गुरुवार, २९ मार्च, २०१८

हिमालयाच्या सहवासात भाग ११


११. डलहौसी दर्शन
     आज दिनांक २४ मार्च २०१६! आमच्या सहलीचा ११वा दिवस! डलहौसी येथे बघण्यासाठी बरेच पॉईंट आहेत. त्यामुळे आज आम्ही आमचा पूर्ण दिवस येथेच घालवणार आहोत. सकाळचे प्रातर्विधी आणि चहापाणी झाल्यावर हॉटेलवर आणलेले सामान गाडीत चढवुन हॉटेलमधुन चेक आऊट केले.
     सर्वात प्रथम आम्ही पंचफुला येथे दाखल झालो. पंचफुला येथे छान धबधबा आहे. तो पाहून मला शिवथर घळीची आठवण झाली. शिरथर घळी येवढ्या उंचीवरुन हा धबधबा पडत नव्हता तरीही स्पॉट खूपच छान होता. जवळच दोरीच्या सहाय्याने तयार केलेला पुल होता. धबधब्याचे पडणारे पाणी शेवटी एका विशाल तलावात जाते त्या ठिकाणी बोटींगची सोय आहे. त्या तलावाच्या काठावर परम देशभक्त सरदार अजीत सिंह  यांचे स्मारक आहे. त्यांचा पुतळा येथे उभा केलेला आहे. हे अजित सिंग म्हणजे शहिद भगत सिंग यांचे काका होते. या ठिकाणी एक माणूस ससे घेऊन बसला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिथे असलेले ससे शांत बसले होते.
     पंचफुला येथिल निसर्ग सौंदर्याचा आनंद घेतल्यानंतर आम्ही जवळच असलेल्या सातधारा या प्रसिध्द स्थळी आलो. समुद्रसपाटीपासुन २०३६ मिटर उंचीवर असलेल्या या ठिकाणी सात झरे छोट्याशा धबधब्याच्या स्वरुपात पडतात. या सातधारांच्या पाण्यात औषधी गुण आहेत असा लोकांचा विश्वास आहे. या पाण्यात गंधकाचा अंश असल्याने त्वचा रोग तर बरे होणारच. येथिल निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्याकरीता तर लोक येथे येतातच शिवाय हे सात अप्सरांचे किंवा देवीचे स्थान आहे असाही लोकांचा समज आहे. आपल्याकडे कोंकणातही अशी सात आसरांची अशी बरीच स्थाने आहेत.
            सातधारा नंतर आम्ही सुभाष बोहली या पवित्र स्थळाला भेट दिली. आपल्या देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात मह्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी निगडीत असे हे स्थळ आहे. सन १९३७ मध्ये इंग्रजांच्या कैदेत असताना नेताजींना टी.बी. झाला होता. त्यावेळी उपचारासाठी आक्टोबर ते मे १९३७ या काळात ते पंचफुला रोडवरील डॉ.धर्मवीर यांच्याकडे ते राहिले होते. त्यावेळी ते दररोज या रोडवर फिरायला येत असत आणि या विहिरीचे पाणी पित असत. येथिल औषधी पाण्याने आणि शुध्द हवेने ते बरे झाले व नंतर नव्या उत्साहाने त्यांनी परत स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली. या ठिकाणी आम्ही नेताजींच्या पवित्र स्मृतीला वंदन केले.
     डलहौसी येथिल आणखी एक प्रसिध्द ठिकाण म्हणजे गांधी चौक. येथे प्रसिध्द तिबेटी बाजार आहे. चिनने जेव्हा तिबेटवर हल्ला केला तेव्हा हजारे तिबेटी आश्रयासाठी येथे स्थलांतरीत  झाले होते. त्यातिल बरेचसे कालांतराने हे शहर सोडून गेले. मात्र जाताना रस्त्याच्या कडेला त्यांनी निर्माण केलेली लेणी आणि गांधी चौकातिल तिबेटी बाजारच्या स्वरुपात आपल्या खूणा ठेवुन गेले. आमच्यापैकी काहीजणांनी येथे खरेदी केली.
     त्यानंतर आम्ही भेट दिली सुभाष चौकाला. येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारला आहे. या चौकातच फ्रान्सिस चर्च आहे. त्या चर्चला आणि तेथिल झूला भेट दिली. या ठिकाणी असलेल्या मोराने चक्क पिसारा उभारला होता. तसे जामनगरला आम्ही दररोज मोर बघतो परंतु पिसारा उभारलेला मोर बघणे हा वेगळाच अनुभव आहे.
     फ्रान्सिस चर्चला भेट दिल्यानंतर आम्ही डलहौसी शहराच्या बाहेर पडलो ते सरळ चमेरा लेकच्या दिशेने निघालो. डलहौसीहून चमेरा लेक ३४ किलोमिटर आहे. परंतु रस्ता वळणा वळणाचा आणि पूर्णपणे घाट रस्ता आहे. धरण दिसायले लागले होते परंतु रस्ता काही संपतच नव्हता. शेवटी एका बोगद्यातुन गेल्यावर धरणाचा बोटींग करता असलेला स्पॉट दिसायला लागला. तेथुन जवळच भालेई मातेचे मंदिर होते. आम्ही आधी भालेई मातेच्या मंदिरात जायचा निर्णय घेतला.
     आपल्याकडे ज्याप्रमाणे दक्षिण काशी म्हणून अनेक देवस्थानांचे नांव घेतले जाते. त्याच प्रमाणे वैष्णोदेवीच्या खालोखाल प्रसिध्द असणारी बरीच मंदिरे आहेत त्यापैकीच हे एक मंदिर आहे. या मंदिरात जाण्यासाठी साधारण शंभर पायऱ्या चढाव्या लागतात. मंदिराला छान दगडी कमान केलेली आहे.
भद्रकालीला येथे भालेई माता असे संबोधले जाते.  हे स्थळ भाल्यासारख्या टोकदार असणाऱ्या डोंगरावर असल्याने त्याला भालेई असे म्हणातात. समुद्रसपाटीपासुन याची उंची ३८८० फुट आहे. हे मंदिर चंबा या जिल्हाच्या ठिकाणापासुन ४० किलोमिटर तर डलहौसी पासुन ३५ किलोमिटर आहे. आश्विन आणि चैत्र महिन्यांत येथे नवरात्री उत्सव साजरा केला जातो.
या मंदिराची कथा मोठी रंजक आहे. माता भद्रकाली राजा प्रतापसिंग यांच्या स्वप्नांत आली व तिने मी भ्रण येथे गाडलेल्या अवस्थेत आहे, तिथुन मला बाहेर काढ आणि योग्य जागी माझे मंदिर बांध असे सांगितले. हे भ्रण गांव सध्याच्या मंदिरापासुन तिन किलोमिटर अंतरावर आहे.  
राजा प्रताप सिंग यांना आपली राजधानी चंबा येथे मंदिर बांधायचेच होते. त्याला शुभ शकुन झाला असे म्हणुन ते आपल्या सैनिकांसह मूर्ती शोधण्याकरीता निघाले. मूर्तीचा शोध घेतल्यानंतर परत येताना वाटेत ते सर्वजण भालेई येथे विश्रांतीसाठी थांबले. विश्रांती झाल्यावर परत चंबाच्या दिशेने निगण्याकरीता मूर्ती उचलु लागले असता मूर्ती जागची हालेना. याच्यावर तोडगा काढण्याकरीता किलोद येथिल ब्राह्मणाला बोलावुन उपाय विचारला तेव्हा त्याने सांगितले की, देवीची इच्छा इथेच रहाण्याची आहे. दुसऱ्या कथेनुसार येथिल ग्रामस्थांचा देखिल देवीला येथुन हलवुन चंबाला नेण्यास विरोध होता, म्हणून त्यांनीही राजाला भालेई येथेच मंदिर बांधण्याची विनंती केली.
कारण काही असो राजा प्रताप सिंग यांनी भालेई येथे हे मंदिर बांधले. कालांतराने राजा श्री सिंग यांनी त्याचे नूतनिकरण केले. दुर्दैवाने सन १९७३ मध्ये मंदिरामधिल मूर्तीची चोरी झाली. परंतु सुदैवाने ती मूर्ती परत सध्याच्या धरणाच्या परिसरात सापडली. परंतु तेव्हापासुन त्या मूर्ती मधुन घामाच्या धारा लागु लागल्या असे म्हणतात. भालेईमाता मंदिराच्या टेकडीवरुन चमेरा धरणाचा परिसर अगदी लॅंडस्केप सारखा दिसतो. एवढ्या उंचीवरुन चंबा खोरे पहाणे म्हणजे डोळ्यांना मेजवानीच आहे.
भालेई मातेचे दर्शन करुन झाल्यावर आजच्या लंचचा मेनू कोंकणातिल दडपे पोहे करायचे असा ठरवला. त्याकरीता पोहे, मीठ, तिखट, तेल ही सर्व सामुग्री रोह्याहून येताना बरोबर आणलेली होती. फरसाण, टॉमॅटो आणि कांदे मुंबईहून आणलेले होते. हिरवी मिरची आणि कोथिंबीर भालेई मातेच्या पायथ्याशी असलेल्या सब्जीच्या दुकानातुन घेतली. ओला नारळ देखिल होता परंतु तो किसायचा कसा हा प्रॉब्लेम होता. पोहे कालवण्याकरीता आमच्या सामानात प्लॅस्टीकची बालदी होती.
पोहे बनविण्याकरीता आमच्या सोबत गब्बुपण कामाला लागला होता. सुरीने कांदे कापण्यात तो मदत करत होता.  ते सर्व साहित्य एकत्र करुन प्लॅस्टीक बादलीत ते दडपे पोहे कालवले आणि ते खायला मात्र खाली चमेरा लेकपाशी गेलो. दडपे पोह्यांचा बेत मस्तच जमला होता. भरपुर दडपे पोहे खाऊन झाल्यावर आम्ही लेक पहाण्याकरीता बोटींग करण्याच्या धक्यावर गेलो.
लेकमध्ये बोटींग करण्याच्या दृष्टीने चौकशी करायला गेलो असता त्यांनी सांगितलेले दर ऐकुन चाटच पडलो. बोटींग करायचे अंतर आणि वेळ याचा विचार करता दर खूपच जास्त होते. याच्यापेक्षा खूप कमी पैशात आम्ही मांडवा ते मुंबईमधिल गेट वे पर्यंतचे अंतर अगदी कमी पैशात पार करतो. त्या जलप्रवासाला वेळ देखिल बराच लागतो. त्यामुळे आमच्यापैकी कोणीही बोटींग करीता गेले नाही. लेकच्या पार्श्वभूमीवर फोटो मात्र काढले. त्यावेळी तिथे लेकमध्ये बरीच बदके पोहताना दिसत होती.
चमेरा लेक पाहून होईपर्यत बराच वेळ झाला होता. आज आम्हाला पठाणकोट येथे वस्तीला जायचे होते. त्यामुळे आमचा प्रवास आता त्या दिशेने सुरु झाला. पठाणकोटच्या रस्त्याच्या दोन्ही बाजुला बरीच आंब्याची झाडे दिसत होती. वाटेत एक शहरवजा  गांव लागले. तेथे गब्बुने गाडी थांबविली.रस्त्याच्या बाजुला अनेक दुकाने होती. त्या दुकानांमध्ये विकायला ठेवलेली एक वेगळीच वस्तु होती. तिचे नांव होते आमके पपड. आंब्याच्या रसापासुन बनविलेले हे पापड म्हणजे आपल्याकडे बनवतात ती आंबापोळी अथवा साठे होती. रायवळ सारख्या आंब्यापासुन बनविलेली असल्यामुळे आंबट लागत होती. आपल्याकडे चिपळुण रत्नागिरी येथे मिळतात तशा जेलीच्या स्वरुपातही आंब्याच्या वड्या विकायला ठेवलेल्या होत्या. अशाप्रकारच्या आंब्याच्या जेली आम्हाला अमृतसर मध्येही नंतर बघायला मिळाल्या.
पठाणकोट येथिल गुरुदास पुर रोड वरील न्यू पटेल नगर मधिल गुरुराज गेस्ट हाऊस मध्ये आम्ही उतरलो होतो. वास्तविक आमच्या सहलीच्या नियोजनात पठाणकोट येथे जायचे नव्हते परंतु डलहौसीला झालेल्या हॉटेलच्या बुकींगमध्ये झालेल्या घोळामुळे आम्ही फक्त पठाणकोट येथे वस्तीला आलो होतो. तेथिल कोणतेही स्पॉट बघण्याचा आमचा शेड्युल नव्हता. कारण उद्या आम्हाला धरमशाला येथे जायचे होते.

*******
 
          

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा