बुधवार, १४ डिसेंबर, २०१६

हिमालयाच्या सहवासात भाग २

२) बडोदा ते कटरा (माता वैष्णोदेवी)



            मातेच्या इच्छेनुसार आज सकाळी बांद्र्याहुन सुटलेल्या आणि दुपारी एकच्या सुमारास बडोद्यात दाखल झालेल्या स्वराज एक्सप्रेसमध्ये सौ वर्षासह दाखल झालो. गाडीमध्ये आमच्या स्वागता करीता आमच्या या सहलीमधले सहप्रवासी १) श्री सुरेश व सौ केतकी, २) श्री नंदकुमार व सौ संध्या, ३) श्री नारायण उर्फ नाना व सौ नंदिनी(माधुरी) आणि ४) श्री विकास व सौ विप्रा उपस्थित होते.
गाडीमध्ये मला मिळालेला स्लिपर पांच बोगी पुढे होता. परंतु मी केवळ रात्री झोपण्यापुरताच त्या बोगीमध्ये गेलो होतो. आमच्या बोगीमध्ये जवळपास सर्वच महाराष्ट्रीयन लोक होते. त्यापैकी एक कुटूंब दरवर्षी वैष्णोदेवीला जाणारे होते. त्यांचे देखिल असेच म्हणणे होते की आई वैष्णोदेवीने बोलावल्या वाचुन कोणिही तिला भेटायला जाऊ शकत नाही. चर्चा करता करता अनेक राज्य पार होत होती. आमची गाडी अनेक राज्यामधुन जाणार होती. ती अशी १) महाराष्ट्र, २) गुजरात३) राजस्थान, ४) मध्य प्रदेश, ५) दिल्ली, ६) हरीयाणा७) हिमाचल प्रदेश, ८) पंजाब, ९) जम्मु आणि काश्मिर.
आमचा ग्रुप पूर्ण तयारीने आलेला होता. आमच्या बरोबर तयार नाश्ता तर होताच परंतु आयत्यावेळी झटपट तयार करता येईल असे नाश्त्याचे साहित्य देखिल हजर होते. त्या शिवाय गरमा गरम चहा कॉफी तयार करण्याची सामुग्री देखिल होती. आम्ही गाडीमध्ये स्थिरस्थावर होताच सर्वप्रथम जेवणाचा कार्यक्रम झाला. लवकरची गाडी असल्यामुळे सगळेचजणच पहाटे लवकर उठले होते त्यामुळे पोटात भर पडताच प्रत्येकजण डुलक्या घ्यायला लागला.
संध्याकाळी पांच साडेपांचच्या सुमारास सगळे जरा ताजे तवाने झाल्यावर चहा कॉफीचा कार्यक्रम झाला. मग मात्र पत्यांचा कॅट बाहेर पडला. मेंडिकोट, बदाम सातचा डाव सुरु झाला.
गाडीने गुजराथ सोडल्यानंतर राजस्थान सुरु झाले. सगळीकडे रखरखाट होता,  मैलोन मैल हिरवळीचे नांव नव्हते. नद्यांवर पुल होते पण पाण्याचा पत्ताच नव्हता. तरीही अशा भीषण वाळवंटात लोक आपल्या शेतात काम करीत होते. एवढ्या कडक उन्हात बाजुलाच रेल्वेचा ट्रॅक वाढवायचे काम चालु होते अनेक लोकं तिथे काम करत होती. खरोखरच या सर्व विश्वकर्म्याच्या वंशजाना दिलसे सलाम.
बघता बघता दिवस मावळला काळोख झाला. गाडीतले फेरीवाले फिरायचे कमी झाले. गाडीतल्या पँट्री मधुन जेवणाच्या ऑर्डर पोचवण्याचे काम सुरु झाले. आम्हीही यथावकाश बरोबर आणलेल्या जेवणाचा समाचार घेतला. थोडावेळ पत्ते खेळुन मग मी माझ्या बोगीत जाऊन झोपलो. इकडे नानांनी यांनी रात्रीचा पहारा मी करणार असे सांगितले म्हणून बाकीचे देखिल थोडावेळ जागे तर थोडी झोप अशी झोप घेत राहिले.  दरम्यान रात्री काही लोक दादागिरी करीत होते त्यांना हुसकवुन लावल्याचे नाना सोहनींनी सकाळी सांगितले. थोड्या वेळाने असे समजले की काही हत्यारी लोकांना रात्री दोनच्या सुमारास नवी दिल्लीच्या अगोदर रेल्वे पोलिसांनी याच गाडितुन पकडले होते. क्षणभर मनात आले आपल्या पाठिशी माता होती म्हणून ही घटना दोन बोगी पुढे घडली.
आज दिनांक १५ मार्च नवीन दिवस नविन प्रांत समोर घेऊन आला होता. आता पंजाब राज्य सुरु झाले होते. मोबाईल वरील मेसेज मुळे नविन राज्य सुरु झाल्याचे कळत होते. पंजाब हा प्रांत तसा संपन्न, आसपास गव्हाची, उसाची शेती दिसायला सुरवात झाली. डोळ्यांना सुखद हिरवळ दिसायला लागली होती. बराचसा गहू कापायला तयार झालेला दिसत होता. मधुन मधुन उसाने भरलेले ट्रॅक्टर दिसायला लागले होते. दुकानांच्या पाट्या मात्र पंजाबीत होत्या त्यामुळे आपण निरक्षर असल्या सारखे वाटायला लागले होते.
अनेक स्टेशन्स पास होत होती. बऱ्याच शहरांची नांवे ओळखिची होती. गाडीत अनेक प्रकारचे फेरीवाले येत होते. कोणी बँगांची चेन रीपेर करणारे, तर कोणी बँगांना बांधायच्या साखळ्या विकणारे. खाद्य पदार्थ, चहा, कॉफी विकणारे तर होतेच. परंतु चंदिगढ नंतर मात्र विशेष महिला विक्रेत्या मोठ्या प्रमाणात गाडीत दिसु लागल्या. अनेक प्रकारचे कपडे, विशेषत: जम्मु काश्मिर मध्ये आवश्यक असणारे स्वेटर, कान टोप्या, मफलर, शाली, हातमोजे, पायमोजे विकणा-यांचे प्रमाण जास्त होते.
आमच्या ग्रुपमधल्या लोकांनी फारशी खरेदी केली नाही, कारण आम्हाला अजुन १३-१४ दिवस प्रवास करायचा होता. आणि हे जास्तीचे ओझे आम्हाला परवडणारे नव्हते. आमच्याकडे आधिच प्रत्येकी साधारण दोन दोन बँगा होत्या. शिवाय  खाण्या पिण्याच्या पदार्थांची ओझी वेगळीच.
बघता बघता दिवस उताराला लागला. साधारण तिन साडेतिनच्या सुमारास आमच्या गाडीने जम्मु काश्मिरची बॉर्डर पार केली आणि आम्हा सर्वांच्याच प्रीपेड मोबाईलची नेटवर्क बंद झाली. मी नेटवर वाचले होते त्याप्रमाणे आमच्या गाडी मधुन काश्मिर मधला पहिला टोलनाका दिसु लागताच सर्वांची प्रीपेड सिम बंद पडली. आमच्या ग्रुप मध्ये आता माझ्याकडे एक आणि सुरेशराव यांच्या कडे दोन असे तिन पोस्टपेड मोबाईल चालू होते.
जम्मु काश्मिर मध्ये प्रवेश करताच सिमा सुरक्षा दलाच्या हत्यारबंद जवानांचा वाढलेला वावर जाणवु लागला. आपण आता एका वेगळ्या वातावरणांत आलो आहोत हे प्रकर्षाने जाणवायला लागले. आता कोठेही काहीही होऊ शकते या शंकेने मन थोडे अस्वस्थ झाले. पूर्वी वैष्णोदेवीला जाण्याकरीता जम्मु पर्यंत रेल्वेने आणि नंतर रस्त्याने जावे लागायचे. परंतु आता रेल्वे थेट कत्रा पर्यंत जाते. आमच्या बोगीतील काही लोकांना हे माहिती नसल्याने त्यांनी जम्मु पर्यंतच तिकीटे काढली होती. त्यामुळे ते जम्मुलाच उतरले.
सुमारे अर्धातास जम्मुला थांबुन आमची गाडी कत्र्याच्या दिशेने निघाली. जम्मु ते कत्रा ही रेल्वे लाईन उभारणे मोठे आव्हानात्मक काम होते. खडतर निसर्ग तर होताच, पण अतिरेकी हमला कधीही होईल ही भिती रेल्वे उभारताना कायम होतीच. आपल्याला कोंकण रेल्वेचे काम बघुन निसर्गाच्या आव्हानाची कल्पना आहेच. परंतु कोंकणामधिल कातळ पक्के तरी होते. इकडे कातळ किंवा खडक दिसतच नाही. रेल्वे लाईनच्या बाजुच्या दरडी वरुन लक्षांत येते की, ही दरड म्हणजे अतिशय भुसभुशीत माती आणि छोटे छोटे गोटे यांचे हे मिश्रण आहे. यामधुन मोठ मोठाले बोगदे, उंचच उंच पुल बांधुन ही रेल्वे लाईन बांधलेली आहे. खरोखरच अशी सर्व आव्हाने पेलुन ही रेल्वे लाईन उभारणाऱ्या त्या सर्व निर्मात्यांचे आम्ही शतश: ऋणी आहोत.
कत्रा रेल्वे स्टेशन

अशा प्रकारे संध्याकाळी सुमारे सात वाजता त्या माता वैष्णोदेवीच्या पुण्यभूमीत कत्र्यामध्ये आमची गाडी पोचली आणि आम्ही त्या पवित्र भूमीला वंदन करण्याकरीता गाडीतुन खाली उतरलो.

।। जय मातादी! जय मातादी! जय मातादी! ।।

1 टिप्पणी: