८. पहलगाम दर्शन
आज दिनांक २१ मार्च २०१६! आता थोड्याच वेळात ही हाऊसबोट सोडायची होती. काल
रात्री उशिरा फारुकभाई हॉस्पिटल मधुन आले होते. त्या गुजराथी माणसाच्या जिवाला
असलेला धोका टळला होता. परंतु तो स्वत:च्या पायावर ऊभा
रहाण्याची शक्यता कमी होती. याचा अर्थ एकच अनोळखी प्रांतात भलतेच साहस करण्याच्या
भरीस पडू नये. बर्फातुन गाड्या चालवण्याचा सराव असणाऱ्या आणि सुरक्षेसाठी गाडीच्या
चाकांना लोखंडी साखळीचा बेल्ट लावलेल्या गाडीमधुन प्रवास करण्याची सक्ती ही
पर्यटकांच्या सुरक्षेसाठीच होती हे आता मनात पक्के झाले. आमच्याकडे देखिल
हरिहरेश्वर येथे येणारे पर्यटक असेच वेडे धाडस करुन समुद्रात उतरतात आणि आपल्या
जिवाला मुकतात. त्यानंतर बोंबाबोंब मात्र शासनाच्या नावाने करतात. पर्यटनाचा आनंद
घ्यावा परंतु आपल्या बरोबर सगळ्यांचाच जीव धोक्यात घालू नये.
चहा नाश्ता करुन फारुकभाईंचा सर्व हिशेब करुन
आम्ही शागु पॅलेस सोडला. जाताना फारुकभाईंच्या फॅमिलीला काही गिफ्ट दिले, कारण
गेले तिन चार दिवस त्यांनी आमच्यासाठी चांगली व्यवस्था ठेवली होती. सर्वांच्या
बॅगा परत शिकाऱ्यामध्ये ठेवण्यात आल्या. जाता जाताच लेकला मोठी प्रदक्षिणा घालुन
रस्त्यावर आलो. शिकारेवाले देखिल टीप द्या म्हणून पाठिशी लागले होते. त्यांना टिप
देऊन झाल्यावर त्यांनीच रस्त्यावर हजर असलेल्या आमच्या बसमध्ये आमचे सामान चढवुन दिले.
आम्हाला निरोप देण्यासाठी रस्त्यावर फारुकभाई आले होते. आम्ही गब्बुला वाटेत
सफरचंदाची बाग आणि केशराची शेती दाखवायला सांगितली. काश्मिर मध्ये येऊन सफरचंदाची
बाग आणि केशराची शेतं पाहिली नाहित तर काश्मिर दर्शन पूर्णच होणार नाही. साधारण
दहाच्या सुमारास आम्ही श्रीनगर सोडले.
![]() |
केशराची शेती |
![]() |
उध्वस्त अवंती स्वामी मंदिर |
भगवान विष्णूंचे हे मंदिर
नवव्या शतकातिल आहे. हे मंदिर इसविसन पूर्व ८५३ ते ८८८ या काळात या राज्याचा शासक
असणाऱ्या अवंती वर्मन या राजाने बांधले होते. हे मंदिर, अवंतीपूर येथेच
जिर्णोद्धार केलेले अवतेश्वर(शिव) मंदिर आणि काश्मिर मध्येच असणारे मार्तंड(सूर्य)
मंदिर ही तिनही मंदिरे ग्रीक स्थापत्य शैलीतिल आहेत. या उद्धवस्त असणाऱ्या अवंती
स्वामी मंदिराचे अवशेषांवरील कोरीव काम पाहून त्यावेळच्या स्थापत्यकलेच्या
भव्यतेची कल्पना येते.
पहलगामच्या दिशेने जाताना
रस्त्याच्या दोन्ही बाजुला सफरचंदाच्या बागा होत्या. आपल्याकडे कोंकणात आंब्याच्या
बागा असतात तशाच पद्धतिच्या त्या बागा मला वाटल्या. सध्या पाऊस, स्नो फॉल आणि
पानगळीचा ऋतु चालू असल्यामुळे सफरचंदाची झाडे म्हणजे खराटे झालेले होते. नुकतिच झाडांना पालवी यायला सुरवात झाली होती.
अपवाद म्हणून एक दोन झाडांवर हिरवी सफरचंदे पहायला मिळाली. बागा मात्र मोठ्या मोठ्या होत्या. आपल्याकडे
कोंकणात माझी पांचशे कलमांची, हजार कलमांची आंब्याची बाग आहे असे म्हणतात, तसे इथे
पाचशे हजार झाडांची सफरचंदाची बाग आहे असे म्हणत असावेत.
दुपारी दोनच्या सुमारास
आम्ही पहलगामला पोचलो. पहलगाम येथिल मुख्य आकर्षण होते फ्लॉवर व्हॅली. त्याकरीता
घोडेस्वारी करणे आवश्यक होते. पहलगाम हे अनंतनाग जिल्ह्यातिल एक शहर आहे. हे शहर
लिड्डर नदीच्या किनाऱ्यावर वसले आहे. हे पर्यटकांचे अत्यंत आवडते ठिकाण आहे. या
शहराची समुद्र सपाटीपासुनची उंची ७२०० फुट आहे. येथे अनेक सिनेमांचे चित्रिकरण
झाले आहे. दरवर्षी अमरनाथ यात्रेला जाणारे लोक प्रथम येथे येतात. येथुन पुढे
अमरनाथ लिंगापर्यंत घोड्यावरुन अथवा पायी जावे लागते. येथिल मुख्य व्यवसाय पर्यटन
हाच असावा. कारण हा सर्व पहाडी भाग आहे. किंबहूना सर्व काश्मिर खोरेच पर्यटन
व्यवसायावर अवलंबुन आहे.
पहेलगाम येथे आमच्या
स्वागताला तेथिल आमचे बुकींग असलेल्या हॉटेलचे मालक गफुरभाई हजर होते. त्यांच्या
सल्यानुसार आम्ही आधी हॉटेलवर न जाता साईट सीइंग करुन जायचे ठरवले. त्यांच्याच
मध्यस्थिने घोडे ठरवले.

घोडेवाल्यांनी आम्हाला
कारगिल पॉईंट, पहलगाम लिड्डर रिव्हर पॉईंट, चंदनवारी, आरु व्हॅली, शिकार पॉईंट
एवढे पॉईंट दाखवले. हवामान स्वच्छ असल्यास या ठिकाणाहून श्रीनगर परिसर दिसतो असे
एका पॉईंटवर आम्हाला त्यांनी सांगितले. कारगिल
पॉईंटवरुन ज्या ठिकाणी कारगिल युद्ध झाले ते शिखर दिसत होते. दुसऱ्या एका
पॉईंटवरुन लिड्डर नदीचे विहंगम दृष्य दिसत होते.
पूर्ण चढण चढुन गेल्यावर
एक छान पठार होते. मस्त हिरवळीला चिनार, पाईन, देवदार या वृक्षांच्या गर्द झाडीची
कुंपण घातल्यासारखी भिंतच होती. त्या पार्श्वभूमिवर जमिनीवर सगळीकडे बर्फच बर्फ
पसला होता. थोडे उंचवटे सोडून सर्व जमिन बर्फाने झाकलेली होती. उन्हाच्या कवडशांनी
बर्फ सोन्यासारखा चकाकत होता. या पठाराला बैसरन(Baisaran) पठार
असे म्हणतात. या बैसरन पठारावरील बर्फावरुन फिरायला खूपच मजा येत होती. हे पठार
खूपच मोठे असल्याने तेथे असलेली गर्दी जाणवत नव्हती. या पठारावर एक झाड होते त्या
झाडाला दिड दोन फुटांवर एक फांदी फुटून ती दोन झाडे झाल्यासारखी दिसत होती. खाली
असलेल्या बर्फाच्या पार्श्वभूमीवर त्या बेचकीत उभे राहून फोटो खूपच छान येत होत. त्यामुळे त्या पॉईंटवर
बरेच फोटो काढुन झाले.
आतापर्यंत कुठे बघण्यात न
आलेला एक गेम तिथे पहायला मिळाला. चेंडूच्या आकाराच्या एका मोठ्या फुग्यामध्ये
हायड्रोजन गॅस भरुन त्यात दोन माणसांना बसवुन ते फुगे उतारावरुन सोडून दिले जात
होते. या गेमला झोर्बिंग असे म्हणतात. बैसरन पठारावर बराच वेळ घालवुन त्यानंतर
तिथेच असलेल्या टपरीवजा हॉटेलमध्ये पोटपूजा केली. त्यानंतर आमचा पहेलगामकडे परतिचा
प्रवास सुरु झाला.
पहलगामकडे परत जाताना सर्व
प्रवास तिव्र उताराचा होता. त्यामुळे तोल सावरणे कठीण जात होते. एकाबाजुला अतिशय
खोल दरी त्यातच दगड, गोटे राडा, रोडा याने भरलेली अति चिंचोळी वाट यामुळे अक्षरश: जीव मुठीत नाही तर घोड्याच्या लगामात धरुन आम्ही
जात होतो. घोड्यावर एकाबाजुलाच वजन पडणार नाही याची दक्षता घेत आमची घोडेस्वारी
चालू होती. अखेर एकदाचा आमचा घोड्यावरचा प्रवास संपला आणि आम्ही आमची गाडी जेथे
पार्क केली होती तेथे आलो.
संध्याकाळी सहा वाजता
आम्ही हॉटेलवर पोचलो. हे हॉटेल आमच्या पूर्ण सहलीच्या मुक्कामाच्या ठिकाणांचा
विचार करता एक नंबरचे हॉटेल होते. रुमच्या खिडकीतुन बाहेरील निसर्ग सौंदर्य खूपच
छान दिसत होते. रुमचे इंटीरिअरही खूप चांगले होते. बेडवर पातळ गादी होईल एवढ्या
जाडीची रजई, शिवाय रग आणि इलेक्ट्रीक हिटींग रग देखिल होता. अर्थात आताचे तापमान
देखिल तिन अंश सेल्सिएस होते.
आजच्या घोडेस्वारीने
अंगाचा खुर्दा झाला होता त्यामुळे कढत कढत पाण्याने आंघोळी केल्या. सकाळपासुन
फारसे खाणे झाले नसल्याने आणि वातावरणाचा परिणाम म्हणून असेल् कडकडून भूक लागली
होती. त्यामुळे बरोबर आणलेल्या पदार्थांचा नाश्ता केला. नाश्ता झाल्यावर येथे जवळच
मामलेश्वराचे मंदिर आहे असे समजले. तेथे दर्शनाला जाण्याकरीता म्हणून निघालो तो अचानक
सगळीकडचे लाईट गेले आणि पूर्ण काळोख झाला. त्यामुळे अनोळखी प्रदेशात उगाच
भटकण्यापेक्षा परत हॉटेलात परत आलो. एकूणच श्रीनगरच्या परिसरात असताना देवदर्शनाचा
योग काही आला नाही.
वास्तविक मामलेश्वराचे
मंदिर आमच्या हॉटेलपासून अगदी जवळ होते परंतु नेमकी जागा दाखवणारा कोणी नसल्यामुळे
आम्हाला देवळात जाता आले नव्हते. त्या मामलेश्वराच्या मनांत आम्हाला दर्शन द्यायचे
नव्हते. हॉटेलात आल्यावर या मंदिराची माहिती मिळाली ती फार महत्वाची होती. या
मंदिराला पौराणिक संदर्भ आहे. हे मंदिर इसवीसन पूर्व ४०० वर्षांपूर्वीचे असण्याची
शक्यता आहे. पार्वतीने आपल्या मळा पासुन बनविलेल्या गणपतिला स्नानाला जाताना
द्वारपाल म्हणून बसविले. त्यावेळी त्याने प्रत्यक्ष शंकारांना अडविले होते तो
प्रसंग येथे घडला असे म्हणतात. “मा मल” याचा अर्थ जाऊ नका असा होतो. म्हणून या
महादेवाचे नांव मामलेश्वर असे पडले.
हॉटेलात परत आल्यावर
तासाभराने लाईट आले त्याकाळात बेडवर पडुन रहाणेच पसंत केले. कारण घोडेस्वारीचे
परिणाम जाणवायला लागले होते. लाईट आल्यावर नऊच्या सुमारास सर्वांनी एकत्र डायनिंग
हॉलमध्ये जेवण केले आणि जास्त टाईमपास न करता लगेचच झोपायला गेलो. उद्या जम्मुला
जायचे होते. येतानाचा श्रीनगर जम्मु हायवेचा अनुभव चांगला नव्हता त्यामुळे
प्रवासाला किती वेळ लागेल याचा भरवसा नव्हता. सावधगीरी म्हणून उद्या पहाटे पांच
वाजताच मार्गाला लागायचे असे ठरवले होते.
*******
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा