१६) सहलीचा अखेरचा दिवस
आज दिनांक ३० मार्च, सकाळी साडे सहा वाजता सर्वजण तयार होऊन सर्व
सामानासह हॉटेलच्या खाली हजर होते. जवळच असलेल्या हायवे वरुन दोन रिक्षा ठरवुन
आणल्या. सातच्या ठोक्याला आम्ही सर्वजण पानिपत रेल्वे स्टेशनवर हजर झालो होतो.
आमच्या जवळ प्रत्येकी कमितकमी दोन बॅगा शिवाय एखादी सॅक एवढे सामान होते. आमची
गाडी दोन नंबर प्लॅटफॉर्मवर येणार होती. त्याकरिता जिना चढुन पलिकडे जायचे होते.
एवढे सामान घेऊन पलिकडे जायचे होते शिवाय सर्व सामान गाडीत चढवायचे होते. त्यात या
स्टेशनवर गाडी फक्त दोन मिनिटेच थांबणार होती त्यामुळे खूप टेन्शन आले होते.
पण तेवढ्यात एक वयस्कर पोर्टर आला व त्याने सर्व सामान पलिकडे नेऊन आमच्या
डब्यात चढवुन देईन असे सांगितले. त्याप्रमाणे त्याने त्याच्या ढकलगाडीवर सर्व
सामान चढवुन पलिकडे नेले आणि आमचा डबा जेथे थांबणार होता तिथे सर्व सामान त्याच्या
ढकलगाडीवर तयारीत ठेवले आणि गाडी आल्यावर अक्षरश: दिड मिनिटात गाडीत चढवले देखिल.
खरोखरच त्या वयस्कर माणसाच्या या स्किलला दाद दिली पाहिजे.
आता गाडी वेळेवर येऊन त्यात सर्व सामान चढवुन झाले होते त्यामुळे सर्व काळजी दूर
झाली होती. माझे रिझर्वेशन दुस-या बोगीत होते ते टि सी च्या मदतिने सेट करुन झाले.
त्यानंतर प्रथम चहावाला आला होता त्याच्या कडुन चहा घेतला.
गाडी स्टेशन मागुन स्टेशन मागे टाकुन भरधाव वेगाने पुढे जात होती. प्रवासा
दरम्यान दोन तिन वेळा चहा झाला. एकदा सँडविच करुन खाऊन झाले. एकदा भेळ झाली. मधुन
मधुन पत्यांचा डाव होत होता. प्रत्येकाला आता घराचे वेध लागले होते. जाताना होते
त्यापेक्षा आज गाडीत विक्रेते कमी दिसत होते. मधेच एक बॅग रिपेर करणारा आला होता.
त्याच्याकडुन बॅग रिपेर करुन घेतली. नाहीतर उतरल्यावर त्या बॅगेची वाहतूक करणे
कठीण होणार होते.
दुपारी थोडावेळ झोपुन घेतले होते. कारण आम्हाला रात्रभर जागरण करायचे होते. ही
गाडी अहमदाबादला रात्री एक वाजता पोचणार होती, त्यामुळे झोपेत स्टेशन गेले तरी पत्त्ता लागणार नाही म्हणून झोपता येणार
नव्हते आणि अहमदाबादहून जामनगरची गाडी पहाटे पाच वाजता होती त्यामुळे ती गाडी
चुकायला नको म्हणून तिथेही झोपता येणार नव्हते. आमची ही गाडी पानिपत, दिल्ली, गुरगाव, रेवरी, नरनौल, निम का थाना, रिंगास जंग्शन, फुलेरा जंग्शन, अजमेर, मारवार, फलना, अबु रोड, पालनपुर, मेहसाणा इतक्या ठिकाणी थांबली. अहमदाबाद येईपर्यंत आम्ही सात आठजण पत्ते खेळत
जागे राहिलो होतो. अहमदाबादला एक वाजता आम्ही उतरल्यावर ती मंडळी झोपली. अहमदाबाद
येथे गाडी जवळपास अर्धा तास थांबली होती. त्यामुळे सामान सावकाशपणाने काढता आले.
पुढच्या गाडीला अजुन चार तास होते त्यामुळे सर्व सामान घेऊन वेटींगरुम मध्ये गेलो.
जामनगरची गाडी वेटींगरुम होते त्याच प्लॅटफॉर्मला येणार होती. त्यामुळे परत सामान
जिन्यावरुन हलवण्याची काळजी नव्हती.
वेटींगरुममध्ये आता साडेतिन तास काढायचे होते. म्हणून प्रथम गरमा गरम कॉफी
प्यायली. नंतर टाईमपास म्हणून मोबाईलमधिल फोटो बघायला सुरवात केली. फोटो बघताना
परत ती सगळी दृष्य जिवंत होऊन समोर दिसायला लागली. या सहलीमध्ये आपण काय मिळवले
आणि आपल काय करायच राहुन गेले याचा आढावा फोटो बघता बघता मनात चालू होता.
आपण पूर्वापार ऐकत आलो आहे की आपण जे अन्न खातो त्याचा परिणाम आपल्या आचरणावर
होतो ते खरे असावे. कारण जिथपर्यंत काश्मिर मध्ये होतो तेवढ्या काळांत कुठल्याही
मंदिरात जाणे झाले नाही. शंकराचार्य मंदिरात जायचेच असे ठरवुन गेलो असुनही त्या
मंदिराच्या बाजुलाही फिरकलो नाही. जे मंदिर बघायलो गेलो ते नेमके उध्वस्त झालेले
होते. तेच जम्मुमध्ये गेल्या गेल्या बाहेरुन का होईना रघुनाथ मंदिराचे दर्शन झाले.
हे सर्व मनाचे खेळ चालूच होते.
आयुष्यात आपण कधी असे बर्फामधे फिरत असु अशी कधी कल्पना सुद्धा केली नव्हती ती
प्रत्यक्षात उतरली होती. या सहलीच्या पंधरा दिवसाचा अनुभव असा की, ज्या गुढघेदुखीला मी घाबरत होतो त्याचा मला बिलकुल त्रास झाला नाही.
त्याचप्रमाणे थंडीचेही, जामनगरला १३-१४ तापमान असताना पाय फुटणे त्यातुन
रक्त येणे हे प्रकार व्हायचे. पण २-३ तापमान असूनही किंबहूना शून्य पेक्षा कमी
तापमान असताना देखिल कोणताही त्रास झाला नाही.
आम्ही ज्या भागातुन सहलीच्या निमित्ताने फिरलो तो जवळपास सर्वभाग हिमालयाच्या
परिसरात होता. सर्वभाग पहाडी मुलखातिलच होता. निसर्गाची मुक्त उधळण असलेल्या या
परिसरात फिरताना मनाला नवी उभारी आल्याचे जाणवले. सेवानिवृत्त झाल्यामुळे जिवनाला
जी शिथिलता आली होती त्याच्या ऐवजी जिवन उत्साहाने भरल्याची जाणिव झाली.
सतीची जी ५१ पिठे आहेत त्यापैकी ज्वालामुखी, छिन्नमस्तिका अथवा चिंतपूर्णी, कुरुक्षेत्र येथिल भद्रकाली माता या मंदिरात या
सहलीच्या निमित्ताने जाणे झाले.
आतापर्यंतच्या काळात अनेक कारणांनी जे शक्य झाले नव्हते ते पटणी टॉप, पहलगाम, डलहौसी या सारख्या हिल स्टेशनवर या निमित्ताने राहणे फिरणे झाले. एकुणच
आतापर्यंतच्या आयुष्यात अनेक कारणांनी जे करायचे राहुन गेले आहे ते पूर्ण करायचे
हा मुदत पूर्व सेवानिवृत्ती घेण्याचा जो उद्देश होता तो या सहलीच्या निमित्ताने
थोडाफार साध्य झाला.
वेटींगरुममध्ये बसुन फोटो बघता बघता हे जे मनाचे खेळ चालू होते ते गाडी
येण्याची वेळ झाली म्हणून थांबवुन प्लॅटफॉर्मवर सामान घेऊन गेलो. जामनगरची गाडी
वेळेत होती. अशातऱ्हेने या सहलीतला अखेरचा प्रवास सुरु झाला आणि ३१ मार्चला दुपारी
बारा वाजेपर्यंत संपला देखिल.
“केल्याने देशाटन पंडित मैत्री, सभेत संचार ।
शास्त्र ग्रंथ, विलोकन, मनुजा येतसे चातुर्य फार ।।”
या कवी वामन पंडितांच्या उक्ती प्रमाणे देशाटन केल्याने, विद्वान लोकांच्या संगतित राहिल्याने, निरनिराळ्या सभांमध्ये(सेमिनार) भाग घेतल्याने आणि शास्त्र, ग्रंथ यांच्या अभ्यासाने माणसाला शहाणपण येते. या सहलीच्या निमित्ताने देशाटन
तर झाले. काही वेगळे अनुभव मिळाले त्या अनुभवातुन नकळत काही शिकायला मिळाले.
एकंदरीत अशा प्रकारच्या सहलीचा परत परत अनुभव घ्यायला काही हरकत नाही.
*******
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा