शनिवार, २४ मार्च, २०१८

हिमालयाच्या सहवासात भाग ४



४) पटणी टॉप हिल स्टेशन
आज दिनांक १७ मार्च! सकाळीलवकरय उठुन प्रातर्विधी आणि आंघोळ करुन झाली. बाहेर बघितले तर आज हवामान बदलले दिसत होते. पाऊस चांगलाच सुरु झालेला होता. टि.व्ही. वरच्या बातम्यांमध्ये जम्मु काश्मिर मध्ये अतीवृष्टी आणि बर्फ पडण्याचा इशारा देत होत. सर्वांचे प्रातर्विधी आटोपल्यावर आम्ही बरोबर आणलेला नाश्ता केला. चहा कॉफी मात्र रुमवरच मागवली होती. बदललेल्या हवामानामुळे आमची बस उशिराच आली. साधारण नऊच्या सुमारास आम्ही मार्गस्त झालो.
नियोजित वेळापत्रकाप्रमाणे आम्ही आज पटणी टॉप हे हिलस्टेशन व तेथिल प्रेक्षणिय स्थळे बघुन रात्री मुक्कामाला श्रीनगरला जाणार होतो. कटऱ्याहून पटणीटॉप साधारण ११० ते ११५ किलोमिटर अंतरावर आहे. पाऊस चालुच होता. जागोजागी बर्फ पडलेला दिसत होता
पटणी टॉप हे जम्मु काश्मिर मधिल उधमपुर जिल्ह्यातील पर्यटकांच्या दृष्टीने अतिशय मह्त्वाचे ठिकाण आहे. आपल्याकडिल महाबळेश्वर, भाथेरान सारखे हिल स्टेशन आहे. येथे नेहमीच पर्यटकांची खूप गर्दी असते. पटणी टॉप येथे नाथा टॉप, संसार लेक, नाग मंदिर, सुध महादेव मंदिर, बगलीहर डॅम, बिल्लो की पावरी ही पर्यटकामची आवडती ठिकाणे आहेत. पटणी टॉप समुद्रसपाटी पासुन २०२४ मिटर (६६४० पुट) उंचीवर आहे. येथे येणारे पर्यटक जास्त करुन स्नो फॉल आणि स्केटीगचा आनंद घेण्याकरीता येतात.
            आम्ही जेव्हा पटणी टॉप मधे प्रवेश केला तेव्हा पावासाचा जोर वाढला होता. जेव्हा आम्ही नागमंदिरात जाण्यासाठी गाडीतुन खाली उतरलो तेव्हा पावसाच्या जोरामुळे चार पावले देखिल चालणे मुश्कील झाले होते. हा सिझन पावसाचा नसल्यामुळे आमच्या कोणाकडेच छत्री नव्हती. नागमंदिरात जाण्याकरीता जवळपास दोन किलोमिटर चालत जायचे होते आणि पावसामुळे ते शक्य नव्हते. त्यामुळे नाग मंदिरात जाणे तर्तास स्थगित करुन आम्ही नाथा टॉपकडे जायचे ठरवले.
      जाता जाता वाटेत एक पार्क होते त्या ठिकाणी थोडावेळ थांबुन चहापाणी घेतले. तेथिल रिमझिम पाऊस आणि थंड वातावरणात गरमागरम वाफाळलेला चहा पिण्याची मजा काही औरच होती. पाऊस जरा कमी झाल्यावर आमच्या आजुबाजुच्या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेता आला. पाऊस आणि आजुबाजुला पडलेला बर्फ यामुळे तेथिल निसर्ग सौंदर्य वेगळेच भासत होते. जोडीला गुलाबी थंडी देखिल होती. अशा या वातावरणांत जर फोटो काढले नाही तरच नवल.
     थोड्या वेळाने नाथा टॉप येथे गेलो. तिथे पोचेपर्यंत वातावरण बदलले होते.  आता चक्क उन पडले होते. आजुबाजुला पडलेल्या बर्फावर उन्हाचे कवडसे पडल्यावर तो बर्फ स्पटीकाप्रमाणे चमकत होता. दरम्यान बर्फात आणि पावसाळी वातावरणांत वावरण्यासाठी आवश्यक असणारे गमबुट आणि रेनकोट सारखे मोठे डगले भाड्याने घेतले. येथेही बारगेनिंग नाही केले तर खूप मोठे नुकसान होऊ शकते.
     बसमधुन उतरल्यावर समोर दिसणारे दृष्य खरोखरच अवर्णनिय असे होते. सगळीकडे नुसता बर्फच बर्फ दिसत होता. जवळपास तिस फुट असणारा रस्ता बर्फाने झाकल्यामुळे चिंचोळ्या गल्लीसारखाच दिसत होता. देवदार, पाईन सारख्या मोठ्या झाडांवर देखिल बर्फाचे थर साचलेले दिसत होते. खाली आलेल्या बारिक बारीक फांद्या म्हणजे बर्फाच्या सळ्याच दिसत होत्या. पावसाने आणि बर्फाने मोबाईल खराब होऊ नये म्हणून त्या प्लॅस्टिक पिशवीत ठेवला आणि प्रत्येकाने भराभर फोटो काढायला सुरवात केली. या अप्रतिम दृष्याचे किती फोटो काढु आणि किती नाही असे प्रत्येकाला झाले होते.
     लोकल गाईडच्या मदतीने मग बर्फात स्केटींग करायला सुरवात केली. आमचे स्केटींग म्हणजे लाकडाच्या जाड फळीवर एक एक जण बसुन लहानपणी खेळायचो तसे गाडी गाडी खेळलो. म्हणजे आमचा जो गाईड होता त्याच्या भावाने आम्हाला त्या फळीवर बसवले आणि त्याने ती फळी बर्फाच्या उतारात ओढत नेली. त्यानंतर प्रत्येकाने बर्फाचे गोळे करुन एकमेकांच्या अंगावर उडवले.  बर्फात उताराने घसरत जाणे सोपे होते परंतु परत चढण चढुन येणे कठीण काम होते. कारण बर्फावर शरिराचा भार पडला की, तो वितळत होता. त्यामुळे पाय फटाफट सरकत होते. शेवटी आमच्या गाईडने आम्हाला सुखरुप बाहेर काढले. बराच वेळ बर्फात राहील्याने आणि नुकताच परत सुरु झालेल्या पावसाने थंडी असह्य होऊ लागली. त्यामुळे एक एक करत सर्वजण परत रस्त्यावर आले. तिथल्या स्थानिक लोकांनी म्हणजेच गाईडचे काम करणाऱ्या मंडळींनी शेकोटी पेटवली होती. त्या शेकोटीवर हात पाय शेकून स्वत:ला गरम करुन घेतले. जोडीला गरमा गरम चहा कॉफी होतीच.
            आम्हाला आज श्रीनगरला मुक्कामाला जायचे होते. बदललेल्या हवामानामुळे आता आम्हाला आमचा नियोजित कार्यक्रमात बदल करणे भाग होते. जवळपास दोनशे किलोमिटरचा प्रवास करायचा होता. हा रस्ता पूर्णपणे पहाडी भागतुन जात होता. म्हणून मग आम्ही बाकीचे सगळे पॉईंट बघणे रद्द करुन साधारण दोनच्या सुमारास श्रीनगरच्या रस्त्याला लागलो.
     साधारण तासाभराच्या प्रवासानंतर वाटेतल्या एका वैष्णो धाब्यावर जेवणासाठी थांबलो. तेथिल जेवणाचा मेनू एकदम मस्त होता. राजमा रोटी आणि राजमा राईस. राजमा हा इतका रुचकर लागू शकतो याची कधी कल्पनाच केली नव्हती. राजमा राईस मधिल भातावर साजुक तूप घातले होते त्यामुळु त्याची चव लाजबाब होती. सुग्रास जेवण झाल्यावर परत प्रवासाला सुरवात झाली. पोटातल्या जेवणाने सगळेच जण सुस्तावले होते.
     जवळपास पाच साडेपाच वाजले असावेत रस्त्यावरील मैलाचे दगड रामबन पंधरा किलोमिटर आहे असे दाखवत होते. आमची गडी एक दोन किलोमिटर गेली नसेल तोच पोलिसांनी रस्त्यावर अडथळे लाऊन रस्ता बंद केलेला दिसत होता. गाड्यांची भली मोठी लाईन लागली होती. पोलिसांनी आमच्या ड्रायव्हरला सांगितले की, श्रीनगरला जाणाऱ्या रस्त्यावर जागोजागी दरडी कोसळल्यामुळे हायवे पूर्णपणे बंद आहे. शिवाय वाटेत मोठा अपघात झाला आहे. दरीत कोसळलेल्या बसमधिल जवळपास सर्वच माणसे दगावली आहेत. अशा परिस्थितीत दोन दिवस तरी ट्रॅफिक सुरु होणार नाही. तेव्हा गाडीतल्या माणसांचे वय आणि महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तुम्ही ताबडतोब मागे फिरा. सगळी हॉटेल बुक होण्यापूर्वी दोन दिवसाच्या मुक्कामाची सोय करा.
     अचानक निर्माण झालेल्या समस्येवर तोडगा काढण्याकरीता ड्रायव्हरने त्याच्या मालकाला फोन लावला. आमच्या सहल संयोजक सौ. केतकी यांनी श्री फारुक भाई यांना फोन लावला. आमच्या सहलीचा सर्व व्यवहार श्री फारुक भाई यांच्याबरोबर ठरला होता. आम्ही माता वैष्णोदेवीचे दर्शन घेतल्यानंतर दिनांक १७ मार्च रोजी कत्रा येथिल हॉटेल मधुन आम्हाला पिकअप करुन दिनांक २९ मार्चला रात्री पानिपत येथिल हॉटेल सोडे पर्यंतची सर्व व्यवस्था करण्याची जबाबदारी  श्री फारुक भाई यांच्यावर सोपवली होती. फक्त जम्मुपासुन पुढील जेवण नाश्ता चहापाणी आम्ही करणार होतो.
     फारुक भाई यांनी त्यांचे कॉन्टॅक्ट वापरुन परिस्थितीचा आढावा घेतला आणि त्यांनी आमची सोय पटणी टॉपयेथिल रोज गेस्ट हाऊस येथे केली. त्यामुळे आमची गाडी परत उलट दिशेने वळवली आणि दोन तासाचा प्रवास करुन परत पटणी टॉपला आलो. येताना वाटेत सतत पाऊस चालुच होता. डोंगरावरुन पाण्याचे धबधबे पडत होते. रस्त्यावरुन पाण्याचे लोट वहात होते. ते पाहून मला कोकणातल्या तुफान पावसाची आठवण झाली.
     पटणी टॉप येथिल हॉटेल मात्र छान होते. आम्ही अचानक आल्याने सर्वांची व्यवस्था एका मजल्यावर झाली नाही. परंतु एकुण व्यवस्था चांगली होती. गेल्या गेल्या गरमा गरम चहा घेतल्यानंतर चांगल्या कडकडीत पाण्याने आंघोळ केली. दिवसभराच्या प्रवासाचा शिण त्यामुळे दूर झाला. साधारण दोन तासांनी मस्त मिक्स भाजी, रोटी, डाळ, राईस आणि जोडीला पापड असे भरपेट जेवण जेवलो. मुख्य म्हणजे एवढ्या थंडीतही रोटीसुद्धा सर्व पदार्थ गरमा गरम होते. तिथल्या जिवघेण्या थंडीत याचे अप्रुप जास्त होते. विशेषत: जेवणची चव मस्त होती. जेवण झाल्यावर थोड्या गप्पा मारुन सगळेजण झोपायला गेले. वास्तविक आमच्या वेळापत्रका प्रमाणे आमचा एक मुक्काम पटणी टॉपवर ठरला होता. परंतु काही कारणाने तो रद्द झाला होता. परंतु निसर्गाच्या मनात आम्ही पटणी टॉपवर मुक्काम करावा असे होते. त्यामुळे श्रीनगरच्या दिशेने निघालेले आम्ही येथे मुक्कामाला आलो होतो.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा