मंगळवार, २७ मार्च, २०१८

हिमालयाच्या सहवासात भाग ९


९. पहलगावपासुन जम्मु पर्यंत
            आज २२ मार्च २०१६! पहाटे ठिक पाच वाजुन दहा मिनिटांनी सर्वजण बसपाशी उभे होतो. काल अगदी जरुरी पुरते सामान गाडीतुन उतरवले होते. त्यामुळे सामान चढवण्याचा प्रश्नच नव्हता. गब्बुने गाडीचे इंजिन चालू केले होते. तापमान शून्य अंशापेक्षा कमी असावे कारण गाडीच्या काचेवर बर्फ साचला होता. १५-२० मिनिटे इंजिन गरम झाल्यावर प्रवासाला सुरवात झाली. वातावरण अतिशय थंड असल्याने रस्त्यावर वाहनांची गर्दी नव्हती. त्यामुळे श्रीनगर जम्मु हायवे येईपर्यंत विना अडथळा प्रवास झाला. हायवे सुरु झाल्यावर मात्र गाडी दर दहा मिनिटांनी थांबत होती. वाहतूकीचे नियंत्रण सिमा सुरक्षा दलाचे जवान करीत होते. त्यामुळे प्रवास धिमा असला तरी चालू होता. कोणतेही वाहन मधे घुसत नव्हते.
     रामबन गेल्यावर श्रीनगरला येताना जिथे जेवण केले होते त्याच्या जवळपासच्या एका वैष्णो धाब्यावर मागच्यासारखाच राजमा राईस आणि राजम रोटीची ऑर्डर दिली परंतु आज चव मात्र पूर्वीसारखी नव्हती. त्या हॉटेलच्या मागच्या बाजुला एक धरण दिसत होते. त्या धरणाचे दृष्य मात्र मनमोहक होते.
     जाताना पावसामुळे रहित झालेल्या पटणी टॉप येथिल नाग मंदिरात आज गेलो. हे नाग मंदिर क्रिमची येथे मंतालाई जवळ आहे. येथे शंकर भगवान आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता असे मानले जाते. पटणी टॉप येथिल हे सर्वात जुने मंदिर आहे. पटणी टॉप येथिल सर्वांत उंच टेकडीवर असलेले हे मंदिर ६०० वर्षे जुने आहे. नाग पंचमीच्या दिवशी येथे हजारो भक्त दर्शनाला येतात.
तावी नदी, जम्मु
     पटणी टॉपनंतर मात्र प्रवास विना अडथळा आणि पूर्ण वेगात सुरु झाला. जम्मुमध्ये प्रवेश करण्यापूर्वी तावी नदीचे दर्शन झाले. या नदीच्या नांवावरुनच जम्मु शहराचे नांव जम्मु तावी असे पडले आहे. जम्मुमध्ये पोचायला रात्रीचे आठ वाजले. जम्मुमध्ये आम्ही हॉटेल इंटरनॅशनल मध्ये उतरलो होतो. हॉटेल ए.सी. होते परंतु रिनोव्हेशनचे काम चालू असल्याने आकर्षक वाटत नव्हते. रुम मात्र प्रशस्त होत्या. हॉटेलपासुन रेल्वे स्टेशन आणि रघुनाथ मंदिर जवळच होते. आता शहरात आल्यामुळे की काय उकाडा खूपच जाणवत होता.

     हॉटेल मध्ये चेकइन करुन, फ्रेश व्हायला पावणे दहा वाजले होते. जेवण्याकरीता वैष्णोधाबा शोधुन काढी पर्यंत त्या धाब्याची बंद करण्याची वेळ झाली होती. त्या हॉटेल वाल्याला रिक्वेस्ट करुन दहा माणसांची जेवणाची सोय करायला सांगितली. जेवण झाल्यावर जवळच असणाऱ्या रघुनाथ मंदिरापर्यंत चक्कर मारुन आलो. झोपेपर्यंत अकरा साडे अकरा वाजले होते. काश्मिरमध्ये दाखल झाल्यापासुन आज पहिल्यांदा रात्रभर पंखा लाऊन झोपलो. आता उद्या जरा निवांत होते. थोडे उशिरा उठले तर चालणार होते.
*******

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा