५) पटणी टॉपहून श्रीनगरकडे
आज
दिनांक १८ मार्च सकाळी आमचे सगळे व्यवहार जरा निवांतच चालू होते. आज वातावरण मात्र
बदललेले दिसत होते. आभाळ निरभ्र होते, थोडेफार उन पडलेले होते. सकाळचे प्रातर्विधी
आंघोळ दाढी उरकली आणि पहिला चहा रुम मध्येच मागवला. नाश्ता करण्याकरीता मात्र
सगळेजण एकत्र जमलो. तेवढ्यात श्रीनगरहून फारुक भाईंचा फोन आला, ते म्हणाले ट्रॅफिक
अंशत: सुरु झाले आहे. जी प्रवासी वाहने कालपासून ट्रॅफिकमध्ये अडकली आहेत, सध्या
त्यांनाच फक्त सोडणार आहेत. तेव्हा तुम्ही
वेळ न घालवता ताबडतोब निघा. हा निरोप आम्ही आमचा ड्रायव्हर गब्बुला
सांगितला. त्याने परत फारुकभाईंबरोबर फोनवर बोलुन व्यवस्थित चौकशी केली. त्यानंतर
साधारण दहा वाजता आम्ही पटणी टॉप वरील हॉटेल मधुन बाहेर पडलो.
पटणी टॉप गावाच्या बाहेर असलेल्या पोलीस आणि सिमासुरक्षा दलाच्या संयुक्त चेक पोस्टवर
गेल्यावर आमची गाडी अडवली. पोलिसांनी सांगितले की अजुन ट्रॅफिक सुरु झाले नाही. वाटेत
अडकुन पडलात तर परत मागे फिरणे शक्य होणार नाही. मग परत फोना फोनी सुरु झाली.
पोलिसांनीही कुठेतरी फोन केला. अखेर अर्धा तासानी आमची गाडी पोलिसांनी सोडली. गाडी
सुटल्याबरोबर व्यवहारेंनी गणपती बाप्पा मोरयाचा गजर केला. खरोखरच आलेले विघ्न
हरण्याकरीता त्या विघ्नहर्त्या गजाननाच्या आशिर्वादाची गरज होती. म्हणून मग
सामुदायिक गणपति अथर्वशिर्षाचे पठण सुरु केले. ते संपल्यानंतर प्रणम्य शिरसा त्यानंतर
दुसरी स्तोत्रे असा क्रम सुरुच होता. त्यानंतर आमचा प्रवास सुरु राहिला परंतु
त्याची गती अतिशय मंद होती. एका ठिकाणी रस्ता रुंदिकरणाचे काम सुरु होते. तेथे
सुरुंग लावुन कातळ फोडायचे काम सुरु होते. त्या एका जागेवर तब्बल दिडतास गाडी उभी
होती.
हॉटेल
सोडल्यापासुन सलग सहा तास गाडीत बसुन होतो. ट्रॅफिक मंद गतीने का होईना सुरु होते.
फक्त छोट्या गाड्यांनाच सोडले होते. रस्त्याच्या कडेला ट्रक, टेंपो, अगदी बस देखिल
लाऊन ठेवलेल्या होत्या. जवळपास सत्तर ऐशी किलोमिटर होईल एवढी या मोठ्या गाड्यांची
लाईन रस्त्याच्या कडेला लावलेली होती. श्रीनगरला जाणारा सर्व रस्ता अतिशय अवघड असा
होता.
एका
बाजुला उंचच उंच डोंगर तर दुसऱ्या बाजुला खोल खोल दरी असा रस्ता होता. त्या उंचच
उंच डोंगरावर जायला कोणताच रस्ता दिसत नव्हता तरीही तेथे विखुरलेल्या स्वरुपात घरे
दिसत होती. एकुणच इथल्या स्थानिक लोकांचे जिवन खडतर असे दिसत होते. त्यांना
खाण्यापिण्याच्या आणि इतर जिवनावश्यक वस्तु कशा मिळत असतिल देव जाणे.
जसे जसे
श्रीनगर जवळ यायला लागले तसा वातावरणात बदल जाणवयला लागला. सिमा सुरक्षा दलाच्या
वाहनांची वर्दळ वाढलेली दिसायला लागली. जागो जागी सिमा सुरक्षा दलाचे जवान हातात
हातात बंदुका ताणलेल्या अवस्थेत पहारा करताना दिसायला लागले. असे वातावरण बघायची
कधीच सवय नसल्याने मनावर नकळत दडपण यायला लागले.
लवकरच
बनिहाल अथवा जवाहलाल नेहरु बोगदा आला. बोगदा सुरु होण्याच्या आधी जवळपास एक
किलोमिटर पासुन जवानांचा पहारा दाट झालेला होता. पहारा करीत असलेले जवान हातात
रायफल ताणून कोणत्याही क्षणी फायर करायच्या तयारीत असलेले दिसत होते.
आमची
गाडी या बोगद्यातुन चार मिनिटे चालत होती. या बोगद्याची लांबी २.८५ किलोमिटर आणि
रुंदी अडिच मिटर आहे. हा बोगदा बांधायला सन १८५४ ते १६६० एवढा कालावधी लागला होता. पुर्वी हा बोगदा
मध्यरात्री पासुन सकाळी सात वाजेपर्यंत बंद असायचा परंतु बोगद्याचे नूतनीकरण
झाल्यापासुन तो चोविस तास खुला असतो.
थोड्याच
वेळात लाखनपुर टोल नाका आला. ट्रॅफिक जामचे संकट आता संपले होते. त्यामुळे फ्रेश
होण्याकरीता थांबायला आता हरकत नव्हती. जेथे महिलांकरीता टॉयलेटची सोय असेल अशा
ठिकाणी गाडी थांबवण्याची सूचना आम्ही ड्रायव्हरला केली. त्याप्रमाणे त्याने एका
हॉटेल समोर गाडी उभी केली. जिथे गाडी थांबवली होती त्या हॉटेलचे नांव होते, “नाझ मुस्लिम हॉटेल” नांव बघुन मन थोडेसे चरकले. पण आता मनाला
याची सवय करायला हवी होती. कारण श्रीनगरमध्ये सर्वच मुस्लिम असणार होते. आपल्याकडे जसे
कोंकणी, पंजाबी अथवा साऊथ इंडियन हॉटेल असते तसे हे मुस्लिम हॉटेल असावे. तेथे चहा
कॉफीची ऑर्डर दिली. परंतु त्याने कॉफी मिळणार नाही असे सांगितले. आमचे चार मेंबर
कॉफि पिणारे होते. त्यांना दुधाची ऑर्डर दिली. येथिल विशेष म्हणजे येथे दुधात साखर
घाला असे सांगायला लागते. इकडे बहूदा साखर घातलेले दूध पिण्याची पद्धत नसावी. आज
दुपारचे जेवण गुड डे बिस्कीट आणि चहा यावर भागवावे लागले. कारण येथे दुसरे काही
उपलब्धच नव्हते.
काही अंतर गेल्यावर हलमुल्लाह नावाचे छोटे
शहरवजा गांव लागले. या गावाचे वैशिष्ट असे
की, येथे रस्त्याच्या दोन्हीबाजुला ठराविक आकाराचे लाकडाचे तुकडे पद्धतशिरपणे रचुन ठेवलेले
होते. चौकशी करता समजले की, हे गांव क्रिकेटच्या बॅट निर्मिती करीता प्रसिद्ध
होते. ते लाकडाचे तुकडे काश्मिर सारख्या अतिशय थंड वातावरणात होणाऱ्या विलो(Willow) या झाडाच्या लाकडाचे तुकडे होते. या
गावात तयार होणाऱ्या बॅट पाकिस्थान, इंग्लंड, न्यूझिलंड, ऑस्ट्रेलिया, बांगला देश
येथे एक्सपोर्ट होतात. इंग्लंड मध्ये तयार होणाऱ्या बॅटच्या खालोखाल येथे तयार
होणाऱ्या बॅटस्चा नंबर लागतो.
रस्त्याच्या
दुतर्फा पिवळी फुले असणाऱ्या झुडुपांची शेती दिसत होती. चौकशी केली तेव्हा ती
मोहरीची शेत असल्याचे समजले. मग त्या शेतांच्या पार्श्वभूमीवर फोटो काढणे झाले. हिरव्या गार झांडांवर
आलेल्या पिवळी जर्द फुले असलेली लांबच लांब पसरलेली शेती अतिशय आकर्षक वाटत होती.
श्रीनगरच्या हद्दीत दाखल झाल्यावर म्हणजेच
श्रीनगर सुमारे २५-३० किलोमिटर असेल तेव्हा एक आयुष्यभर लक्षांत राहिल असा एक
प्रसंग घडला. झाले काय, आमच्या गाडीच्या मागच्या चाकाने रस्त्यावरील एक दगड उडाला
आणि कशावर तरी आपटला त्याचा मोठा आवाज झाला. म्हणून साहजिकच काय झाले ते बघायला
आमचा ड्रायव्हर खाली उतरला. त्याच क्षणाला सिमा सुरक्षा दलाच्या दोन गाड्या आमच्या
गाडीच्या मागे आणि पुढे उभ्या राहिल्या. झटकन त्यातुन दोन जवान रायफल रोखुन खाली
उतरले. आमच्या ड्रायव्हरने त्यांना काय घडले ते सांगितल्यावर त्यांनी त्याला
काहीही न बोलता गाडी त्वरीत हलवायला सांगितली.
अखेर संध्याकाळी सात साडेसातच्या सुमारास आम्ही
श्रीनगर शहर गाठले. आम्हाला रिसिव्ह करायला श्री फारुकभाई दाल सरोवराच्या गेट
क्रमांक सातवर हजर होते. सर्वांचा परिचय करुन झाल्यावर आमचे सर्व सामान खाली
उतरवले गेले. समोरच विस्तिर्ण असे दाल सरोवर दिसत होते. हाऊस बोटींमधिल लाईटच्या
प्रकाशामुळे सरोवरातिल पाणी चमकत होते.
फारुकभाईंच्या सोबत असणाऱ्या माणसांनी
भराभर आमचे सामान दोन शिकाऱ्यांमध्ये चढवले. आम्हीही पाच पाच जणांच्या ग्रुपनी
दोन्ही शिकाऱ्यांमध्ये बसलो. काही मिनिटातच आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजेच
हाऊस बोटीच्या पायऱ्यांपाशी थांबले. आमच्या हाऊस बोटचे नांव होते शागु पॅलेस.
शागु
पॅलेस मध्ये आमचे स्वागत करायला फारुकभाई यांची पत्नी, आई आणि मुले हजर होती. आज
दिवसभराच्या प्रवासाने खूपच थकायला झाले होते. वास्तविक दोनशे किलोमिटर प्रवास सलग
केला असता तर जास्तित जास्त चार तास लागले असते. परंतु आम्हाला याच प्रवासाला जवळपास
आठ तास लागले होते. फक्त समाधान एवढेच होते की, एवढे ट्रॅफिक असुनही अडखळत का
होईना आमचा प्रवास पूर्ण झाला होता.
चहा, कॉफी
झाल्यानंतर फारुकभाईंनी आम्हाला आमच्या रुम दाखवल्या. सामानाचे सॉर्टींग होऊन
प्रत्येकाचे सामान प्रत्येकाच्या रुम मध्ये पोचवले गेले. त्या सामाना पाठोपाठ आम्ही आपापल्या रुममध्ये दाखल झालो. अँटॅच
टॉयलेट आणि बाथरुम असणारी ती सेमी लक्झरी रुम होती. रुमची रचना छानच होती.
सर्वरुममध्ये जाड आणि उबदार कारपेट अंथरले होते. प्रशस्त बेड उबदार दोन रग शिवाय
ईलेक्ट्रीक वेड हिटरही होता. त्यामुळे हवामान अती थंड असले तरी सुसह्य होणार होते.
या शिवाय रुमच्या बाहेर हॉलवजा खोली होती. तिथेही गॅसवरचा रुम हिटर होता.
तासाभराने
जेवण झाल्यावर सगळ्यांनी गॅसवरील रुम हिटरच्या उबेत बसुन थोड्या गप्पा मारल्या.
उद्याच्या कार्यक्रमावर चर्चा केली आणि आपापल्या रुममध्ये झोपण्यासाठी गेलो. अशा
तऱ्हेने आमचा श्रीनगरमधिल आमचा पहिला दिवस संपला.
*******
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा