६)
सोनमर्ग दर्शन
आज
दिनांक १९ मार्च. आज सकाळी सहा वाजताच जाग आली. थंडी प्रचंड होती. काल रात्री
श्रीनगरला पोचल्याचा केदारला फोन केला तेव्हा मी नेट चालू केले होते. तेव्हा
तापमान आठ अंश सेल्सीएस एवढे होते. आज सकाळी बघितले तेव्हा ४ अंश सेल्सिएस होते. बाहेर बघितले तो रिमझिम पाऊस
चालू झालेला होता. सात वाजता गरम पाणी चालू झाल्यावर सर्व प्रातर्विधी उरकले.
आंघोळ दाढी झाल्यावर बाहेर डेकवर आलो.
डेकवर गुडमार्निंग करायला फारुकभाई हजर
होते. त्यांनी काश्मिरी स्पेशल घोंगडीसारखा दिसणार डगला घातला होता. त्या
डगल्याच्या आतमध्ये काश्मिरी कांग्री (शेगडी) घेतली होती. एकुणच त्यांनी थंडीचा पुरता बंदोबस्त केला होता. त्यांच्या
बरोबरच गप्पा मारत गरमा गरम चहा घेतला.
रात्री हाऊस बोटवर आलो तेव्हा एकतर काळोख
होता आणि दिवसभराच्या प्रवासाने आलेल्या थकव्यामुळे आजुबाजुला काही बघितले नव्हते.
आता वातावरण आल्हाद दायक होते. फारुकभाईंशी चर्चा करता करता त्यांनी आम्ही रहात
असलल्या दाल सरोवराची माहिती दिली. सरोवराची लांबी ७.४४ किलोमिटर तर रुंदी ३.५
किलोमिटर एवढी आहे. त्याचे क्षेत्रफळ २२ किलोमिटर एवढे होते. हे सरोवर कमित कमी
४.७ फुट तर जास्तित जास्त २० फुट एवढे खोल आहे. या सरोवरातिल पाण्याचा साठा ८७३
दशलक्ष घन मिटर एवढा असतो.
या सरोवरात दोन बेटे असुन त्यांची नांवे
सोना आणि रुपा अशी आहेत. जेव्हा तापमान उणे अकरा सेल्सिएस होते तेव्हा सर्व सरोवर गोठलेल्या अवस्थेत असते. या सरोवरा मधिल पाणी पृष्टभागावर जरी स्थिर दिसत असले तरी
त्याच्या अंतर्गत प्रवाह आहेत. दाल सरोवराचे मूळ नांव “महासरित” असे होते. पौराणिक कथेनुसार दाल
सरोवराच्या पूर्व भागात असलेल्या “इसबार” या गावात माता
दुर्गादेवीचा निवास होता. दाल सरोवराच्या किनाऱ्यावरील त्या जागेला “सूरेश्वरी” असे संबोधले जायचे.
ब्रिटीश साम्राज्याच्या काळात त्या काळातिल
डोग्रा महाराजांनी काश्मिर घाटीमध्ये घरे बांधण्यासाठी आणि मालमत्ता बनविण्यासाठी
बंदी घातली होती. त्या नियमाला पळवाट म्हणून ब्रिटिशांनी दाल सरोवरात हाऊस बोटी
बांधल्या. स्वातंत्र्यप्राप्ती नंतर ती तरंगती घरे काश्मिरी हाजी लोकांनी आपल्या
मालकीच्या करुन घेतली. त्यांची देखभाल आणि दुरुस्ती करुन त्यावर बागा, दुकाने आणि
घरे तयार केली.
सगळ्यांच्या आंघोळी झाल्यानंतर कांदा पोहे, ब्रेड बटर जाम असा नाश्ता झाला.
त्यावर चहा कॉफी झाल्यावर दाल सरोवराच्या किनाऱ्यावर जाण्याकरीता दोन छोटे शिकारे
आले. त्यात बसुन सर्वजण परत सात नंबरच्या गेटवर आलो. तेथे बस तयारच होती. त्यात
बसुन सर्वजण सोनमर्गच्या दिशेने निघालो.
सोनमर्ग याचा अर्थ सोनेरी गवताचे मैदान. काश्मिरी भाषेत “मर्ग” या शब्दाचा अर्थ आहे, गवताचे मैदान. हे स्थळ श्रीनगरच्या उत्तर पूर्वेला ८७
किलोमिटर अंतरावर आहे. सोनमर्ग मधिल सिंध घाटी काश्मिर मधिल सर्वात मोठी घाटी आहे.
सोनमर्ग हे समुद्रसपाटी पासून सुमारे तिन हजार मिटर उंचीवर असणारे एक रमणिय स्थान
आहे. सिंधु नदीच्या दोन्ही बाजुच्या किनाऱ्यावर पसरलेले हे मर्ग सोन्यापेक्षाही
सुंदर दिसते.
सोनमर्गला जायच्या रस्त्याच्या दुतर्फा घनदाट झाडी होती. घाटी
चढायला सुरवात केल्यावर जिकडे तिकडे बर्फच बर्फ दिसत होता. सोनमर्ग मध्ये
पोचल्यावर तेथिल स्थळे पहाण्याकरीता आम्ही नेलेली गाडी उपयोगी नव्हती.
त्याचप्रमाणे बर्फात फिरण्याकरीता आमचे रेग्युलर शूज देखिल उपयोगी नव्हते. त्यामुळे
बर्फात चालता येईल असे गमबुट भाड्याने घेतले. त्याचप्रमाणे बर्फात चालू शकेल अशी
चेन लावलेली फोरव्हीलरही भाड्याने ठरवली. प्रत्येक ठिकाणी बार्गेनिंग कंपलसरी
होते. या बाबतित तेथिल लोकांचे म्हणणे असे की, आम्हाला आमचा वर्षभराचा गुजारा
याच्यावरच करावा लागतो त्यामुळे जास्तित जास्त पैसे कसे मिळतिल हे आम्ही बघतो.
कारण पर्यटनाचा सिझन काही वर्षभर नसतो.
येथे आम्ही पब्लिक पार्क, राम तेरी गंगा मैली हो गयी या सिनेमाचे शूटींग
जेथे झाले तो स्पॉट, पाकीस्थान मध्ये उगम पाऊन सोनमर्ग मधून वहात जाणारी निलम नदी
ही ठिकाणे पाहिली. ही नदी गोठलेल्या स्वरुपात पहायला मिळाली. या शिवाय गडसर लेक,
विशनसर लेक, बालतल व्हॅली, कृष्णसर लेक ही प्रेक्षणिय स्थळे आहेत. परंतु कालच
झालेल्या स्नो फॉल मुळे सगळीकडे बर्फाचे साम्राज्य होते. त्यामुळे काही ठिकाणी
जाणे आम्हीच रद्द केले, तर अर्थ स्लायडींग झालेले असल्यामुळे काही ठिकाणी
पोलिसांनी जाऊ दिले नाही.
सोनमर्गमध्ये सगळ्यात जास्त वेळ आम्ही पब्लिक पार्क मध्ये घालवला.
गाडीतुन उतरल्यापासुन फोटो आणि व्हीडिओ काढायचा प्रत्येकाने सपाटाच लावला. या ठिकाणचे वातावरणच असे आल्हाददायक होते की,
प्रत्येकातले लहान मुल जागे झाले होते. एकमेकांच्या अंगावर बर्फ उडवणे, बर्फात
लोळणे अशा खेळात प्रत्येकजण आपले वय विसरुन बर्फात रमु लागला. श्रीवर्धनला येणारे
जसे समुद्र पाहिल्यावर वेडे होतात तसेच आमचे झाले होते. समुद्र आम्हाला रोजचाच
असल्याने त्याचे आम्हाला अप्रुप नव्हते परंतु ज्यांनी कधी समुद्रच पाहिला नाही
त्याला त्याचे वेड लागणारच. हे आम्हाला आत्ता जाणवले, कारण बर्फ पाहून आम्ही देखिल
असेच वेड्यासारखे वागत होतो.
सोनमर्ग येथे अक्रोड, चिड, देवदार, चिनार आणि विलो या झाडांची गर्दी
दिसत होती. काही काही झाडे तर प्रचंड मोठे वृक्ष झालेले दिसत होते. येथे देखिल
विलो लागडांचे बॅट बनविण्याकरीता ठराविक आकाराचे तुकडे रचुन ठेवलेले आढळले. त्या
रचुन ठेवलेल्या लाकडांवर बर्फाचे थरावर थर पसरलेले दिसत होते.
बर्फामध्ये भरपुर वेळ घालवल्यावर श्रीनगरच्या दिशेने परतिचा प्रवास
सुरु केला. परत जाताना श्रीनगर मध्ये थोडे मार्केटिंग करायचे होते. त्याचप्रमाणे
येथिल प्रसिद्ध शकराचार्य मंदिरालाही भेट द्यायची होती. परंतु गाडीचे काम
निघाल्याने त्यातच वेळ गेला. नंतर काळोख पडला. त्यामुळे दुसऱ्या कुठेही न जाता परत
मुक्कामी हाऊस बोटवर गेलो.
हाऊस बोटीत आल्यावर चहा कॉफी झाली. दरम्यान हवेतिल गारवा वाढायला
लागला होता. तापमान सहा अंश सेल्सिएस एवढे खाली आले होते. गॅस हिटरच्या उबेत
उद्याचा कार्यक्रम ठरवणे सुरु होते. उद्या आमचे एक सहप्रवासी सुरेश आठवले यांचा
वाढदिवस होता. त्यामुळे उद्याचा मेनू आणि
वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे नियोजनही करणे चालू होते.
दरम्यान एक फोटोग्राफर काश्मिरी ड्रेस घेऊन फोटो
काढायला आला होता. सर्वांनाच काश्मिरी ड्रेस मध्ये फोटो काढायचे होते. परंतु तो
फोटोग्राफर अव्वाच्या सव्वा पैसे सांगत होता. त्यामुळे येथेही बार्गेनिंग करुन
पन्नास रुपये एका फोटाचा दर ठरवुन त्याला सकाळी यायला सांगितले. त्यानंतर एक
विक्रेता हार, बांगड्या वगैरे प्रसाधन साहित्य घेऊन विक्रीकरीता आला होता. मग सर्व
महिला मंडळ त्याच्या भोवती बसुन निरनिराळ्या वस्तू पाहून त्याचे बार्गेनिंग करुन
खरेदी करु लागले.
काश्मिर मध्ये आल्यावर प्रत्येकालाच येथिल अक्रोड, केशर, जर्दाळु,
बदाम यासारखा येथिल प्रसिद्ध सुकामेवा खरेदी करायचा होता. परंतु खात्रीलायक आणि
वाजवी किंमतीत कसा मिळणार याचा प्रश्न होता. परंतु हा प्रश्न फारुकभाईंच्या मिसेसनी
सोडवला. त्यांच्या भावाचा या सर्व वस्तुंचा बिझिनेस होता. त्यांनी एक दिवस आधी
ऑर्डर दिली तर या सर्व वस्तू वाजवी दरात आणि उत्तम दर्जाच्या आपल्या हाऊसबोटवरच
उपलब्ध करुन देईन असे आम्हाला सांगितले. त्यामुळे आम्ही निश्चिंत झालो.
रात्री जेवण झाल्यावर उद्याचा कार्यक्रमाबद्दल चर्चा करुन आणि तो
निश्चित करुन सगळेजण झोपायला निघाले. उद्या गुलमर्गला जायचे होते. शिवाय उद्या
काश्मिरी ड्रेसमधले फोटो काढायला फोटो ग्राफर येणार होता. त्याचप्रमाणे काश्मिरी
साड्या घेऊन एक विक्रेताही हाऊसबोटवर येणार होता. श्रीनगर दर्शनाचा कार्यक्रमही
उद्याच होता. असा भरगच्च कार्यक्रम उद्याकरीता ठरवला होता. त्यामुळे उद्या लवकरात
लवकर तयार होणे गरजेचे होते. त्याकरता वेळेवर झोपणे जरुरी होते. एकमेकांना गुड नाईटकरुन
सर्वजण आपापल्या रुममध्ये गेले.
*******
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा