भाग ४
आज श्रावण महिन्याचा पहीला दिवस आणि पहिला सोमवार होता. गुहागर येथे व्याडेश्वर मंदिरात गर्दी दिसत होती. कालच्या पेक्षा आज हवामान जर बरे होते. म्हणजे पावसाची संततधार चालू होती त्याच्याऐवजी पाऊस थांबुन थांबुन पडत होता. अनिकेत, आर्या, अनिकेतचे आई बाबा सर्वजण सकाळी आठ वाजताच गुहागरयेथे हजर झाले होते. त्यांनी आपल्या आंघोळी देवीहंसोळच्या भक्त निवासाताच उरकल्या होत्या. गुहागरला आल्यावर ते सर्वजण थेट पाटणकरांचे नेहमीचे अंजर्लेकरगुरुजी यांच्या घरी गेले होते. त्यांच्या घरी अनिकेत आणि आर्याने आपले प्रवासी कपडे बदलुन अभिषेकाकरिता कद आणि पैठणी नेसल्यावर सगळेजण चहापाणी करुन देवळांत आले होते. तेथे अंजर्लेकर गुरुजी त्यांची वाटच पहात होते. ते येताच त्यांनी अनिकेत आणि आर्याला थेट गाभा-यात नेले. आणि त्यांच्या हस्ते संकल्प करुन यथाविधी रुद्राभिषेक संपन्न केला.
सर्वांचे विधिवत दर्शन होताच त्यांनी आपली गाडी गुहागर मध्येच असलेल्या दुर्गा देवीच्या दर्शनाला नेली. तेथुन परत ते अंजर्लेकर गुरुजींच्या घरी गेले. तिथे जाऊन त्यांच्या हॉलमध्ये बसल्यावर नाश्ता तयार होईपर्यंत वेळ जावा म्हणून त्यांनी टि. व्ही लावला. कालपासुन बातम्या बघितल्या नव्हत्या म्हणून त्यांनी प्रथम न्यूज चॅनेल लावला तो, त्यावर सतत ब्रेकींग न्यूज दाखवत होते. महाडच्या सावित्री नदीवरील पूल पुराच्या पाण्याच्या लोंढ्याने वाहून गेला. त्यामध्ये अनेक वाहने वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यांत येत होती.
ते ऐकल्यावर आर्याने धीरच सोडला. कारण तिच्या आई बाबांचा रात्री अकरा वाजता चिपळुणला असल्याचा फोन होता. त्यानंतर त्यांचा संपर्क झालाच नव्हता. पुल वाहून गेल्याची वेळ आणि त्यांची महाडच्या आसपास असण्याची वेळ एकच असल्याचे त्यांच्या लक्षांत आले. दरम्यान राजापुर डेपोची आणि रत्नागिरी डेपोची अशा दोन बस बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत होते. मग मात्र अनिकेत, अशोकराव, अनिकेतची आई यासर्वांनी आपल्या मोबाईलवरुन त्यांच्याशी संपर्क करायचा प्रयत्न करायला सुरवात केली. एकुणच सर्व हकीगत समजताच अंजर्लेकर गुरुजींच्या मुलानेही आपले कॉन्टॅक्ट वापरुन बातमी काढायचा प्रयत्न करायला सुरवात केली. त्याने चिपळुण येथिल आपल्या मित्राला एस्. टी. स्टँडवर जाऊन खात्रीची बातमी द्यायला सांगितले.
मधल्या काळात माधवलाही फोन लावायचा प्रयत्न करत होते पण तो सारखा एंगेज लागत होता. थोड्याच वेळात चिपळुणहून गुरुजींच्या मुलाला त्याच्या मित्राचा फोन आला. त्याने बातमी सांगितली ती अशी होती. रात्री अकरा वाजता चिपळुणच्या कँटीनमध्ये मुंबईकडे जाणा-या तिन बसेस उभ्या होत्या पैकी जयगड मुंबई आणि राजापुर बोरीवली बस एकदम निघुन गेल्या, मात्र राजापुर मुंबई बस थोड्या उशिराने चिपळुणहून निघाली. पैकी राजापुर बोरीवली आणि जयगड मुंबई बस मिसींग असल्याचे समजते. या सर्वच गाड्यांना महाड थांबा नाही त्यामुळे पेणच्या रामवाडी स्थानकावर चौकशी करायला लागेल.
ती बातमी ऐकुन आर्या म्हणाली, आई बाबाची राजापुर बोरीवली बस चुकली होती. ते राजापुर मुंबई बसमध्येच असतिल. त्या गाडीची बातमी काढायला पाहीजे. त्या गाडीची बातमी कशी काढायची या विचारात ते सर्वजण बसले.
********
देवी हंसोळ येथे भक्तनिवासमध्ये मॅनेजर जोशी देखिल टी. व्ही.वर बातम्या बघत बसले होते. तेही पाटणकर दांपत्य सुखरुप असेल नां किंवा कसे या विचारात बसले होते. तेवढ्यांत त्याच्या मोबाईलची रींग वाजली. बघतात तर चव्हाण ड्रायव्हर यांचा फोन होता. मोठ्या उत्सुकतेने त्यांनी फोन घेतला.
फोनवर हॅलो करताच, चव्हाणांचा एकदम उत्तेजीत झालेला आवाज ऐकु येत होता. ते म्हणाले अहो जोशी तुम्हाला लाख लाख धन्यवाद. त्यावर जोशींनी विचारले मी अस काय केले म्हणून तुम्ही सकाळी सकाळी मला धन्यवाद देत आहात.
अहो! तुमच्यामुळेच आज माझ्यासह माझ्या गाडीतल्या एकोणीसजणांचे प्राण वाचले आहेत! चव्हाण म्हणाले.
ते कसे काय? मी काय केले! जोशींनी विचारले.
अहो तुमच्याच सांगण्यावरुन मी तुमचे पाव्हणे पाटणकर जोडप्याला देवी हंसोळहून राजापुरला आणले. पुढे मी तिकडुन आणलेली बसच कंट्रोलरनी मुंबईकरीता लावली. आणि आम्हा दोघांची जोडीच मुंबईला पाठवली. नंतर त्यांनी सविस्तर हकिगत सांगितली. शेवटी ते म्हणाले, अहो शेवटच्या क्षणी जेव्हा त्या तुटलेल्या पुलाच्या आधी जर पाटणकर जागे नसते तर मी त्या गाडी अडवणा-या माणसाला भूत समजुन त्याच स्पीडमध्ये पुढे न्यायचा विचार करत होतो.
मग यात माझे क्रेडीट काहीच नाही. देवीचा आशिर्वादाचे कवच तुमच्या पाठीशी होते म्हणूनच देवीने ही लिला केली आहे. नाहीतर सौ पाटणकर रुमाल विसरल्याच नसत्या. त्या रुमालाच्या रुपाने आई आर्यादुर्गेने आपले कवचच तुमच्या बरोबर दिले होते. तेव्हा तुम्ही राजापुरला आलात की सगळी कामे सोडुन आधी देवीच्या दर्शनाला या आणि माझ्या ऐवजी तिचे मनापासुन आभार माना.
**************
आता नऊ वाजुन गेले होते. आई बाबांचा पत्ता लागत नाही म्हणून आर्याचे डोळे रडुन रडुन लाल झाले होते. अशोकराव आणि अनघाताई तिला समजवायचा प्रयत्न करीत होते. ते बाहेरुन दाखवत नसले तरी त्यांचाही जीव वरखाली होत होता. सोय-यांचा फोनही लागत नव्हता. त्यांचा नाही तर नाही माधवचाही फोन लागत नव्हता. तेवढ्यात अशोकरावांचा फोन वाजायला लागला. बघतायत तो देवी हंसोळच्या जोशींचा फोन होता. तो फोन नंबर बघुनतर त्यांना धसकाच बसला, आता काय बातमी ऐकायला मिळते या चिंतेत त्यांनी आर्यादुर्गेचे स्मरण करुन फोन उचलला.
पलिकडुन जोशींचा आवाज एकदम उत्साहाने भरलेला ऐकायला येत होता. त्यावरुन त्यांनी बातमी चांगली आहे असा अंदाज बांधला. पलिकडुन जोशी म्हणत होते, तुम्ही चिंतेत आहात असा तुमचा आवाज सांगतोय. तेव्हा मी सांगतो ते ऐका तुमचे सोयरे अगदी सुखरुप आहेत. आताच मला चव्हाण ड्रायव्हर यांचा फोन आला होता. त्यांनी तुमच्या सोय-यांना पनवेलला पुण्याच्या बसमध्ये बसवुन दिले आहे. आतापर्यंत ते जागेवर पोचले असतिल. त्यांच्या फोनची बॅटरी संपल्याने ती चार्ज केल्याशिवाय त्यांचा फोन लागणार नाही. असे म्हणून त्यांनी देवीने सर्वांचे कसे रक्षण केले, ती चव्हाणांनी सांगितलेली सर्व हकीगत त्यांना सांगितली.
त्यावर अरुणरावांनी जोशींचे योग्यवेळी फोन करुन चिंतामुक्त केल्या बद्दल मनापासुन आभार मानत फोन ठेवला आणि हॉलमध्ये बसलेल्या सर्वांना सविस्तर हकिगत सांगितली. त्यावर नुकतेच ही बातमी समजली म्हणून घरी आलेले अंजर्लेकर गुरुजी म्हणाले, देवीचे कवच पाठीशी होते म्हणूनच हे सर्व शक्य झाले! नाहीतर आज काळ आलेला होताच, पण देवीने आपल्या शक्तीने त्याला पार दूर पळवुन लावला! हे नक्कीच!
तेवढ्यात आर्याचा फोन वाजायला लागला, त्यावर आईचा नंबर बघताच आर्या एकदम खूष झाली. तिने फोन उचलताच, अग आई कुठे आहेस तू? इथे टि. व्ही. वर निरनिराळ्या बातम्या ऐकुन आमच्या जीवाचे काय झाले असेल याची काही कल्पना ? बॅटरी संपलीतर दुस-या कोणाच्या फोनवरुन फोन करायचा नां!
अगं हो! हो! मला समजतेय तुझी काय अवस्था झाली असेल ती, पण इथे काय झालेय माहीत आहे का? आताच माधवी प्रसूत होऊन कन्यारत्न झालेय! अग तू आत्या झालीयस! इथे उतरल्या उतरल्या हे सर्व झाल्यामुळे आम्हाला फोन चार्ज करायलाच मिळालाच नाही. अजुन आमचे माधवशी रात्रीच्या प्रवासातिल प्रसंगाबद्दल बोलणे देखिल झाले नाही. तरीपण सॉरी, मी कुठुनतरी फोन करायला हवा होता हे अगदी बरोबर. पण आजी झाल्याच्या नादात राहूनच गेले. सगळ्यांनाच मनापासून सॉरी सांग. सगळेचजण काळजीत असतिल. बाकी सर्व आपण प्रत्यक्ष भेटीतच बोलू. सगळ्यांना आम्ही इकडे बोलावले आहे असे सांग. तुझे बाबा तसा फोन करतिलच.
आईशी फोनवर झालेले बोलणे आर्याने सगळ्यांना सांगितले आणि सगळे एकदम खूष झाले. त्यामुळे मगाच पर्यंत काळजीने भरलेले वातावरण एकदम बदलुन गेले.
सगळ्या गोष्टी सुरळीत झालेल्या बघुन अंजर्लेकर गुरुजींनी सर्वांचा निरोप घेतला. त्यांनी सांगितले मला आता निघायला हवे. आज पहिला श्रावणी सोमवार असल्याने देवळात बरीच कामे आहेत. त्यामुळे मला यायला उशिर होईल. तरीही तुम्ही सर्वांनी आता इथुन जेऊनच जा. ज्याला कोणाला सोमवारचा उपवास असेल त्यांचीही सोय होईल. तेव्हा अनमान करु नका.
डेक्कन जिमखान्यावरील पाटणकरांच्या फ्लॅटमध्ये आज एकदम उत्साहाचे वातावरण होते. सनईचे मंद सूर वातावरणांत भरुन राहिले होते. सगळीकडे लगबग जाणवत होती. हॉलमध्ये फुलांनी सजवलेला पाळणा ठेवला होता. आजुबाजुला बारश्याची परंपरागत तयारी केलेली दिसत होती. पाटणकर आणि फणसळकरांच्या दोन्ही परिवारातले सर्व सदस्य आज येथे उपस्थित होते. समारंभ अगदी घरगुती स्वरुपाचा ठेवलेला होता. फक्त फणसळकर आणि माधवच्या सासुरवाडीच्या लोकांनाच कार्यक्रमाला बोलावले होते.
मुलीला पाळण्यात घालायचा मुहूर्त होताच हजर असलेल्या पांच सुवासिनींच्या हस्ते तिला पाळण्यांत घालण्यांत आले. मुलीचे नांव आजीच्या खास आग्रहास्तव दुर्गा ठेवण्यांत आले. दुर्गाच्या अंगावर घालण्यासाठी मोहिनीताईंनी म्हणजेच तिच्या आजीने खास दुलई तयार करुन घेतली होती. ती दुलई त्या प्रसिद्ध आर्यादुर्गचा प्रसाद म्हणून आणलेल्या छोट्या साडीपासुन बनवीली होती. ती तीच साडी होती. जिचा फोटो घराघरांत सगळ्यांना माहित झाला होता.
दुर्गाच्या जन्माच्या आधी झालेल्या सावित्री नदी दुर्घटनेतुन आश्चर्यकारकरीत्या बचावलेल्या पाटणकर दांपत्याचा शोध घेत घेत सगळे चॅनेलवाले पुण्याला त्यांच्या घरी पोचले होते. त्यापूर्वी म्हणजे पुलाची दुर्घटना झाली, त्याचा सविस्तर रिपोर्ट महाड पोलीसांना दिल्यानंतर चव्हाण बस घेऊन मुंबई सेंट्रल बस स्थानकावर पोचले. तेव्हा चॅनेलच्या सर्व पत्रकारांची फौज त्यांची वाटच बघत कॅमे-यांसह हजर होती. तेव्हा चव्हाणांनी चॅनेलवाल्यांना देवी हंसोळहून निघाल्या पासुनची सर्व हकिगत सविस्तर स्वरुपांत सांगितली होती.
त्यानंतर न्यूज चॅनेल, प्रिंटमिडीयाच्या पत्रकारांनी पाटणकर दांपत्याला गाठले होते आणि देवी कवच या विषयावर वर्तमानपत्रामध्ये कव्हर स्टोरी छापली होती. त्यात आर्यादुर्गा मंदिरापासुन ते अगदी त्यांच्या जवळ असलेल्या प्रसादाच्या साडी पर्यंत सर्व बाबी फोटोसह छापल्या होत्या. तर चॅनेलवर स्पेशल स्टोरी सगळ्या व्हीडीओ सह वारंवार दाखविली होती.
सगळ्यांचे दुर्गाला औक्षण करुन झाल्यावर मोहिनीताई उठल्या आणि आपल्या जवळची ती खास दुलई दुर्गाच्या अंगावर पांघरत म्हणाल्या आई आर्यादुर्गेने आमचे जसे आलेल्या अरिष्टापासुन रक्षण केले, तसेच या तिच्या कवचाने माझ्या नातीचेही सर्वप्रकारच्या अरिष्टापासुन कायम रक्षण करो ही तिच्या चरणी प्रार्थना. त्यावर उपस्थित असलेल्या सगळ्यांनी तथाSSस्तु तथाSSस्तु म्हणून त्याला अनुमोदन दिले.
**********