बल मस्जिदमध्ये हजरत मोहमंद पैगंबराच्या दाढीचा केस जपुन ठेवला आहे.
     श्रीनगर शहरामध्ये शंकराचार्य पर्वतावर शंकराचार्यांचे मंदिर आहे. याला तख्त ए सुलेमान असेही म्हटले जाते. या मंदिराची निर्मिती राजा गोपादित्याने इसवीसन पूर्व ३७१ मध्ये केली होती.  आमच्या दुर्दैवाने आम्ही येथे जाऊ शकलो नाही.
     आमच्या सर्व मेंबरची खरेदी, फोटोसेशन उरकल्यावर आजचे उत्सवमूर्ती श्री आठवले यांचे औक्षण करण्यात आले. औक्षणाची तयारी केतकीताईंनी मुंबईहून येतानाच आणलेली होती. आमच्या ग्रुपमध्ये पांच सुवासिनी होत्याच त्यांनी त्यांना औक्षण केले. त्यानंतर फारुकभाईंच्या मिसेसनीपण त्यांना औक्षण केले. औक्षण झाल्यावर श्री आठवले यांनी आमच्यात ज्येष्ठ असणाऱ्या नानांना आणि फारुकभाईंच्या आईला नमस्कार केला. केतकीताईंनी खास वाढदिवसाकरीता आणलेल्या बेसनाच्या लाडवांनी सर्वांचे तोंड गोड केले. मात्र काश्मिरच्या कडक थंडीने त्या लाडवांना देखिल कडक केले होते.
     एवढे सगळे होईपर्यंत दोन शिकारे दाल सरोवराच्या किनाऱ्यावर जाण्याकरीता हजर झाले होते. त्या शिकाऱ्यांमध्ये बसुन दाल सरोवराच्या किनाऱ्यावर आलो तेथे आमची बस हजरच होती. परंतु तेवढ्यात काही गरम टोप्या, जर्कीन असे गरम कपडे विकणाऱ्या लोकांनी आम्हाला गराडा घातला. आमच्यापैकी काही जणांनी त्यातले गरम कपडे खरेदी केले. आजचा बिझी शेड्युल विचारात घेऊन गब्बु आमचा ड्रायव्हर निघण्याची घाई करीत होता.
     आता आम्ही गुलमर्गच्या रस्त्याला लागलो होतो. हा रस्तादेखिल निसर्गसौंदर्याने नटलेला होता. दोन्ही बाजुला घनदाट झाडी, मधुन मधुन धबधबे कोसळत होते. त्यातच रिमझिम पाऊस पडत होता. त्यामुळे वातावरणात गारवा वाढला होता. एकुणच वातावरण आल्हाददायक होते.
     काश्मिरच्या खोऱ्यामध्ये श्रीनगर पासुन कोणत्याही दिशेला गेले तरी निसर्गाची इतकी लोभसवाणी दृष्ये दिसतात की, ती पाहून असे वाटते परमेश्वराने आपले सर्व वैभव येथे उधळुन टाकले आहे. या राजमार्गावरुन निघाल्यावर पर्यटक रस्त्यावर लिहिलेल्या गावांची नावे वाचुनच आकर्षित होतात आणि गुलमर्ग, सोनमर्ग आणि पहलगाम येथे फिरायला जातात.
     गुलमर्गच्या रस्त्याच्या दुतर्फा असलेली छोटी छोटी गावे आणि शेती मनाला मोहून टाकते. सरळ लांबच लाब रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या उंचच उंच झाडांच्या भव्य रांगा हिरव्या हिरव्या भिंतींप्रमाणे भासतात. जुन्या काळातिल अनेक चित्रपटामधली गाणी या रस्त्यावर चित्रित केली गेली आहेत. चढणीचा रस्ता सुरु झाल्यावर या झाडांची घनता आणखिनच वाढते. गुलमर्गला पोचल्यावर सगळीकडे गवताने भरलेली सुंदर सुंदर मैदाने दिसायला लागतात. या मैदानांना काश्मिरी भाषेत मर्ग असे म्हणतात. गुलमर्ग याचा अर्थ आहे फुलांनी भरलेली मैदाने. गुलमर्ग समुद्रसपाटी पासुन २६८० मिटर उंचीवर आहे. येथुन घोड्यावरुन खिलनमर्ग, सेवन स्पिंग आणि अलपथ्थर येथे जाता येते.
     गुलमर्ग येथे जगात सगळ्यात उंचीवर असणारा गोल्फकोर्स आहे. हिवाळ्यात येथिल धरतीने बर्फाची जणू चादरच पांघरलेली असते. त्यावेळी आईस स्केटींगचा आणि बर्फात खेळण्याची हौस असणाऱ्यांसाठी हा जणू स्वर्गच असतो. गुलमर्ग येथिल वैशिष्ट म्हणजे येथे चालवली जाणारा गंडोला. गंडोला म्हणजे बर्फाने भरलेल्या दरीची दृष्ये पहाण्याकरीता आकाशातुन केलेले भ्रमण. येथे असणाऱ्या या रोप वे किंवा केबल कारमधुन  आकाशातुन विहार करणे. येथे असणाऱ्या वृक्षराजीवर साचुन राहिलेला बर्फ पहाण्यात एक वेगळीच मजा आहे. अशा या बर्फाच्छादित शिखरांवर जर सोनेरी सूर्याची किरणे पडली तर सोनेपे सुहागा. परंतु आम्ही या गंडोला सफारीचा आनंद घेऊ शकलो नाही.
     आम्ही गुलमर्गमध्ये प्रवेश केला आणि स्नो फॉल व्हायला सुरवात झाली. आम्ही आणलेली मिनी बस आता पार्क करण्यात आली होती. याच्या पुढचा प्रवास सोनमर्ग प्रमाणे स्पेशल चेनवाल्या गाडीने करावा लागणार होता. तेथे हजर असणारे गाडीवाले भरमसाट दर सांगत होते. आम्ही आमच्या गाडीतुन उतरुन चौकशी केली तेव्हा समजले की, गंडोल्यापर्यंत कोणालाच जाऊन देत नाहित. तेव्हा आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला येथिल लोकल गाडिवाल्यांच्या थापांना बळी न पडता येथेच मोकळ्या जागेत स्नो फॉलचा आनंद घ्यायचा.
     सिनेमातला स्नो फॉल बघणे आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणे यात खूपच अंतर आहे.  येथे बर्फात मनसोक्त खेळून त्याचे व्हीडीओ करुन झाल्यावर तेथे जवळच असणाऱ्या हॉटेलात पोटपूजा करुन घेतली. गरमा गरम कांदाभजी, त्यासोबत गरमा गरम चहा आणि बरोबर घरुन आणलेल्या पदार्थांनी पोटभरुन घेतले. त्या हॉटेलात असलेल्या फायर प्लेस जवळ बसुन बर्फात खेळून आखडलेले हात शेकून घेतले. त्या हॉटेलच्या परिसरांतच एक काश्मिरी कपड्यांचे दुकान होते. महिलांनी तेथे काही खरेदी केली. तेथे असलेल्या निरनिराळ्या प्रकारच्या टोप्या घालुन फोटो काढले.
     दुपारी तिनच्या सुमारास परत श्रीनगर शहरांत आलो. सर्वप्रथम आम्ही निशाद गार्डनला भेट दिली. निशात गार्डन नंतर आम्ही शालिमार गार्डनला भेट दिली. या बागेला पौराणिक संदर्भ देखिल आहे. सध्याच्या इतिहासानुसार शालिमार गार्डनच्या विस्तारिकरणाचे आणि मोगल गार्डनच्या सध्याच्या स्वरुपामध्ये ही बाग परिवर्तित करण्याचे श्रेय मुगल बादशहा जहांगिर याच्याकडे जाते. परंतु प्राचिन इतिहास पाहिला तर दुसऱ्या शतकात ज्या प्रवरसेन द्वितिय याने श्रीनगर शहर वसविले त्यानेच या बागेचे निर्माण केले असावे असा संदर्भ मिळतो.
     प्रवरसेन राजाने दाल सरोवराच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यात एक झोपडीवजा घर उभारले होते. त्या घराचे नाव त्याने शालिमार असे ठेवले. संस्कृतमध्ये शालिमार या शब्दाचा  अर्थ प्रेम निवास अथवा प्रीती घर असा होतो.  जेव्हा प्रवरसेन राजा त्यावेळचे संत सुकर्मास्वामी यांना भेटायला येत असे तेव्हा तो या झोपडीत रहात असे. कालांतराने ती झोपडी राहिली नाही परंतु शालिमार हे या जागेचे नांव कायम राहिले.
     शालिमार गार्डन नंतर आम्ही चश्म ए शाही गार्डन बघायला गेलो. या बागेत जाण्याकरीता ५०-६० पायऱ्या चढुन जावे लागते. बागेमधुन दाल सरोवराचे आणि परिसराचे दृष्य विलोभनिय दिसते. या जागेचा शोध घेण्याचे श्रेय काश्मिर मधिल काश्मिरी पंडितांच्या कुळातिल महिला संत रुपा भवान यांच्याकडे जाते. रुपा भवानी यांच्या कुटूंबाचे आडनाव साहिब असे होते. त्यावरुन या झऱ्याला चश्मे साहिब असे संबोधले जायचे. काही कालानंतर त्याचा अपभ्रंश होऊन त्याला चश्मेशाही अथवा चश्म ए शाही या नांवाने ओळखले जायला लागले. कालांतराने मोगल शासकांनी त्याचा मुगल गार्डन स्वरुपात विस्तार केला.
     सध्या या गार्डनमध्ये जाण्याकरीता सिमा सुरक्षा दलाच्या क़डक पहाऱ्यातुन जावे लागते. सुरक्षा चौकीच्या गेटमधुन आधी आमची रिकामी गाडी पुढे गेली. नंतर आम्ही सर्वजण मेटल डिटेक्टर सारख्या मशिनमधुन पलिकडे गेलो. तेथिल सुरक्षा जवानांनी आमची आस्थेन चौकशी केली. विशेष म्हणजे चौकशी करणारा जवान मराठी बोलणारा होता.
            चश्म ए शाही बागेला भेट दिल्यानंतर आम्ही श्रीनगरचे वैभव मानल्या गेलेल्या तुलिप गार्डनला भेट द्यायला गेलो. हे गार्डन श्रीमति इंदिरा गांधी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ निर्माण करण्यांत आले आहे. हे आशिया खंडातिल सर्वात मोठे तुलिप गार्डन आहे. १२ हेक्टर एवढ्या प्रचंड जागेत निर्माण करण्यांत आलेले हे गार्डन पहाणे म्हणजे डोळ्यांना मेजवानीच आहे. निरनिराळ्या रंगाच्या तुलिप फुलाचे हे गार्डन आखिव रेखिव आहे. या ठिकाणी देखिल अनेक फोटो काढले व्हीडीओ केला. श्रीनगरमध्ये आल्याचे सार्थक झाले असा भाव हे गार्डन पाहून मनात आले.
     तुलिप गार्डन एवढे भव्य होते की, ते बघता बघता वेळ कसा निघुन गेला ते कळलेच नाही. त्यामुळे आमची बघायची अनेक ठिकाणे मिस झाली. शंकराचार्य मंदिर तरी बघायला पाहिजे होते कारण शंकराचार्यांचे मंदिर कुठे असलेले ऐकले नव्हते. आज आमचा श्रीनगरचा शेवटचा मुक्काम  होता त्यामुळे इलाज नव्हता.
            संध्याकाळी हाऊस बोटीवर आलो तेव्हा एक धक्कादायक बातमी समजली. बडोदा येथिल एक फॅमिली फारुकभाईंच्या बहिणीच्या हाऊसबोटवर उतरली होती. ते एकूण तिघेजण स्वत:ची कार घेऊन आले होते. गाडी ते स्वत: चालवत होते. आज ते फारुकभाई यांच्या भाच्याला रस्ता दाखवायला घेऊन सोनमर्ग येथे गेले होते. सोनमर्ग येथे ती कार बर्फावरुन स्लिप होऊन खोल दरीत कोसळली होती. गाडी चालवणारा तो गेस्ट जिवंत होता परंतु त्याच्या शरिराची इतकी मोडतोड झाली होती की, त्याला अतिदक्षता विभागात दाखल होते. त्याची पत्नी देखिल गंभिर जखमी होती. फक्त त्याचा मुलगा आणि फारुकभाई यांचा भाचा सही सलामत होते. या घटनेमुळे फारुक भाई तिकडे हॉस्पिटल मध्ये गेले होते. 
     आज आठवले यांचा वाढदिवस होता त्यानिमित्ताने सकाळी त्यांना औक्षण करुन झाले होते. आता संध्याकाळी कापण्यासाठी केक आला होता. परंतु घडलेल्या प्रसंगाचे त्यावर सावट आले होते. रात्री जेवण्यापूर्वी केक कापण्याचा कार्यक्रम झाला. जेवणात स्विट देखिल केले होते. रात्री आम्ही झोपेपर्यंत फारुकभाई हॉस्पिटल मधुन आले नव्हते. वास्तविक आज आठवले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ते हाऊसबोटला लाईटिंग करणार होते. स्वत: गिटार वाजवुन बर्थ डे गीत गाणार होते. परंतु तो योग नव्हता.
     आधी ऑर्डर दिल्याप्रमाणे सुकामेव्याची पार्सल आलेली होती त्याचा हिशेब पूर्ण केला गेला. सकाळी काढलेल्या फोटोच्यादेखिल प्रिंट आलेल्या होत्या. काहीजणांनी कपडे धुण्यासाठी आणि इस्त्री करीता दिले होते ते देखिल आले होते. या सगळ्याचा हिशेब पूर्ण करुन रात्री झोपायला साडे दहा वाजले. आज श्रीनगर येथिल मुक्कामाची अखेरची रात्र होती. उद्या पहलगाम गाठायचे होते.
*******
    


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा