मंगळवार, २७ मार्च, २०१८

दुर्गा कवच भाग २

दुर्गा कवच

भाग २
आज रविवार देवीचा वार. आज अनिकेत आणि सौ.आर्याच्या हस्ते त्यांच्या विवाहानंतर प्रथमच कुलस्वामिनी आर्यादुर्गेची षोडशोपचारे विधीवत पूजा होणार होती. त्यांच्या लग्नानंतर अनिकेतला लगेचच कंपनीच्या कामासाठी अमेरीकेला जावे लागले होते. त्यामुळे हा कुलाचार लांबणीवर पडला होता. आता त्याला रजा मिळताच सर्वप्रथम त्याने देवी हंसोळला जाण्यासाठी प्लॅनिंग केले होते. ते जाणार म्हटल्यावर त्याचे सासु सासरे आम्हालाही गुहागरला व्याडेश्वराला जायचे आहे असे म्हणून त्यांच्या सोबत आले होते. कारण उद्याच श्रावण महिना सुरु होणार होता. पहिलाच दिवस सोमवार आला होता म्हणून त्यांचा कुलस्वामी व्याडेश्वराला या नव दांपत्याच्या हस्ते  अभिषेक व्हावा ही त्यांचीही इच्छा होती.
      आज आषाढ महिन्यातला शेवटचा दिवस होता. अमावस्या दुपारनंतर संपणार होती. त्यामुळे आज देवीची यथासांग पूजा करुन सर्वजण रात्री येथेच मुक्काम करणार होते. उद्या पहाटे निघुन आठ वाजेपर्यंत गुहागरयेथे व्याडेश्वराला त्यांना जायचे होते. तेथिल अभिषेकाचा कार्यक्रम उरकुन नंतर तेथुनच सर्वजण पुण्याला जाणार होते.
      अनिकेत सकाळी लवकर उठुन आर्यासह मॉर्नींग वॉक आणि साईट सिईंग हा दुहेरी उद्देशाने फिरायला बाहेर पडला होता. त्यांना दोघांना फिरायला जाताना पाहुन जोशींनी त्यांना गुड मॉर्नींग केले. पावसाचे दिवस आहेत तेव्हा सरपटणारे प्राणी फिरत असतात त्यांच्या पासुन सावध राहुन फिरण्याचा आनंद घ्या अशी सूचनाही त्यांनी केली. नंतर ते दोघे फिरत फिरत पांडवांनी खोदलेली विहीर, कातळामध्ये कोरलेले नागयंत्र पाहून आले. आज हवामान पावसाळी होते. कोणत्याही क्षणी मुसळधार पाऊस कोसळायला सुरवात होईल असे वाटत होते.
      थोड्या वेळाने सर्वजण आंघोळी उरकुन खाली भोजनगृहात आले. सर्वांनी चहापान केले आणि मंदिरात दर्शनाला गेले. अनिकेतने आज छान कुसुंबी रंगाचा कद नेसला होता. त्यावर त्याच रंगाचे उत्तरीय घेतले होते. आर्याने त्याच रंगाची पैठणी नेसली होती. दोघांची जोडी अगदी दृष्ट लागावी अशी दिसत होती. नुकतीच देवीची पूजा झालेली होती. सर्वांनी मनोभावे देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर परिसर देवतांचेही दर्शन घेतले. तिथपर्यंत उपाध्ये गुरुजी आले. गुरुजींनी येताना सर्व तयारी आणलेली होतीच.
      उपाध्ये गुरुजींना आलेले पहाताच अशोकराव पुढे झाले. त्यांनी गुरुजींना ओळखले कां म्हणून विचारले. त्यावर गुरुजींनी आपण अशोक फणसळकरच नां? असे विचारले. एकमेकांचे क्षेम कुशल विचारुन झाल्यावर अशोकरावांनी आपल्या सगळ्या परिवाराची गुरुजींना ओळख करुन दिली. त्यांनी गुरुजींना विचारले, आपले फोनवर बोलणे झाले होते त्याप्रमाणे आज माझ्या मुलाच्या हस्ते देवीला अभिषेक करायचा आहे. आपण सर्व तयारी घेऊन आला आहात नां?
            त्यावर गुरुजींनी हो! हा काय मी तयारीत आलो आहेचला, जवळपास दहा वाजलेच आहेत, आता आपण पूजेला सुरवात करु याम्हणजे अभिषेक, पूजा आरती सगळे अकरा, साडे अकरा  पर्यंत पूर्ण होईल.
      उपाध्ये गुरुजींनी अनिकेत आणि आर्याला मोठ्या माणसांना नमस्कार करुन देवीच्या गाभा-यात यायला सांगितले. त्याप्रमाणे दोघेही वडिलधा-यांच्या आणि उपाध्ये गुरुजींच्या पाया पडुन गाभा-यांत पाटावर जाऊन बसले. बाकी सर्वजण बाहेर सभामंडपात बसले.
      गाभा-यांत देवीच्या पायाजवळ बसुन देवीची पूजा सुरु झाली. उपाध्ये गुरुजी एक एक विधी सांगत होते त्याप्रमाणे अनिकेत ते करत होता. त्यानंतर गुरुजींनी अभिषेकास सुरवात केली. ते श्रीसूक्ताचा पाठ म्हणू लागले. त्यांच्या बरोबर अनिकेतही म्हणू लागला. ते बघुन गुरुजी त्याला म्हणाले तुला जर व्यवस्थित म्हणता येत असेल तर तू एक स्वतंत्र आवर्तन म्हटलेस तरी चालेल. मग त्यांच्या सूचने प्रमाणे त्याने शेवटचे सोळावे आवर्तन संथ स्वरात म्हणायला सुरवात केली.
हरिः ॐ हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजाम् ।
चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ॥
      अशा प्रकारे पूर्ण श्रीसूक्त म्हणून झाल्यावर यथावकाश त्यांची पूजा पूर्ण झाली. त्यांनी सूरतेहून येताना खास देवीसाठी तयार करुन घेतलेली साडी आणली होती. त्या खास साडीने आर्याने देवीची ओटी भरली. नंतर भक्त निवासमधुन आणलेला नैवद्य दाखवला. सर्वांनी मिळुन आरती केली. उपस्थित असलेल्या सर्वांना प्रसाद दिला.
            इकडे देवीवर अभिषेक सुरु झाला आणि आकाशांत आधिपासुनच दाटुन आलेल्या मेघांनी जोरदार बरसात करायला सुरुवात केली. अक्षरशढगफुटी झालेली दिसत होती. पावसाच्या धारा इतक्या जोरदार बरसत होत्या की देवळातुन समोरच असलेले भक्तनिवास दिसत नव्हते. आता थांबेल मग थांबेल असे करताना एक तास झाला तरी पावसाचे थांबायचे चिन्ह दिसत नव्हते.
            दरम्यानच्या काळात आर्याच्या आई सौ. मोहिनी पाटणकर, अनिकेतची आई सौ. अनघा फणसळकर आणि आर्या यांना देवीला नेसवलेल्या साड्यांचा येथे लिलाव होऊन त्यांची विक्री केली जाते असे समजले. तेव्हा त्यांनी भोपी गुरवांकडे चौकशी केली असता त्यांनी अशा साड्या आताही मिळु शकतिल असे सांगितले. तेव्हा त्या तिघींनीही देवीचा प्रसाद म्हणून अशा साड्या खरेदी करायच्या ठरवल्या. मग त्या तिघीही गुरवांच्या बरोबर त्या साड्या बघायला गेल्या. त्या तिघींनीही आपल्या स्वत:करिता तसेच आपल्या परिचयातिल व्यक्तींकरिता मिळुन पंधरा सोळा साड्या खरेदी केल्या. त्यातल्या दोन साड्या लांबीला खूपच लहान होत्या. परंतु त्या प्युअर कॉटनच्या आणि छान डिझाईन असलेल्या होत्या. त्या दोन्ही साड्या सौ पाटणकर आणि सौ फणसळकर यांनी डोक्याला बांधायला रुमाल म्हणून वापरायच्या ठरवल्या आणि आपल्या पर्स मध्ये ठेवुन दिल्या.
      बराच वेळ वाट बघुन पावसाचे थांबण्याचे लक्षण दिसेना असे पाहून शेवटी उपाध्ये गुरुजी, गुरव यांच्या सह सर्वजण भक्त निवासमध्ये भोजनाकरिता गेले. आज भोजनगृहात टेबल खुर्ची ऐवजी पंगत मांडली होती. अनिकेत आणि आर्या सोडून सर्वजण भोजनास बसले. जोशी दांपत्यालाही ते नाही म्हणत होते तरी जेवायला बसायला लावले. त्या सर्वांना अनिकेत आणि आर्या वाढायचे काम करित होते. सर्वांची जेवणे झाल्यावर सवाष्णींची साडीने ओटी भरण्यांत आली. उपाध्ये गुरुजींची योग्य ती पाठवणी करण्यांत आली. त्यानंतर अनिकेत आणि आर्या भोजनास बसले. सर्वांचे भोजन उरकताच सर्वचजण वामकुक्षी करिता गेले.
      दुपारचे चार वाजले तरी पावसाची संततधार चालूच होती. अती पर्जन्य वृष्टीमुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. दरम्यान राजापुरहून भालावली मार्गे पावसकडे जाणारी एस्. टी. बस परत आली होती. पावसाच्या पाण्याने आणि एका ठिकाणी दरड कोसळल्याने रस्ता बंद झाला होता. त्या गाडीचा ड्रायव्हर भक्तनिवासच्या व्यवस्थापक जोशींच्या ओळखीचा होता म्हणून तो भक्तनिवासमध्ये त्यांना भेटायला आला होता. जोशींनी त्याला आणि कंडक्टरला आत बोलावुन चहा बिस्कीटे दिली आणि त्याच्याबरोबर गप्पा मारत बसले होते. बघता बघता एक तास निघुन गेला. दरम्यान त्या बसच्या ड्रायव्हरने डेपो मॅनेजरना फोन करुन काय करु म्हणून विचारले. त्यावर डेपो मॅनेजर साहेबांनी थोडी वाट पाहून रस्ता सुरु होत नसेल तर परत राजापुरला परत या असे  सांगितले.
*******
            पावसाच्या रिपरिपीला कंटाळुन आर्या, तिची आई आणि अनिकेतची आई पॅसेजमध्ये खुर्च्या टाकुन गप्पा मारत बसल्या होत्या. एका रुममध्ये अनिकेत, त्याचे बाबा आणि त्याचे सासरे मुकुंद पाटणकर गप्पा मारत बसले होते. तेवढ्यात मुकुंद पाटणकरांचा फोन वाजला. तो त्यांच्या मुलाचा माधवचा फोन होता. ते फोन घेण्याकरिता थोडे बाजुला गेले. फोन घेऊन परत जागेवर आल्यावर त्यांचा चेहरा चिंतेत दिसु लागला. तेव्हा अनिकेतनी विचारले, काय झाले बाबा, एनी थिंग सिरियस?
            होतसे सिरियसच म्हणायला पाहिजे. कारण आमची सूनबाई माधवीला लेबर पेन्स सुरु झाल्याचे लक्षण दिसते असे माधव म्हणत होता. तिला आता हॉस्पिटल मध्ये अँडमिट करावे लागेल असेही तो म्हणाला होता. त्यामुळे आता आम्हाला निघावे लागेल. पुण्याला जायला या पावसात कसे काय जमेल तेच आता बघावे लागेल.
      त्यावर तुम्ही आर्याच्या आईला सांगुन तयारी करा, मी खाली जाऊन जोशींशी बोलतो. ते काय म्हणतात ते बघुया, असे म्हणून अशोकराव लगेचच गडबडीने खाली निघुन गेले. तेव्हा एस् टी ड्रायव्हर चव्हाणांचे डेपो मॅनेजर बरोबरचे बोलणे चालूच होते.
      अशोकरावांना गडबडीत खाली आलेले पाहून जोशी त्यांना सामोरे गेले आणि काय गडबड आहे म्हणून विचारले. तेव्हा अशोकरावांनी पाटणकरांना तातडीने पुण्याला जावे लागत आहे तेव्हा काय करता येईल असे विचारले. त्यावर जोशींनी आपण याबाबत येथे चव्हाण ड्रायव्हर आहेत त्यांनाच विचारुया असे म्हटले.
            तेव्हढ्यात श्री पाटणकरही खाली आले. मग जोशी, पाटणकर आणि अरुणराव तिघेही चव्हाणांजवळ गेले व त्यांना परिस्थितीची कल्पना दिली. त्यावर ते म्हणाले, मला आत्ताच आमच्या साहेबांनी राजापुरला परत यायला सांगितले आहे. त्यामुळे मी आता ही बस घेऊन लगेचच राजापुरला जातो आहे. तेव्हा तुम्ही याच बस मधुन राजापुरला चला. तिथुन पुढे कोल्हापुर मार्गे पुण्याला जाता येईल. पण तो मार्ग एवढ्या पावसात चालू असेलच असे नाही. तेव्हा त्यामार्गाने नाहीच जमले तर आता राजापुरहून दोन बस सुटतात बोरीवली सहा वाजता आणि मुंबई साडेसहा वाजता दोनपैकी कुठलीतरी बस नक्कीच मिळेल तिने पनवेल पर्यंत जा. तिथुन एक्सप्रेस वेने दोन अडीच तासात पुण्याला जाल. म्हणजे सकाळी सात साडेसात पर्यंत तुम्ही पुण्यात पोचु शकाल.
***********

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा