१३ चितपूर्णी माता दर्शन आणि
वाघा बॉर्डर
आज दिनांक २७ मार्च, आज संकष्टी चतुर्थी. गाडी सुरु होताच मंगलमूर्ती मोरयाचा गजर झाला. त्यानंतर
श्री गणपति अथर्वशिर्षाची एकवीस आवर्तने म्हणून झाली. त्यानंतर “प्रणम्य शिरसा” ही म्हणून झाले. आजच्या
नियोजित वेळापत्रकाप्रमाणे संध्याकाळी साडेचार वाजे पर्यंत वाघा बॉर्डरला पोचायचे
आहे. त्यामुळे सकाळी आठ वाजताच सगळे तयार होऊन मार्गस्त झालो.
पहिला टप्पा होता चिंतपूर्णी मातेचे दर्शन. गब्बुने मंदिराच्या खाली गाडी उभी
केली. मंदिराच्या दिशेने चढत असताना, वाटेत काही माणसे भेटली त्यांनी सांगितले मंदिरात जायला खूप मोठी रांग आहे चार
तास गेले तरी नंबर लागणार नाही. तुम्ही बाहेर पडण्याच्या मार्गाने गेलेल तर कदाचित
लवकर जाऊ शकाल. बाहेर पडण्याच्या गेटवर पोलीस बंदोबस्त होता. आम्ही त्यांना
आम्हाला वाघा बॉर्डरला जायचे आहे असे सांगितले तरी ते सोडेनात. शेवटी कळसाला नमस्कार
करुन परत जायचे असे ठरवले. शेवटची एकदा पोलिसांना विनवणी केली. अखेर त्यांना आमची
दया आली आणि त्यांनी आम्हाला गेट मधुन आत सोडले. परंतु पुढे अजुन एक पोलिस गेट
होतेच. परंतु तेथुन येणा-या लोकांमध्ये घुसुन आमच्यापैकी काहीजण आत पोचले.
चिंतपूर्णी हे प्रख्यात ५१ शक्ति पीठा पैकी एक आहे. या देवीला “छिन्नमस्तका” देवी असेही म्हटले जाते. या
जागेवर सतीचे पाय पडले होते. मार्कंडय पुराणातिल उल्लेखानुसार “माता चंडिने केलेल्या घनघोर युद्धामध्ये राक्षसांचा पूर्ण विध्वंस झाला परंतु
जया आणि विजया या दोघी योगिनींची रक्ताची तहान भागली नाही. ती भागवण्या करिता
चंडीने स्वत:चे मस्तक कापुन त्यातुन गळणा-या रक्ताने त्यांची तहान भागविली.”
या बाबतित आणखी एक पौराणिक आख्यायिका आहे. छिन्नमस्तका देवीचे रक्षण रुद्र
महादेवां कडुन चारही दिशांनी केले आहे. त्या रक्षण करणा-या शिवरुपांची पूर्वेला
कलेश्वर महादेव, पश्चिमेला नारायण महादेव,
उत्तरेला मुचकुंद महादेव तर दक्षिणेला शिव बारी अशी मंदिरे आहेत. भक्तांची अशी
श्रद्धा आहे की, पूर्ण भक्ति भावाने जर
देवीकडे काही मागितले तर ती भक्ताची इच्छा पूर्ण करतेच. या मंदिराची स्थापना पंडित
माईदास या सारस्वत ब्राह्मणाने केली. आजही त्या ब्राह्मणाचे वंशज देवीची सेवा करीत
आहेत. त्र्यंबकेश्वर येथे ज्याप्रमाणे भक्तांच्या वंशावळींची नोंद ठेवली जाते तशीच
इथेही ठेवली जाते.
चिंतपूर्णी मातेचे दर्शन झाल्यानंतर आम्ही वाघा बॉर्डरला जाण्यासाठी प्रवास
सुरु केला. संध्याकाळी सव्वाचार वाजता आम्ही वाघा बॉर्डरच्या पार्कींग मधे पोचलो.
पार्कींग मधिल गाड्यांच्या गर्दीवरुन तिथे उपस्थित असणा-या लोकांच्या गर्दीचा
अंदाज येत होता. लाऊडस्पिकरवर स्वागताची अनाऊन्समेंट होत होती. त्यामध्ये पॉवर बँक
सिमेवर नेता येणार नाही असे सांगितले जात होते. म्हणजेच मोबाईल फोन न्यायची
परवानगी होती. त्यामुळे मोबाईल मधे फोटो व्हीडीओ काढता येणार होते.
दोन टप्यामधिल सिक्युरीटी चेकअप मधुन गेल्यावर सिमेवरचे गेट दिसु लागले. परंतु
प्रत्यक्ष वाघा बॉर्डर वरील गेटच्या समोर असलेले स्टेडियम फुल झाले होते. त्यामुळे
उरलेल्या सर्व लोकांना स्टेडियमच्या अलिकडे असलेल्या गेटवरच थांबवले होते. तेथे
होणारा कार्यक्रम प्रत्यक्ष डोळ्यांनी आम्हाला पहाता येणार नव्हता. परंतु तेथे
मोठी स्क्रीन लावलेली होती. त्यावर परेडचा कार्यक्रम लाईव्ह दाखवत होते.
स्टेडियमच्या बाहेर १५ ते २० हजार लोक उभे होते. वातावरण एकदम वेगळेच होते.
तेथे उपस्थित असणारे सर्वच जण देशभक्तीने भारलेले होते. “भारतमाताकी जय” या सतत होणा-या घोषणेने
वातावरण भारुन गेले होते. प्रत्येकाचे डोळे समोरच्या स्क्रीनवर खिळलेले होते.
आपल्या कडचे जवान परेड करताना ज्या पद्धतीने पाय डोक्याच्या लेव्हलला नेत होते ते
पहाण्यासारखे होते. दोन्ही कडची गेट उघडल्यानंतर दोन्ही कडच्या जवानांनी एकमेकांशी
हात मिळवले होते. दोन्ही कडचे ध्वज एकसाथ उतरवले जात होते. आतमध्ये स्टेडीयममधे
बसुनदेखिल स्क्रिनवर दिसत होते असे व्यवस्थित दिसले असतेच असे नाही. हा कार्यक्रम सुमारे
अर्धातास चालला.
भारत पाकिस्थानला रस्त्याने जोडण्या-या या एकमेव सिमेवर (वाघा बॉर्डरवर) दररोज
संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेला दोन्ही देशांचे ध्वज उतरविण्याचा समारंभ होतो
त्याला “Beating Retreat ceremony” असे म्हणतात. हा कार्यक्रम सन १९५९ पासुन दररोज भारताच्या सिमा सुरक्षा दलातिल
आणि पाकिस्थानी रेंजर्सच्या पायदळातिल जवान एकत्रित पणे करतात. हा कवायतिचा
कार्यक्रम बारीक सारीक तपशिल विचारांत घेऊन केलेला आणि अतिशय जलद हालचालींनी युक्त
असतो. सुर्यास्त होण्याच्या सुमारास सुरवातिला दोन्ही देशांचे जवान एकमेकांचे सामर्थ्य
दाखवत पाय जास्तित जास्त उंच नेत कवायत करतात. बरोबर सुर्यास्ताला दोन्ही गेट
उघडली जातात त्यावेळी दोन्हीकडचा एक एक जवान दक्ष अवस्थेत तेथे उभा असतो दोन्ही
कडचे ध्वज एकाच वेळी उतरवले जातात. दोनही जवान एकमेकांशी हात मिळवतात. दोनही गेट
एकाचवेळी बंद होतात आणि हा कार्यक्रम संपतो.
कार्यक्रम संपल्यावर आम्हालाही प्रत्यक्ष सिमेपर्यंत जाऊन दिले. प्रत्यक्ष
सिमेवर ऊभे राहुन परिसराचे निरिक्षण करताना मनात एक वेगळीच भावना होती. विशिष्ट
पद्धतीने फेटे बांधलेले जवान आजु बाजुला वावरत होते. अनेकजण त्यांच्या बरोबर फोटो
काढत होते. एकुणच आजचा दिवस संस्मरणिय असा होता.
वाघा बॉर्डरला भेट देऊन आल्यावर आम्ही अमृतसरला गेलो. अमृतसर येथे रेल्वे
स्टेशन लिंक रोडवर असलेल्या विकी रेसिडेन्सि या गेस्ट हाऊसवर आमचा मुक्काम होता.
आम्हाला रुम दुस-या आणि तिस-या मजल्यावर मिळाल्या होत्या. आता आमचा अमृतसरला दोन
दिवस मुक्काम होता. त्यामुळे आजचा कार्यक्रम थोडा निवांत होता.
रात्री जेवायला रेल्वे स्टेशनच्या जवळ असलेल्या वैष्णो धाब्यावर गेलो होतो.
त्यानंतर गप्पा गोष्टी करित सावकाश रुमवर आलो. आता सहलीचे आणखी दोनच दिवस राहिले
होते. शेवटचा मुक्काम पानिपत येथे होता. उद्या सकाळी सुवर्ण मंदिरामध्ये जायचे
होते.
*******
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा