दुर्गा कवच
भाग ३
पाटणकर दांपत्य राजापुर बस स्थानकावर पोचले तेव्हा नुकतीच राजापुर बोरीवली बस सुटुन गेली होती. त्यांनी कंट्रोलरकडे कोल्हापुरला जाण्याकरिता बसची चौकशी केली तेव्हा त्यांनी गेल्या पाच सहा तासात कोल्हापुरहून एकही बस आली नाही, बहुदा कोल्हापुरला जाणारा घाट दरड कोसळुन बंद झाला असावा. नंतर त्यांनी पुण्याला जाण्यासाठी आता कसे जावे असे विचारले असता, “आज सगळीकडेच जोरदार पाऊस कोसळत असल्याने कोणत्याही घाटाने जाणे धोकादायकच आहे. त्यातच चिपळुण, खेड, महाड, नागोठणे या गावांत पाणी भरल्याच्या बातम्या येत आहेत. अजुनतरी मुंबई हायवे चालू आहे, आता पांच मिनिटात येथुन मुंबईला जाणारी बस सुटेल तिने जाणार असाल तर पनवेल पर्यंत जा. पुढे पनवेलहून एक्सप्रेस हायवे ने तुम्ही पुण्याला जाऊ शकाल.” असा सल्ला कंट्रोलरने दिला.
पाटणकरांना कंट्रोलरचे म्हणणे पटले व ते दोघेजण राजापुर मुंबई बस मध्ये बसले. योगायोगाने देवी हंसोळहून ते ज्या बसने आले होते तिच बस त्याच ड्रायव्हर कंडक्टर सह मुंबईला जात होती. त्यामुळे त्यांना हायसे वाटले. त्यांना अगदी पुढची म्हणजे ड्रायव्हरच्या मागची सिट मिळाली होती. त्यामुळे रस्त्यावरच्या खड्ड्यांमध्ये गाडी आपटली तरी फारसे धक्के जाणवत नव्हते.
बसने राजापुर सोडल्यानंतर लगेचच त्यांनी फोन करुन ही गोष्ट अनिकेतला सांगितली. त्याचप्रमाणे त्यानी आपला मुलगा माधवला बाकी सगळे मार्ग बंद आहेत म्हणून आम्ही राजापुरहून पनवेलकडे निघालो आहोत. एक्सप्रेस हायवे ने उद्या आठ वाजे पर्यंत पोचू असे फोन करुन सांगितले.
राजापुर सोडल्यापासुन पावसाची संततधार चालू होती. रस्त्याच्या दुतर्फा पाण्याचे लोटच्या लोट वहाताना दिसत होते. बघता बघता गाडीने संगमेश्वर गाठले. संगमेश्वरला सर्वत्र पाणीच पाणी झालेले दिसत होते. पुलाच्या काठोकाठ पाणी होते. सगळीकडे काळोखमिट्ट होता. पावसामुळे हवेत गारठा आला होता. म्हणून सौ पाटणकरांनी देवीच्या देवळात घेतलेली ती छोटी साडी बाहेर काढली आणि ती रुमालासारखी डोक्याला बांधली. त्यामुळे त्यांची थंडी जरा कमी झाली.
रात्रीचे पावणे अकरा वाजले. बस चिपळुण बस स्थानकात जेवण्यासाठी थांबली. तेव्हा पाटणकर दांपत्यही उतरले. आज बसमध्ये फारशी गर्दी नव्हती. राजापुरमधुन आठ जण बसले. त्यानंतर वैभववाडीला तिघेजण चढले होते. शेवटी संगमेश्वरला दोन जोडपी चढली होती. त्यापैकी बरीच लोक पनवेललाच उतरणार होती. कंडक्टरने नेहमीप्रमाणे गाडी जेवणासाठी वीस मिनिटे थांबेल अशी घोषणा केली. चिपळुण स्थानकातही सर्वत्र पाणीच पाणी झालेले होते.
चिपळुणचे एस्. टि. कँटीन त्यामानाने स्वच्छ होते. पाटणकरांनी सौंना विचारले काय मागवुया? त्यावर त्यांनी मला फारशी भूक नाही मी फक्त कॉफी आणि बिस्कीटे घेईन. तुम्ही पाहीजे तर जेवा नाहीतर काहीतरी खायला मागवां. त्यावर पाटणकर म्हणाले मीही कॉफीच घेईन. कँटीनमध्ये जरा गर्दी जाणवत होती. एकदम पांच सहा गाड्यांचे पॅसेंजर जमा झालेले दिसत होते.
वेटर ऑर्डर घ्यायला आल्यावर त्यांनी त्याला कॉफी आणि गुड डे बिस्कीटपुडा आणायला सांगितला. त्यांनी सहजच वेटरला विचारले आज इथे खूप गर्दी वाटते आहे. त्यावर त्याने हो राजापुर-बोरीवली, जयगड-मुंबई, दोन मुंबईहून आलेल्या बस आणि राजापुर-मुंबई एवढ्या बस एकदम आल्याने गर्दी दिसत आहे असे सांगितले. कॉफी येईपर्यंत मी आर्याला फोन करते असे सौ. मोहीनीनी पाटणकरांना सांगितले. त्यावर कशाला उगाच एवढ्या रात्री फोन करतेस ती झोपली असेल! असे ते म्हणाले. परंतु एवढ्यात काही ती झोपत नाही, म्हणून मोहिनी यांनी तिला फोन केलाच. फार काही न बोलता, आम्ही चिपळुण पर्यंत पोचलो आहोत. आता आमच्या दोघांच्याही फोनच्या बॅट-या संपत आल्या आहेत तेव्हा परत फोन करायला जमेलच असे नाही. असे त्यांनी आर्याला सांगितले. तिनेही इकडेपण खूपच पाऊस पडतच आहे. तरीही आम्ही पहाटे साडेपांच पर्यंत गुहागरला जायला निघणार आहोत. त्यातच इकडे वीजही गेलेली आहे, त्यामुळे आमचेही फोन कितपत टिकतात ते बघुया.
फोना फोनीच्या गडबडीत त्यांचा खूप वेळ गेला. त्यामुळे कँटीनमधील सर्वजण गाडीमध्ये निघुन गेले. गाडीमध्ये कंडक्टर सारखा बेल वाजवु लागला होता म्हणून ती दोघे गडबडीने गाडीकडे गेली. गाडीत बसल्यावर मोहीनीच्या लक्षांत आले आपला डोक्याला बांधायचा रुमाल कॅंटीन मध्येच राहीला. म्हणून त्यांनी चव्हाण ड्रायव्हरना विनंती केली, माझा देवीचा प्रसाद म्हणून घेतलेला रुमाल कॅंटीनमध्ये राहीला आहे, प्लीज तेवढा मी तो घेऊन येते. त्यावर त्यांनी झटकन या! आधीच खूप उशीर झाला आहे. आपल्या नंतर आलेल्या बसदेखिल पुढे निघुन गेल्या आहेत.
त्यावर हो ही आलेच! असे म्हणून त्या झटकन कँटीन मध्ये गेल्या. तिथे त्यांना तो रुमाल दिसेना. म्हणून त्यांनी त्यांना सर्व्ह करणा-या वेटरला शोधुन काढले. त्याने तो रुमाल उचलुन ठेवला होता. तो काढुन दिला. या गडबडीत बसला मात्र चांगला वीस मिनीटे लेट झाला.
*******
चिपळुणहून सुटल्यावर कंट्रोल पॉईंटवर नोंद करण्यापुरतीच बस घाटात थांबली होती. बसमधले कंडक्टर आणि पाटणकर दोघे वगळता गाढ झोपले होते. पोलादपुरला बस पोचली तेव्हा सव्वा बारा वाजले होते. तिथे फक्त एक मिनिटच बस थांबली आणि भरधाव वेगाने निघाली. पहाता पहाता आठ दहा किलोमिटर अंतर मागे गेले आणि अचानक रस्त्याच्या मधोमध एक माणूस वेड्यासारखा दोन्ही हात हलवत उभा होता. हे लांबुनच चव्हाणांनी पाहिले ते बघुन त्यांनी गाडीचा स्पीड एकदम कमी केला आणि त्यांनी पाठीमागे जागे असलेल्या पाटणकरांना विचारले, पाटणकर साहेब मी बघतोय तेच तुम्ही बघताय नां?
हो! हो!! चव्हाण, तो माणूसच आहे, काहीतरी अँक्सीडेंट झालेला दिसतोय. तुम्ही गाडी थांबवा. पाटणकरांचा आणि चव्हाणांचा हो संवाद ऐकुन अर्धवट झोपेत असलेले पवार कंडक्टर चांगले जागे झाले.
गाडी अचानक थांबताच गाडीतले सगळेचजण जागे झाले आणि खाली उतरले. खाली उतरल्यावर बघतात तो एक माणूस हाफ चड्डीतच रस्त्यांत उभा होता. चेह-यावरुन खूप घाबरलेला दिसत होता. पाटणकरांनी आधी त्याला आपल्या जवळच्या बाटलीतुन पाणी प्यायला दिले. तो जरा नॉर्मल होताच त्याला काय झाले असे चव्हाणांनी विचारले. त्यावर त्याने हातातल्या बॅटरीने समोरचा रस्ता दाखवला. तो बघताच चव्हाण अक्षरश: त्याच्या पाया पडले. तेव्हा बाकी सगळेजण हा काय प्रकार आहे ते विचारायला लागले. तेव्हा चव्हाण गाडीत गेले आणि त्यांनी गाडीचे हेड लाईट लावले.
गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात समोर पहातात तो काय? रस्त्यातल्या पुलाचा मोठ्ठा भागच गायब झालेला होता. ते दृष्य बघताच सगळ्यांच्याच काळजाचे पाणी पाणी झाले. त्यानंतर मग त्यांनी त्या रस्त्याच्या मधोमध आपल्या जीवाची पर्वा न करता बसला थांबवणा-या त्या देवदूताची चौकशी करायला सुरवात केली. तेव्हा त्याने आपण काय बघितले ते सांगितले.
तो म्हणाला पुलाच्या पलिकडे जे गॅरेज दिसत आहे तिथे मी काम करतो. अकरा वाजे पर्यंत आम्ही काम करित होतो. त्यानंतर बाकी सगळे आपापल्या घरी गेले. मी रात्री गॅरेजमध्येच झोपतो. झोप येईपर्यंत खिडकीत बसुन मी मोबाईलवर गाणी ऐकत होतो. खिडकीतुन हायवेवरील जाणा-या येणा-या गाड्यांचे हेडलाईट मला दिसत होते. पण बघता बघता माझ्या लक्षांत आले, अरे! मुंबईकडे जाणा-या गाड्यांचे हेडलाईटस् अचानक गायब होत आहेत.
पहिल्यांदा मला हा भास वाटला. पण नंतर मला काहितरी गडवबड आहे हे लक्षांत आले. कोणाला मदतिला बोलावायला कोणीच नव्हते. शेवटी मी मनाची तयारी केली, गॅरेजमधली बॅटरी घेतली आणि या गोव्याच्या दिशेने जाणा-या नव्या पुलावरुन पलिकडे गेलो. बघतो तो जुन्या पुलाचा मधला मोठा भागच गायब झालेला होता. तेव्हा मला गाड्यांचे हेडलाईट का गायब होते ते लक्षांत आले. आतापर्यंत ब-याच गाड्या वाहुन गेल्या असाव्यात. म्हणून मग मी मनाशी ठरवले आपण आता रस्त्याच्या मधोमध उभे राहुन येणारी गाडी थांबवायची. आणखी कोणतीही गाडी वाहुन जाऊ द्यायची नाही. तेवढ्यांत तुमची गाडी आली. तुम्ही भूत बित समजुन सरळ गाडी पुढे आणलित नाही म्हणून नशिब! नाहितर तुमच्याबरोबर मी सुद्धा नदीत गेलो असतो.
अरे बाबा! तू खरचं देवदूत म्हणून पुढे आलास! नाहीतर आज आम्ही देखिल नदीच्या प्रवाहात कुठे असतो कोण जाणे? चव्हाण म्हणाले. माझी गाडी अगदी शंभरच्या स्पीडने धावत होती. तुम्हाला पाहिले तेव्हा मला क्षणभर भूतच आहे असे वाटले. परंतु हे पाटणकर काका जागे होते म्हणून मी स्पीड कमी करुन गाडी थांबवली.
बरं ते असु दे! आमच्या गाडीत फायबरचे दोन रेडीयम इंडीकेटर आहेत आपण ते रस्त्यात मधोमध दगडांच्या सहाय्याने लाऊन ठेवु. रात्रीच्या वेळी रस्त्याच्या मधोमध उभे राहुन वाहन थांबवणे धोक्याचे आहे. ही फार मोठी घटना आहे, त्यामुळे याची खबर पोलीसांना आणि बाकी सर्व सरकारी खात्यांना द्यायला हवी. तेव्हा आम्हाला जायला हवे. आम्ही महाडहून तातडीने इकडे मदत पाठवतो. तिथुन मदतीला येणा-या माणसांची गाडी येईपर्यंत आम्ही महाड सोडणार नाही. तुझ्या मदतिला कोणाला थांबवु काय? पण तू ही आता गॅरेजवर जाऊन आराम कर. आपण आता हा रस्ता अडथळा लाऊन पूर्ण बंद करु.
गाडीतल्या प्रवाशांच्या मदतीने चव्हाणांनी गॅरेज मधुन गाडीच्या मोडक्या सिट आणल्या त्या, आजुबाजुचे मोठे दगड आणि त्यांच्या गाडीतल्या इंडीकेटरच्या सहाय्याने मुंबईच्या दिशेने जाणारा रस्ता पूर्ण बंद केला. नंतर सिद्धुला गॅरेजमध्ये सोडुन ते महाडला निघुन गेले. एवढे सर्व होऊन त्यांना महाडच्या एस्. टी स्टँडवर पोचायला त्यांना पाऊण वाजला होता.
महाडच्या स्थानकावर सर्वत्र काळोखाचे साम्राज्य दिसत होते. महाडच्या स्टँडवर ड्युटीवर असलेल्या ट्रॅफिक कंट्रोलरला ही सर्व घटना सांगताच त्याने पोलीस स्टेशनला फोन लाऊन घटनेची माहिती दिली. पोलीस स्टेशनमधील पोलीसांनी ताबडतोब ही घटना जिल्ह्याच्या पोलीस कंट्रोल रुमला कळवली आणि त्यांची गाडी पुलाकडे जाण्यासाठी निघाली. जाता जाता ते एस्. टी. स्टँडवर सविस्तर चौकशी करिता आले. चव्हाण आणि पाटणकर यांच्याकडे चौकशी करुन त्यांची गाडी त्वरीत घटना स्थळी रवाना झाली. त्यांच्यापैकी एकजण सविस्तर वर्दी लिहून घेण्यासाठी थांबला.
दरम्यानच्या काळांत सर्वजण सावरले होते. महाडच्या कंट्रोलरने समोरच असलेल्या रस्त्यावरच्या चहाच्या टपरीवरुन सर्वांकरिता चहा मागवला. त्यामुळे सर्वप्रवासी बसलेल्या धक्यामधुन थोडे भानावर आले. ते सर्वजण सौ पाटणकरांचे आभार मानायला लागले. त्यावर मोहीनीताईंनी माझे आभार कशाबद्दल असे विचारताच, सर्वजण त्यांना तुम्ही जर चिपळुणला कँटीनमध्ये राहिलेला रुमाल आणायचा आग्रह धरला नसतात, तर आज आपण सर्वजण नदीत पाण्याखाली असतो असे म्हणाले.
त्यावर त्यांनी जे वक्तव्य केले ते फार महत्वाचे होते. त्या म्हणाल्या, अहो तो नुसता साधा रुमाल असता तर मी परत कँटीनमध्ये गेलेच नसते. पण तो मी कालच श्री आर्यादुर्गादेवीचा प्रसाद म्हणून घेतलेला होता. तो रुमाल तिथे विसरण्यामागे तिचाच काहितरी सुप्त हेतू असला पाहिजे. नाहितर मी सहसा माझा डोक्याला बांधायचा रुमाल काढुन न ठेवता गळ्यांत अडकवुन ठेवते. मला वाटते तो रुमाल हे जणू आपल्या सर्वांकरिता देवीने दिलेले कवचच होते.
मोहिनी पाटणकरांचे हे बोलणे चव्हाण ड्रायव्हरसह सर्वांनाच पटले. मग सर्वांनीच श्री व सौ पाटणकरांचे त्या रुमालासह आपापल्या मोबाईलवर फोटो काढुन घेतले. काहींनी त्या रुमालरुपी देवी कवचाचे हात जोडून आणि तो मस्तकी लाऊन दर्शन घेतले. त्यांचे हे बोलणे पोलींसाचा तिथे थांबलेला माणूस लक्षपूर्वक ऐकत होता. मग त्यानेही त्या देवी कवचाचे हात जोडून दर्शन घेतले. त्यानतर त्याने बसमधले प्रवासी, ड्रायव्हर, कंडक्टर यांच्याशी बोलुन सविस्तर रिपोर्ट तयार केला त्यावर त्या सर्वांच्या सह्या घेतल्या.
सर्व सोफस्कार झाल्यावर ती बस मार्गस्त झाली. आता एवढ्या रात्री कोणाला काही कळवायला नको म्हणून पाटणकरांनी कोणालाच फोन केला नाही. त्या दोघांच्या फोनची बॅटरी देखिल संपण्याच्या बेतात होती. यथावकाश त्यांची बस पनवेलला पोचली. चव्हाणांनी स्वत: थांबुन पाटणकर दांपत्याला पुण्याला जाणा-या बसमध्ये बसवुन दिले.
सकाळी आठ वाजता ते दोघे त्यांच्या सूनेला अँडमीट केलेल्या मॅटर्निटी होममध्ये पोचले. ते पोचल्यावर काही मिनीटातच त्यांची सून माधवी प्रसूत होऊन तिने गोंडस कन्यारत्नाला जन्म दिला.
***********