१४) अमृतसर दर्शन
आज दिनांक २८ मार्च, सकाळी प्रातर्विधी आंघोळ आटोपुन आठ वाजता हॉटेलच्या समोरच असलेल्या छोट्याशा
दुकानात चहा कॉफी पिण्यासाठी एक एक करुन सर्वजण गेलो. एक वयस्कर शिख दांपत्य ते
दुकान चालवत होते. तिथे एक जरा वेगळीच दिसणारी खारी(बिस्कीटे) मिळत होती. चहाबरोबर
खायला छान लागत होती. आमचे चहा पाणी होईपर्यंत गब्बु गाडी घेऊन आला होता. लगेचच
आम्ही सुवर्ण मंदिरात जायला निघालो.
सुवर्ण मंदिराच्या अलिकडे साधारण दिड ते दोन किलोमिटर अंतरावर पार्किंगमध्ये
गब्बुने गाडी लावली. गाडीमधुन उतरताच डोक्याला बांधायचे भगवे रुमाल विकायला अनेक
विक्रेते आले. त्यातल्याच एका वृद्ध विक्रेत्या कडुन रुमाल विकत घेतले. त्यानेच ते
सगळंयाच्या डोक्याला बांधले. पार्किंगच्या बाहेर आल्यावर बॅटरी रीक्षावाले
सुवर्णमंदिर लांब आहे असे सांगत आम्हाला मनवु लागले. आमच्यापैकी कोणालाच अंतराचा
अंदाज नव्हता म्हणून मग दोन गाड्या ठरवुन सुवर्णमंदिरापर्यंत आलो.
प्रथमदर्शनी उन्हामध्ये चकाकणा-या त्या सोन्याच्या मंदिराने मनाला भुरळ घातली.
मोबाईल आणि वस्तु क्लॉक रुममध्ये जमा केल्या आणि मंदिराच्या गेटमध्ये प्रवेश केला.
समोर मोठे सरोवर आणि त्या सरोवरामध्ये मंदिर फारच छान दिसत होते. मंदिरात जायला
प्रचंड गर्दी होती. मंदिराचे पूर्ण आवार दर्शनार्थिंनी भरले होते. जवळपास चार ते
पाच हजार लोक रांगेत उभे होते. परंतु रांगेला शिस्त नव्हती. एवढी गर्दी असुनही
कुठेही सिक्युरीटी दिसत नव्हती. रांगेमध्ये लोक सतत “सतश्री अकाल! वा s हे गुरु!!”
हा जप सतत करत होते. सुमारे अडीच तास रांगेत उभे राहिल्यावर आमचा नंबर लागला.
सुवर्णमंदिर अथवा हरमिंदर साहेब हे शिखपंथियांचे सर्वांत पवित्र स्थळ आहे.
अमृतसर शहरामधिल हे अत्यंत पवित्र स्थान आहे. किंबहूना अमृतसर शहराचे नांवच ज्या
सरोवरावरुन पडले आहे ते सरोवर शिख गुरु रामदास यांनी स्वत: निर्माण केले आहे.
हरमिंदर साहेब हे गुरुद्वारा या सरोवराच्या मधोमध आहे. या गुरुद्वाराचा बाहेरील
भाग सोन्याच्या पत्र्यांनी मढविलेला आहे. म्हणून या गुरुद्वाराला सुवर्ण मंदिर असे
म्हणतात. या गुरुद्वाराची पायाभरणी सुफी संत साई मिया मीर यांच्या हस्ते डिसेंबर
१५८८ मध्ये केली गेली. या मंदिरामध्ये शिखांशिवाय अन्य लोकही मोठ्या संख्येने
येतात. सुमारे ४०० वर्षांपेक्षा जास्त काळापूर्वी बांधलेल्या या गुरुद्वाराचा
आराखडा गुरु अर्जुन सिंग यांनी तयार केला होता. या गुरुद्वाराला चारही दिशेने
दरवाजे आहेत.
येथे येणा-या भक्तांकरिता येथे लंगरची सोय आहे. लंगर मधिल सर्व व्यवस्था
कारसेवेद्वारे केली जाते. भक्तांची रहाण्याची व्यवस्थाही येथे केली जाते.
सुवर्णमंदिर परिसरात अनेक तिर्थ आहेत. लंगरमध्ये मिळणा-या प्रसादा शिवाय मंदिरात
प्रसाद म्हणून एका द्रोणात अस्सल साजुक तुपातला(शिरा) दिला जातो. लंगरमध्ये खुप
गर्दी असण्याची शक्यता असल्याने आम्ही द्रोणामध्ये मिळालेल्या प्रसादावरच समाधान
मानायचे ठरवले आणि सुवर्णमंदिर परिसरातुन बाहेर आलो.
सुवर्णमंदिराच्या बाहेरच असलेल्या एका धाब्यावर जेवायचे आम्ही ठरवले. अमृतसर
येथिल प्रसिद्ध अमृतसरी कुलच्याचा आस्वाद येथे आम्ही घेतला. कुलचा म्हणजे
पराठ्याचाच एक प्रकार होता. परंतु छोले आणि कुलचा हा छान मेनू होता. सोबत हिरवी
मिरची, दही आणि कांदाही होता
त्यामुळे एक वेगळीच मजा आली.
जेवण झाल्यावर खरेदीची मोहिम सुरु झाली. आजची दुपार खास खरेदी करिता राखुन
ठेवलेली होती. सुमारे दोन अडिच तास निरनिराळी दुकाने फिरुन ड्रेस पिस,
तयार ड्रेस, शाली असे कपड्याचे निरनिराळे
प्रकार खरेदी करुन झाले. मला तर त्या करीता नविन बॅगपण खरेदी करायला लागली.
खरेदीचा कार्यक्रम पार पडल्यावर तेथुन जवळच असलेल्या जालियनवाला बाग मध्ये
गेलो. जालियनवाला बाग म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यासाठी एकाचवेळी मोठ्या संख्येने
बलिदान दिलेल्या हूतात्म्यांचे स्मृती स्थान आहे.
दिनांक ११ एप्रिल १९१९ या दिवशी ब्रिगेडीअर जनरल डायर याने अमृतसर शहराची
कायदा आणि व्यवस्थेची सूत्रे आपल्या हातात घेतली आणि त्याने शहरामध्ये कोणत्याही
प्रकारे सभा घेण्यास किंवा लोकांनी एकत्र येण्यास प्रतिबंध घातला. आणि ह्या
नोटिशीला फारशी प्रसिद्धीही दिली नाही. अशातच दिनांक १३ एप्रिल १९१९ या दिवशी
पंजाबमधिल मुख्य सण बैसाखी होता.
या निमित्ताने जालियनवाला बाग येथे आजुबाजुच्या खेड्यामधुन हजारो लोक जमा झाले
होते. जनरल डायरला हे समताच त्याने पन्नास गुरखा हत्यारी शिपायांसह तेथे आला आणि
त्यांना लोकांच्या पाठीमागे उभे करुन जमावावर गोळीबार करायला सांगितला. या
जमावामध्ये अनेक लहान मुले आणि स्त्रियासुद्धा होत्या. एकुण १६५० फायरिंगचे राऊंड
झाडण्यात आले. त्या बागेतुन जमा करण्यांत आलेल्या रिकाम्या काडतुसांवरुन हा आकडा
जाहिर करण्यांत आला होता. अधिकृत आकडेवारी नुसार ह्या गोळीबारात ११०० जखमी आणि ३७९
व्यक्ती मृत झाल्या होत्या. परंतु प्रत्यक्ष हा आकडा १५०० गंभिर जखमी आणि ११०० मृत
असा होता.
या स्मारकामध्ये अमर ज्योती, स्मृती स्तंभ, स्मृती बाग याचे निर्माण या
गोळीबारामुळे मृत्युमुखी पडलेल्यांमधे लाला लजपतराय यांचाही समावेश होता. या
घटनेचा बदला घेण्याच्या हेतूने क्रांतिवीर भगतसिंग आणि त्यांच्या सहका-यांनी जनरल
डायर यांच्या हत्येचा कट रचला होता.
सन १९५१ मध्ये भारत सरकारने ही जागा राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केली.
त्यानंतर जालियनवाला बाग राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट ची स्थापना करण्यांत आली. या
ट्रस्टने जालियनवाला बागेची जागा मुळ मालकाकडुन खरेदी केली आणि त्या जागेचे सध्या
दिसते आहे त्या आराखड्या प्रमाणे स्मारक बागेत रुपांतर केले. हे सर्व काम
लोकवर्गणितुन करण्यांत आले. करण्यांत आले आहे. या जागेचे मूळ नांव बाग असे असले
तरी ही जागा म्हणजे एक ओसाड जागा होती. त्यामध्ये असलेल्या बलिदान विहिरीचेही पुनरुज्जीवन
करण्यांत आले. गोळीबारातुन वाचण्याकरिता पळालेल्या अथवा जखमी झालेल्या अनेक
लोकांचा या विहिरीत पडुनही मृत्यु झाल्याचे मी वाचले होते.
जालियन बागेतल्या हुतात्म्यांना वंदन करुन नंतर तिथेच असणा-या छोट्याशा
म्युझियमला भेट दिली. तेथे असणारे त्या काळातिल वर्तमान पत्राचे फोटो पाहिले.
गोळीबाराच्या खुणा दर्शविणा-या भिंती पाहिल्या. या भारतिय स्वातंत्र्य
संग्रामाच्या साक्षीदार असणा-या स्थळाची आठवण चिरंतन रहावी म्हणून फोटो काढले.
अजुनही काही खरेदी बाकी होती म्हणून आमच्या पैकी काहीजण जालियनवाला बागेच्या
बाहेरच असणा-या दुकानांना भेट द्यायला गेले. तिथपर्यंत संध्याकाळचे पाच वाजुन गेले
होते. सर्वजण चालतच गाडी पार्क केली होती तिथे गेलो. त्यानंतर आमचा स्टॉप होता
दुर्गियाना मंदिर.
दुर्गियाना मंदिराला लक्ष्मी नारायण मंदिर, दुर्गा तिर्थ आणि सितला तिर्थ या नावानेही ओळखले जाते. हे हिंदू मंदिर असले
तरी याची रचना सुवर्ण मंदिर या शिख पंथातिल गुरुद्वारा प्रमाणे आहे. या मंदिराचे
दुर्गाडिया हे नांव या मंदिरातील मुख्य देवता दुर्गा देवी असल्या कारणाने दिलेले
असावे. या मंदिरामध्ये लक्ष्मी आणि नारायण यांच्या मूर्तिंचीही पूजा केली जाते. येथिल
मूळ मंदिर १६ व्या शतकातिल होते. सध्या असणारे हे मंदिर गुरु हरसाईमल कपूर यांनी
सन १९२१ मध्ये परत बांधलेले आहे किंवा होते त्याचा जिर्णोद्धार केला आहे. या नूतन
मंदिराची रचना सुवर्ण मंदिरा प्रमाणे केलेली आहे. या नूतन मंदिराचे उद्घाटन पंडित
मदन मोहन मालविय यांच्या हस्ते झाले होते. दसरा, जन्माष्टमी, राम नवमी आणि दिपावली ला
येथे उत्सव साजरा केला जातो.
दुर्गियाणा मंदिराला भेट दिल्यानंतर चहा कॉफी घेऊन मुक्कामी हॉटेलवर आलो.
दिवसभर उन्हात आणि शॉपिंगमुळे ताटकळत राहिल्याने थकवा जाणवत होता. म्हणून कुठेही
जायचे नाही असे मी ठरवले होते. परंतु सुवर्ण मंदिराचे लाईटिंग पहाण्यासाठी म्हणून
परत सर्वजण सुवर्ण मंदिराकडे स्पेशल रिक्षा करुन गेलो. लाईटिंग केलेले सुवर्णमंदिर
खरोखरच पहाण्या सारखे होते. मंदिराला लावलेले सोने विद्युत रोषणाई मधे चमकत होते.
रात्र होती तरी दर्शनाला सकाळपेक्षा जास्त गर्दी दिसत होती.
*******
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा