रविवार, २५ मार्च, २०१८

हिमालयाच्या सहवासात भाग १२


१२) धरमशाला दर्शन
आज दिनांक २५ मार्च! सकाळी जरा उशिरा म्हणजे साडे आठ वाजता सगळीजण तयार होऊन गाडीमध्ये हजर झाले. आज धरमशाला परिसर दर्शन हा
आमचा कार्यक्रम होता.
धर्मशाळा हे हिमाचल प्रदेश मधिल मोठे शहर असुन हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. हे शहर भागसुया नावाने देखिल ओळखले जाते. येथे दलाई लामा यांचे निवासस्थान आणि तिबेटी प्रशासनाचे मध्यवर्ती ठिकाण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदिंनी स्मार्ट सिटी योजने मध्ये निवडलेल्या १०० शहरांपैकी हे एक आहे. देवदार वृक्षांच्या दाट वनराईने युक्त अश्या कांग्रा घाटी मध्ये वसलेले हे निसर्गरम्य स्थळ आहे. एम् सि लिओडगंज, भागसुनाग, धरमकोट, नड्डी, फॉरसिथगंज, कोतवाली बझार, कचेरी अड्डा, धारी, रामनगर, सिद्धपुर आणि सिध्दबारी ही या शहराची उपनगरे आहेत.
धर्मशाळा येथे आंतर राष्ट्रीय क्रिकेटचे मैदान आहे. हे आंतर राष्ट्रीय दर्जाचे मैदान आहे. येथे आय पी एल् च्या, एकदिवसीय, टेस्ट मॅच असे सर्व प्रकारचे सामने होतात. आम्ही हे मैदान पहावयास गेलो परंतु सुरक्षेच्या कारणा वरुन आम्हाला आत सोडले नाही.
धर्मशाळा शहरामध्ये प्रवेश करताना लक्ष वेधुन घेतो तो गोरखा रेजिमेंटचा कॅटोन्मेंट एरिया. हे सर्व शहर टेकड्या टेकड्यांवर वसलेले आहे. सर्वप्रथम आम्ही नड्डी या विभागात उतरलो. तेथे पांच सहाजण स्टँडवर दुर्बिणी घेऊन उभे होते. त्या दुर्बिणी मधुन ते दूरवरच्या शिखरांवर असणारे निरनिराळे पॉईंट दाखवत होते.
थोडे पुढे गेल्यावर बुरान फुलांची झाडे होती. अगदी हाताने काढता येतिल इतक्या जवळ तिथल्या झाडांवर फुले होती. ती फुले काढुन आम्ही सगळ्यांनी त्या फुलांसोबत फोटो काढले. बायकांनी केसात माळुन तर पुरुषांनी शर्टाच्या बटनहोलमध्ये लावुनही फोटो काढले.
थोडे अंतर चालुन गेल्यावर माता निर्मलादेवी यांनी स्थापित केलेल्या सहज योग आश्रमात गेलो. त्या ठिकाणी मेडिटेशनसाठी रहाण्याचीही व्यवस्था आहे. मार्च १९८५ मध्ये स्वत: माताजी आशिर्वाद देण्यासाठी येथे राहिल्या होत्या. सर्वांनी तेथे चालू असलेल्या मेडिटेशन मध्ये सहभाग घेतला. मेडिटेशन नंतर मनाला शांतता आणि तरलता आल्याचे जाणवले, समाधान वाटले.
निर्मला माता यांनी स्थापित केलेले सहजयोग केंद्र पाहिल्यानंतर आम्ही भगसु नाग मंदिरात जाण्याचे ठरविले. वाटेत जाता जाता रस्त्याच्या कडेला असलेले दाल सरोवर पाहिले. हे दाल सरोवर म्हणजे एक तलाव होता. तलावाच्या आजुबाजुचा परिसर निसर्गसंपन्न आहे.
थोड्याच वेळात आम्ही एम् सि लिओडगंज पासुन दोन किलोमिटर अंतरावर असलेल्या भगसुनाग मंदिरात आलो. भगसुननाग मंदिर हे पुरातन मंदिर आहे. येथे पवित्र झ-याच्या पाण्याचे एक कुंड आहे. कुंडापासुन वरच्या बाजुला सुमारे एक दिड किलोमिटर अंतरावर भगसु धबधबा आहे.
भगसु नाग मंदीराची कहाणी फार पुरातन आहे. द्वापारयुगाच्या मध्यंतरामध्ये दैत्यांचा राजा भगसु याची राजधानी अजमेर(राजस्थान) राज्यामधे होती. त्याच्या राज्यामधे बराच काळ पाऊस न पडल्याने प्रजा दु:खी होती. प्रजेच्या प्रमुखाने राजा भगसुकडे प्रार्थना केली की, आपण पाण्याची व्यवस्था करा अन्यथा आम्हाला देश सोडुन जाणे भाग पडेल. त्यावर त्याने प्रजेला दिलासा दिला आणि स्वत: पाण्याच्या शोधाकरिता बाहेर पडला. दैत्यांचा तो राजा भगसु स्वत: मायावी जादुगार होता. फिरत फिरत दोन दिवसांनी तो १८००० फूट उंचीवर असणा-या नाग दाल सरोवरापाशी पोचला. हे सरोवर खूप खोल होते. त्याचा परिघ २ मैल एवढा होता. आपल्या मायावी शक्तीच्या जोरावर त्या सरोवरातले सर्व पाणी आपल्या कमंडलु भरले आणि तो परत आपल्या राज्यात यायला निघाला असता रात्र झाल्यामुळे तो सध्याच्या भगसु नाग येथे थांबला.
दरम्यान नागदेवता आपल्या सरोवरापाशी आल्यावर त्यांना सरोवर पाण्याविना कोरडे झालेले दिसले. पावलांचा मागोवा घेत घेत त्या तेथे भगसु विश्रांती घेत होता त्या जागेवर आल्या. त्याच्याशी युद्घ करुन नाग देवतांनी त्याला मारुन टाकले. युद्धाच्या गडबडीत सर्व पाणी जमिनीवर सांडले. त्यामुळे कोरडे पडलेले सरोवर पाण्याने भरुन गेले. त्याच पाण्याचा झरा येथे वाहताना आपल्याला दिसत आहे.
मरता मरता भगसुने नागदेवतेची स्तुती केली. त्याने केलेल्या स्तुतीने नागदेवता प्रसन्न झाली आणि त्यांनी भगसुला तुझी इच्छा असेल ते माग असे सांगितले. त्यावर त्याने माझ्या राज्यातिल दुष्काळ दूर व्हावा आणि माझे नांवही विश्वविख्यात व्हावे असा वर मागितला. त्यावर नागदेवतेने तथास्तु असे म्हटले. या स्थानाच्या नांवात आधी तुझे नांव येईल नंतर माझे नांव घेतले जाईल असाही वर दिला. म्हणून या स्थानाला भगसु नाग असे संबोधले जाते. त्या घटनेला आता २०१६ साली ९१२८ वर्षे पूर्ण झाली आहेत.
कलीयुगाला सुरवात झाल्यावर येथे धर्मचंद राजा राज्य करित होता. एके दिवशी धर्मचंद राजाच्या स्वप्नांत भगवान शंकर भगवान आले व त्यांनी या ठिकाणी नागदेवतेने पवित्र जलाची स्थापना केल्या पासुन मी येथे रहायला आलो आहे, तेव्हा तू या स्थानी येऊन माझी प्रतिष्ठापना कर असे सांगितले. तेव्हा धर्मचंद राजाने येथे मंदिर निर्माण केले. त्या घटनेला या वर्षी २०१६ साली ५१२४ वर्षे पूर्ण झाली आहेत.(महंत गणेशगिरजी, भगसुनाथ आश्रस यांच्या संगमरवरी लेखावरुन)
४ एप्रिल १९०५ ला पूर्ण कांग्रा घाटीमध्ये मोठा भूकंप झाला होता. त्यामध्ये २०,००० लोक दगावली होती. पूर्ण धर्मशाळा परिसर उध्वस्त झाला होता. त्यातच भगसुनाग मंदिरही उदध्वस्त झाले होते. त्याची पुन: उभारणी गुरखा रायफलस् नी केली होती. आज भगसु नाग मंदिर पहिल्या गुरखा रायफलचे पवित्रस्थान म्हणून ओळखले जाते.
त्यानंतर आम्ही एम् सि लिओडगंज या धर्मशाळा येथिल मोठ्या विभागात आलो. हा विभाग तिबेटी बहुल असल्याचे जाणवत होते. येथेच दलाई लामा यांचे निवासस्थान आहे. ट्रफिक पोलिसांनी आमच्या गाडीला दलाई लामा यांच्या निवास स्थाना पर्यंत जाऊ दिले नाही. म्हणून आम्ही तेथिल चौकात उतरलो आणि चालत जायला सुरवात केली.
वाटेत मेन रोडवरच एक स्तुप दिसले. आम्ही त्या स्तुपाला भेट दिली. तेथिल मुख्य कक्ष बंदच होता. परंतु बाकी सगळे पाहून आलो. तेथे असलेल्या प्रेयर व्हील फिरवत फिरवत प्रदक्षिणा घातली. त्या प्रेयर व्हीलवर ॐ मणी पद्मे हमही प्रार्थना लिहिलेली असते.
या स्तुपापासुन १५-२० मिनिटे चालत गेल्यावर दलाई लामा यांचे निवास स्थान होते. प्रवेशद्वारातुन आत गेल्यावर डाव्या बाजुला एक तिबेटी म्युझियम आहे. तेथे चिनने तिबेटी लोकांवर केलेल्या अनन्वित अत्याचाराच्या कहाण्या फोटोंच्या स्वरुपात पहायला मिळतात. वास्तविक तिबेट हे एक स्वतंत्र राष्ट्र होते. चिनने ते ताब्यात घेण्यासाठी काय काय प्रकार केले याचे पुरावे तेथे आपल्याला बघायला मिळतात.
दलाई लामा निवासस्थानात भगवान बुद्धांची भव्य मूर्ती आहे. त्याचप्रमाणे आचार्य पद्मसंभव यांची ही मूर्ती तेथे पहायला मिळते. येथे तिबेटी संस्कृतीशी निगडित हजारो हस्तलिखित पोथ्या आणि वस्तु जतन करुन ठेवलेल्या आहेत.
एम् सि लिओडगंज मधे आणखी एक तिबेटी लोकांशी निगडित एक वास्तु पाहिली. त्याचे नांव टेनझिन ग्वॉटसो मठ(monstery). या ठिकाणी तिबेटी विद्य़ार्थ्यांचे वसतिगृह आहे. कदाचित धार्मिक शिक्षण संस्था असावी. एखादे लँडस्केप असावे तशी ही वास्तु बर्फिल्या डोंगरांच्या पार्श्वभूमीवर दिसत होती.
तिथुन आम्ही छीलगारी येथे चहाचे मळे बघायला गेलो. चहाचे मळे पाहिल्यावर मला अडुळशाची झुडपे सलग लावली आहेत असा भास झाला. आम्ही चहाची पाने चुरगळुन वास घेऊन पाहिला. कोवळ्या पानांना नाही पण जुन पानांना चुरगळल्यावर चहाचा छान वास येत होता.
अशा त-हेने आजचा पूर्ण दिवस धर्मशाळा परिसरांत घालवला. संध्याकाळी चामुंडा देवीच्या मंदिराजवळ एका हॉटेलात मुक्कामाला गेलो. हॉटेलच्या परिसरात आणखीही पांच सहा हॉटेल होती. हॉटेलचा परिसर निसर्गरम्य होता. रात्री जेवण झाल्यावर शतपावली करण्याकरीता थोडे फिरलो. आज सगळ्यांची आईसक्रीम खाण्याची इच्छा होती, परंतु तेथे आईसक्रीमच उपलब्ध नव्हते.
प्रवासाला सुरवात केल्यापासुन आम्ही एक नियम कटाक्षाने पाळला होता. तो म्हणजे काहीही झाले तरी बाटली बंद मिनरल वॉटर शिवाय पाणी प्यायचे नाही. त्याकरीता आम्ही शक्यतो पाण्याच्या बाटल्यांचा डझनाचा बॉक्सच खरेदी करत होतो. या ठिकाणी आम्हाला असा बॉक्स खूपच स्वस्त मिळाला म्हणून आम्ही एकदम तिन बॉक्स खरेदी केले. पाण्याच्या बाबतित दक्षता बाळगल्यामुळे पूर्ण सहलीच्या काळात कोणालाही कसलाही त्रास झाला नाही.
आज दिनांक २६ मार्च! सकाळी ज्या हॉटेलात उतरलो होतो तेथेच चहा पाणी नाश्ता करुन आठ वाजता तयार होऊन गाडीत बसलो. चामुंडादेवीचे मंदिर जवळच होते. चामुंडा देवी, बज्रेश्वरी देवी, ज्वालामुखी देवी आणि चिंतापूर्णी देवी ही देवीची चार धाम हिमाचल प्रदेश मधे प्रसिद्ध आहेत.
हिमाचल प्रदेशमधिल कांगडा जिल्यातील चामुंडा देवीचे मंदिर बाणेर नदिच्या किना-यावर पालमपुर पासुन दहा किलोमिटर अंतरावर आहे. चामुंडा देवीचे नांव तिने मारलेल्या चंड आणि मुंड या दैत्यांच्या नावावरुन पडलेले आहे. या संदर्भात सप्तशतीमध्ये एक श्लोक आहे,
यस्माच्चंडं च मुंडच गृहित्वात्वमुपागता।
चामुंडति ततो लोके ख्याता देवी भविष्यसि।।
या स्थानाला चामुंडा नंदिकेश्वर धाम असेही म्हणतात. चारशे वर्षांपूर्वी राजा आणि ब्राह्मणाने देवीकडे प्रार्थना केली की, भक्तांना सहज जाता येईल अशा ठिकाणी तिचे मंदिर बांधण्याची परवानगी द्यावी. देवीने ब्राह्मणाच्या स्वप्नांत येऊन या गोष्टीला संमती दिली आणि तिने एका ठराविक जागी खणल्यास तेथे तिची पुराणकालिन मूर्ती सापडेल त्या मूर्तीची प्रतिष्ठापना मंदिरात करुन त्या ठिकाणी तिची उपासना करावी असे सांगितले.
राजाने काही माणसांना मूर्ती आणण्यास पाठविले परंतु त्यांना ती मूर्ती सापडली नाही. त्यानंतर देवी परत त्या ब्राह्मणाच्या स्वप्नात आली आणि तिने सांगितले की शोध करण्यास गेलेली माणसे देवीची पवित्र मूर्ती शोधण्याच्या भावनेने न जाता एखादा दगड शोधण्याच्या भावनेने गेली होती म्हणून मी त्यांना सापडले नाही. तेव्हा तू सकाळी स्नान करुन शुचिर्भूत होऊन पवित्र भावनेने शोध घे. त्या प्रमाणे तो ब्राह्मण गेला आणि ती मूर्ती घेऊन देवळात आला.
चामुंडादेवीचे दर्शन घेतल्यानंतर सर्वजण मंदिर परिसरातच असलेल्या खादी ग्रामोद्योग मंडळाच्या स्टॉलमध्ये शिरले. तिथे हिमाचल मधिल वस्तु विकायला ठेवलेल्या होत्या. तिथुनच आम्ही बुरान फुलांचे सरबत आणि चटणी खरेदी केली.
चामुंडादेवीच्या दर्शनानंतर आम्ही जवळच असलेल्या गोपाळपुरचिडियाघर मध्ये गेलो. त्यामध्ये वाघ, सिंह, हिमालयामधिल अस्वले, सांबर, हरणे, कोल्हे, ससे असे ब-याच प्रकारचे प्राणी आणि पक्षी होते. त्या चिडियाघर मध्ये अनेक प्रकारची झाडेही होती.
चिडियाघर बघुन झाल्यावर आम्ही देवीच्या चारधामांपैकी एक असलेल्या बज्रेश्वरी देवीच्या मंदिरात गेलो. मंदिराचे आवार प्रशस्त होते. सोमनाथ मंदिराप्रमाणे या मंदिराकडे असलेल्या प्रचंड संपत्ती करिता महमंद घोरीने दोनदा हे मंदिर लुटले होते. १९०५ साली झालेल्या भूकंपामध्ये हे देऊळ पूर्ण उध्वस्थ झाले होते. पंधरा वर्षांनी ते परत खुले झाले.
दरवर्षी संक्रातीच्या दिवशी येथे मोठा उत्सव होतो. आठवडाभर चालणा-या या उत्सवात देवीला प्रथम तूपाने स्नान घातले जाते. त्यानंतर १०० वेळा साध्या पाण्याने आंघोळ घातली जाते. स्नानानंतर मातेला फुलांनी सजविली जाते.
आपल्याकडे शिखर शिंगणापुर येथे ज्याप्रमाणे पितळेच्या नंदिच्या मूर्ती आहेत, त्याप्रमाणे बज्रेश्वरी मंदिराच्या बाहेर सभामंडपात चार पांच पितळेच्चा सिंहांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या रस्त्यावर प्रसाद, निरनिराळ्या प्रकारच्या माळा, प्रसाधनाचे साहित्य, पूजा साहित्य यांची खूप दुकाने आहेत.
बज्रेश्वरी मातेच्या दर्शनानंतर आम्ही कांगडा शहराच्या नजिकच असलेला कांगडा किल्ला बघायला निघालो. जाता जाता वाटेत एका शर्मा धाब्यावर जेवणासाठी थांबलो. गब्बुने(आमच्या बसचा ड्रायव्हर) सांगितले की, भारतिय क्रिकेट टिम मधिल खेळाडु या धाब्यावर खास जेवणासाठी थांबतात. जेवणासाठी अर्थातच पराठ्याचे प्रकार होते. या सहलीमधे एकुणच सगळीकडे पराठ्याचे प्रकार जास्त होते. प्रत्येक ठिकाणची चव मात्र वेगळी असायची.
कांगडा किल्ला कटोच या रजपुत राजघराण्याने बांधलेला होता. ह्या राजघराण्याचे मूळ महाभारत कालिन त्रिगर्त राज्याशी जाते. हा हिमालयातिल सर्वात मोठा आणि देशातिल कदाचित सगळ्यांत जुना किल्ला आहे. या किल्यावरुन मोगल बादशहा अकबर याने देखिल हार पत्करली होती. काही काळाने अकबर बादशहाचा मुलगा जहांगिर याने मात्र तो जिंकला होता. या किल्याकरिता अनेक लढाया झाल्या. त्यामुळे हा किल्ला शिख, रजपुत, मोगल, गुरखा अशा अनेक राज्यकर्त्यांच्या ताब्यात आलटुन पालटुन होता. अखेरीस १८०६ साली हा किल्ला ब्रिटिशांनी घेतला होता. १९०५ च्या भूकंपामध्ये पडझड होईपर्यंत हा किल्ला ब्रिटिशांकडेच होता.
किल्यामध्ये जायला छान फरसबंदी रस्ता आहे. फरसबंदी रस्त्याच्या दक्षिण बाजुला लक्ष्मी नारायण, सितला देवी आणि अंबिकादेवी यांच्या उभ्या मूर्ती आहेत. किल्ल्याला अनेक दरवाजे आहेत. त्यांची नांवे अहानी दरवाजा, अमिरी दरवाजा, जहांगिरी दरवाजा, दर्शनी दरवाजा, रणजित सिंग दरवाजा अशी आहेत.
या किल्ल्यामधे जाताना समोरच्या टेकडीवर जयंतीमाता मंदिर दिसते. हे देऊळ गुरखा सेनेचा प्रमुख बडा काजी अमरसिंग थापा याने बांधले होते. कांगडा किल्ल्याच्या बालेकिल्ल्यामध्ये अंबिकामाता आणि जैन मंदिर एकाच छताखाली आहे. या मंदिरामध्ये बसुन श्री सूक्ताचेपठण केले. एकाच छताखाली दोन वेगळ्या प्रवृत्ती असलेल्या देवतांची मंदिरे कशी काय याचा मला प्रश्नच पडला. कारण अंबिकामाता म्हणजे सकल शस्त्र धारी आणि असुरांचा शस्त्राने विध्वंस करणारी देवता, तर जैन देवता ही अहिंसेचा पुरस्कार करणारी, या दोघांची मंदिरे एकत्र बांधण्याचा काहितरी वेगळा हेतू असावा. किल्ल्यामधे लक्ष्मी नारायणाचे देखिल मंदिर आहे.
किल्ला उतरताना आम्ही मराठीत बोलत बोलत किल्ला उतरत होतो. ते ऐकुन किल्ला चढणा-या एका फॅमिलीने ऐकले आणि त्यांनी आमच्याशी संवाद साधला. कारण तेही महाराष्ट्रामधिल परंतु सध्या दिल्ली आणि धर्मशाळा येथे रहाणारे होते. त्यातिल मुलगी तर चक्क श्रीवर्धन येथिल होती.
कांगडा किल्ला पाहून झाल्यावर आम्ही ज्वालामुखी या चारधाम मधिल एका देवीच्या दर्शनाला जाण्यासाठी निघालो. कांगडा किल्ल्यापासुन ज्वालामुखी गाव ३३ किलोमिटर आहे. संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आम्ही ज्वालामुखी गावातिल आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी हॉटेलात गेलो. ज्वालामैयाची आरति ८ वाजता असते ती साधण्यासाठी आम्ही साडेसात वाजता मंदिरात जायला निघालो.
ज्वालामुखि किंवा ज्वालामैयाचे मंदिरात जायला जवळपास १००-१५० पाय-या चढुन जावे लागते. वाटेत अनेक प्रकारची दुकाने, जेवणाच धाबे आहेत. वर चढुन गेल्यावर बघितले तर जवळपास चार पाच हजार लोक दर्शनाला लाईनमधे उभे होते. त्यातच आरती करिता जवळपास अर्धा तास लाईन बंद केली होती. मंदिर परिसर खूपच विस्तिर्ण होता. तेथे असलेली मंदिरे सोनेरी रंगाची होती.
माता ज्वालामुखीचे कांगडा जिल्ह्यातिल हे मंदिर सर्व ज्वालाजी मंदिराच्या रचने प्रमाणेच आहे. चतुष्कोनी असलेल्या या मंदिराला घुमट असलेला कळस आहे. मंदिराच्या गाभा-यात अखंड तेवत रहाणारी मुख्य ज्योत आहे. शिवाय आणखिही सात किंवा नऊ ज्योती तेवत असतात. त्या ज्योती हे सात आसरा किंवा बहीणींचे प्रतिक आहे, तर नऊ ज्योती हे नव दुर्गांचे प्रतिक आहे. हे मंदिर खूप प्राचिन आहे. या मंदिराचा उल्लेख महाभारतात तसेच आणखीही काही पौराणिक ग्रंथात आढळतो. पौराणिक कथे नुसार सतीच्या शरिराचे जे एकावन्न तुकडे झाले त्यातिल सतीमातेची जिभ येथे पडली. येथे असणारी ज्योती हे त्या जिभेचे प्रतिक आहे. दुसरे एक मत असे आहे की, सतीची जळती वस्त्रे येथे पडली.
या मंदिरा संबंधी एक कथा सांगितली जाते. एका गुराख्याला त्याच्या गाईंपैकी एक गाय दुध देत नाही असे आढळले. म्हणून तो त्या गाईच्या मागावर राहिला असता त्याने पाहिले की एक मुलगी अरण्या मधुन बाहेर येते आणि गाईचे दूध पिऊन परत चमकणा-या उजेडात अंतर्धान पावते. त्या गुराख्याने ही गोष्ट राजाला सांगितली. राजाला आपल्या राज्यात कुठेतरी सतीची जिभ पडलेली आहे ही गोष्ट माहित होती परंतु बराच शोध करुन देखिल त्याला ती जागा सापडत नव्हती. परत त्याच गुराख्याने त्याला डोंगरामध्ये न विझता पेटत रहाणारी ज्वाला दिसल्याचे सांगितले.
त्यानंतर राजाला ती जागा सापडली आणि त्याला देखिल त्या पवित्र ज्वालेचे दर्शन झाले. राजाने त्या जागेवर मंदिर बांधले आणि तेथे एक पूजारी नेमुन नियमित पूजेअर्चेची व्यवस्था केली. काही काळाने पांडवांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला होता असा लोकांचा विश्वास आहे.
मंदिरामधुन दर्शन घेऊन बाहेर पडेपर्यंत अकरा वाजले होते. अजुन जेवण व्हायचे होते. मंदिरा बाहेर लंगर होता. परंतु तिथे इतकी गर्दी होती की, अजुन दोन तास गेले तरी नंबर लागला नसता, म्हणून मंदिराच्या पायऱ्यांच्या जवळ असणा-या एका वैष्णो धाब्यावर जेवलो आणि मग हॉटेलवर गेलो. उद्या दुपारी वाघा बॉर्डरला जायचे होते आणि तिथल्या कार्यक्रमाला वेळेवर पोचायचे होते. त्यामुळे उद्या लवकर निघायला हवे होते. जाताना वाटेत चिंतपूर्णी या चार धामातिल देवीलाही जायचे होते. अशा तऱ्हेने आजचा दिवस संपला.

*******

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा