१०. जम्मु आणि डलहौसी दर्शन.
आज दिनांक २३ मार्च २०१६! आज होळी पोर्णिमा आहे. आज जर घरी असतो तर
होळीच्या सणाची वेगळीच गडबड असती. घरच्या पुरणपोळीची चव होळीचा दिवस असुनही चाखता
येणार नव्हती. इकडच्या लोकांना पुरणपोळी हा प्रकार तरी माहित असेल असे वाटत नाही.
इकडचा आलु पराठा म्हणजेच इकडची तिखट पुरणपोळी. आज बहूदा तिच खावी लागेल असे दिसते.
सकाळी साडेदहाला रघुनाथ मंदिरात आलो. संपूर्ण
परिसर सिमा सुरक्षा दलाच्या तैनातिखाली होता. मंदिराच्या प्रवेशद्वारावर असलेले
जवान मराठी होते. आम्ही मराठी बोलत होतो ते ऐकुन त्यांनी आमची आस्थेन चौकशी केली.
मंदिराच्या परिसरात सर्वत्र सावधान पोझिशन मधेले हत्यारी जवान दिसत होते. मंदिरात
प्रवेश केल्यावर समोरच मंदिराचे निर्माते(patron) राजे
रणबिरसिंग यांचे पोर्ट्रेट होते.
जम्मु शहराच्या मध्यवर्ती
भागात असणारे रघुनाथ मंदिर हे मुख्यत: रामाचे मंदिर आहे.
मुख्य मंदिराचा गाभारा सोन्याच्या पत्र्याने मढविलेला आहे. गाभाऱ्यात श्रीराम,
सिता, लक्ष्मण यांच्यासह एकूण सात मूर्ती आहेत. या मंदिराचा परिसर भव्य असुन त्या
परिसरात रामायणातिल सर्व व्यक्तिमत्वांची वेगवेगळी मंदिरे आहेत. तसेच संपूर्ण
प्रदक्षिणा मार्गावर अनेक मंदिरे आहेत.
मंदिराच्या परिसरात
बांधलेल्या हॉलमध्ये असंख्य शालिग्राम बसविले आहेत. त्यांना तेहतिस कोटी देवांच्या
स्वरुपात पूजले जाते. मंदिरात प्रवेश करताना प्रथम हनुमानाचे दासमारुतीच्या
स्वरुपातिल मूर्ती असलेले मंदिर आहे. या शिवाय एक स्वतंत्र गणपति मंदिर आहे. त्या
मंदिरात पंचमुखी गणेशाच्या मूर्ती आहेत. या
मंदिराच्या निर्मितीचे काम या राज्याचे महाराज गुलाबसिंग यांनी सन १८३५ मध्ये सुरु
केले ते त्यांचे पुत्र महाराजा रणविर सिंग यांनी सन १८६० मध्ये पूर्ण केले.
आम्ही मंदिरात प्रवेश केला
तेव्हा श्रीरामांच्या आरतीची सुरवात झालेली होती. आरती झाल्यावर आम्ही विधीपूर्वक
दर्शन घेतले. तेथे असलेल्या पूजाऱ्यांकडे आम्ही रामरक्षा स्तोत्राचे पठण करण्याची
परवानगी विचारली. तेव्हा त्यांनी दर्शन घेणाऱ्यांना त्रास होणार नाही आणि
आम्हालाही सहज दर्शन होईल अशी जागा आम्हाला बसण्यासाठी दाखवली. त्यांनीच आम्हाला
बसण्यासाठी गालिचा देखिल आणून दिला. मग त्या गालिचावर बसुन आम्ही सर्वांनी
रामरायाचे दर्शन घेत घेत रामरक्षा स्तोत्राचे संथ सुरात सामुदाईक पठण केले. त्यामुळे
मनाला एक वेगळेच समाधान मिळाले. त्यानंतर पंचमुखी गणेश मंदिरातही असेच श्री गणपति
अथर्वशिर्षाचे पठण केले. या पठनात तेथिल पूजारीही सामिल झाले. त्यानंतर सर्व
परिवार देवतांचे दर्शन घेतले.
जामनगरहून प्रवासाला
निघाल्यापासुन जास्त रोकड जवळ बाळगायची नाही हे धोरण ठेवले होते. त्याप्रमाणे जसे
जसे पैसे लागतिल तसे ए. टी. एम्. मधुन काढत असे. आज आता जवळची रोकड संपली होती.
त्यामुळे पैसे काढण्याकरीता रघुनाथ मंदिराच्या जवळ असणारे स्टेट बॅंकेचे ए. टी.
एम्. शोधुन काढले.
ए. टी. एम्. मधुन येईपर्यंत बाकी सर्वजण गाडीत सामान भरुन तयारच
होते. मी आल्यावर लगेचच गाडी सोडण्यांत आली. या नंतर आम्ही जम्मुचा किल्ला पहायला
गेलो. “बाहू” या नावाने या किल्याचा ओळखले जाते. या
किल्याचे बांधकाम “राजा बाहूलोचन” याने सुमारे तिन हजार वर्षांपूर्वी केले आहे. या किल्यावरुन तावी
नदीचे अद्भूत दृष्य दिसते. येथे काली मातेचे मंदिर आहे. मंदिराच्या परिसरात
असलेल्या जंगलाचे सुंदर बगिचामध्ये रुपांतर करण्यात आलेले आहे. या बागेला बाहू बाग
म्हणून ओळखले जाते.
पांढऱ्या
संगमरवरात बांधलेले हे मंदिर आकाराने मात्र छोटे आहे. याची उंची केवळ ३.९ फुट आहे.
त्यामुळे मंदिरात एकावेळी मोजकेच भक्त जाऊ शकतात. येथे रोज कुमारीकांची ओटी भरुन
पूजा केली जाते. हे मंदिर महाराजा गुलाबसिंग सत्तेत आल्यावर १८व्या शतकांत सन १८२२
मध्ये बांधले गेले असे मानले जाते. या संबंधी एक कथा सांगितली जाते.
सुमारे ३०० वर्षापूर्वी “पंडित जगतराम” याच्या स्वप्नात माता महाकाली आली होती. तिने त्यांना सांगितले की,
मी पिडींच्या(स्वयंभू) स्वरुपात डोंगराच्या माथ्यावर आलेली आहे. त्यानंतर लोकांना
सध्या मंदिर आहे त्या ठिकाणी पिंडीच्या स्वरुपातिल देवी आढळुन आली. काही काळाने
त्या ठिकाणी मंदिर बांधण्यात आले. सध्याच्या काळ्या पाषाणातिल मूर्तीची शिला
अयोध्येच्या राजाकडून मिळाली होती.
मंदिर
परिसरात आणखिही देवीच्या मूर्ती आहेत. मंदिराचा परिसर छान स्वच्छ होता. या ठिकाणचे
एक वैशिष्ट म्हणजे येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला अस्सल साजुक तुपातला शिरा आणि
हरभऱ्याची उसळ प्रसाद म्हणून देण्यांत येतो. खास बाब म्हणजे ते पदार्थ वाटी आणि
चमच्या सह दिले जात होते. प्रसाद ग्रहण करुन झाल्यावर वाटी चमचा घासण्याकरीता लगेच
सेवेकरी हजर असतात.
या
किल्याच्या तटाच्या पार्श्वभूमीवर अनेक फोटो काढुन झाले. किल्यातल्या गार्डन मध्ये
देखिल फोटो काढले. अशा तऱ्हेने बाहू किल्ला पाहून झाल्यावर डलहौसीच्या दिशेने
प्रवासाला सुरवात झाली. काही काळ प्रवास
झाल्यावर जम्मु काश्मिरची बॉर्डर लागली. सिमेवरचा टोल क्रॉस करताच सगळ्यांची
प्रिपेड सिम चालू झाली. त्यामुळे सर्वांनी भराभरा फोन लावायला सुरवात केली. माझा
काही प्रश्न नव्हता कारण मी पोस्टपेड सिम बरोबर ठेवले होते.
आता
आम्ही पंजाबमध्ये प्रवेश केला होता. दुपारचे दोन वाजुन गेले होते. सगळ्यांच्या
पोटात कावळे काव काव करायला लागले होते. गब्बुला सांगितल्यावर त्याने एका पंजाबी
धाब्यावर गाडी थांबवली. त्या हॉटेलमधिल सरसोका साग आणि मकईकी रोटी हा स्पेशल मेनू
होता. सगळ्यांनी तोच मेनू ऑर्डर केला. जेवण खरोखरच चविष्ट होते. भरपेट जेवण झाल्यावर
परत पुढचा प्रवास सुरु झाला. आता आपण पंजाब मधुन प्रवास करीत आहोत हे रस्त्याच्या
दुतर्फा असणाऱ्या गव्हाच्या शेतांवरुन जाणवत होते.
दुपारच्या
तिन साडेतिनच्या सुमारास गब्बुने गाडी थांबवली आणि येथे एक खास शिवमंदिर आहे असे
सांगितले. हे मंदिर म्हणजे हिमाचल मधिल प्रसिद्ध त्रिलोकीनाथाचे म्हणजेच शंकराचे
मंदिर होते. हे मंदिर राजा अजब सेन याची राणी सुलतान देवी हिने सन १५२० मध्ये
बांधले. या गावाचे नांव मंडी असे आहे. बयास नदीच्या किनाऱ्याला असणाऱ्या गुंफेत हे
मंदिर आहे. गुंफेच्या छता मधुन सतत पाणी ठिपकत होते. जणू तेथे भगवान शंकराला संतत
धारेच्या स्वरुपात अभिषेकच करीत होते.
हे
मंदिर मंडी गावातिल व्हिक्टोरीया पुलाच्या
अगदी बाजुला आहे. येथे भक्तांची खूपच गर्दी दिसत होती. बयास नदिच्या पात्रातही एक
छोटे मंदिर दिसत होते. या ठिकाणचा निसर्गही समृद्ध आहे. हिरव्यागार वनराई मध्ये
नदीच्या पात्राच्या अगदी बाजुला असल्याने या ठिकाणाचे आकर्षण जास्त होते. या
तिर्थक्षेत्राचा विकास हिमाचल प्रदेश पर्यटन विभागा तर्फे केला गेला आहे. तिथेच असलेल्या एका धाब्यावर चहापाणी
करुन पुढच्या प्रवासाला सुरवात केली.
थोड्याच
वेळात आम्ही डलहौसीच्या परिसरात पोचलो. डलहौसीची घाटी चढायला सुरवात केल्यावर
रस्त्याच्या दुतर्फा अनेक प्रकारची झाडे होती. परंतु त्यात लक्ष वेधुन घेत होते ते
लालफुलांचे वृक्ष. या झाडांवर जास्वंदी सारखी फुले आलेली होती. जंगलाचा मोठा भाग
या झाडांनी व्यापला होता. त्या झाडांच्या फुलांमुळे सर्वत्र लाल रंग भरून राहिला
होता. नंतर चौकशी केली तेव्हा त्या फुलांच्या झाडाचे नांव “बुऱ्हान” आहे असे समजले. या जातीच्या झाडांना
लाल, पांढरी आणि गुलाबी अशी तिन प्रकारची फुले येतात. या फुलांचे सरबत, चटणी आणि
जाम असे पदार्थ केले जातात. हिमाचल प्रदेश खादी ग्रामोद्योग मंडळा तर्फे या
वस्तुंचे उत्पादन आणि विक्री केली जाते.
आता आम्ही डलहौसी शहरात प्रवेश केला
होता. डलहौसी हे शहर सन १८५४ मध्ये ब्रिटीश सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना
उन्हाळ्याची सुट्टी घालविण्याकरीता निर्माण केले होते. या शहराचे नांव लॉर्ड
डलहौसी या भारतातिल त्यावेळच्या ब्रिटिश गव्हर्नरच्या नांवावरुन दिले होते. हे
धौलाधार पर्वतावरील पांच टेकड्यांवर वसविले गेले आहे. या शहराची समुद्र
सपाटीपासुनची उंची ६००० ते ९००० फुटां दरम्यान आहे.
आता
संध्याकाळ झाली होती. आम्ही डलहौसी येथिल प्रसिद्ध खज्जर लेक या ठिकाणाला भेट
दिली. मोठे हिरवळ असलेले मैदान, आजुबाजुला घनदाट झाडी, एक छोटा तलाव हे येथिल
निसर्ग वैभव आहे. घोडेवाले, फोटोग्राफर आपापला धंदा व्हावा म्हणून पाठिशी लागले
होते. होळीच्या निमित्ताने सलग चार पाच दिवस सुटी असल्याने भरपुर गर्दी होती.
सशांची छोटी छोटी पिल्ले एका उभट टोपलीत घेऊन काही माणसे तेथे हजर होती. लोक त्या
सशाची पिल्ले असणाऱ्या टोपल्या हातात घेऊन फोटो काढत होते. एक फोटो करीता ती टोपली
वापरण्याचे दहा रुपये ती माणसे घेत होती.
खज्जर
येथिल निसर्ग सौंदर्याचा आनंद घेऊन झाल्यावर वाटेत एका टेकडीवर देवीचे मंदिर होते
ते पहाण्यासाठी गब्बुने गाडी थांबवली. आम्ही चढण चढायला सुरवात केली तेव्हा दिवस
मावळायला सुरवात झाली होती. सुमारे १५-२० मिनिटे चालल्यावर आम्हाला देवीचे दर्शन
घेऊन येणारे काही भक्त भेटले, ते म्हणाले आता थोड्याच वेळात काळोख होईल तुम्हाला
पुढे जाणे मुश्किल होईल. तरीही आम्हा मोबाईलच्या बॅटरीच्या प्रकाशात पुढे जाणे
चालूच ठेवले. तेवढ्यांत वरुन भक्तांचा दुसरा ग्रुप आला. त्यामध्ये देवीच्या
मंदिराचे पूजारीबाबाही होते. त्यांनी आम्हाला सांगितले, आता वरती जाण्यात काही अर्थ
नाही. देवीच्या मंदिराच्या परिसरात रानटी श्वापदांचा वावर असतो म्हणून मी मंदिर
बंद करुन आलो आहे. तेव्हा देवीच्या दर्शनाचा योग नाही असे समजुन आम्ही परत फिरलो.
तरीही या ठिकाणी आल्याची आठवण म्हणून काही फोटो काढले.
आता
रात्र झाली होती. मुक्कामाच्या ठिकाणी जायची वेळ झाली होती. आमच्या बुकिंग मध्ये
काहीतरी गडबड झाली होती. त्यामुले गब्बुची गेस्ट हाऊस शोधायची धावपळ सुरु होती. आज
डलहौसीमध्ये प्रचंड गर्दी होती. त्यामुळे वाहने पार्किंग करण्याकरीता जागा देखिल
मिळत नव्हती. बऱ्याच प्रयत्नानंतर आम्हाला हव्या तशा पांच रुम एकाच ठिकाणी
मिळाल्या. डलहौसी हे हिलस्टेशन असल्याने गेस्ट हाऊस देखिल टेकडी टेकडीवर होती.
आम्हाला मिळालेले गेस्ट हाऊस असेच उंच टेकडीवर होते. तिथे गाडी जाऊ शकत नव्हती.
त्यामुळे अत्यावश्यक सामान बरोबर घेऊन गेस्ट हाऊस मध्ये दाखल झालो. महाबळेश्वर,
माथेरान ही हिलस्टेशन जवळ असुनही कधी तिथे जाणे झाले नव्हते ते आता हिमाचल मध्ये शक्य
झाले. रुम छानच होत्या. आज हवामानही खूपच थंड होते. परंतु आल्हाद दायक होते.
आता
उद्या डलहौसी दर्शनाचाच कार्यक्रम होता त्यामुले सकाळी लवकर उठण्याची घाई नव्हती.
*******
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा